शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या
विरोधात गेले काही महिने जोरदार मोहीम चालू केली आहे. त्यांच्या आवाहनानंतर साईबाबांच्या
देशभरातील विविध मंदिरातील मूर्ती उखडून टाकण्यात आल्या होत्या. आता बजरंगबली हनुमान
साईबाबांवर हल्ला करत आहेत, अशी पोस्टर्स वितरीत करण्यात आली आहेत. त्या निमित्ताने
हनुमानभक्त आणि साईभक्त यांच्यात तेढ वाढवायची अशी व्यूहरचना सुरू आहे. देशभर साईबाबांच्या
विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. साईबाबा मुस्लीम आहेत, मग हिंदूंना त्यांच्याबद्दल
पुळका का, अशी द्वेषाची भाषा वापरली जात आहे.
शंकराचार्य आणि त्यांचे सहकारी साईबाबांविरोधात संताप
का व्यक्त करत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी इतिहासात जावे लागेल. साईबाबा
१८६०च्या दशकात एक दिवस एका वरातीत शिर्डीत आले. १९१७ साली दसऱ्याच्या दिवशी त्यांनी
समाधी घेतली. म्हणजे जवळपास ६० वर्षे ते शिर्डी परिसरात एक फकीर म्हणून वावरले. “एकोप्याने
रहा. त्या एका देवावर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी बाळगा. अल्ला मालिक है. जात-धर्माच्या
पलीकडे जाऊन माणूस बना. माणूस म्हणून जगा,” असा संदेश साईबाबा लोकांना देत असत. शिर्डी
आणि परिसरातल्या शेतकरी समाजात ते एकरूप झाले होते. हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांना
ते एकत्र करून भक्ती मार्गाला घेऊन जाऊ पाहत होते. एक हकीम (वैद्य) म्हणून त्यांचा
बोलबाला झाला होता. जडीबुटीची औषधे देऊन लोकांना ते बरे करत. रोगातून वाचलेल्या, रंजल्या-
गांजल्या माणसांना तो चमत्कार वाटे. साठेक वर्षांत बाबांनी समाजात स्वत:चे स्थान निर्माण
केले. ज्याची जात-धर्म माहीत नाही, कोण, कुठला माहीत नाही, अशा गूढ साईबाबांनी दसऱ्याला
समाधी घेणे, लोकांमधून निघून जाणे हे सारेच साईभक्तांना अकल्पित वाटत आले आहे. १९१७
नंतर शिर्डीत साईभक्तांचा ओघ सुरू झाला. अल्पावधीत बाबांची कीर्ती देशभर पसरली. आज
देशात एकही गाव असे नाही की, तिथे साईभक्त सापडणार नाही. हिंदू, शीख, मुस्लीम, जैन,
ख्रिश्चन, लिंगायत, पारशी, आदिवासी अशा सर्व धर्म-समुदायात साईभक्त दिसतात. म्हणूनच
शिर्डीत दररोज भक्तांचा लोंढा असतो. गेल्या ५० वर्षांत एवढे लोकप्रिय, श्रीमंत झालेले
भक्तिस्थान देशात दुसरे नाही. अयोध्या, वाराणशी, हरिद्वार या धर्मस्थळांपेक्षा शिर्डीचा
बोलबाला मोठा आहे.
सर्व जाती-धर्मातले लोक एकत्र येतात. ते साईबाबांना
मानतात. त्यांची भक्ती करतात. नेमके हेच शंकराचाऱ्यांना खटकते आहे. आपल्याकडे लोक येत
नाहीत, ते साईबाबांकडे कसे जातात, हा त्यांचा राग आहे. शंकराचार्य हे नेहमी धर्मातल्या
मक्तेदारीचे नेतृत्व करत आले आहेत. आपल्या नियंत्रणाबाहेर कुणी संत, फकीर, भक्त, बाबा
लोकप्रिय झालेला त्यांना खपत नाही. हे फार पूर्वीपासून दिसून आले आहे. लोकांनी स्वतंत्रबुद्धीने
देवाची भक्ती करणे, धर्माचे आचरण करणे, देवाशी संवाद साधणे याला शंकराचाऱ्यांचा नेहमी
विरोध राहिला आहे. आपल्यापेक्षा वेगळे धर्ममत, विचार त्यांना मानवत नाही.
सामान्य माणूस एक होऊन स्वतंत्र बुद्धीने धर्माचरण,
देवाशी संवाद करत असेल तर शंकराचाऱ्यांच्या पोटात का दुखते? कारण शंकराचार्य हे नेहमी
विषमता आणि नियंत्रित धर्माचे तत्त्वज्ञान पुढे रेटत आले आहेत. त्यांनी जातिव्यवस्थेचे
गुणगान गायले आहे. स्त्रिया, दलित यांना तुच्छ लेखले आहे. गरीब हा त्याच्या पूर्वजन्मीच्या
पापकर्मामुळे गरिबीत सडत पडलाय हे त्यांचे धर्ममत आहे. आपल्या मतांपेक्षा वेगळे धर्म,
पंथ, संप्रदाय, विचार शंकराचाऱ्यांनी कधीही खपवून घेतलेले नाहीत.
हा संघर्ष फार जुना आहे. आद्य शंकराचाऱ्यांनी भागवत
संप्रदाय हा वेदविरोधी आहे असे म्हणून त्याविरोधात लढे दिले. या लढ्यात रक्तपात घडवण्यात
आले. वास्तविक भागवत संप्रदाय हा वेदांना नाकारत नव्हता. सामान्य लोकांना भक्तीचा मार्ग
उपलब्ध करून देण्याची धडपड तो करत होता. वेद, यज्ञ ज्यांना करायचे त्यांनी करावेत,
पण सामान्य लोकांनी देवांच्या दलालाला धुडकावून लावावे आणि देवाशी प्रत्यक्ष संवाद
करावा असे भागवत संप्रदाय सांगत होता. अशा देवाच्या दारात समता निर्माण व्हावी अशी
भूमिका घेणाऱ्या संप्रदायाला नष्ट करण्यात आदि शंकराचाऱ्यांनी हयात खर्च करावी, याला
काय म्हणावे?
सामान्य लोकांना धार्मिक न्याय, समता यांचा आग्रह धरणाऱ्या
चार्वाक, जैन आणि बौद्ध या दर्शनांशीही धर्माच्या दलाल-मक्तेदारांनी भांडणे केली. ही
तीनही दर्शने सामान्य लोकांना वैदिकांच्या शोषणातून मुक्त करत होती. पण ते धर्माच्या
मक्तेदारांना पटले नाही. त्यांनी गौतम बुद्धांना विरोध केला. मृत्यूनंतर मात्र त्यांना
विष्णूचा अवतार ठरवून निष्प्रभ करण्याचा डाव टाकला.
भागवत संप्रदायाप्रमाणेच नाथ संप्रदायालाही शंकराचाऱ्यांनी
विरोध केला. नाथपंथी तत्त्ववेत्ते गोरक्षनाथ यांनी भारतभर हिंडून वैचारिक क्रांती केली.
नेपाळपासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत त्यांचा प्रभाव वाढला होता. त्यांनी धार्मिक
समता निर्माण केली होती. बंदिस्त धर्म चाकोरीबाहेर आणून सामान्य लोकांसाठी खुला केला.
या नाथपंथीयांशी साईबाबांनी आपली फकिरी नाळ जोडली होती. चक्रधर स्वामींच्या महानुभाव
संप्रदायानेही धर्मसत्तेला आव्हान दिले होते. या सर्वांची त्या त्या काळी शंकराचाऱ्यांनी
कोंडी केली होती. बसवेश्वरांनी जातिप्रथेवर हल्ला केला. लिंगायत हा नवीन धर्म स्थापन
केला. संत कबीरांनी उत्तरेत समाजाला स्वतंत्र ताजातवाना विचार दिला. महाराष्ट्रात संत
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामांपर्यंत विविध संतांनी देवाच्या दलालांना धक्के दिले.
वाळवंटात आध्यात्मिक समता आणली. या सर्व प्रयत्नांचा शंकराचाऱ्यांना राग आहे. पंजाब
परिसरात गुरुनानक यांनी समतावादी शीख धर्माची स्थापना केली. शीख बनलेल्या समाजाने उद्योग,
व्यापार, शेती, शिक्षणात जगात नाव कमावले. केंद्रित धर्माच्या बुरसटलेल्या, विचारांतून
सुटून समतावादी स्वतंत्र विचारांनी सामान्य माणूस काय प्रगती करू शकतो हे शीख समाजाकडे
बघितले की लक्षात येते.
शीख धर्माचाही वेगळा विचार शंकराचाऱ्यांना मानवला नाही.
ख्रिश्चन आणि मुस्लीम हे धर्मही आपल्या समाजात रुजले. परदेशातून आलेल्या या धर्मांचा
काही भारतीयांनी स्वीकार केला. मुस्लीम परंपरेतील सुफी संतांसारखी फकिरी जीवनशैली हे
साईबाबांचे वैशिष्ट्ये होते.
मुद्दा असा की, साई बाबा हे नाथपंथ, सुफी फकिरी या परंपरांशी
उघड नाते दर्शवत राम, कृष्ण या सर्वजनवादी भक्ती परंपरांशीही जोडून घेताना दिसले. हे
एक प्रकारे भारतात विकासित झालेल्या समतावादी, लोकवादी भक्ती संप्रदायाचा वारसा पुढे
नेण्याचा क्रांतिकारी प्रयत्न आहे. तो नियंत्रित धर्मसत्तेला आव्हान देणारा आहे. म्हणूनच
त्याला शंकराचाऱ्यांचा विरोध आहे. या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी मारलीय.
संघाने म्हटलेय, साईबाबा स्वत:ला देव मानत नव्हते. मग भक्त त्यांना देव म्हणून का पुजतात?
हे एका बाजूला बोलत असताना संघाने साईबाबांच्या मूर्ती तोडा या शंकराचाऱ्यांच्या आवाहनाचा
मात्र निषेध केलेला नाही. या भांडणात संघ, शंकराचाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असे चित्र
दिसत आहे.
थोडक्यात, धर्माच्या प्रांगणात स्वतंत्र, समतावादी,
सर्वजनवादी तत्त्वाचा एखादा विचार रुजत असेल तर तो धर्माच्या मक्तेदारांना खपत नाही.
म्हणून साईबाबांच्या भक्तिपंथावर हल्ले सुरू आहेत. तो एका नियोजित कटाचा भाग आहे. म्हणून
सर्वजनवादी, समतावादी धर्मविचार मानणाऱ्यांनी संघटित होऊन शंकराचाऱ्यांच्या नेतृत्वाखालील
नियंत्रित धर्मसत्तेच्या हल्ल्यांचा वैचारिक प्रतिवाद केला पाहिजे. साईबाबांना, साईभक्तांना
बरोबर घेऊन त्याची सुरुवात होऊ शकते.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : ०३/११/२०१५
No comments:
Post a Comment