महाराष्ट्राच्या पोटात सध्या एक गाणे आणि एक वाद खळबळ माजवत आहे. खळबळ
माजवणाऱ्या गाण्याचे बोल असे -
कल्लूळाचं
पाणी, कशाला डवळिले,
नागाच्या
पिलाला, का गं डिवचिले!
सोशल
मीडियात, युट्यूबवर या गाण्याला मिळणारी पसंती बघून त्याची लोकप्रियता जाणता येते.
ठेक्यावरची चाल, डोलायला लावणारा लोकसंगीताचा बाज या गाण्यात आहे. हे गाणे ऐकता ऐकता
दुखावलेली हरएक व्यक्ती आपला अहंकार कुरवाळून घेऊ शकते. आपल्यातले हिंसकपण गाणे ऐकताना
खूश होऊ शकते. आपण जसे आहोत तसे मस्त आहोत असे काल्पनिक सुख हे गाणे देते. डिवचाल तर
दंश करील अशी अभिव्यक्ती हरएकाला देणारे हे गाणे बसल्या ठिकाणी मनोरंजन करून घेता घेता
आपल्याला नागासारखे हिंसक बनवू शकते.
या गाण्यातून समाजमन पुढे येतेय. त्याचा वास्तवात आविष्कार एका वादात
प्रतिबिंबित झालेला दिसतो. बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना घोषित झालेल्या
महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या निमित्ताने हा वाद उफाळून आला आहे. दुखावलेले समाजमन
या वादाच्या निमित्ताने ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. प्रसरामाध्यमांनी या गंभीर वादाकडे
फारसे लक्ष दिलेले नाही. त्याचे कव्हरेज नीट झालेले नाही. या वादाने राज्यात जातीजातींत
घुसळण सुरू आहे. दोन्ही बाजूने जन-मन संतप्त आहे.
बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार शासनाने
रद्द करावा या मागणीसाठी काही सामाजिक संघटनांनी राज्यात अकरा शिवसन्मान जागर परिषदा
घेतल्या आहेत. हजारो लोक या परिषदांना हजर होते. सांगलीच्या परिषदेत लठ्ठालठ्ठी झाली
म्हणून त्याची बातमी झाली. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बुलढाणा, नाशिक,
अहमदनगर, पारनेर, नांदेड, यवतमाळ या ठिकाणीही मोठ्या परिषदा झाल्या. दोन्ही बाजूंनी
तक्रारी, हरकती, आरोप-प्रत्यारोप होताहेत. पोलिस बंदोबस्तात या परिषदा सुरू आहेत. या
परिषदांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, प्रा. प्रतिमा
परदेशी, श्रीमंत कोकाटे हे वक्ते घणाघाती भाषणे ठोकतात. टाळ्या, घोषणा, जल्लोष, त्वेष
त्या भाषणांत असतो. जितेंद्र आव्हाड हे या परिषदांमध्ये स्टार वक्ते असतात. शिवरायांच्या
स्वराज्याचा खोटा इतिहास सांगणाऱ्याला महाराष्ट्रभूषण आणि खरा इतिहास सांगणाऱ्या गोविंद
पानसरे यांची हत्या कशी व का केली जाते यांचे विवेचन परिषदांत केले जाते. राजा शिवछत्रपती
या पुस्तकात पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्याबद्दल गैरसमज
निर्माण करणाऱ्या चलाख्या कशा केल्या हे आव्हाड भाषणात सांगतात. या विपरित लेखनाला
अधिकृत करण्यासाठी राज्य शासन पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देतेय. विदेशातून जेम्स लेन
आला आणि शिवराय-जिजाऊंची बदनामी करून गेला, असे झालेले नाही. पुरंदरेंचे साहित्य म्हणजे
आधुनिक मनुस्मृती आहे. स्वत:ला शिवशाहीर म्हणणाऱ्या पुरंदरेंनी इतिहासाचा खून केलाय.
जिजाऊंचे चारित्र्यहनन करणारे पुरंदरे हेच खरे जेम्स लेन आहेत. जीव गेला तरी बेहत्तर
पण इतिहासाचा खून सहन करणार नाही, असे जळजळीत भाषण आव्हाड करतात, तेव्हा अहं दुखावलेल्या
लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येते.
राज्यभर झालेल्या अकरा जिल्ह्यांतील परिषदांमध्ये आव्हाडांची भाषणशैली
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याशी मिळतीजुळती दिसली. दुखावलेल्या मुस्लिम समूहाला
ओवेसी चेतवतात. त्या समूहाचे नकारात्मक राजकियीकरण करतात. आक्रमक भाषणे, आव्हाने देण्याची
धमक-भाषा, अहं सुखावणारा अजेंडा, मुद्द्यांचे अभ्यासून आणि साभिनय सादरीकरण, विनोद-उपहास-इशारे,
भाषेचे खेळ यांनी भरलेल्या उत्कृष्ट एकपात्री प्रयोगासारख्या ओवेसी सभा रंगवतात. आपले
राजकारण पुढे रेटतात. आव्हाड आणि ओवेसी यांच्यात हे समान धागे दिसतात. दोघांच्या भाषणांना,
सभांना म्हणूनच प्रतिसाद मिळतो. दोघेही लोकांना चेतवण्यात माहीर ठरताहेत.
आव्हाडांची ओवेसी यांच्याशी तुलना करण्याचा इथे हेतू नाही. ओवेसी किंवा
आव्हाडांना हिणवण्याचा तर नाहीच नाही. उलट राजकारणात आक्रमकपणा आणि अभ्यासूपणा यांचा
मेळ दुर्मीळ आढळतो. उजव्या पक्षांकडे आक्रमक नेते खूप, अभ्यासू कमी. डाव्या, मध्यममार्गी
पक्षांकडे अभ्यासू बरेच, पण जनमाणसाला गदगदा हलवणारे आक्रमक नेते कमी. दत्ता सामंत,
दि. बा. पाटील असे अपवादात्मक नेते होऊन गेले. (जॉर्ज फर्नांडिस यापैकीच एक.) ते अभ्यासू
होते आणि आक्रमकही. आव्हाडांना दत्ता, दि.बा., जॉर्ज यांचे वारस होता येऊ शकेल. तेवढे
गुण त्यांच्याकडे नक्कीच आहेत.
इथे मुद्दा आहे राज्यात पुरंदरेंच्या निमित्ताने गंभीर बनलेल्या वादाचा
आणि त्यातून वाढणाऱ्या विखाराचा. या वादात संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या मित्र संघटना
विरुद्ध पुरंदरेप्रेमी संघटना यांच्या टकरावातून सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. तो
ब्राह्मण-ब्राह्मणेतर या फॉर्ममध्ये भडकत आहे. गोविंद पानसरे यांच्या खुनाची या वादाला
पार्श्वभूमी आहे. पानसरे हे जातीपलीकडे गेलेले कॉम्रेड-कम्युनिस्ट नेते. त्यांनी कधी
त्यांची जात सांगितली नाही. मिरवली तर अजिबात नाही. जातीची घमेंड म्हणजे पराभवाचे मूळ
असे ते मानत. प्रत्येकाने आपली जात टाकून दिली पाहिजे. कात टाकलेल्या सापासारखे जातीमुक्त
झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पण पानसरेंच्या खुनाने त्यांची जात पुढे आली.
पानसरे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हारचे. मराठा जातीत जन्मलेले. पानसरेंचा खून म्हणजे
आपल्यावर झाडलेली गोळी असे सर्वमान्य मराठा समाजातल्या तरुणाला वाटले, असेल काय? हे
तरुण आव्हाडांच्या भाषणाला गर्दी करतात. संभाजी ब्रिगेड त्या तरुणांचा मंच बनतेय. राष्ट्रवादी
काँग्रेस हा पक्ष या मंचाला सहकार्य करताना दिसतोय. आंबेडकरी, कम्युनिस्ट हे गटही सोबत
आहेत.
या गंभीर सामाजिक दुखण्यावर इलाज करू शकते अशी एकमेव व्यक्ती राज्यात
आहे, ती म्हणजे खुद्द बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांना आवाहन करावेसे वाटते की, बाबासाहेब
तुम्ही पुढे व्हा. संभाजी ब्रिगेडला एमआयएम बनू देऊ नका आणि आव्हाडांचा ओवेसी होऊ देऊ
नका. तुम्हाला हे नक्की करता येईल. त्यासाठी तुम्हाला थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी
आणि ख्यातनाम चित्रपट अभिनेते निळू फुले यांनी घालून दिलेल्या उदाहरणांपासून काही सूत्र
सापडेल.
एस.एम. जोशींनी काय केले?
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या मागणीसाठी
नामांतर आंदोलन पेटले. या आंदोलनाला सवर्ण विरुद्ध दलित असे रूप आले. जातीय तणाव वाढला.
सवर्ण नेते, विचारवंत नामांतराला खोडा घालताहेत अशी दलित तरुणांची भावना वाढीस लागली.
दुखावलेले दलित समाजातले तरुण हिंसक प्रतिक्रिया देत. त्याविरोधात त्याहून हिंसक प्रतिक्रिया
उमटत. हा नकारात्मक समाजविघातक खेळ थांबवण्यासाठी, नामांतराचे आंदोलन अहिंसक आणि योग्य
पद्धतीने, सर्वसमावेशक विचाराने पुढे जावे म्हणून एस.एम. जोशी यांनी पुढाकार घेतला.
पहिल्यांदा दलित तरुणांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला. एस.एम. मराठवाड्यात दौऱ्यावर
गेले. ठिकठिकाणी सर्व जातींतल्या कार्यकर्त्यांशी बोलू लागले. लातूर जिल्ह्यात एका
ठिकाणी तर त्यांनी दलित तरुणांनी आणलेली चपलांची माळ स्वखुशीने गळ्यात घालून घेतली.
ही माळ घालणाऱ्या तरुणांशी त्यांनी संवाद केला. त्यांचा राग रास्त आहे. मला चपलेची
माळ घातल्याने जर त्यांना समाधान मिळणार असेल तर तेही मी स्वीकारतो. हा अपमान मी आनंदाने
गिळतो, असे त्यांनी सांगितले. त्या चपलेच्या हाराने चमत्कार केला. अपमान गिळलेल्या
एसेमांच्या नेतृत्वाचा सन्मान वाढला. त्यांचे नेतृत्व उजळून निघाले. बहुजनांनी त्यांना
नेता मानले. महाराष्ट्राच्या शिल्पकारांच्या माळेत ते जाऊन बसले.
बाबासाहेब, हजारो सन्मान स्वीकारणे सोपे असते, पण एखादा अपमान गिळणे सोपे
नसते. अपमान गिळण्याने सन्मान वाढतो, ही एसेम यांनी आपल्यापुढे तयार केलेली पायवाट
आहे. आता निळू फुले यांचे पाहा. त्यांना राज्य सरकार म्हणाले, महाराष्ट्रभूषण तुम्हाला
देतो. आपल्याला खलनायक म्हणून परिचित असलेले निळू फुले सरकारला म्हणाले, माझ्यापेक्षा
मोठे नायक राज्यात आहेत. डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग या जोडप्याला माझ्याऐवजी महाराष्ट्रभूषण
द्या. या पुरस्काराचा गौरव वाढेल. २००३ची ही गोष्ट. निळू फुलेंच्या सूचनेवरून त्यावेळी
सरकारने बंग दाम्पत्याला महाराष्ट्रभूषण दिला. हा कलाकार-कार्यकर्ता म्हणून मोठा असलेला
मनुष्य मनानेही किती महान होता! चालून आलेला सन्मान त्यांनी दुसऱ्याकडे वळवून दिला.
मोठी झालेली माणसे मनानेही तितकीच उंच होतात असे सहसा दिसत नाही.
आज निळू फुले असते तर त्यांनी महाराष्ट्रभूषणसाठी हिंदू कार डॉ. भालचंद्र
नेमाडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे
यांचीही नावे सुचवली असती किंवा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनाही
महाराष्ट्रभूषण द्या, असेही म्हणाले असते. ते काही असो. असो. मूळ मुद्द्याकडे येतो.
बाबासाहेब, राज्यातले हिंसक सामाजिक वातावरण निवळण्यासाठी तुम्ही भूमिका
बजावू शकलात, तर महाराष्ट्रभूषण पुरस्कारापेक्षा मोठे व्हाल. एस. एम. जोशी आणि निळू
फुले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाले नाहीत, पण म्हणून त्यांना राज्यातले लोक
लहान मानत नाहीत. व्यक्तीच्या जीवनात मानसन्मानापेक्षा लोक जीवनाला दिशा देणारी कृतीच
सर्वात जास्त सन्मानजनक ठरते. अशी कृती करणाऱ्यांना लोक संत, फकीर मानतात. त्यांच्या
तसबिरी घरात लावतात.
बाबासाहेब, ७० वर्षे तुम्ही राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक भूमिका घेऊन
वावरत आहात. आजच्या दुखावलेल्या विषारी सामाजिक वातावरणात सर्वांचे तुमच्या भूमिकेकडे
डोळे लागलेले आहेत. आजच्या गढूळलेल्या सामाजिक ओंगळाला हटवलेत तर लोक तुम्हाला डोक्यावर
घेतील. तेव्हा एस.एम. यांचा वारसा तुम्ही पुढे न्याल काय बाबासाहेब?
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ११/०८/२०१५
No comments:
Post a Comment