डॉ. भालचंद्र नेमाडे मोठे
डेरिंगबाज लेखक आहेत. ते नागपूरमध्ये म्हणाले, मोगल बादशाह आलमगीर औरंगजेबाचे हिंदू
महिलांनी आभार मानायला हवेत. कारण त्याने सती प्रथा इंग्रजांच्या अगोदर २०० वर्षे बंद
केली होती. ही प्रथा बंद करून त्याने त्याच्या राज्यातल्या हजारो महिलांना जीवदान दिले,
सन्मान दिला. नेमाडे हे बोलत होते त्याला तीन बातम्यांची पार्श्वभूमी होती. पहिली,
दिल्लीत औरंगजेबाचे एका रस्त्याला असलेले नाव हटवून त्या ठिकाणी माजी राष्ट्रपती एपीजे
अब्दुल कलमांचे नाव देण्यात आले. दुसरी, औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेने
पुन्हा केली. तिसरी, मराठवाड्यात दुष्काळात आपल्या पोटच्या कच्याबच्यांना जेवण देता
येत नाही म्हणून हबकलेल्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले.
तर अशा तीन बातम्यांच्या
पार्श्वभूमीवर नेमाडे बोलले. त्यानिमित्ताने औरंगजेब चर्चेत आला.
१६१८ला शहाजहान-मुमताज या
दांपत्याच्या घरात जन्माला आलेला औरंगजेब ९० वर्षाचे दीर्घायुष्य जगला. १७०७ ला अहमदनगरला
त्याला मृत्यू आला. ९० वर्षांच्या आयुष्यात त्याने जवळपास ५० वर्षे हिंदुस्तानवर राज्य
केले. त्याच्या राज्याचा विस्तार अफगाणिस्तानच्या काबुलपासून दख्खनपर्यंत होता.
हा मोठा हिकमती, महत्त्वाकांक्षी
राजा होता. त्याने कर्तबगारीने १६९० पर्यंत त्यावेळचे जगातले सर्वात मोठे राज्य स्थापन
केले. त्याचा आलमगीर बनला. हा त्याच्या काळातला महाशक्तिशाली बादशाह होता. क्रूर, धर्मांध
म्हणून त्याची प्रतिमा रंगवलेली असली तरी त्याच्या चरित्राला दुसरी बाजूही आहे. तो
टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशावर उपजीविका करी. तो धार्मिक होता. इस्लामप्रेमी
होता. पाच टाइम नमाजी होता. संगीत, नृत्य, चित्रकला यांची त्याला घृणा होती. ही चैनबाजी
त्याला आवडत नसे. तो निर्व्यसनी होता. महिलांना तो खूप मान देत असे. महिलांकडे वाकड्या
नजरेने कुणी बघितलेले त्याला खपत नसे. तो कडक शिस्तीचा होता. राजद्रोह करणारा मुसलमान
असो की, हिंदू तो त्याला कठोर शिक्षा करत असे. राजद्रोह केला म्हणून त्याने तीन भावंडांना
मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या. त्यामुळे त्याला क्रूर म्हटले गेले.
औरंगजेबाची हिंदूविरोधी
प्रतिमा आहे, पण त्याच्या दरबारात १८२ मनसबदार हिंदू होते. त्या तुलनेत त्याचा बाप
शहाजहानच्या दरबारात फक्त १०६ हिंदू मनसबदार होते. म्हणजे हिंदू मनसबदारांना जवळ करण्यात
तो बापाच्याही एक पाऊल पुढे होता. सम्राट अकबरालाही त्याने याबाबतीत मागे टाकले होते.
औरंगजेबच्या संपूर्ण लष्कराचा सरसेनापती मिर्झाराजे जयसिंग होता. मोगल सैन्याने बहुतेक
मोठ्या लढाया हिंदू सेनापती जयसिंगच्या नेतृत्वाखाली लढल्या. औरंगजेबाच्या लष्करात
इतर महत्त्वाच्या पदांवर राजपूत हिंदू बहुसंख्येने होते. १६६५ला त्याने राजा अजय सिंग
याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमला. छत्रपती शिवरायांबरोबरच्या लढायांत हेच राजपूत
औरंगजेबाच्यावतीने पुढे होते. छत्रपतींनी औरंगजेबाशी शांतता करार करावा म्हणून हे राजपूत
आग्रही होते.
हिंदूची देवळे फोडणारा,
देव-देवतांच्या मूर्ती तोडणारा म्हणून काही इतिहासकारांनी औरंगजेबाची जुलमी राजवट चित्तारली
आहे. असे असले तरी त्याने अनेक मंदिरांना देणग्या, जमिनी दिल्या. जिर्णोद्धाराला पैसा
दिल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या प्रसिद्ध सोमेश्वरनाथ
महादेव मंदिराला औरंगजेबाने जमीन दिली. काशी-बनारसच्या जंगमवादी शिवमंदिराला मदत केली.
गुहाटी येथील हिंदू मंदिराला ग्रँट दिली. काश्मिरातही काही मंदिरांना सहकार्य केले.
उत्तर प्रदेशातल्याच बालाघाटातील चित्रकुट येथील विष्णू मंदिराला औरंगजेबाने ८ खेड्यात
३३० बिघे जमीन इनाम दिली. देखभालीसाठी, दिवबत्तीसाठी प्रत्येक दिवशी १ रुपया सरकारी
मदतीची २ तहहयात तरतूद केली. ३२३ वर्षानंतरही ही इनामी जमीन व पैशाची तरतूद अबाधित
आहे. ब्रासच्या प्लेटवर या इनामाचे औरंगजेबाचे फर्मान (हुकूम) आहे. ते आजही वाचता येते.
१९व्या इस्लामिक वर्षात रमजानच्या पवित्र महिन्यात औरंगजेबाने हे फर्मान काढल्याची
नोंद आहे. आज त्या विष्णू मंदिराच्या जमिनी त्या भागातल्या गुंडांनी बळकावल्या आहेत.
मंदिराला अवकळा आलीय. मंदिरांच्या प्रॉपर्टीवरून महंत, पुजारी, विश्वस्त यांच्यात लबाड्या,
झगडे, भांडणे बोकाळलीत. एका ऐतिहासिक मंदिर-वारशाची अशी हेळसांड सुरू आहे. अशी मदत
करणाऱ्या औरंगजेबाने विरोधी सत्तेची केंद्र असणारी मंदिरे पाडली हाही इतिहास आहे. तो
एसेज ऑन इस्लाम अॅण्ड इंडियन हिस्ट्री या इतिहासकार रिचर्ड एम. इटन यांच्या पुस्तकात
आला आहे. नवी दिल्लीच्या ऑक्सफर्ड युनिव्हसिटी प्रेसने ते छापले आहे.
हिंदू प्रजेचा छळ करण्यासाठी
औरंगजेबाने जिझिया कर लादला, अशी मांडणी काही इतिहासकारांनी केली आहे. जिझिया हा मूळ
अरबी शब्द. त्याचा अर्थ टॅक्स, कर, शुल्क असा आहे. औरंगजेबाच्या राज्यात मुस्लिमांवर
मालमत्तेच्या दोन-पाच टक्के जकात वसुल केली जाई, तर मुस्लिमेतर प्रजेकडून जिझिया कर
घेण्यात येई. तो नागरिकांकडून त्यांच्या जीविताचे, मालमत्तेचे शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी
घेतला जाई. शिवाय हिंदू, गरीब, म्हातारे, महिला, अपंग, अनाथ, लहान मुले यांना या करातून
सवलत देण्यात आली होती. जे संपन्न होते त्यांच्याकडूनच हा कर घेतला जाई हे विशेष.
औरंगजेबाने १६६४ त्या सतीबंदीचे
फर्मान काढले. हजारो वर्षे सुरू असलेल्या त्याच्या या जुलमी प्रथेला कायद्याने विरोध
करणारा हा पहिला राजा म्हणता येईल. त्याचे असे झाले की, त्याच्या दरबारात त्यावेळच्या
एका फ्रेंच वैद्याने स्वत:ला अहमदाबाद ते आग्रा या प्रवासात आलेला अनुभव सांगितला.
प्रवासात या वैद्याने सती जाणाऱ्या महिलेचे अमानवी संकट अनुभवले. एका महिलेला नटवून-सजवून
नवऱ्याच्या चितेवर बाबूंने गचके देत ढोसले जाते. तिचा आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येऊ
नयेत म्हणून ढोल-ताशे वाजवले जातात. असहाय बाई नातेवाईकांच्या, गावकऱ्यांच्या साक्षीने
दिवसाढवळ्या जळते. ते पाहून हा परदेशी वैद्य हादरला. त्यापूर्वी त्याने एवढे अमानवी
वास्तव पाहिले नव्हते. त्याला राहवले नाही. त्याने औरंगाजेबला हा आँखो देखा हाल सांगितला.
त्या काळात वर्षभरात अदमासे ६०० हिंदू महिलांना असे बळी जावे लागे. बंगाल प्रांतात
हे प्रमाण तर जास्तच होते. उत्तर हिंदुस्थानात दररोज अशा घटना घडत. त्याला धर्माचा
भक्कम आधार होता. फ्रेंच वैद्याचे कथन ऐकून औरंगजेबही हलला. खरे तर त्यावेळचा कोणताही
शहाणा राजा धार्मिक बाबींत हस्तक्षेप करत नसे. धर्म वेगळा, राज्यकारभार वेगळा, पण औरंगजेबाने
सतीबंदी केली. हा निर्णय घेतला म्हणून बांगला प्रांतातले हिंदू त्याच्याविरुद्ध गेले.
अर्थात औरंगजेबाने त्याची पर्वा केली नाही.
औरंगजेबाचा हा सारा कडू-गोड
इतिहास सर जदुनाथ सरकार यांनी लिहून ठेवला आहे. सरकार बंगाली. मोगल साम्राज्याचे ते
जगातले तज्ज्ञ, अधिकारी इतिहासकार मानले जातात. आपल्यापैकी सर्वांना हा इतिहास त्यांच्या
पुस्तकातून वाचता येतो. जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार अलेक्झांडर हॅमिल्टन हा औरंगजेबाचा
समकालीन होता. तो त्याच्या साम्राज्यात फिरला. त्याने निरीक्षणे नोंदवली आणि म्हटले,
या राज्यात धर्मस्वातंत्र्य सर्वत्र आहे. देवपूजेला सर्वांना मोकळीक आहे. जबरदस्तीने
धर्मांतर झाल्याची घटना मला दिसली नाही. सत्ता, प्रॉपर्टी, मानसन्मान यांच्यासाठी धर्मांतरे
होत. तो मामला राजीखुशीचा होता.
इरफान हबीब हे भारतातले
सध्याचे जानेमाने इतिहासकार आहेत. त्यांचे म्हणणे असे की, इतिहास हा काळ्या-पांढऱ्या
रंगात पाहू नये. सत्य नेहमी दोन टोकांच्यामध्ये कुठेतरी असते. ते काळे नसते तसे पांढरही
नसते. ग्रे शेडमध्ये कुठेतरी असते. १८५७च्या उठावाने इंग्रजांचे डोके फिरले. त्यांनी
हिंदू-मुस्लिम एकीचे संकट ओळखले. हिंदू-मुस्लिम एक होऊन इंग्रजांविरोधात एकवटतील तर
राज्य करणे मुश्किल होईल. हा धोका टाळण्यासाठी इंग्रजांनी हिंदू-मुस्लिमांत वैर वाढवा,
द्वेष पेरा, फूट पाडा, हे तंत्र वापरले. त्यासाठी ऐतिहासिक वैभवशाली प्रतिकांचा गैरवापर
केला. प्रतिकांच्या गैरवापराच्या लढाईत औरंगजेब, छत्रपती शिवराय यांच्या ऐतिहासिक प्रतिमांना
सोयीने पेश करण्यात आले. हिंदुस्तानच्या साऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणाची मोठी कृत्रिम
वावटळ विदेशी-देशी हुशार लोकांनी निर्माण केली. त्याची फळे आज आपण भोगतो आहोत. काय
खरे, काय खोटे, यांचा थांगपत्ता लागू नये एवढा भ्रम फैलावला गेला आहे. भारत-पाक फाळणी,
हिंदू-मुस्लिम वैमनस्य, बॉम्बस्फोट, दंगली, पक्षपाती भाषणे, पुस्तके या माध्यमातून
आजही भ्रम फैलावणे सुरूच आहे. धर्म-धर्मांत, जाती-जातींत आज लोक गचांडी पकडताना दिसतात.
ते त्यातूनच घडत आहे. आपली विचार करण्याची प्रक्रियाच गढूळ झाली आहे.
खरे तर इतिहास आहे तसा स्वीकारावा.
त्यातल्या चांगल्या-वाईट घटनांसह तो आपला वारसा आहे. तो बदलण्याचा, अट्टहास करून कुणाचेही
भले होणार नाही. आपल्या देशाचे मन मोठे आहे. आपल्या देशाने गुजरात दंगली, तिथला वंशसंहार
ज्यांच्या एक छत्री शासनकाळात झाला त्या नरेंद्र मोदींनाही बहुमताने स्वीकारले. बाबरी
मशिद पाडलेल्या पक्षाला स्वीकारले. त्याच देशात, याच मातीत जन्मलेला परदेशी नसलेला
औरंगजेब त्याच्या बऱ्या-वाईट कामांसह स्वीकारायला काय हरकत आहे? खास करून सतीबंदीसाठी
देशाने त्याचे आभार मानायला काय हरकत आहे?
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : ०८/०९/२०१५
Good article Rajaji
ReplyDeleteRaja bhau, vry nice article. it give lots up information about real history.
ReplyDeletethnks a lot & all the best for this kind service
अत्यंत सुंदर लेख याला जाहीर प्रसिध्दी मिळणे आवश्यक आहे एड दरवतकर पुणे इतिहास लेखक यांनी या विषयावर माहिती दिली होती आजही अनेक ऐतिहासिक दस्त aiwaj असे दाखऊन देतात की त्या काळात मोंघाल बादशहानी हिंदू मंदिरे मठ यांना अनेक जमिनी दान दिलेल्या होत्या
ReplyDelete