हिंदुस्थानच्या
भूमीवरून इंग्रजांना उखडवून त्याच्या देशात पळवून लावल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही
अशी विष्णूपुढे दररोज पूजा-प्रार्थना करणाऱ्या टिपूचा भाजपवाल्यांनी द्वेष का करावा?
देशप्रेमी, इंग्रजविरोधी टिपू त्यांचा नावडता का आहे? भाजपवाल्यांना मिसाईल मॅन कलाम
यांच्याविषयी प्रेम आहे, पण कलाम ज्याला भारताचा पहिला मिसाईल मॅन म्हणाले होते, त्या
टिपूविषयी प्रेम का नाही?
दक्षिण भारतात सध्या एक
वाद खदखदतोय. म्हैसूरचा १८व्या शतकातला राज्यकर्ता टिपू सुलतान याच्या जीवनावरील चित्रपटाच्या
निमित्ताने हा वाद उद्भवलाय. टिपू हा असा कोण टिकोजीराव लागून गेला की, त्याच्या जीवनावर
कन्नड आणि तमिळमध्ये चित्रपट निघावा? त्याची भूमिका रचनीकांतसारख्या मातब्बर नटाने
का करावी? हिंदूविरोधी टिपूला हे सारे उद्योग करून हिरो का बनवावे? असे प्रश्न विचारत
तामिळनाडू आणि कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टिपूच्या जीवनावरच्या चित्रपटाला
हरकत घेतलीय. रजनीकांतलाही या नेत्यांनी टिपूची भूमिका करू नको, असा दम भरला आहे. रजनीकांतने
त्याला अजून उत्तर दिलेले नाही.
कन्नड चित्रपटनिर्माते अशोक
खेणी यांच्या डोक्यात टिपूवर चित्रपट करण्याची कल्पना आहे. त्याचे शूटिंग अजून सुरू
व्हायचे आहे. कथा, पटकथा, संवाद या पातळीवर जमवाजमव सुरू आहे. अशोक यांनी रजनीकांतला
टिपूच्या भूमिकेविषयी विचारले, तेव्हा त्याने या कथेत रस घेतला. चित्रपटाची कल्पनाही
त्याला आवडली. अॅटेनबरोचा गांधींसारखा टिपू साकारायची निर्मात्याची कल्पना आहे. आता
टिपूचा चित्रपट येणार, ती भूमिका रजनीकांत करणार, म्हणजे सारे अवाढव्य काम होणार. त्याला
अगडबंब प्रसिद्धी मिळणार. त्यातून टिपूचे जीवन उजळून निघणार, या भीतीने भाजपवाले रागावलेत.
कट्टर दक्षिणपंथी हिंदू मुन्नानी आणि हिंदू मक्कल कतची या संघटनांनी रजनीकांतला इशारे
देत चित्रपट चालू देणार नाही, अशी भूमिका घेतलीय. या संघटना तोडफोड करण्यात मशहूर आहेत.
या वादाच्या निमित्ताने
टिपूच्या जीवनाबद्दल नव्याने प्रसारमाध्यमांत चर्चा सुरू झालीय. रजनीकांतसारख्या ख्यातनाम
व्यावसायिक नटालाही ज्याचे जीवन आकर्षित करते असे टिपूच्या जीवनात काय आहे? तो खरेच
हिंदूविरोधी होता काय? नेमका सत्य इतिहास काय आहे?
टिपू हा म्हैसूरचा वाघ म्हणून
प्रसिद्ध आहे. २० नोव्हेंबर १७५० ला तो जन्मला. सुलतान हैदर अली यांचा तो थोरला मुलगा.
तो विद्वान होता, कवी होता. तो ५० वर्षांचे आयुष्य जगला. त्या काळात त्याची ख्याती
दक्षिण आशियातला सर्वात लढाऊ आणि थोर राज्यकर्ता अशी होती. त्याने स्वत:चे चलनी नाणे
सुरू केले. कॅलेंडर सुरू केले. मौलुदी लुनीसोर असे त्याचे नाव होते. नवी महसूल व्यवस्था
त्याने आणली. म्हैसूरची सिल्क इंडस्ट्रीही त्यानेच भरभराटीला आणली. ब्रिटिशांविरोधात
त्याने फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्टबरोबर आघाडी केली. मराठा, निजाम-मोगल या सर्वांची
युती करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. स्वत:चे सैन्य फ्रेंच आर्मीच्या धर्तीवर
उभे केले. त्याने बनवलेले म्हैसूर रॉकेट जगप्रसिद्ध आहे. युद्धात रॉकेटचा वापर करणाऱ्या
टिपूला भारताचा पहिला मिसाईल मॅन असे म्हणतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया त्याने
घातला. म्हणून इंग्रजांविरोधात लढणारा तो पहिला स्वातंत्र्ययोद्धा होय. हे वैभव, वारसा
जगाला अभिमाने सांगायचा की, दाबून टाकून विचारदारिद्र्य दाखवायचे?
टिपूचे वडील कॅन्सरने वारले.
१७८२ मध्ये तो म्हैसूरच्या गादीवर बसला. त्याने इंग्रज राज्यकर्त्यांचा धोका ओळखला.
त्यांना देशातून हुसकावण्यासाठी नेपोलियनची मदत घेतली. स्वत:च्या लष्कराचे फ्रेंचाकडून
ट्रेनिंग करून घेतले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही शत्रू क्रमांक एक घोषित करून त्याने
१७८९ मध्ये त्रावणकोर इथे ब्रिटिश सैन्यावर मोठा हल्ला केला. त्यात ब्रिटिशांना माघार
घ्यावी लागली होती.
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र
या न्यायाने त्या काळी फ्रेंच-इंग्रजांचे वैमनस्य हेरून टिपूने फ्रेंच लष्कर, सेनापती
नेपोलियन यांच्याशी संगनमत बांधले. नेपोलियनला पराक्रमी टिपूचे आकर्षण होतेच. फेब्रुवारी
१७९८ मध्ये नेपोलियनने त्याला एक पत्र लिहिले. त्यात हिंदुस्थानी फ्रेंच लष्कराची आघाडी
उभारून इंग्रजांना जेरबंज करून हुसकावून लावायचे. चारी मुंड्या चित करायचे असा प्लॅन
मांडला होता. पण मस्कत इथे हे पत्र फुटले. इंग्रज हेराने ते गायब केले. संभाव्य टिपू-नेपोलियन
युतीचा धोका ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीला कळला. त्याने टिपूचा बंदोबस्त
करण्याचा मोठा प्लॅन आखला.
वेलस्लीने सुसज्ज लष्करानिशी
१७९९ मध्ये श्रीरंगपट्टन इथे टिपूवर निकराचा हल्ला चढवला. फ्रेंच सल्लागाराने टिपूला
किल्ल्यातून पळू जावे, असा सल्ला दिला, पण त्याने तो ऐकला नाही. तो म्हणाला, हजार वर्षे
शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगणं मी पत्करीनं. त्याचे हे प्रेरणादायी
वाक्य पुढे जगप्रसिद्ध झाले. ४ मे १७९९ ला टिपूला इंग्रजांनी पराभूत करून ठार केले.
दुसऱ्या दिवशी वडिलांच्या कबरीजवळ त्याचे दफन केले गेले, तेव्हा या मुस्लिम राजाची
बहुसंख्य हिंदू प्रजा हळहळली.
आपल्या किल्ल्यात विष्णूची
नित्यनेमाने पूजा करणारा हा मुस्लिम राजा आजही दक्षिणेत विष्णूपूजक म्हणून प्रसिद्ध
आहे. म्हैसूरच्या किल्ल्यात त्याचे विष्णू मंदिर आहे. आजही तिथे भक्तिभावाने पूजा होत
असते. भाजपवाल्यांनी हे मंदिर बघावे. विष्णू आणि टिपूचे नाते समजावून घ्यावे. सेक्युलर
राजाचे ते मोठे उदाहरण आहे. टिपूचा धर्म मुस्लिम. त्याची बहुसंख्य प्रजा हिंदू. आपल्या
प्रजेचे सुख ते आपले सुख, अशी शिकवण बापानेच त्याला दिली होती. अशा या लोककल्याण राजाची
हिंदूविरोधी प्रतिमा इंग्रजांनी पुढे उभी केली. १८५७ च्या ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्ययुद्धाअगोदर
इंग्रजांना समूळ उखडण्यासाठी अँग्लो-म्हैसूर युद्ध लढताना बलिदान देणारा टिपू किती
पुढचा विचार करणारा होता हे लक्षात येते. अमेरिकन-फ्रेंच यांच्याशी लष्करी संबंध प्रस्थापित
करून हिंदुस्थानच्या सर्व हिंदू-मुस्लिम राजांना गोळा करण्याची भूमिका घेणे, इंग्रजांना
हुसकावण्याची भाषा, कृती करणारा हा राजा किती दूरदर्शी म्हणायचा! श्रीलंका, ओमान, अफगाणिस्तान,
फ्रान्स, तुर्की, इराण या देशांशी टिपून व्यापार सुरू केला होता. या देशात त्याचे राजदूत
असत. त्याला कन्नड, उर्दू, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी, फ्रेंच अशा सहा भाषा येत. त्याला
तरुणपणात सूफी व्हायचे वेड लागले होते. पण बापाने त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली.
तो राजा बनला. आपल्या राज्यात त्याने हिंदुस्तानातल्या सर्व राजांच्या राजपुत्रांसाठी
अत्याधुनिक लष्करी शाळा सुरू केली. भारतात लढावू योद्धे घडावेत यासाठी त्याचा खटाटोप
होता.
अशा गुणवान, लढाऊ राजाचा
भाजपवाल्यांनी द्वेष का करावा? दिल्लीत औरंगजेबाच्या नावाची एका रस्त्याची पाटी हटवून
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांचे नाव भाजपवाल्यांनी दिले. ते कलाम टिपूविषयी
काय म्हणताहेत ते भाजपवाल्यांनी वाचावे. बंगलोरमध्ये ३० नोव्हेंबर १९९१ ला टिपू सुलतान
शहीद मेमोरिअल लेक्चर झाले होते. त्यात कलाम म्हणाले होते, टिपू हा जगातला पहिला असा
राजा आहे की, त्याने युद्धात रॉकेट तयार करून वापरले. त्याचे दोन रॉकेट इंग्रजांनी
श्रीरंगपटनच्या युद्धात ताब्यात घेतले. लंडनमध्ये नेऊन ठेवले. आजही लंडनच्या रॉयल आर्टिलरी
म्युझियममध्ये ते प्रदर्शनात ठेवलेले दिसतात. भारतीय राजाचे वैभव, सामर्थ्य त्या रॉकेटच्या
रूपाने जगात पर्यटक कौतुकाने न्याहाळत असतात.
इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी
लिहितात, टिपू नेपोलियनलाही सरस ठरेल असा लढाऊ होता. चपळाईने शत्रूला गाठण्यात तरबेज
होता. एकाच वेळी विविध आघाड्यांवर तो लढे. निझामाचा त्याने पराभव केला. इंग्रजांचा
दोनदा पराभव करणारा तो पहिला हिंदुस्थान राजा होय. नेपोलियनच्या फ्रेंच डायरीत नोंद
आहे- नेपोलियन म्हणाला होता, मी लवकरच इजिप्त जिंकेल. त्यानंतर भारतीय राजा टिपूशी
संबंध, मैत्री प्रस्थापित करील. त्याच्या बरोबर इतरही राजे आहेत. त्यांच्या एकजुटीने
इंग्रजांवर निकराचा हल्ला करेल आणि त्यांना पराभूत करूनच दाखवेन. १५ हजार सैनिक सुएझ
कालव्यामधून भारतात जातील. हे सैन्य टिपूच्या लष्करात सामिल होईल. आणि मग बघा इंग्रजांना
चारीमुंड्या चीत करून उखडले जाईल.
इंग्रजांना एवढा मोठा धोकादायक,
त्रासदायक ठरलेल्या टिपूचा इंग्रज इतिहासकरांनी द्वेष करणे स्वाभाविक आहे. त्याची प्रतिमा
खलनायक, हिंदूविरोधी रंगवणे हे इंग्रजांच्या कारस्थानी द्वेषी स्वभावाला धरून झाले.
पण हिंदुस्थानच्या भूमीवरून इंग्रजांना उखडवून त्याच्या देशात पळवून लावल्याशिवाय स्वस्थ
झोपणार नाही अशी विष्णूपुढे दररोज पूजा-प्रार्थना करणाऱ्या टिपूचा भाजपवाल्यांनी द्वेष
का करावा? देशप्रेमी, इंग्रजविरोधी टिपू त्यांचा नावडता का आहे?
भाजपवाल्यांना मिसाईल मॅन
कलाम यांच्याविषयी प्रेम आहे, पण कलाम ज्याला भारताचा पहिला मिसाईल मॅन म्हणाले होते,
त्या टिपूविषयी प्रेम का नाही? इंग्रजांच्या फुटपाड्या, परद्वेषी मनोवृत्तीला बळी पडून
भाजपवाल्यांनी टिपूच्या चित्रपटाला विरोध तर केला नाही ना? अशा वादांतून भाजपवाले कुणाचे
भले करताहेत?
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : १५/०९/२०१५
This comment has been removed by the author.
ReplyDeleteही बाजु सर्वबाजूने दिसल्यास आपल्या समाजाच्या विचारवारील 'आवरण'(!) थोड्या का प्रमाणात होईना पण दूर होईल.
ReplyDelete