पडघम हे लोकसंगीतातले एक वाद्य आहे. आनंदाची बातमी, नव्याची चाहूल लागते तेव्हा हे वाद्य वाजवले जाई. पण काळानुसार कुठल्याही गोष्टीचे संदर्भ बदलत जातात. तसे या वाद्याचेही बदलले आहेत. काळोखाचे पडघम , मध्यरात्रीचे पडघम , निवडणुकांचे पडघम अशा शब्दप्रयोगांतून आपल्याला त्याची जाणीव होतच असते. सध्याचा काळात तर हे वाद्य केवळ चांगल्याच घटनांसाठी वाजवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे राजकारण-समाजकारण या क्षेत्रातील विविध घटना-घडामोडींविषयी पडघम वाजवण्याचे काम या साप्ताहिक सदरातून दर मंगळवारी केले जाईल...
तथागत गौतम बुद्धांची भूमी म्हणून बिहारची ओळख आहे. या भूमीवर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. दिल्लीचा रस्ता बिहारमधूनच जातो. दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारी ही निवडणूक देशाला मार्ग दाखवणारी आहे. देशाच्या १२५ कोटी जनतेच्या वतीने आपण बिहारींनी ती लढवली पाहिजे असे आवाहन संयुक्त जनता दलाचे नेते खासदार शरद यादव यांनी केले आहे. लबाडांना थारा देऊ नका. बिहारची बोली लावणाऱ्या बिहारींचा अपमान करणाऱ्यांना इथं पाय ठेवू देऊ नका , असे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांनी तर दिल्ली बदलो, दिल्ली बदलो अशी घोषणा पाटण्याच्या गांधी मैदानातून दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची या नेत्यांना साथ आहे.
दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम बिहारी मतदारांना जंगलराज पार्ट-२ येऊ द्यायचे नसेल तर यांना घरी बसवा, अशी हाक देत आहेत. आम्ही मंगलराज आणतो अशी आशा दाखवत आहेत. त्यावर जंगलराज नही, मंडलराज पार्ट-२ आहे, असे लालू म्हणत आहेत. या बोलबातांच्या गलबल्यात कुणाचे ऐकायचे, कुणाचे खरे मानायचे, असा प्रश्न बिहारी जनतेसमोर आहे.
या संभ्रमातून वाट काढण्यासाठी बिहारींना अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग, त्यातल्या उपदेश आज मदतीला येईल. तथागत बुद्ध एकदा कोसल देशात चारिका (पदयात्रा) करत होते. मोठा भिक्खू संघ सोबत होता. कालामांच्या (कोसल देशातल्या लोकांना कालाम म्हणत.) केसमुत्त या गावाजवळून ते जात होते. बुद्धांची कीर्ती कालामांना माहीत होती. भारावलेले कालाम बुद्धांना भेटायला गेले. अभिवादन करून ते बुद्धांना म्हणाले, “भन्ते, काही श्रमण आणि ब्राह्मण केसमुत्तामध्ये येतात. स्वत:च्या सिद्धांताला उजळवून सांगतात. दुसऱ्याच्या सिद्धांताची निंदा करतात. नावे ठेवतात. त्याला कमी लेखतात, अनादर करतात. आमच्या मनात शंका निर्माण होते. श्रमण-बाह्मणांपैकी कोण खरे बोलतो? कोण खोटे बोलतो?”
त्यावेळी तथागत म्हणाले, “कालामांनो, एखादी गोष्ट अनुभवावरून (ऐकीव माहितीवरून) स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे असे सांगितले आहे, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्यरूपाचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाराचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका. किंवा संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका. हा श्रमण आपला गुरू आहे, अशा विचार करून स्वीकारू नका. कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वत: होऊनच हा अनुभव घ्याल की, त्या गोष्टी अहिताच्या आहेत, सदोष आहे, त्या गोष्टींची निंदा जाणकारांनी केलेली आहे. त्या गोष्टी स्वीकारल्या असता अहिताला; दु:खाला कारणीभूत होतात. तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा?”
बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करताना बिहारी जनता या उपदेशाचा नक्की उपयोग करून घेईल. बिहार चाणक्याचीही भूमी आहे. चाणक्याचे अर्थशास्त्र इथेच तयार झाले. त्याचा अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ आहे. त्यात राजा, जनता, राज्य कारभार याविषयीच्या व्यवहारांचे ज्ञान आहे. त्या राजकारण-व्यवहाराच्या आधारे सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांनी राज्य केले. एवढा समृद्ध राजकीय वारसा असणाऱ्या बिहारी नेते, जनता यांच्या रोमारोमांत राजकारण भरलेले दिसते. या राजकीय ज्ञानाची शिदोरी जवळ असल्यानेच बिहार-उत्तरप्रदेश या भागातले नेते, लोक अधिक आत्मविश्वासाने वावरताना दिसतात, हे आपण पाहतो.
या प्रदेशात सगळेच तयारीचे गडी असतात. त्यामुळे बिहारची निवडणूक साधीसोपी नसते. त्यात जातीची गणिते असतात. प्रगतीचे मुद्दे असतात. बिहारी मतदार फॉरवर्ड-बॅकवर्ड, यादव, कुरमी, कोयरी, कुशवाहा, लवकुश, धातू, तलवार, पंडिती, राजपूत, भूमिहार, ब्राह्मण, मुसलमान, अतिपिछडा, दलित, महादलित, मुसहार, पासवान अशा शेकडे जातीगटांत विखुरला गेला आहे. निवडणुकीत या जातींची मोट जो बांधतो, तो भारी भरतो, जिंकतो, हा आजवरचा अनुभव आहे.
बिहारच्या या निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय दल, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस अशा चार पक्षांचे महागठबंधन बनले आहे. त्या विरोधात भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती आणि इतर छोटे-मोठे पक्ष यांची आघाडी आहे. महागठबंधनची जमेची बाजू नितीशकुमार यांचा विकासवादी चेहरा ही आहे. गुन्हेगार संपवणारा, प्रशासन पारदर्शक-गतिमान करणारा, भ्रष्ट नसलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही. केंद्रीयमंत्री राम विलास पासवान हे मीच मुख्यमंत्री पदाला योग्य अशी पाचर अगोदरच मारून बसले आहेत. बिहार भाजपची इच्छा आहे की, नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई व्हावी. या लढाईतून भाजपच्या जागा वाढवतील अशी अटकळ बांधली जात आहे.
आजतरी ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध नितीशकुमार अशी होणार असे चित्र आहे. माझ्या डीएनएमध्ये गडबड आहे ही मोदींनी बिहारला दिलेली शिवी आहे, अशी भूमिका घेत नितीशकुमार यांनी मोदींवर वरताण मारली आहे. माझा अपमान म्हणजे बिहारचा अपमान या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजतरी त्याला यश मिळतेय असे दिसतेय. मोदींनी कात्रीत पकडण्यात नितीशकुमार यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत नितीशकुमार जिंकले तर मोदींनी देशपातळीवर शेरास सव्वाशेर ठरू शकेल असा चेहरा साऱ्या विरोधी पक्षांना मिळू शकेल. असे होणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहे. त्यामुळे संघ परिवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.
संघ परिवाराला खरे आव्हान बिहार-उत्तर प्रदेश या बुद्धभूमीतूनच मिळत असते. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवली होती. राम मंदिराचे आंदोलन उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांनी निष्प्रभ केले होते. आता मोदींचा सर्वसत्तावादाचा घोडा नितीशकुमारच रोखू शकतील. मोदी ज्या संघ परिवाराच्या विचारसूत्रावर स्वार आहेत, ते पंक्चर करण्याची युक्ती जनता परिवाराच्या जनतावाद या विचारात आहे. जनतावाद म्हणजे मध्यम, मागास, दलित, महादलित जाती-जमाती, अल्पसंख्यांक यांना प्रतिष्ठा आणि विकासाची संधी. डॉ. राम मनोहर लोहियांनी त्याची मांडणी केली आहे. जनतावाद म्हणजे संघाच्या धर्माच्या आधारावरच्या कट्टरवादी संघटनाला आडकाठी. म्हणून म. गांधी जनतेचे संघटन करत होते. तोपर्यंत संघाला स्वत:चे संघटन वाढवता येईना. या देशातल्या माणसांची जात अस्मिता धर्म, राष्ट्र, भाषा, वंश, प्रांत या ओळखीवर सतत मात करत आली आहे. नुकतेच गुजरातमध्ये पटेलांचे झालेले आंदोलन पाहा. ३० वर्षापूर्वी याच पटेलांना घेऊन संघाने राखीव जागांना विरोध केला होता. तेच पटेल आज स्वत:च्या जातीला ओबीसीअंतर्गत आरक्षण मागत आहेत. एका अर्थाने संघाचा विचार बाजूला सारत आहेत.
सांगायचा मुद्दा असा की, बिहारात नितीशकुमार जिंकले तर संघ विचाराला देशव्यापी आव्हान उभे राहिल. देशात नवी राजकीय समीकरणे जन्माला येतील. संघ विचाराच्या विरोधात सरळ सरळ ध्रुवीकरण होईल. बुद्धभूमी बिहारमध्ये मोदींचे हरणे म्हणजे वैर, द्वेष, हिंसेविरोधात प्रेमाचा संदेश जिंकणे असा अर्थ लावला जाईल. सहिष्णुता जिंकली, असे म्हटले जाईल. मोदी, संघ द्वेषाच्या विचाराने देश हाकू पाहत आहेत. त्या विचारांचा पराभव झाला असे विश्लेषण केले जाईल. म्हणून ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. बिहारी मतदारांच्या मतांचा कस लावणारी आहे. कोण खरे, कोण खोटे याची तड लावणारी आहे.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : ०१/०९/२०१५
No comments:
Post a Comment