मा. राम शिंदे साहेब,
गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
ख्वाडा
हा धनगर समाजातील मेंढपाळांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकणारा अप्रतिम चित्रपट सध्या
चर्चेत आहे. त्यानिमित्ताने धनगरांच्या प्रश्नांविषयी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी
हा पत्रप्रपंच. तुम्ही उच्चशिक्षित आहात. धनगर समाजाच्या प्रश्नांचा तुमचा अभ्यास आहे.
अहमदनगरसारख्या सहकार चळवळ रुजलेल्या जिल्ह्यातले तुम्ही आहात. तुमच्याकडे गृहखात्याची
महत्त्वाची जबाबदारी आहे. सामाजिक प्रश्नांचे भान असणारे मंत्री म्हणून धनगरांच्या
व्यथा तुमच्यापुढे मांडणे योग्य ठरेल.
ख्वाडा मध्ये रघु कऱ्हे या धनगर मेंढपाळांच्या
कुटुंबाची गोष्ट चित्रारलेली आहे. मेंढरांचा कळप गावोगाव चारण्यासाठी घेऊन हिंडणे हे
या कुटुंबाचे जगणे. रघुला बायको, दोन मुले. थोरला पांडा, धाकटा बाळू. पांडाचे लग्न
झालेय. तो मेंढ्या चारण्याचे काम करतो. बाळूला पैलवानकीचा नाद असतो. व्यायाम, कुस्ती
हे त्याचे छंद. पांडाला वडिलांचे जिणे मान्य. बाळूला गावोगाव भटकणे अमान्य. चाऱ्यासाठी
फिरता फिरता रघुचे कुटुंब एका गावातल्या रानात येते. त्या गावचे सरपंच अशोकराव. ते
या कुटुंबाला दमदाटी करतात. या रांगड्या सरपंचाशी कऱ्हे कुटुंबाचा संघर्ष होतो. तो
म्हणजेच ख्वाडा. त्याला खोडा, अडथळा असेही म्हणतात. असे विविध खोडे हटवत कऱ्हे कुटुंबाची
वाटचाल चालू असते.
रघु कऱ्हे हा सर्व मेंढपाळांचा प्रतिनिधी म्हणता येईल. सर्वच मेंढपालांना
गावोगाव अशोकरावासारख्या धनदांडग्यांशी संघर्ष करत करत मेंढ्यांची चारणी करावी लागते.
ख्वाडा सिनेमा शहरी लोकांसाठी फक्कड गावरान मेजवाणी आहे. शानदार मनोरंजन आहे. दोन घटकेचे
उत्तम मनोरंजन आहे हे खरेच. पण या चित्रपटाच्या पलीकडचे वास्तव भयानक आहे. वादळ, ऊन,
वारा, दुष्काळ, पाऊस, चोर-दरोडेखोर यांच्या तावडीतून सुटका करून घेता घेता मेंढपाळांना
काय मरणप्राय जिण्याला सामोरे जावे लागते हे मुंबईत बसून नाही कळणार.
शिंदेसाहेब, आपल्याकडे
पोलीस दल आहे. मेंढपाळांचा संरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मेंढ्या चारायला जाताना गावोगाव
मेंढपाळांना अनेकदा जबर मारहाणीला सामोरे जावे लागते. गावगुंड मरेस्तोवर मारतात. मेंढ्या,
शेळ्या ओढून नेतात. मेंढपाळ भोळा, भाबडा असतो. तो पोलीस खात्याला घाबरतो. कोर्टाची
पायरी आणि पोलिसांची डायरी नको रे बाबा असे म्हणतो. रानात राहणारा हा माणूस बुजरा असतो.
तो अन्यायाविरोधात ना पोलिसांकडे जात, ना कोर्टात. मारहाण झाली, सहन करतो. माझ्या नशिबी
हे जीणे आलेय म्हणून नशिबाला दोष देत रडत, कुढत बसतो. आला दिवस साजरा करतो. पोलीस खाते
या मेंढपाळांना गावोगाव त्यांच्याशी संवाद साधून, धीर देऊन अन्याय झाला तर सहन करू
नका, आमच्याकडे या, असे काही सांगेल काय? त्यासाठी पोलिसांना मेंढपाळांकडे रानात त्यांच्या
मेंढ्यामागे जावे लागेल. पण त्यातून मेंढपाळांना धीर येईल आणि गावातल्या दांडग्यांना,
अन्याय करणाऱ्यांना चाप बसेल. मेंढपाळांच्या पाठीमागे पोलीस आहेत, हा संदेश गेला तरी
मारहाण, चोऱ्या आटोक्यात यायला मदत होईल.
दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांपेक्षाही जास्त
हाल मेंढपाळांचे होतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करते. पीक विमा भरपाई,
अनुदान देते. गाई-बैलांसाठी चारा छावण्या सुरू करते. पण मेंढ्यांसाठी चारा छावणी किंवा
चाऱ्याची मदत आजवर सरकारने कधी केल्याची बातमी ऐकली नाही. पाण्यावाचून मेंढ्या, शेळ्या
मरतात. रोगराईने मरतात. त्याची भरपाई मेंढपाळांना कधी मिळत नाही. हे प्रश्न मार्गी
लावण्यासाठी राज्यात किती मेंढपाळ आहेत, त्यांच्याकडे किती मेंढ्या, शेळ्या, घोडे,
गाई आहेत याची सरकारने मोजदाद केली पाहिजे. या जनावरांचे विमे काढले पाहिजेत. एखादवेळी
पावसाळ्यात वीज पडते. पाच-दहा मेंढ्या मरतात. दहा मेंढ्या मेल्यातर दोन लाख रुपयांचे
नुकसान झाले म्हणून समजा. त्याची भरपाई मेंढपाळांना मिळत नाही. त्यासाठी सरकारने विमा
योजना मेंढपाळांपर्यंत नेली पाहिजे. लांडगे, बिबटे मेंढ्या खातात, रोगराईने मरतात.
त्यावेळी मेंढपाळांना या विम्याचा आधार मिळेल. हे झाले नाही तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या
बातम्या आम झाल्यात. उद्या मेंढपाळही वैतागून त्या मार्गाने जातील.
वनजमिनी मेंढ्यांना
चरण्यासाठी द्या, अशी मेंढपाळांची जुनी मागणी आहे. या जमिनी त्यांना दिल्या तर मेंढ्यांना
चाऱ्याची व्यवस्था होईल. वनातील झाडे राखण्याची जबाबदारी मेंढपाळ घेऊ शकतील. त्यातून
वनही वाढतील. मेंढ्याही जगतील. व्यवसाय वाढेल.
सरकारने मेक इन महाराष्ट्र , मेक इन
इंडिया सारख्या घोषणा केल्या आहेत. मेंढपाळ व्यवसायाच्या साखळीतून करोडो लोकांना राज्यात
रोजगार मिळतो. आज शेतीत रोजगार घटतोय. ग्रामीण भागात मेंढीपालन, शेळीपालन या व्यवसायाची
वाढ झाली तर अनेक रोजगार वाढतील. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर शेळ्या-मेढ्यांच्या मटणाला
मागणी वाटतेय. हे लक्षात घेता या व्यवसायाकडे सरकारने रोजगारवाढीची संधी देणारा व्यवसाय
म्हणून पाहायला हवे. या व्यवसायातले कष्ट कमी केले, चारा मुबलक उपलब्ध करून दिला, बंदिस्त
शेळी, मेंढी पालनात नवे तंत्रज्ञान आणून या व्यवसायाला गती दिली, त्यात गुंतवणूक वाढली
तर राज्यात ग्रामीण भागात एक मोठी भक्कम अर्थसाखळी वाढायला मदत होईल. मुबलक पैसा येईल.
महाराष्ट्र समृद्ध व्हायला मदत होईल. राज्यात सहकारी चळवळीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे
सहकारी साखर कारखाने उभे राहिले. दूध उत्पादकांचे दूध संघ उभे राहिले. मग शेळ्या, मेंढ्या
उत्पादकांचे मटण उत्पादन, मार्केटिंगचे सहकारी कारखाने का उभे राहू शकले नाहीत? त्यासाठी
पुढाकार घेतला पाहिजे. काळाची ती गरज आहे.
भावी काळात रोजगारवाढीचा किफायतशीर उद्योग
म्हणून शेळी, मेंढी उद्योगाकडे पाहावे यासाठी सरकारने आग्रह धरला पाहिजे. धनगर समाजात
आमदार गणपतराव देशमुख, आमदार महादेव जानकर यांच्यासारखे नेते आहेत. त्यांनीही या प्रश्नाकडे
सरकारला तात्काळ लक्ष द्यायला भाग पाडले पाहिजे.
राज्यात शेळीमेंढी पालन महामंडळ आहे.
ते अधिक सक्रिय करावे लागेल. जगभर शेळ्या-मेंढ्याच्या उत्पादनात, मटण उत्पादन विक्रीत
नवे तंत्रज्ञान येत आहे ते गावातल्या, रानातल्या मेंढपाळांकडे नेले पाहिजे. या व्यवसायात
नवी दृष्टी, नवे तंत्रज्ञान आणले तर क्रांती घडून येईल.
मेंढपाळांच्या कुटुंबाचे इतरही
अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण झाले पाहिजे. त्यांच्या मुलांमध्ये चांगले
कुस्तीगीर होण्याचे गुण असतात. ही मुले पळायला कुणाला आवरत नाहीत. उंच उडी मारायला
त्यांचा हात कुणी धरणार नाही. त्यांना संधी मिळाली तर ती ऑलिम्पिक सामन्यांपर्यंत आपल्या
देशाचे नाव रोशन करतील. मेंढपाळ रानावनात हिंडत देशाच्या उभारणीत योगदान देतो. शेतकऱ्यांना
आदर्श शेतकरी पुरस्कार मिळतात. मेंढपाळांना असे पुरस्कार सरकारने का देऊ नयेत? धनगरी
नृत्याला प्रोत्साहन द्यायला हवे. या समाजात भूत, भगत, भानामती, अघोरी प्रथांना बुवाबाजीला
बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याबद्दल प्रबोधन होण्याची गरज आहे.
शिंदेसाहेब, आपण
सरकारचे प्रतिनिधी म्हणून या प्रश्नांचा विचार करावा. आपल्यालाही हे प्रश्न माहीत आहेत.
मेंढपाळ लोक मुंबईत आझाद मैदानात किंवा मंत्रालयात आपल्याकडे त्यांची गाऱ्हाणी घेऊन
येणार नाहीत. त्यांचा भांडण्यापेक्षा काही नवे घडवण्याकर जास्त विश्वास आहे. स्वत:च्या
लेकरापेक्षा मेंढीचे नवजात कोकरू ते जास्त जीव ओवाळून सांभाळतात. नवे घडवणे, वाढवणे
हेच जिणे अशी जीवनशैली जगणाऱ्या या लोकांसाठी काही करता आले तर बघा.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : २७/१०/२०१५
No comments:
Post a Comment