बिहारात भाजप, संघ परिवाराचा
पराभव होणे याला ऐतिहासिक महत्त्व आहे. बिहार ही गौतम बुद्धांची भूमी आहे. देशातला
हा सगळ्यात जागरूक असा प्रदेश आहे. इथली माणसे खूप शहाणी आहेत. ते निवडणूक निकालात
दिसले आहे. या भूमीने देशाला चंद्रगुप्त, चाणक्य दिले. वैदिक विरुद्ध अवैदिक अशी वैचारिक
घनघोर लढाई या भूमीने पाहिली. बुद्धाचा धम्म वाढताना या भूमीने पाहिला. त्या धम्माचा
वैदिकांनी केलेला पराभव पाहिला. त्या पराभवात झालेला रक्तपात अनुभवला. राम-कृष्णाच्या
चरित्राशी, वारशाशी इथली माणसे दररोज नाते सांगतात. बाबरी मशीद पाडायला निघालेल्या
लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा या बिहारनेच अडवली होती. त्या अडवाणींच्या वाढदिवशीच संघ
परिवाराला, भाजपला स्वत:चा पराभव पाहावा लागला. बिहारींची ही भेट अडवाणींना पचली असेल
काय?
पिछडा पावे सौ में साठ ही
घोषणा समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दिली आणि १९६० च्या दशकात उत्तर भारतात
पिछडा म्हणजे ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समूहाला जाग आली. या घोषणेने केवळ पीडित जाती
जागृत झाल्या नाहीत, तर नवी सामाजिक न्यायाची लढाई उभी राहिली. बिहारच्या निवडणूक प्रचारात
नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे नेते मोदींना विरोध म्हणजे आगडे आणि पिछडे यांची
लढाई आहे असे जे म्हणत होते, त्याचा अर्थ त्या घोषणेशी जोडलेला होता.
बिहारमध्ये नीतीशकुमार-लालूप्रसाद
यांच्या ऐतिहासिक विजयाने पिछड्यांच्या लढाईने एक पाऊल पुढे टाकले आहे. हे दोघेही लोहिया
यांच्या सामाजिक न्यायाच्या लढाईतून पुढे आलेले ओबीसी नेते. नीतीश कुर्मी, तर लालूप्रसाद
यादव आहेत. या जाती पारंपरिक सत्तेच्या परिघात नव्हत्या. साऱ्या उत्तर भारतात उच्चवर्णीयांच्या
हातात सत्ता होती. त्यात पिछड्यांनाही वाटा मिळावा ही लोहिया यांची मागणी होती. पुढे
मंडल यांच्या क्रांतीने सत्तेच्या वर्तुळात माझा माणूस हे सूत्र मांडले. त्यातूनच कर्पूरी
ठाकूर, बी. पी. मंडल, मुलायमसिंग यादव, शरद यादव, रामविलास पासवान, नीतीशकुमार, लालूप्रसाद,
उपेंद्रसिंग कुशवाहा हे नेते पुढे आले. आज देशभरात ओबीसी जातीतून पुढे आलेले अनेक नेते
राजकारणात काम करत आहेत.
सत्तेच्या वर्तुळात माझा
माणूस या जादुई सूत्राची किमया आताच्या बिहार निवडणुकीच्या निकालानंतर दिसली आहे. या
निवडणुकीत नीतीश-लालू यांनी उघडपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा अजेंडा लोकांना
समजावून सांगितला. त्याला निमित्त घडले सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणाबद्दलच्या
वक्तव्याचे. भागवत म्हणाले, आरक्षणाचा आम्ही फेरविचार करू. त्याच्या फेरविचारासाठी
अशासकीय समिती नेमू. संघ परिवार हे भाजपाचे सुप्रीम कोर्ट आहे. संघ बोले भाजपा चाले
अशी स्थिती आहे. संघ कितीही आम्ही राजकारणात नाही असे म्हणत असला तरी ते ढोंग आहे हे
आता लोकांना कळून चुकले आहे. संघ परिवाराने संविधानाच्या समीक्षेसाठी वाजपेयी पंतप्रधान
असताना शासकीय समिती नेमली होती. या संविधान पुनरावलोकन राष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष
न्या. एम.एन. वेंकटचलय्या होते. संघाचे तेव्हाचे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी तर
हे संविधान मोडीत काढले पाहिजे असा आदेशच सरकारला दिला होता. संघाचे एक सरसंघचालक माधव
सदाशिव गोळवलकर यांनी बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात १९६६ सालीच संविधान, आरक्षण या गोष्टींना
संघाचा विरोध का आहे हे जाहीररित्या मांडले आहे.
भागवत यांच्या आरक्षणाबद्दलच्या
वक्तव्यानंतर बिहारमध्ये त्याची सर्वात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पुढे दादरीचे हत्याकांड,
फरिदाबादचे कोवळ्या दलित मुलांचे जळितकांड, गाईच्या शेपटाला धरून अल्पसंख्याकांवरचे
हल्ले, बिहारींना पाकिस्तानी ठरवणे, नीतीशकुमारांच्या डीएनएला खराब ठरवणे, लालूप्रसादांची
जंगली म्हणून हेटाळणी करणे, या साऱ्या प्रकरणातून आमचा अपमान होतोय हे बिहारींना जाणवले.
त्यामुळे दिल्लीनंतर बिहारमध्ये संघ परिवाराचा लाजीरवाणा पराभव झाला. त्याची जबाबदारी
संघ घेणार नाही. लबाडीने ते खापर भाजपवर फोडेल. संघ परिवाराने स्वत:च्या छत्रीखालील
साऱ्या संघटना बिहार निवडणुकीत कामाला लावल्या होत्या. भाजपने रामविलास पासवान, जीतनराम
मांझी, उपेंद्र कुशवाहा, पप्पु यादव हे मागासवर्गीय चेहरे सोबत घेत पिछड्यांमध्ये फूट
पाडण्याचा मोठा डाव टाकला होता, पण त्याला यश आले नाही. सारे पिछडे नीतीश यांच्या मागे
उभे राहिले. बिहारची निवडणूक म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. मोदी-शहा यांच्याकडे १०-१०
हेलिकॉप्टर, प्रचंड पैसा, डझनभर केंद्रीयमंत्री प्रचारात टाळ उडवायला होते. शिवाय आगलावू
भाषणे करणारे साधू, साध्वी हेही होते. या सर्व लवाजम्याला नीतीश यांनी जनता परिवार,
काँग्रेस यांची मोट बांधून थोपवले. बिहारातून अक्षरश: पळवून लावले. सामान्य माणसांच्या
बळावरच हे घडले.
नीतीश यांचा चेहरा विकासवादी
आहे. गुन्हेगारी संपवणारा मुख्यमंत्री, प्रशासन पारदर्शक आणि गतिमान करणारा नेता, सर्व
जातिगटांना एकत्र घेऊन पुढे जाणारा लोकनेता अशी त्यांची प्रतिमा आहे. ती लोकांना जास्त
भावली. बिहारात नीतीश विरुद्ध मोदी असा सामना झाला. त्यात नीतीश सरस ठरले. मोदींना
या निवडणुकीने उघडे पाडले आहे. मोदी केवळ प्रचारपुरुष आहेत. ते भाषणे ठोकतात. काम काही
होत नाही. दीड वर्षात ते महागाई कमी करू शकले नाहीत, तरुणांना रोजगार देऊ शकले नाहीत,
हे या निवडणुकीत नीतीश यांनी स्पष्टपणे मांडले. लोकांना ते पटले. विकास, अच्छे दिन
तर बाजूलाच राहिले, पण देशात हिंसक वातावरण वाढले. लेखक-कलाकारांना पुरस्कार परत करण्याची
वेळ आली. संवेदनशील लेखकांना तुम्ही लिहिणे थांबवा असे देशाचा सांस्कृतिकमंत्री म्हणतो
आणि मोदी ते चालवून घेतात. याचा अर्थ लोकांना कळला आहे. अरुण जेटली यांनी लेखकांच्या
पुरस्कार वापसीला कागदी क्रांती म्हणून हेटाळले. ती बिहारमध्ये भोवली.
बिहारात भाजप, संघ परिवाराचा
पराभव होणे याला ऐतिहासिक महत्त्व आहे. बिहार ही गौतम बुद्धांची भूमी आहे. देशातला
हा सगळ्यात जागरूक असा प्रदेश आहे. इथली माणसे खूप शहाणी आहेत. ते निवडणूक निकालात
दिसले आहे. या भूमीने देशाला चंद्रगुप्त, चाणक्य दिले. वैदिक विरुद्ध अवैदिक अशी वैचारिक
घनघोर लढाई या भूमीने पाहिली. बुद्धाचा धम्म वाढताना या भूमीने पाहिला. त्या धम्माचा
वैदिकांनी केलेला पराभव पाहिला. त्या पराभवात झालेला रक्तपात अनुभवला. राम-कृष्णाच्या
चरित्राशी, वारशाशी इथली माणसे दररोज नाते सांगतात. बाबरी मशीद पाडायला निघालेल्या
लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा या बिहारनेच अडवली होती. त्या अडवाणींच्या वाढदिवशीच संघ
परिवाराला, भाजपला स्वत:चा पराभव पाहावा लागला. बिहारींची ही भेट अडवाणींना पचली असेल
काय?
या निवडणुकीत विकासाचे खरे
मॉडेल कोणते? गुजरातचे की बिहारचे? की इतर आणखी वेगळे? कायदा सुव्यवस्था, अर्थनीती,
संघाची शिरजोरी, बिहारींचा गौरव, राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व, सुशासन, असहिष्णुता,
सेक्युलॅरिझम या मुद्द्यांचा कस लागला. बिहारींनी मोदी आणि असदुद्दीन ओवेसी या दोघांनाही
नाकारले. हिंदू मध्यम जाती एक झाल्या तर उच्चवर्णीयांचे हिंदुत्व पराभूत होते हे सूत्र
बिहारने दाखवून दिले.
नीतीश यांच्या विजयाने मोदींच्या
भाजपांतर्गत दादागिरीलाही शह बसला आहे. देशातले राजकारण नीतीश यांच्या विजयाने कूस
बदलते आहे. भाजप हा पक्ष संघाचा अजेंडा घेऊन काँग्रेसेतर मध्यम मार्गी राजकीय पक्षांना
हरवू शकत नाही हे बिहारात दिसलेच, पण त्याआधी दिल्लीतही केजरीवाल यांच्या विजयात पाहायला
मिळाले होते. ममता बॅनर्जी, मुलायसिंह यादव, जयललिता, करुणानिधी, चंद्राबाबू नायडू,
के. चंद्रशेखर राव, नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना भाजप हटवू शकत नाही.
त्या पक्षांच्या विभागात भाजपला आघाडी करावी लागते. स्वत:ची ताकद वाढवता येत नाही.
संघ परिवाराला माहीत आहे
की, बिहारमधून एकता, सहिष्णुतेचा संदेश देशात जातो. बिहारात एकता, सहिष्णुतेचा नीतीश
यांच्या रूपाने विजय झाला. एकतेचा विजय म्हणजे संघाच्या द्वेषवादी विचाराचा पराभव.
मोदी-संघ द्वेषाच्या विचाराने देश हाकू पाहत होते. बुद्धाच्या बिहारने द्वेषाच्या विचारकांना
धुडकावले. संघाला हा मोठा तडका आहे. देशाला या विजयाने मार्ग दाखवला आहे. दिल्लीचा
रस्ता बिहारमधून जातो. बिहारने सहिष्णुतेच्या राजकारणाला विजयी केले. हे राजकारण देशपातळीवर
आकाराला येत आहे. संघ, मोदी यांनी यातून योग्य तो धडा घ्यावा, असा बुद्ध भूमीचा संदेश
आहे. अन्यथा पुढील काळात दिल्लीचे तख्त बदलल्याशिवाय राहणार नाही.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : १०/११/२०१५
No comments:
Post a Comment