डॉ. सदानंद श्रीधर मोरे, देहूकर (जन्म -25 जून 1952) हे संत तुकारामांचे दहावे वंशज. पुणे विद्यापीठात तत्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक. संत्विचारांचे भाष्यकार, लोक व्यवहाराचे अभ्यासक, चिंतक आहेत. आजच्या काळाचे अव्वल संशोधक म्हणून महाराष्ट्र त्यांना जाणतो. 'तुकाराम दर्शन', 'लोकमान्य ते महात्मा' हि त्यांची पुस्तक गाजली. 'उजळत्या दिशा' हे नाटक लक्षवेधी ठरले. असा चतुरस्र लेखक, विचारवंत आणि क्रियाशील पंडित त्यांच्या वयाची साठी यावर्षी पूर्ण करतोय. त्यानिमित्ताने त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली ही मुलाखत. -
प्रश्न : सर, तुम्ही संत साहित्याचा अभ्यास आणि मांडणी करताना परंपरा आणि आधुनिकता यांचा मेल घातलेला दिसतो. याविषयी काय सांगाल ?
डॉ. मोरे : मला तुकारामांचा वारसा मिळाला . घरातच अध्यात्म, कीर्तन, प्रवचनाची परंपरा मिळाली. आमच्या घराण्याला मानणारा मोठा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर आहे. माझे आजोबा कीर्तनकार होते. वडील श्रीधरबुवा मोरे देहूकर हे अभ्यासक आणि सामाजिक अग्रणी होते. 1942 च्या लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तेव्हा त्यांचे शिक्षणही अर्धवट राहिले . असं असलं तरी वडिलांना विविध विषयांचा व्यासंग होता . संतांनी वारकऱ्यांना फक्त अध्यात्म शिकवलं नाही तर अध्यात्म्साधानेशिवाय इतरवेळी व्य्यव्हारात माणूस म्हणून चांगलं कसं वागावं, याविषयी अभंगातून मार्गदर्शन केलं आहे. वारकरी काही 24 तास अध्यात्मात दंग असत नाही . भक्ती करण्याची वेळ सोडली तर इतरवेळी अध्यात्म नसतं. त्यावेळी सामान्य माणसासारखंच त्याचं जगणं असतं. समाजातले सगळे लोक पूर्ण वेळ परमार्थ करू शकत नाहीत. काही मोजके लोक सर्व वेळ परमार्थ जरूर करू शकतात . काही धर्मात अशी तरतूद आहे की काही लोकांनी सर्ववेळ अध्यात्म साधना करायची. अशा लोकांना यती म्हणतात . संन्याशीही म्हणतात. या संन्याशांची व्यवस्था समाजातल्या इतरांना करायची . वारकरी संप्रदायात मात्र अशी व्यवस्था नाही . वारकरी प्रापंचिक असतात. हे कीर्तन, प्रवचन, उपदेश करतात . संसार करून परमार्थ करणं हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचं मानलं जातं. स्वतः तुकोबा असे वारकरी होते . त्यांनी त्यादृष्टीने जीवनवादी उपदेश केला .
ब्रिटीश काळात आपल्या सामाजिक जीवनाचं संस्थीकरण झालं. समाजात काम करायचं तर संस्था काढून त्याद्वारे काम करण्याची परंपरा सुरु झाली. अनेकांनी शिक्षण संस्था काढल्या. समाजोपयोगी विविध संस्था समाज जीवनात अस्तित्वात आल्या. वारकऱ्यांनी स्वतःच्या संस्था काढल्या नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं संस्थीकरण केलं गेलं नाहीत. त्यातून वारकऱ्यांचा ऐहिक जीवनाशी काहीच संबंध राहिला नाही. त्यामुळे लोक म्हणू लागले, संत साहित्य, त्याचा अभ्यास हे देवधर्माशी सबंधित गोष्ट आहे. जगण्याशी त्याचा फारसा संबंध नाही. हे खरं नव्हतं. मी मात्र आपलं जगणं, संत साहित्याचा अभ्यास आणि आपला समाज यांच नातं एकच आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला.
माझा आजचा पिंड घडला माझ्या वडिलांमुळे ते आमच्या घराण्याला देहूकर म्हणून ओळखतात. आमच्या घराण्यात कीर्तनाची परंपरा होतीच. वारकर्यांमध्ये विविध फड आहेत . वेगवेगळी घराणी आहेत . हे फड, घराणे स्वतःच्या प्रथा, परंपरा, शिकवण यानुसार वर्तन करतात . एका फडकऱ्याने दुसऱ्या फडकऱ्याचे ऐकायचं नाही स्वतःच्या फडाची शुद्धता जपायची असा आटोकाट प्रयत्न प्रत्येक जन करीत. माझ्या वडीलांनी मात्र सर्वांचं ऐकायचं. चांगलं ते घ्यायचं वांगलं ते टाकून द्यायचं असं ठरवलं. त्यांनी मामा दांडेकर, जोग महाराज, आजरेकर महाराज, केशवराव देशमुख, दादा महाराज सातारकर अशा मोठमोठ्या वारकरी कीर्तनकार, नेत्यांबरोबर सलोखा जोपासला. वडील पायी पंढरीला जात. वेगवेगळ्या फडांचा अभ्यास करत . माहिती घेत. वेगवेगळ्या संप्रदायाचा अभ्यास करत. वारकरी संप्रदायाच्या बाहेरच्या अध्यात्मिक तत्वावेत्त्यांचा त्यांनी अभ्यास केला. स्वामी विवेकानंद, कृष्णमूर्ती यांचं तत्वज्ञान अभ्यासलं. त्याविषयीची पुस्तकं जमा केली. आचार्य रजनीश, रमणमहर्षी यांचे विचार समजून घेतले. कृष्णमूर्तीना तर ते भेटलेही होते. वडिलांनी अशा वेगवेगळ्या संप्रदायाचा अभ्यास करून त्यातून चांगले ते घेतलं. त्यामुळे त्यांची दृष्टी, विचार करण्याची पद्धत व्यापक झाली . हा अभ्यास केल्यानंतर वडिलांना जाणवलं की, वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र धर्म आहे. वेगळं दर्शन आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी पहिल्यांदा हे स्पष्ट केलं. जसं महानुभाव हा पंथ स्वतंत्र दर्शन आहे. त्याच्या अनुयायांना त्याची सुरुवातीपासूनच कल्पना होती . वारकरी संप्रदायात मात्र तशी जाणीव नव्हती. स्वतंत्र दर्शनासंबंधीची मांडणी वारकरी संप्रदायात कुणी केली ही नाही.
माझ्या वडिलांविषयी सांगत होतो . त्यांनी ख्रिश्चन अभ्यास केला . आधुनिक तत्वज्ञानाच्या विविध ज्ञानशाखा, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र याविषयीची पुस्तकं आमच्या घरात भरलेली होती. नवभारत, मराठी साहित्य पत्रिका, अमृत, सोनोपंत दांडेकरांचं प्रसाद, आचार्य अत्रेंचा मराठा हे अंक घरी येत. वडील पुण्याला वारंवार जात. आमच्या जमिनीचे खटले चालत. त्यासाठी जावं लागे. पुण्यातून येताना वडील विविध विषयांवरची पुस्तकं घेऊन येत. आईनस्टाइन, मार्क्स, लेनिन यासह वेगवेगळ्या व्यक्ती आणि विषयांवरची पुस्तकं आमच्या घरात येत. मला ती वाचता येत असत.
प्रश्न - वडिलांमुळे तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या बाहेरचं वाचन लहानपणीच करायला मिळालं. त्यातून तुमच्या विविधांगी अभ्यासाला विचार करण्याला चालना मिळाली. तुमची अगदी लहानपणीही जडणघडण होत होती....
डॉ. मोरे : अगदी शाळेत होतो तेव्हा पासूनच घरात मला विविध पुस्तकं वाचायला मिळाली. माझी आई शिक्षिका. तिनंच मला संस्कृत शिकवलं. माझ्या वडिलांइतका विविधांगी दृष्टीचा माणूस देहून दुसरा नव्हता. मोठमोठे लोक घरी येत. त्यामुळे वि. का. राजवाडे यांनी वारकरी संप्रदायाला
challenge करणारी मांडणी केली होती. त्या मांडणीला भा. पं. बहिरट यांनी सडेतोड उत्तर दिलं होते. बहिरट मोठे विद्वान होते. ते वडिलांचे मित्र. आमच्या घरी येत, त्यांच्या चर्चा मी ऐकत असे. दादा महाराज घरी येत. आमच्या बंगल्यात मुक्काम करत. माझे चुलते नव्हते. फडकरी असणं हे खूप कष्टाचं. ते वर्षभराचं काम. पंढरीत त्यांना वारंवार जावं लागतं. थांबावं लागतं. हे माझे चुलते म्हणजे एक अवलिया माणूस. खूप उपक्रमशील, प्रतिभावंत होते. त्यांची स्मरणशक्ती कमालीची, कथा, आख्यायिका, किस्से, उदाहरण त्यांच्या तोंडपाठ असत. एम.ए. पर्यंत मला लोक त्यांचा शिष्य म्हणून ओळखत. मी त्यांच्या जवळपास वावरलो. खूप उचापती केल्या. माझ्यातला कार्यकर्ता त्यांच्या अवतीभवती घडला. या चुलत्यांनी स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीने केलं होतं. वारकरी असून एवढे क्रांतिकारक होते ते.
प्रश्न - त्यावेळी वारकरी संप्रदायात साखरे महाराज, जोग महाराज, दांडेकर महाराज हे ब्राह्मणी मांडणी करत होते. ही मांडणी तेव्हा तुमच्या लक्षात येत होती ?
डॉ. मोरे : होय त्यांची मांडणी ब्राह्मणी वळणाची होती. खरे तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी वारकर्यांना अर्धेब्राह्मण म्हटलं होतं. म. फुलेंचाही वर्कायांवर आरोप होता. हे धड इकडचे नाहीत आणि तिकडचेही. मध्येच लोंबकळत असणारे आहेत, असं समाज सुधारक म्हणत. वारकऱ्यांचं ब्राह्मणीकरण झालंय असं निदान करत म. फुल्यांनीही त्यांना ब्राह्मणी परंपरेकडं ढकलून दिलं पण वास्तव हे होतं की सत्यशोधक समाज तुकोबांनाच नायक मनात होता. फुलेंना सत्यशोधक समाजासाठी पाठींबा मिळाला तो वारकरी संप्रदायाचा प्रभाव असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, चाकण या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातूनच हा परिसर देहू-आळंदीच्या पुढे येतो.
संत गाडगे महाराज देहूत येत असत. ते खरे वारकरी. त्यांना वारकर्यातलं क्रांतीकारकत्व पहिल्यांदा कळलं. बाबांना तनपुरे महाराज, कैकाडी महाराज, शामराव देसाई हे मोठे शिष्य लाभले. गाडगे बाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवून आणली हिंदू धर्माचा सामाजिक वारसा सांगण्याचं, त्यातलं क्रांतीकारत्व उजळून दाखवण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलं. तसंच काम गाडगे महाराजांनी वारकरी संप्रदायांच्या बाबतीत केलं.
मी कॉलेजात असतानाच वडील मला पुण्यातल्या जेधे मँशनमध्ये घेऊन गेले. तेव्हा केशवराव जेधे मोठे नेते. काँग्रेसची सूत्रं तिथून हलत. महाराष्ट्रातील निवडणुकीचं तिकीट वाटप तिथून होई. यशवंतराव चव्हाण तेव्हा नवीनच होते. ते इथल्या बैठकीत कोपऱ्यात बसत. त्यांना अजून एवढं महत्व आलेलं नव्हतं लहान असतानाच मी असा वडीलांबरोबर वावरल्याने मला वेगवेगळे समाजातले प्रवाह कळत गेले. राजकारण, समाजकारण समजून घ्यायला सोपं गेलं. शाळेतही मी हुशार होतो. matrick ला असताना मला पदवी पर्यंतचं ज्ञान होतं. एवढा मी mature होत गेलो.
वडिलांबरोबर मी बरोबरीच्या नात्याने विविध विषयावर चर्चा करायचो. आमच्या दोघांतलं वयातलं अंतर गळून पडलं. घरी मोठी माणसं येतं. त्यांच्याशी मी त्यांच्या पातळीवर जाऊन चर्चा करायचो. त्यांच्याशी माझं ज्ञानसाधना करणार्यांचं नातं तयार झालं. अशी माझी जडण घडण होत होती. देहून कीर्तन ऐकणं पुण्यात कॉम्रेड डांग्यांचं भाषण ऐकूण हे मला काही वेगवेगळं आहे, असं वाटत नसे. त्यात समान धागा शोधात असे. तशी विचाराची सवय लागली.
प्रश्न - तुम्ही विद्यार्थीदशेत देहूत आचार्य अत्रेंच्या प्रचाराची सभा घेतली होती.
डॉ. मोरे - तेव्हा मी ७ वी इयत्तेत होतो. अत्रेंचा मराठा मी वाचत असे. त्यात विविध वाद काळात. साहित्य राजकारणावरची मत मतांतर वाचायला मिळत. भाऊ पाध्ये यांच्या 'राडा' या कादंबरीवरून झालेला वाद मराठात मी वाचला. दि . पु. चित्रे मराठातच भेटले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ कळली. अत्रे आणि 'प्रभात्कार' वा. रा . कोठारी यांचा वाद समजला. १९६२ सालची निवडणूक होती. अत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीमार्फत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून आमच्या मतदार संघात निवडणूक लढवत होतो. हि जागा रिपब्लिकन पक्ल्शाला सोडली होती. त्यांना उमेदवार नव्हता , त्यांनी अत्रेंना उमेदवारी दिली. माझ्यावर मराठमुळे अत्रेंचा प्रभाव. मला आनंद झाला. आता आपल्याला अत्रेंचा प्रचार करायला मिळणार होता. मी वडिलांना म्हणालो आपल्या गावात अत्रेंची सभा अजून कशी झाली नाही. इतर उमेदवारांच्या सभा होऊन गेल्या. वडील म्हणाले, अत्रेंना उमेदवारी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दलित वस्तीत आहेत. गावात कोण सभा घेणार. मग मी दलित वस्तीत गेलो. माझे तरुण मित्र जमा केले. पोस्टर, खळ, शिडी घेतली. गावभर अत्र्यांचे पोस्टर डकवले. त्यानंतर अत्र्यांची सभा घेतली. पण ती गावात नाही दलित वस्तीतच घेतली तिथल्या कार्यकर्त्यांनी माझी ओळख आपल्या पक्षाचा कार्यकर्ता अशी करून दिली.
या सभेच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्ष, त्यातली गटबाजी, समाजातला जातीवाद, त्यावेळच्या संयुक्त महाराष्ट्र समितीचं राजकारण कळलं. पुढे मी उजळल्या दिशा हे आंबेडकरी चळवळीवरचं नाटक लिहिलं. त्यात मी दलितांचा प्रश्न मांडलाच. राजकारण, समाजकारण, संस्कृती हे एकमेकांशी एका धाग्यांनी गुंफलेल्या एकजिनसी असतात हे मला कळत गेलं.
मी अकरावीत होतो. तुकाराम बीजेला मी समाज सुधारक हा लेख लिहिला. 'मराठा'त अत्रेंनी तो छापला. हा माझा छापून आलेला पहिला लेख. त्या दिवशी अत्रे देहूला आले. गावकर्यांना म्हणाले, तुकारामांवर लेख लिहिलेला तो लेख कुठाय ? लोक म्हणाले, कुठला लेखक ? तो पोरगा आहे. मग अत्रेंची भेट झाली. त्यांनी मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं. नंतर कीर्तन करायला लागलो. लोक ऐकायचे. आदर करायचे. लिहायलाही लागलो.
पुढे अहमदनगरला कॉलेजात नोकरी लागली. तिथं लाल निशाण पक्षाचे दत्ता देशमुख, भापकर, भास्कर जाधव याच्या विचारांना समजावून घेता आलं. त्यात श्रमिक विचार हे लाल निशान पक्षाचे मुखपत्र त्यात लिहिलं अगदी सिनेमा, नाटक, चळवळी अशा सर्व विषयावर लिहायचो. मार्क्सवादाचा अभ्यास केला. अशा पाश्च्यात्य विचारवंत वाचले. त्यातून व्यापक जग समजून घेता आलं.
प्रश्न - तुकाराम दर्शन लिहिताना तुम्ही सर्व जनवादाची मांडणी केली, तुम्ही ' सर्वजनवाद' हा शब्द प्रथम वापरला. तो उच्चारला
डॉ. मोरे - वारकरी संप्रदाय 'सर्वजनवादी' आहे, हे राजाराम शास्त्री भागवत यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं. मी तुकाराम दर्शन मध्ये त्याची मांडणी केली. वारकरी संत सर्व जातीतून आले. ज्ञानबा-तुकाराम हे चोखाबापर्यंत आपल्याला ते दिसतं. हा सर्वजनवाद बहुजन वादापेक्षा वेगळा आहे. 'बहुजन' हा शब्द प्रथम टिळकांनी वापरला. टिळकांनी, गोखले, रानडे या उच्चशिक्षित, अर्जविनंत्याचं राजकारण करणाऱ्या पुढार्यांना अभिजन म्हटलं. त्यांच्या बरोबर जे नाहीत, त्यांना बहुजन संबोधलं. म्हणजे मवाळा विरुद्धचे सर्व बहुजन असं टिळकांना म्हणायचं होतं. मवाळांनी टिळकांना तेल्या तांबोळयांचे पुढारी म्हटलं. म्हणजे टिळक बहुजन झाले नंतर विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन पक्ष काढला.बहुजन शब्दांची मांडणी त्यांनी आर्थिक पायावर केली. बहुजन म्हणजे ब्राह्मणेतर नाही तर जो जो गरीब तो तो म्हणजे गरीब, किराणा दुकान चालवणारा ब्राह्मणही बहुजन होय अशी शिंदेंची मांडणी होती.
शिंदे म्हणत कि राखीव जागा द्या. पण त्या फक्त अस्पृश्यांना द्या. अन्यथा भांडणं लागतील. पुढे तेच दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद उफाळला. काँग्रेसनं ब्रिटीशांकडे शक्य तेवढं लवकर आमचं राज्य आम्हाला करू द्या, अशी मागणी केली होती. जिना, टिळक, हे नेतेअसाग्रह्धर्न्यत एक होऊन आघाडीवर होते. ब्राह्मणेतर चळवळीचं मात्र असं मत होतं की, स्वराज्य नकोच. कारण ते मिळालं तरी ब्राह्मणांच्या हातात जाणार. मग उपयोग काय ? शिंदे यांनी यावेळी म्हटलं की, अरे आपण राज्यकर्ते होतो. ब्रिटीश सरकार स्वातंत्र्य देणारच आहे. तर घ्यायला काय हरकत आहे. यावरून खल झाला. जातिवाद फोफावला. त्याला ब्रिटीशांनी खतपाणी घातलं. इथला जातीवाद ब्रिटीशांनी वाढवला हे खरं नाही. तो पूर्वी होताच. ब्रिटीशांनी त्यावर त्यांची पोळी भाजली. त्याला पोसला. ब्रिटीशांनी राखीव जागांच्या प्रश्नावर सगळ्यांना झुलवलं. ब्राह्मणेतर चळवळ फुटली. मुस्लीम, मराठा यांना राखीव जागा नको, ते राज्यकर्ते होते, अशी शिंदे यांची मांडणी होती. शाहू महाराज राखीव जागांचे पुरस्कर्ते होते.
राखीव जागांचा खेळ पुढे धोकादायक बनला. शिंदे यांनी या धोक्याचा पहिल्यांदा इशारा दिला होता. त्यात एक जात विरुद्ध इतर जाती असं म्हणता येईल. ब्राह्मण विरुद्ध इतर, मराठा विरुद्ध इतर असे वाद आज आपण पहिले. मंडळ आयोगानंतर या वादांची तीव्रता जास्त वाढली. पूर्वी ब्राह्मण, दलित, मराठा व ओबीसी यांच्यात वाद खेळले जातात. या वादात एक जात विरुद्ध इतर सर्व जाती असा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळला जातो. वि. रा. शिंदे यांनी त्याबद्दल वारंवार सजग केलं होतं. यावर उपाय सर्वजनवादाचा आहे. एक समाज म्हणून आपण प्रश्नांकडे पाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असं मला वाटतं.
प्रश्न - वारकरी संप्रदायात वेगवेगळे प्रवाह आज घुसलेले दिसतात. त्याविषयी.
डॉ. मोरे - लोकहितवादींनी वारकऱ्यांना अर्धे ब्राह्मण म्हटलंच होतं. आजही वारकऱ्यांना चांगलं नेतृत्त्व मिळालेलं नाही. त्यामुळे ते अर्धे इकडे अर्धे तिकडे असे लोंबकळत आहेत. आमच्यकडे पैठण विरुद्ध पंढरपूर हा झगडा जुना आहे. पैठण हे हिंदू धर्मशास्त्राचं असलेलं गाव. पंढरपूरच्या वाळवंटात समतेचं केंद्र आहे. वारकरी संप्रदायाची धार मराठ्यांना सत्ता मिळाली अन बोथट झाली. समृद्धी आली की प्रत्येकाला पोटापुरतं मिळतं. समाज संतुष्ट बनतो. अठराव्या शतकात मराठे भारतभर पसरले. महाराष्ट्रात मराठ्यांना ब्राह्मणांसह इतर जातींनाही सैन्यात कामं मिळाली. सैन्य लुट करून आणी. लुटीचा हिस्सा थोडा घरातही येत असे. समृद्धीचं वाटप होत होतं. अजिबात नाही असं कमी झालं. काही मिळवायचं हा सामाजिक संघर्ष कमी झाला. समाज गाफील राहिला. वारकरीही बेसावध राहिले. नंतर ब्रिटीश आले. त्यांनी उत्तर भारतातल्या ब्राह्मणांसह शिखजणांना सैन्यात घेतलं पण मराठ्यांना घेतलं नाही. मराठे हि लढाऊ जमत आहे ते दगाफटका करतील याची ब्रिटीशांना भिती होती.
अशा वातावरणात मराठी समाजाची पिछेहाट होत गेली. वारकरी संप्रदाय या काळाची पावलं ओळखू शकला नाही. ब्रिटीशांनी नवी विद्या आणली. नवा विचार आणला. वारकरी जास्त शिकले नाहीत. त्यांच्यातलं कुणी इंग्रजी विद्या जनात न्हवतं. त्यावेळी वारकऱ्यांच ब्राह्मणीकरण होत गेलं. १८व्या शतकाच्या शेवटी बाबा पाध्ये यांनी हिंदू धर्मशास्त्रावरचा शेवटचा ग्रंथ लिहिला. तो पैठणमध्ये नव्हे तर पंढरपुरात लिहिला. धाकटे बाजीराव पेशवे लवाजम्यासह पंढरपूरला वारीला जाऊ लागले. वारकऱ्यांत भांडणं होऊ लागली.
हिंदू धर्माची चौकट जातव्यवस्थेसह या काळात वारकरी संप्रदायात घट झाली. पूर्वी वारकरयांत जात होती पण ती एकमेकांना टोचत नव्हती. पुढे टोचणं चालू झालं. संतांचा क्रांतिकारी उपदेश वारकर्यांना पुढे नेता आला नाही. ब्रिटिश राजवटीचे फायदे घेता आले नाहीत. वारकरी संप्रदायाने पाश्चात्य शिक्षण घेण्यात कसर ठेवली.
गाफील वारकरी समूहात मग ब्राह्मणी विचार बळकट झाला. पुढे हिंदुत्त्ववादी घुसले. विश्व हिंदू परिषदेनं पंढरपुरात संतपूजा केली. हा घुसखोरीचा एक प्रकार होता. याउलट पुरोगामी, डावे, अभ्यासक यांनी वारकऱ्यांची टिंगलटवाळी करणं चालू ठेवलं. हे वर्णजात मानणारे, दैववादी अशी दूषणं दिली. त्यांच्यात जाऊन काही सुधारणा करण्याचं टाळलं. संतांच्या क्रांतिकारी उपदेशाला दूर लोटलं. याचा बरोबर फायदा हिंदुत्त्ववाद्यांना झाला. वारकरी संप्रदायातल्या पोकळीत हिंदुत्त्ववादी उभे राहिले.
पुण्यात पालख्या आल्या की, ज्ञानप्रबोधिनी हि संस्था वारकऱ्यांना औषधपाणी पुरवते. त्याला काय लागतं ? दोन-तीन डॉक्टर आणि सर्दी खोकला-तापाची औषधं - गोळ्या. पण बोर्ड लावतात. आरोग्य सेवा देतात. याउलट बघा. हडपसरमधून पालखी दरवर्षी जाते. तिथं समाजवाद्यांनी सुरु केलेला मोठा साने गुरुजी दवाखाना आहे. या दवाखान्याचे लोक, संस्थाचालक, डॉक्टर कधीही वारकऱ्यांना ज्ञानप्रबोधिनीसारखी आरोग्य सेवा देत नाहीत. याला काय म्हणायचं ?
जिथं आपली सत्ता आहे तिथं ती वापरली पाहिजे. ते ना कम्युनिस्टांनी केलं, ना समाजवाद्यांनी, मग वारकरी तुमच्याकडे कसे यातील ? त्यांना तुम्ही जवळचे कसे वाटाल ?
संत नामदेवांनी त्यांची सत्ता पंढरपुरात वापरली. संत चोखोबांच्या देहाचे अवशेष गोळा केले. विठ्ठलाच्या मंदिराच्या दारात समाधी बांधली. एका अस्पृश्याची समाधी विठोबाच्या दारात. हिंदुस्थानात असं दुसरं उदाहरण नसेल. नामदेवांना हे करताना विरोध झालाच नसेल असं मला वाटत नाही.
ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं त्यांना चोखोबाचं दर्शन घ्यावंच लागेल हे ठणकावून सांगण्यासाठी नामदेवांनी हे केलं . नामदेव एकदा ओंढ्याला गेले होते, देवळापुढे कीर्तन करायला त्यांना मना केलं गेलं. त्यांनी देवळाच्या मागे जाऊन कीर्तन केले. देऊळ फिरवले ही कथा त्यातून आली. कीर्तन महत्त्वाचं देऊळ नव्हे हा त्यातला संदेश. नामदेव हा पहिला मराठी संत. देशभर गेलेला. राष्ट्रीय झालेला. त्यांनी दिंड्यांचं संघटन केलं. फड जागविला. वारकऱ्यांचं नेट्वर्किंग केलं.
हे क्रांतीकारत्त्व नंतरच्या वारकरी नेत्यांना पुढे नेता आले नाही.
प्रश्न - वारकरी संप्रदायाचं नेतृत्त्व संतांचा शहाणा विचार पुढे न्यायला कमी पडलं, असं तुम्ही मांडत आलात. तुम्हाला तुकोबांचा वारसा आहे. तुमचा व्यासंग मोठा आहे. तुम्ही चळवळीत कार्यकर्ते म्हणून काम केलंय. वारकरी संप्रदायाचं नेतृत्त्व तुमच्यासारख्या क्रियावान पंडित का करत नाही !
डॉ. मोरे - माझ्यात एवढी मोठी क्षमता नाहीए. मी चाळीस वर्षं काम करतोय. मांडणी करतोय. हळूहळू बदल होतोय. काहि महिन्यांपूर्वी आम्ही वारकरी साहित्य परिषद स्थापली. फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठावर एकत्र आलेत. प्रबोधनाची भूमिका पुढे जात आहे. संतांचे विचार बालवयात समजले पाहिजेत. शालेय अभ्यासक्रमात या संत साहित्याचा समावेश व्हायला हवा. संत साहित्य-विचार याविषयी संशोधन, अभ्यासाला गती मिळाली पाहिजे. अभ्यास केंद्र, ग्रंथालय स्थापन झाली पाहीजेत. प्रवचन-कीर्तनकारांचा शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या वारकरी शाळा निघाल्या पाहिजेत. आजच्या गोंधळमय आणि भरकटलेल्या जीवनाला दिशा देण्याची ताकद संतांमध्ये आहे. त्या विचारांचं सतत जागरण झालं पाहिजे असं मला वाटतं. इ त्या चळवळीतला एक पाईक म्हणून काम करतोय.
पूर्व प्रसिद्धी
रिंगण