Wednesday, August 15, 2012

छोट्या माणसांच्या मोठ्या गोष्टी!

मॅगसेसे  पुरस्कार (2012) विजेत्या
तैवानच्या भाजीविक्रेत्या - चेन शु चु 

मॅगसेसे  पुरस्कार (2012) विजेते 
तामिळनाडू राज्यातील - कुलंदेई फ्रान्सिस 

यंदाचे  रेमन  मॅगसेसे  पुरस्कार नुकतेच जाहीर झाले . त्यातला एक  मॅगसेसे पुरस्कार तैवानच्या एका भाजी विक्रेतीला मिळाला. दुसरा पुरस्कार तामिळनाडू  मधल्या  एका ग्रामीण भागात गरिबांची कर्जमुक्ती करणाऱ्या माजी फादरला मिळाला. ही दोन्ही सामान्य माणसं. मग त्यांना एवढा मानाचा पुरस्कार मिळण्याचं कारण काय? तर या दोघांनीही श्रीमंतांना लाजवील असं काम केलं म्हणून त्यांचा गौरव झाला.

त्यातल्या भाजीविक्रेत्या महिलेचं नाव - चेन शु चु. वय 61 वर्षे. शिक्षण सहावी. त्यांचा तैवानच्या तैतुंग मार्केटात भाजीविक्रीचा एक छोटेखानी stall आहे. गरजवंताला मदत केल्यानेच पैशाचा खरा उपयोग होतो. लोकांना साहाय्य करण्यात मला समाधान मिळतं, आनंद मिळतो हे या बाईचं तत्वज्ञान. सामाजिक कामाचा कोणताही बडेजाव या बाईनी मिरवला नाही. मात्र या महिलेने आत्तापर्यंत 70 लाख तैवानी डॉलर्स म्हणजे 1 कोटी 29 लाख रुपयांची मदत मुलांसाठी काम करणाऱ्या  संस्थांना  दिली. त्या शाकाहारी आहार घेतात. दिवसातून दोनदा जेवतात. माणसाला काम करण्याची उर्जा मिळण्यासाठी यापेक्षा जास्त जेवणाची अपेक्षा नाही असं या महिलेच मत आहे.

हि महिला जमिनीवर साधं अंथरूण टाकून झोपते. शिक्षणाने जीवनाचा कायापालट होतो. अशी तिची श्रद्धा आहे. पोटासाठी त्यांनी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरु केला. गरीबांमुळे कोणाचा शिक्षणाचा हक्क ओरबाडला  जाऊ नये त्यासाठी त्या त्यांच्या कमाईतून बचत करू लागल्या. तो निधी संस्थांना देऊ लागल्या.

त्यांच्या मदतीने अनेकांना शाळा शिकता आली बाईंच्या पैशातून मुलांसाठी ग्रंथालय सुरु झाले. अनाथ, नडलेले, पीडलेले, दलित यांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांना घरं मिळवीत यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.

आशिया खंड हा गरीबांचा भूभाग आहे. इथं माणसांचे प्रश्न कमी नाहीत. जागतिकीकरणामुळे हे प्रश्न अधिक बिकट झालेत, ते सोडवायचे तर सरकारला विविध योजना राबवाव्या लागतील. नव्या योजनांची आवश्यकता जास्त आहे. पण समाज बदलासाठी सरकार काय करते हे न बघता स्वतः जबाबदारी स्विकारून या बाई स्वतः               छोटे मानवी बेट झाल्या. म्हणून रेमन मॅगसेसे फाउंडेशनने त्यांचा गौरव केला. रेड क्रॉसने नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी आपत्कालीन निधी स्थापन केला आहे. त्यासाठीही चेनबाई मदत करतात. एक भाजीविक्रेती समाज बदलासाठी स्वतः त्याग करून खारीचा वाट उचलू शकते हे या उदाहरणावरून दिसतं.

आपल्या आसपास पैसेवाले अनेक आहेत. पण त्यांना पैशाची लवकर चढते. ते गरीबांपासून दूर पळणं पसंत करतात. श्रीमंतीचं ओंगळवाणं  प्रदर्शन लग्न, वाढदिवस, सणसमारंभ, उत्सवात करतात. अशा लोकांसाठी या गरीब बाईची श्रीमंती डोळ्यात अंजन घालणारी ठरावी.

दुसरे मॅगसेसे पुरस्कार विजेते कुलंदेई फ्रान्सिस हे मजुराच्या घरात जन्मलेले. ते लहान असताना त्यांचा वडिलांनी सावकाराकडून पाचशे रुपयांचे कर्ज घेतले. ते फुगले. पुढे 50 हजार झाले. त्यामुळे या साऱ्या भावंडांना शिक्षण सोडावं लागलं. मोलमजुरी करावी लागली. ते भोग भोगलेले फ्रान्सिस कॅथलिक धर्मगुरु झाले. पण त्यांच्या मनात सावकारी पाशाविषयीची गाठ सुटली नव्हती. सात-आठ वर्षात त्यांनी चर्चला सोडचिट्टी दिली आणि पूर्ण वेळ कर्जमुक्ती चळवळीला वाहून घेतलं. या कर्जमुक्ती चळवळीत महिलांचे गट स्थापन केले जातात. हा गट मोठ्या बँकांकडून एकत्रित कर्ज घेतो. हे सहकाराचे मॉडेल फ्रान्सिस तीन दशकं चालवत आहेत. हे काम करताना त्यांना एकही कर्जबुडवणारी महिला भेटली नाही. आता या बचत गटातील महिलांनी 250 कोटी रुपयांची गंगाजळी तयार केली आहे. अशा सातशेहून अधिक स्वयंसहायता गटांची उलाढाल अडीच हजार कोटी रुपयांच्या पुढे गेलीय. हे काम तामिळनाडूतल्या तील जिल्यात चाललेलं आहे. या इंटिग्रेटेड व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्रामचा विस्तार शाळांतून जालासंधारणापर्यंत आणि गरिबांसाठीच्या दवाखान्यांपर्यंत झालाय.

महिलांच्या सहकारातून कर्जे देणे - फेडण्याबरोबर नवी विकासाची कामं उभी राहत आहेत हे या प्रकल्पाचं वेगळेपण. बांग्लादेशाच्या महंमद युनुस यांच्यापेक्षा हे काम वेगळा आहे. म्हणूनच त्यांना हा पुरस्कार मिळाला. हे काम फ्रान्सिस आता तामिळनाडू राज्यभर पसरवणार आहेत. अशी हि दोन छोटी माणसं. त्यांची गोष्ट मात्र मोठी आहे. आपलं जग बदलवणारी आहे.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)         

No comments:

Post a Comment