चीन हा आपला शेजारी देश. तिथं कम्युनिस्ट राजवट आहे. या देशात आपल्यापेक्षा जास्त प्रगती आहे. जगात हा देश आता एक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. जगातल्या सत्तेचा तोल सध्या आशियाकडे सरकतोय. हे चीनमुळे घडतंय. चीनने अमेरिका, इंग्लंड या देशांची पैशाच्या शेत्रातील सर्व मक्तेदारी मोडून काढली. इतकेच नव्हे तर खेळापासून तर अंतराळापर्यंत सर्व क्षेत्रात चीनने पाश्यात्यांच्या मक्तेदारीला सुरुंग लावले.
चीन या देशाने श्रीमंत व्हायचे वेड जोपासले. या वेडाच्या बळावर हा देश पुढे गेला. आपल्या देशासारखीच तिथली परिस्थिती आहे. आपल्यासारखीच शेती, आपल्यासारखाच समाज, भौगोलिक वातावरण तिथं आहे. एकेकाळी गरीबीही आपल्यासारखीच होती. माओच्या नेतृत्वाखाली तिथं कम्युनिस्टांची लाल क्रांती झाली. त्यानंतर हा देश पुढे झेपावला. त्यानंतर त्याने मागे फिरून पहिले वर्षात या देशात साठ कोटी लोक गरिबीतून उच्च मध्यमवर्गात गेले.
चीनची ही प्रगती म्हणजे मानवी इतिहासाला एक मोठा विक्रम आहे. मानवजातीने कोणत्याच देशात असा पराक्रम आजपर्यंत केलेला नाही. म्हणून चीनचं कौतूक सगळ्या जगाला आहे. असं असलं तरी या देशात आता विकासाच्या भरारी आड भ्रष्टाचाराची समस्या भेडसावू लागली आहे. चीनमध्ये नवे नेते सत्तेवर आहे आहेत. ते सत्तांतर घडत असताना जुन्या नेत्यांच्या भ्रष्टाराच्या विचित्र कहाण्या वर्तमानपत्रं, प्रसिद्धी माध्यमात वाचायला, ऐकायला मिळत आहे. भारतात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने जगभर विविध देशात जागृती झाली. चीन हा देशही त्याला अपवाद कसा ठरेल?
अण्णांच्या आंदोलनाचे पडसाद चीनमध्येही उमटले. तिथले लोकही भ्रष्टाचारावर बोलू लागले. त्यामुळे सत्ताधारी कम्युनिस्ट नेते अस्वस्थ झाले. चीनच्या प्रगतीचं श्रेय तिथल्या सत्ताधारी कम्युनिस्ट नेत्यांना दिलं जातं. चीनी नेते व्यवहारवादी, अभ्यासू, नव्या जगाची पावलं ओळखणारे आहेत असं म्हणून त्यांचं कौतुक केलं गेलं. उलट भारतातल्या नेत्यांकडे हे गुण नाहीत ते घराणेशाही आणि स्वार्थाने लडबडलेले आहेत म्हणून भारत मागे पडतोय अशा चर्चा झाल्या. चीनचे नेते भारतातल्या नेत्यांपेक्षा उजवे आहेत हे खरंच पण चीनी नेतेही भ्रष्टाचारात अडकलेले आहेत हे आत्ता पुढे आल्याने त्यांचेही पाय मातीचेच आहेत हे उघड झालं.
आता आपल्या भ्रष्टाचाचाराच्या कहाण्या जगाला कळल्यानंतर चीनी नेत्यांनी एक हुशारी केली. त्यांनी भ्रष्टाचाराचं छुप समर्थन करायला सुरुवात केली. सौम्य भ्रष्टाचार विकासाला हितकर असतो, एवढेच नव्हे तर गरजेचा असतो असं या नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली. चीनमध्ये 'ग्लोबल टाईम्स' हे सरकारची तळी उचलणारं एक वर्तमानपत्र आहे. त्याच्या अग्रलेखात चीनी राज्यकर्त्याचं धोरण स्पष्ट झालंय. ते म्हणतात, 'भ्रष्टाचार पूर्णपणे हटवायचा मार्ग कोणत्याच देशात सापडलेला नाही. तेव्हा भ्रष्टाचार लोकांना सहन होईल इतपत ठेवणे महत्वाचे आहे. चीनमध्ये तसे न करणे कमालीचे क्लेषदायक ठरेल. भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला तर देशात गोंधळ माजेल. हे चीनी जनतेने समजून घ्यावे. भ्रष्टाचार समूळ उपटणे हे कमालीचे अवघड आहे. त्यातील यश अन्य शेत्रावरील यशावर अवलंबून आहे. पुढारी स्वछ आहेत पण देश काही शेत्रात मागासलेला आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या चीनी देशाची कल्पनाही करवत नाही. असे जरी शक्य असले तरी परवडणारे नाही.'
या अग्रलेखावर चीनमध्ये प्रचंड टीका झाली. तरी थोडा भ्रष्ट्राचार गरजेचा असतो हे समजून घ्या असा चीन सरकार, पदाधिकाऱ्यांचा लोकांना आग्रह आहे. हे नेते म्हणतात, 'आम्ही बिलियन डॉलरवर डल्ला मारला आहे तरी देशाची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरवर नेऊन ठेवलीय बघा. त्याबद्दल आमचं कौतुक करणार कि नाही?'
भ्रष्टाचाराचं हे समर्थन पटणारं नाही. तळ राखणार्यानं म्हणावं, मी तळ्यातलं पाणी किती चोरलं हे महत्वाचं नाही. तळ तर राखलं ना. ते कुणालाही चोरू दिलं नाही ना? असा लंगडा युक्तीवाद करण्यासारखं हे आहे.
अर्थात चीनची जनता या लंगड्या युक्तीवादाला फसणार नाही. पण चीनमध्ये भ्रष्टाचाराचं जे समर्थन सुरु आहे, ते भारतीय जनतेनं समजावून घेणं गरजेचं आहे. कारण नेते किती हुशारी करू शकतात हे चीनच्या नेत्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसतंय. भारत तर चीनचा शेजारीच. आपल्या देशात अजून उघडपणे कुणी भ्रष्टाचाराचं असं समर्थन केललं नाही. पण शेजारच्या घरातला हा वास आपल्याकडेही येणार नाही असं नाही. सावध तर राहिलंच पाहिजे.
- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)
No comments:
Post a Comment