दूध न आवडणाऱ्या इंजिनिअर माणसानं दूध क्रांती करावी. केरळातल्या मल्याळी भाषा बोलणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या मुलानं म. गांधींच्या गुजराथी समाजात 'अमूल डेअरी' काढावी. आपल्या देशाला जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्याचं स्वप्न बघावं. त्या स्वप्नासाठी वयाची ९० वर्षे रात्रंदिन खपावं. हे सारंच अदभूत आणि अलौकिक असं आहे.
असं स्वप्नवत जीवन जगणारा डॉ. व्हर्गीस कुरीयन हा माणूस होताच तसा अदभूत. त्यांचा जन्म केरळातील कोझीकोड येथे २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला . चेन्नईतील लोयोला कॉलेजातून ते पदवीधर झाले. नंतर इथल्याच गिंडी कॉलेज ऑफ इन्जिनीअरिन्ग मधून पदवी घेतली. जमशेदपूर येथे टिस्कोमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना दूग्ध अभियान्त्रीकेच्या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळाली. बंगळूर च्या अनिमल हजबंडरी या संस्थेत प्रशिक्षण घेऊन ते अमेरिकेला गेले. तिथं त्यांनी मिशिगन विद्यापीठातून मकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये मास्टर्स पदवी घेतली. त्यात त्यांचा दुग्ध अभियांत्रिकी हा विषय होता.
एवढं शिक्षण घेऊनही त्यांना अमेरिकेची स्वप्नाळू दुनिया आकर्षून घेऊ शकली नाही. ते अमेरिकेत स्थायिक होऊ शकले असते. पण त्यांना स्वदेश खुणावत होता. ते तिथलं ऐशोरामी जीवन लाथाडून स्वदेशात परतले. थेट गुजरातमधल्या आनंद इथं गेले. कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघटनेत सहभागी झाले. सरदार वल्लभभाई पटेल आणि त्रिभुवनदास पटेल या मोठ्या माणसांनी दूध क्रांतीचं स्वप्न पाहिलं. डेअरी स्थापन करून सामान्य माणसांना रोजगार देण्याचं, सहकारी चळवळ उभारण्याचं स्वप्न रंगवलं होतं. त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी कुरियन यांनी स्वतःला झुकून दिलं.
डेअरी संस्करण प्रकल्प सुरु झाला. त्यातून अमूलची निर्मिती झाली. अमुलचा प्रयोग यशस्वी झाला नंतर साऱ्या गुजरात राज्यात त्यांची पुनरावृत्ती झाली. सर्व दूध उत्पादक संघटना गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या नेतृत्वाखाली एकत्र केल्या. शेतकरी, शेतमजुरांच्या घरात पैसा यावा म्हणून सहकारी दूध व्यवसायाचा अभिनव प्रयोग साकारला गेला.
कुरियन यांनी या महासंघात आणि रुरल management या संस्थेत १९७३ ते २००६ पर्यंत काम केलं. कुरियन यांच्या काळात देशाच्या दुग्धव्यवसायात क्रांतीच झाली. जगात फक्त गाईच्या दुधाची पावडर बनत असे. पण भारतात म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करण्याचा पहिला प्रयोग केला. तो यशस्वी झाला. अमूलचं यश बघून जय जवान, जय किसान ही घोषणा देणाऱ्या लालबहादूर शास्त्री यांनी अमूलच्या धर्तीवर national डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था स्थापन केली . या संस्थेमार्फत ऑपरेशन फ्लड ही योजना १९७० च्या सुमारास सुरु झाली त्यामुळे भारत जगातील मोठ्या दुध उत्पादक देशांपैकी एक बनला. ३३ वर्षे कुरियन national dairy बोर्डाचे अध्यक्ष होते. भारताची दूध खरेदी १९६०च्या दशकात २ कोटी मेट्रिक तन होती. ती २०११ मध्ये १२.२० कोटी मेट्रिक तन इतकी झाली. हा स्वप्नवत कायापालट झाला तो केवळ कुरियन यांच्यामुळेच. विशेष म्हणजे विकासाची साधनं सामान्य माणसाच्या हातात दिली तरच खरा विकास होतो हे या योजनेत स्पष्ट झालं. देशभर आणि जगभर कुरियन यांच्या कामाची वाहवा झाली.
भारताची मान जगात उंचावणाऱ्या कुरियन यांच्यावर सन्मानाचा अक्षरशः वर्षाव झाला. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन गौरवलं. जागतिक अन्न पुरस्कार, Raman Magsese पुरस्कार, कार्नेगी- वॉटलेत जागतिक शांतता पुरस्कार, अमेरिकेचा International Person of the year असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. मी भारतातल्या शेतकरयांचा कर्मचारी आहे अशी कुरियन बांधिलकी मानत म्हणूनच त्यांनी दूधाच्या महापुराचं स्वप्न पाहिलं. त्याचं महत्त्व भारताला, जगाला पटवून दिलं.
हे स्वप्नवत काम काही सहजासहजी झालं नाही. हा देश सर्व क्षेत्रात बलशाली व्हावा हे स्वप्न पं. नेहरू आणि त्यांच्या सहकारयांनी पाहिलं होतं. देशातल्या सामान्य दीन दुबळ्या माणसाचं ते स्वप्न होतं. या दुबळ्या मानसाच स्वप्न साकार करण्याच काम कुरियन यांनी केलं. आज खाजगीकरणाचा मोठा बोलबाला आहे. खाजगीकरणामुळे मोठमोठ्या कंपन्या उभ्या राहतात. सरकारी प्रकल्प, सहकारी संस्थांचे उद्योग मोडून पडतात. त्याचं काही खरं नाही असा खाजगी उद्योगपतींच्या चेल्यांचा गाजावाजा असतो. सगळ्या समाजाला खाजगी करणातून सारं काही भव्य दिव्य, विकास-फिकास होतो हे सांगणारयाच्या तोंडात कुरियन यांचं काम थप्पड मारणारं आहे.
इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष आपल्या देशात जुना आहे. इंडियावाले खाजगीकरण, जागतिकीकरण, मॉल, multinational , कंपन्यांचा झोक, बडेजाव यांनी भूललेत. भारतातले लोक आजही इंडियावाल्यांच्या कुकर्मांचे बळी म्हणून चिरडले जात आहेत. बळी म्हणून चिरडले जायचं नाही तर हातात हात घेऊन पुढं जायचं, आपलं नशीब आजमायचं हा मंत्र कुरियन यांनी गरिबांना दिला. गरिबांच्या घरात विकासाचा उजेड यावा हेच कुरियन यांचं खरं स्वप्न होतं. ते साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी अमूल डेअरीच्या माध्यमातून केला.
म्हणून हा माणूस मोठा. ९ सप्टेंबरला आपल्यातून गेला. त्याचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता आपली. कुरियन यांना भारतरत्न हा किताब जिवंतपणी मिळाला नाही हेही आपलं दुर्दैव. भारतरत्न मिलो न मिळो कुरियन भारताच्या लोकांचे रत्न होतेच.
त्यांना सलाम !
- राजा कांदळकर
No comments:
Post a Comment