Monday, October 29, 2012

सीमोल्लंघन आपलं आणि व्हेनेझुएलातलं!
















दसरा या सणाला आपल्या परंपरेत आगळंवेगळं महत्व आहे. चांगल्या विचारांचा विजय होतो. वाईटाचा नाश होतो. याची आठवण देणारा हा सण आहे. नुस्ती आठवणच नाही तर या दिवशी नव्या गोष्टी साकार करण्यासाठी उभं राहण्याचा निर्धार करायची. पुढे जायचं. नव्याचा ध्यास घ्यायचा. विजयी होण्याकडे घोडदौड करायची असा याचा अर्थ.

हा दसरा आज आपल्या देशाच्या जीवनातही महत्वाचा ठरणार आहे. अण्णांनी जनलोकपालबरोबर निवडणूक सुधारणांचं आंदोलन उभं करण्याची हाक दिली आहे. त्यासाठी जमवाजमव सुरु केली आहे. नवे साथीदार जोडले आहेत. या दसऱ्याला भ्रष्ट शक्तीचं दहन करायचं आणि नव्या जोमानं अण्णांना साथ द्यायचा निर्धार करायचा आहे. हे एक नवं सीमोल्लंघन या वर्षीच्या दसऱ्याच्या निमित्ताने ठरेल. देशभर गावागावात, शहाराशहरात ते व्हावं. लोक अशा सीमोल्लंघनाला तयार आहेत.

आणखी एक सीमोल्लंघन होत आहे. व्हेनेझूएला या लॅटिन अमेरिकेतील देशात ते होतंय. तिथं नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यात समाजवादी नेते हुगो चावेझ हे पुन्हा निवडून आले. आपल्या विरोधकांच्या सुमारे दहा टक्के मतांनी त्यांनी पराभव केला. चावेझ याच्याबद्दल थोडंस. तरुणपणी लष्करात जवान असलेले चावेझ आत्ता ५४ वर्षाचे आहेत. गेली १४ वर्षे ते व्हेनेझूएला या देशाच्या जडणघडणीत महत्वाचा रोल बजावत आहेत. १५ वर्षापूर्वी लष्करातून बाहेर पडून त्यांनी राजकारणात भाग घेतला. समाजवादी विचारांनी देशात चळवळ केली. हा समाजवादी विचार जुनाट नव्हे. तो आहे एकविसाव्या शतकाचा. त्यामुळे तो तरुणांना आवडला. तरुणांनी व्हेनेझूएलात चावेझच्या नेतृत्वाखाली गरिबांची क्रांती केली. सत्ता गरिबांसाठी राबवली. देशाची सत्ता मिळाल्यावर चावेझ यांनी काही धडक निर्णय घेतले. व्हेनेझूएला हा तेल उत्पादक देश. पण एकेकाळी तेलातील निर्माण होणारी संपत्ती धनदांडग्यांच्या खिशात जाई. काही अमेरिकेच्या कपाटात जाई. चावेझने तेलाचा पैसा गरिबांच्या योजनेकडे वळवला. त्यामुळे दारिद्र्यात लक्षणीय घट झाली. चावेझने आरोग्य आणि शिक्षण मोफत केलं. पालकांनी मुलगा फक्त शाळा, कॉलेजात नेऊन घालायचा. त्याला हवं ते शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची. खाजगी शाळा नाहीत की भरमसाठ फी उकळणाऱ्या शिक्षणसंस्था या देशात नाहीत. आजारी पडलेल्या माणसाने दवाखान्यात जायचे, त्यावर योग्य ते उपचार करण्याची जबाबदारी सरकारची. असं सामान्य माणसाला दिलासा देणारं वातावरण या देशात आहे. चावेझ यांनी अनेक उद्योगांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळे गरिबांच्या घरात आनंद भरला. धनिकांचा मात्र जळफळाट झाला.

धनिक भांडवलदार चावेझला का विरोध करतात?

चावेझ येण्याअगोदर व्हेनेझूएला हा देश अमेरिकेच्या पंजाखाली दबून काम करी. अमेरिका सांगेल ती पूर्वदिशा. अमेरिकेची दादागिरी जगभर जशी चालते तशी लॅटिन अमेरिकेतही चाले. अमेरिकेच्या या दादागिरीविरोधात चावेझने तांबूस लाट निर्माण केली. २१ व्या शतकातल्या समाजवादाचा नारा दिला. चावेझची तांबूस क्रांती यशस्वी झाली.

आत्ताच्या निवडणुकीत चावेझला लोळवण्याचा अमेरिकेने आणि त्यांच्या व्हेनेझुएलातल्या देशी भांडवलदार बगलबच्चानी अतोनात प्रयत्न केला. सर्व श्रीमंत वर्ग चावेझच्या विरोधात गेला. व्हेनेझुएलातली वर्तमानपत्रं आणि न्यूज channels  त्याच्या विरोधात होते. पण गरिबांनी, तरुणांनी, महिलांनी त्याची साथ सोडली नाही. तो विजयी झाला. 

व्हेनेझूएलात चावेझच्या विजयाने नवं सीमोल्लंघन झालं.

व्हेनेझूएलात आपल्या देशासारखेच भाववाढ, भ्रष्टाचार, गुन्हेगारी असे प्रश्न आहेत. अध्यक्ष चावेझसमोर ही आव्हानं आहेत. त्याचे विरोधक पूर्वीपेक्षा जास्त संघटीत झालेत. त्यात चावेझला कॅन्सर झालाय. चौदा वर्षे तो आव्हानांचा मुकाबला करतोय. विविध प्रश्न सोडवतोय.

जगभर गरिबांची बाजू लंगडी पडत चालली आहे. धनदांडगे, शिरजोर आहेत. अशा काळात गरीबांचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारा एक नेता म्हणून चावेझ खंबीरपणे उभा आहे.

या दसऱ्याच्या निमित्ताने चावेझकडे, त्याच्यामागे उभे राहणाऱ्या तरुणांकडे अपेक्षेने पाहणं गैर ठरणार आहे.

- राजा कांदळकर  (rajak2008@gmail.com)

No comments:

Post a Comment