कुणाकुणाचे स्मारक करावे? कुठे करावे? सरकारी खर्चाने
ते करावे का? स्मारकांतून खरेच प्रेरणा मिळते? कशा प्रकारचे स्मारक प्रेरणादायी ठरेल,
समाजाला, राज्याला पुढे नेणारे ठरेल? अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेत नवे नवे
मुद्दे पुढे येत आहेत. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, नेत्यांची स्मारके झाल्याने
खरेच समाज पुढे जातो का? की स्मारके उदंड होत आहेत आणि नवविचार थंड आहे? नवविचाराला
चालना कशाने मिळते? स्मारके ही कुणाची गरज आहे, समाजाची की वारसांची?
महाराष्ट्राने देशाला सतत नवविचार देण्यात पुढाकार घेतला
आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात नेत्यांची एक मोठी प्रभावळ इथे तयार झाली होती. समाजचिंतक,
विचारवंत, कार्यकर्ते यांची फळी या काळात राज्यात उभी राहिली. राष्ट्रपिता महात्मा
गांधी म्हणत, या भूमीत कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. विचारी लोकांचे मोठे दळ या राज्यात
नेहमीच पाहायला मिळे. लेखक, पत्रकारांची प्रभावशाली मांदियाळी याच काळात इथे तयार झाली.
नवविचार मांडणाऱ्या मंडळींनी मराठी समाजाची मान उंचावली होती.
आज स्मारकांची चर्चा सुरू असताना समाजातले चित्रे फारसे
आशादायक नाही. एकेकाळी खुलेपणा हे आपल्या समाजाचे गौरवशाली वैशिष्ट्य होते. हा खुलेपणा
आपल्या समाजजीवनातून हरवत चालला आहे. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारा आपला शत्रू,
अशी शिकवण काही संघटना समाजात रुजवत आहेत. सर्वांनी शेळ्या-मेंढ्यांसारखे एका सूरात
ब्या ब्या करावे अशी सक्ती केली जात आहे. खुनाचे समर्थन करणे हा खरे तर मानसिक रोग
होय. जर्मनीत हिटलरच्या विचारांचे, कृत्यांचे समर्थन करणाऱ्यांना मनोरुग्ण (सायको)
ठरवले जाते. कायद्याने त्यावर बंदी आहे. आपल्या समाजात खूनाचे समर्थन, खुन्यांचे समर्थन
करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली जाते आहे. त्यांच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या
पानावर प्रसिद्ध होतात. खूनी माणसांचे गौरवपर सोहळे, जयंत्या साजऱ्या करण्यापर्यंत
काहींची मजल गेली आहे. त्यांना आता समाजात प्रतिष्ठा मिळत आहे. मनोरुग्णतेचे गौरवीकरण
होत आहे.
भीती बाळगणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, हिंसेचे समर्थन
करणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत, असे आता जगभरच्या मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले
आहे. पण आपल्या समाजात द्वेषपूर्ण, हिंसक भाषणे करणाऱ्यांना अमूकतमूक म्हणतात. त्याच्या
अशा विखारी विचार, भाषणांना खास शैली आहे, असे म्हणून खुद्द पत्रकार गौरवताना दिसतात.
तेव्हा आपल्या समाजात काही बिघडत चालले आहे, हे लक्षात येते. हिंसेचे समर्थन करणाऱ्यांना
दवाखान्यात भरती करायचे सोडून त्यांचे जयजयकार होत आहेत.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खूनानंतर त्याचे
समर्थन करणारे महाभाग खुलेआम दिसले. वर्तमानपत्रांनी त्यांच्या वृत्तांना खमंग प्रसिद्धी
दिली. या महाभागांच्या पत्रकार परिषदा म्हणजे खुलेआम धमक्या, इशारे, द्वेष पेरणे असा
कार्यक्रम होता. पण त्याविषयी कुणी फार झोड उठवली नाही. संपादकांच्या लेखण्या त्या
विरोधात चालल्या नाहीत. हे आता आम आहे, हे चालायचे, असेच सर्वांनी मान्य करून गप्प
राहणे पसंत करायचे? की आपण आतून हिंस्त्र बनत चाललो आहोत? बोथट झालो आहोत? सामंजस्य,
उदारता या गोष्टी आता जणू लयाला जात आहेत. त्या बदल्यात हिंसक प्रतिक्रिया, संकुचित
अस्मिता आणि उन्माद या गोष्टी प्रभावी ठरू लागल्या आहेत. कर्ते सुधारक संपादक गोपाळ
गणेश आगरकरांचा या राज्याला वारसा आहे, त्या राज्यात संपादकच हिंसक अग्रलेख, दुही पेरणारे
अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानू लागलेत. याला काय म्हणावे?
दुष्काळात माणसे मरत असताना स्मारकांवर सरकारी खर्च
कशाला करता हे म्हणणारे आपल्या समाजात बहुसंख्येने निघू नयेत याचा अर्थ काय? आपला समाज
नवविचार करायला नकार देतो आहे काय? हे कसल्या समाजरोगाचे लक्षण? विवेकशीलतेचे मूल्य
आपल्या समाजातून लोप पावत चालले आहे की काय? का विवेकशीलता आपल्याला नकोच आहे?
आपल्या राज्यात लेखकांनी असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार
परत केले. त्यावर खूप कडव्या प्रतिक्रिया उमटल्या. खूप लोक कडवट बोलले. राजकीय पक्षांच्या
राजकीय प्रवक्त्यांना या लेखक-कवींबद्दल, त्यांच्या मतांबद्दल जराही सहानुभूती दिसली
नाही. या प्रवक्त्यांनी मुजोरीने बजावले की, तुम्ही कुणाचे तरी हस्तक आहात. तुम्ही
कट कारस्थानाच सहभागी आहात. हे प्रवक्ते लेखकांना तुम्ही लिहायचे बंद केले तरी काही
फरक पडणार नाही एवढेच सुनवायचे बाकी राहिले होते. दुसरी बाजू ही हिणकस ठरवायची. तिचा
तिरस्कार करणारी, नि:पात करायची भाषा काहींनी बोलायची, काहींनी त्यांना ठार मारायचे
अशी ही कलाबाज व्यूहरचना दिसते. पण या विरोधात समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत कशा नाहीत?
लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, अभिनेते, शास्त्रज्ञ, पत्रकार, हे समाजाचे डोळे असतात.
म्हणून त्यांच्याकडे जास्त संवेदनशील माणसे म्हणून पाहिले जाते. या डोळ्यांना फोडणाऱ्या
शक्तीविरोधात आपला समाज एकवटत कसा नाही? की आपल्याला डोळ्यांचे महत्त्वच नाही? आजची
तरुणाई सोशल मीडियाचा वापर करण्यात पुढे आहे याचे कौतुक आहे. ही तरुणाई नवा विचार,
वेगळा विचार मांडणाऱ्या, समाज पुढे नेणाऱ्या या संवेदनशील माणसांची नालस्ती चालू असताना
काय करत होती? तर ती पुरस्कार परत करणाऱ्यांना शिवीगाळ करत होती. संपादक अग्रलेखांतून
या वेगळा विचार करणाऱ्यांना दूषणे देत होते. पण मुळात हे का घडत आहे? ही वेळ कुणी आणली
याचा विचार ना तरुणाईने केला ना थोर पत्रपंडित संपादकांनी. शब्दबंबाळ सामने रंगवण्यातच
सर्वांनी मनापासून रस घेतला. पुरस्कार वापसी जशी सरकार विरोधात होती तशी ती अपप्रवृत्तींना
पोसणाऱ्या, नवा विचार करण्याचे नाकारणाऱ्या समाजविरोधातही होती हे झाकून ठेवण्यात आले.
त्यात माध्यमे पुढे होती. ज्यांनी नवविचारांचा आरसा व्हायचे त्यांनीच तो होण्याचे नाकारणे
हे कशाचे लक्षण आहे?
महाराष्ट्र आज कोणत्या दिशेने निघाला आहे? असमंजसपणा,
अस्मितांची संकुचितता, सनातनी आत्मगौरव, कालबाह्य परंपरांचे उदात्तीकरण, हिंसेचे समर्थन,
खूनांचे समर्थन, या गोष्टी आज महाराष्ट्रात प्रतिष्ठित होऊ लागल्या आहेत. आज जे वातावरण
आपल्या इथे आहे त्याची तुलना फेब्रुवारी १९१९ या वर्षी मुसोलिनीने इटलीत सुरू केलेल्या
कारनाम्यांशी करता येईल. त्याने फॅसिस्ट संघटना बळकट केली. विरोधकांच्या सभा उधळणे,
त्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न केले. अनेक विरोधकांचे खून केले. समाजात यथेच्छ
अनाचार माजवून त्याने स्वत:ची दहशत माजवली. विरोधी विचारवंत, नेत्यांचे खूनसत्र घडवून
विधिमंडळात स्वत:चे बहुमत स्थापन केले. नंतर स्वत: पंतप्रधान झाला. त्याने इटालियन
जनता कलाबाज मार्केटिंगच्या तंत्राने, दहशतीने कब्जात घेतली.
या फॅसिस्ट संघटनेला त्यावेळच्या अनेक इटालियन लेखक,
विचारवंत, तत्त्वज्ञांनी पाठिंबा दिला होता. मुसोलिनीने इटलीत दहशतीचे वातावरण निर्माण
केल्याने त्या समाजाची दशकभर नवविचारांशी फारकत झाली होती. फॅसिस्टांचे मार्केटिंग
एवढे डोळे दिपवणारे, बुद्धी गुंग करणारे होते की, भले भले त्याला बळी पडले.
सांगायचा मुद्दा असा की, स्मारकांची केवढी रेलचल झाली
आहे! त्यातून हितसंबंधीयांची दुकानदारी चालेल, बाकी काही होणार नाही. समाजात नवविचार
वाढीला लागतील, अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. उलट ज्यांनी नवविचार मारले,
त्यांची स्मारके सरकारी खर्चाने उभी करणे म्हणजे समाजाला आणखी गाळात घालण्याचे कृत्य
होय. समाजाने याबाबत सजग राहिले पाहिजे. सतत जागरूक राहणे हीच स्वातंत्र्याची किंमत
असते!
राजा
कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व
प्रसिद्धी - मी मराठी live : २४/११/२०१५
No comments:
Post a Comment