Saturday, December 12, 2015

दोन महानेते आणि काही उणेदुणे













मुलायमसिंह यादव आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये साम्यस्थळे काय आहेत? त्यांची तुलना होऊ शकेल की नाही? दोघांच्या नेतृत्वशैलीत फरक काय आहेत? दोघांना कायमचे भावी पंतप्रधान म्हटले जाते. यात कौतुकाचाही भाग असतो, अनेकदा उपहासानेही त्यांचे विरोधक या वस्तुस्थितीचा वापर करतात. दोघे यावर्षी पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. वयाच्या हिशेबाने मुलायमसिंह पवारांपेक्षा काही महिन्यांनी थोरले आहेत. गेली ५० वर्षे हे दोघेही देशाच्या जनमाणसावर स्वत:चा ठसा उमटवत आलेले आहेत. त्या निमित्ताने या लोकनेत्यांच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू आहे. फळे लागलेल्या झाडाकडे काळजीने, मत्सराने पाहण्याची आपल्याकडची रीत आहे. दोघेही त्यांच्या त्यांच्या राज्याचे तीनदा मुख्यमंत्री होते. दोघांचीही मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, वाजली आणि वादग्रस्तही ठरली. दोघेही देशाचे संरक्षणमंत्री होते. दोघांचीही पंचाहत्तरी धुमधडाक्यात सुरू आहे. विविध कार्यक्रम त्यानिमित्ताने होत आहेत.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणून महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन म्हणता येईल. उत्तर प्रदेश म्हणजे छोटा भारत . हे राज्य देशाच्या राजकारणाला दिशा देते. देशाचा पंतप्रधान ठरवते. दिल्लीचे तख्त कुणाच्या ताब्यात असणार हे उत्तर प्रदेश ठरवतो. या अर्थाने हे राज्य देशाचे राजकीय इंजिन आहे. म्हणूनच अशा या दोन राज्यांतील मोठा जनाधार असणाऱ्या या दोन नेत्यांविषयी देशभर सतत कुतूहल राहिलेले आहे.

या दोन्ही नेत्यांची राजकीय जडणघडण १९६० च्या दशकात झाली. हा काळ देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. सर्वांना स्वराज्याचे सुराज्य करण्याचे वेध लागले होते. दारिद्र्य, अज्ञान, गुलामीतून बाहेर पडण्याची भूक साऱ्या समाजालाच लागली होती. देशात सुराज्य आणायचा रस्ता म. गांधींनी दाखवला होता. पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देश सुराज्याकडे वाटचाल करत होता. अशा वेळी बहुजन समाजातून, मध्यम जातीतून कर्तबगार तरुणांची एक पिढी जीवनाच्या विविध क्षेत्रांत पुढे येत होती. या पिढीचे नेते म्हणून शरद पवार आणि मुलायमसिंह पुढे आले. या दोघांनाही सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे. समाज अस्वस्थ होता. काळ गतीमान होता. त्यात या दोघांच्या जीवनाला दिशा मिळाली.

मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या सैफई या गावातला, यादव जातीतला, शेतकरी कुटुंबातला मुलगा. एम.ए.,बी.टी. झाला. शिक्षक म्हणून काम करू लागला. त्याला कुस्तीची आवड होती. कुस्तीने त्याला जीवनात पुढे जायला रग, धमक दिली. शिक्षणाने विचार दिला. हा तरुण समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या सहवासात आला. लोहिया हे गांधींचे शिष्य. समाजवादाला त्यांनी भारतीय चेहरा दिला. भारतीय समाजातल्या जात या शोषण माध्यमाकडे त्यांनी लक्ष वेधले. जातिव्यवस्था निर्घृण असून तिने केवळ इथल्या माणसांना गुलामच केले नाही, तर त्यांच्यातली सर्व निर्मितीक्षमता चिरडून, छाटून मारून टाकली याची प्रभावी मांडणी लोहियांनी केली. समाजवादाला त्यांनी जातिनिर्मूलनाची जोड दिली. जातीचे चटके सोसलेल्या मुलायमसिंहांना हा विचार झपाटून टाकणारा होता. ते लोहियांचे शिष्य, समाजवादी बनले. सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते झाले. समाजात सर्व प्रकारची समता आणण्यासाठी झटण्याचे त्यांनी ठरवले. उत्तर प्रदेश या राज्यात जातव्यवस्थेचे जाळे तर जास्तच गुंतागुंतीचे आहे. उच्चजातीयांच्या उलट्या कर्तबगारीचे तिथले किस्से भयावह आहेत. दबलेल्या जातींना गुलामासारखे वागवण्याची तिथली अनेक उदाहरणे ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. अशा राज्यात कार्यकर्ता म्हणून मुलायमसिंहांना काम करायचे होते. घरात वारसा नव्हता, विचार हीच प्रेरक शक्ती होती. कुस्तीची आवड असणाऱ्या या पैलवानाने विषमतेविरोधात शड्डू ठोकला.

या उलट शरद पवारांच्या आई डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या होत्या. घरात मार्क्स, लेनिन यांचे फोटो होते. लाल झेंड्याचा परिचय होता. समतेचे विचार लहानपणापासून माहीत होते. काटेवाडी या गावानेच बालवयात पवारांना समतेचा परिचय दिला होता. पवारांना पुण्यासारख्या प्रगत विचारांच्या शहरात शिकायची संधी मिळाली. विद्यार्थी असताना त्यांना यशवंतराव चव्हाणांसारखा नेता जवळून पाहायला मिळाला. चव्हाण मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले. त्यांनी समाजवादाचा व्यवहारीदृष्ट्या सोयीचा आविष्कार असलेल्या सहकाराची कास धरली. सहकारातून समाजवादाकडे हा विचार अंगीकारला. पवारांना घरातल्या समाजवादाने भुरळ घातली नाही, तेवढी या व्यवहारी, उपयुक्त सहकाराने घातली. आज बारामतीत जे विकासाचे बेट उभे राहिले ते सहकारातूनच आकाराला आले आहे. सामाजिकदृष्ट्या पवारांचे विचार पुढारलेले आहेत. यशवंतराव जात मानत नव्हते, पण त्यांना मराठा समाजाचा नेता म्हणून मान्यता मिळाली. पवारही जात मानत नाहीत, पण त्यांचा उल्लेखही मराठा नेता असाच सतत केला जातो. दिल्लीत तर तो जास्त ठळकपणे होतो. पवारांनी अठरापगड जातींना बरोबर घेतले. सर्वच जातीतून नवे नेते घडवले. म्हणून राज्यातल्या छोट्यामोठ्या ओबीसी-दलित-आदिवासी-भटक्याविमुक्त समूहात पवारांविषयी प्रेम आहे. मराठा समाजानेही पवारांवर जीव लावला. या शिदोरीमुळेच त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करता आले. महिलांना सत्तेचा वाटा देता आला. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करता आली, मुस्लीम ओबीसींना सवलती मिळवून देता आल्या. त्यातून पवारांची प्रतिमा एक सामाजिक न्यायवादी नेता अशी उभी राहिली.

मुलायमसिंह यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर मंडल आयोग, धर्मनिरपेक्षता, राखीव जागा हा अजेंडा पुढे रेटला. बाबरी मशीदविरोधी आंदोलन हाताळले. आज समाजवादी पक्षात उत्तर प्रदेशातल्या आठरापगड जातीतले नेते पुढे आलेले दिसतात. सुरुवातीच्या काळात मुलायम आणि कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष हातात हात घालून पुढे आले. दोघांचे अजेंडे एकसारखे असल्याने दोघांनाही त्यातून बळ मिळाले. हे दोन्ही पक्षच आज उत्तर प्रदेशचे तारणहार बनले आहेत. संघ परिवाराची नकारात्मक, समाजात दुही पेरणारी आंदोलने या राज्यात सतत सुरू असतात. ती निष्प्रभ करण्याचा फॉर्म्युला मुलायमसिंह यांनी मध्यम जातीच्या एकजुटीतून तयार केला आहे. त्या राज्यात मुस्लीम बांधव त्यांना मोठा भाऊ मानतात. ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी विश्वासार्हता म्हणता येईल. ही विश्वासार्हता त्यांनी सतत केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमधून तयार झाली आहे. म्हणून सारेजण त्यांना नेताजी म्हणतात. हे दोन्ही नेते ५० वर्षे आपापल्या राज्याचे नेतृत्व करत आले आहेत. पन्नास वर्षांच्या वाटचालीत या दोघांनी अनेक प्रश्न सोडवले. अनेक आव्हाने परतवून लावली. त्याबद्दल लोकांनी त्यांच्या कर्तबगारीला सलाम केला. मुलायमसिंहांना लोकांनी नेताजी ही पदवी दिली, तसे पवारांना महाराष्ट्र जाणता राजा म्हणून संबोधतो. असे असामान्य झालेल्या नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढतात. लोक या नेत्यांबद्दल जास्त पझेसिव्ह होतात. त्यांच्यावर जास्त जबाबदारी लादतात.

त्या भावनेतूनच महाराष्ट्रात पवारांकडे जास्त अपेक्षेने पाहिले गेले. एवढा मोठा महानेता आपल्याजवळ असताना राज्यातल्या असहाय्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाही, असे विश्लेषण केले गेले. शेतकरी मराठा समाजातले दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतेय. त्या समाजातल्या तरुण वर्गात रोजगार संधीचा अभाव असल्याने मोठा असंतोष खदखदतोय. या राज्यातली शेती, ग्रामीण समाज, गावगाडा जवळपास शेवटचे आचके देत आला दिवस ढकलतोय. तो केव्हाही मोडून पडेल अशी स्थिती आहे. या पडझडीत सर्वात जास्त झळ मध्यमजातींना पोचणार आहे. पवारांसारखा जाणता नेता आपल्याजवळ असताना हे होते आहे याची बोच आहे. हा काळाचा घाला असेल पण त्यावर काहीच उपाय नाही काय? पवारांनी या अरिष्टात हस्तक्षेप करावा, यासाठी लोक आशाळभूतपणे त्यांच्याकडे पाहत आहेत. शिक्षण, आरोग्य या व्यवस्थाही आजारी आहेत. लोक त्यात भरडले जाताहेत. राज्यातले सरकारही या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही.

अशीच भीषण परिस्थिती उत्तर प्रदेशातही आहे. रोजगाराचा अभाव, शेती अरिष्ट, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचे रोगटपण याचा सामना का करत नाही म्हणून लोक मुलायमसिंहांना दोष देत आहेत. या रोगटपणातून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा महारोग फोफावतो. असहिष्णुता धगधगते, धर्माची गिधाडे झेपावतात. दंगली होतात, दादरी कांड होते, गुन्हेगारी वाढते ही या रोगट व्यवस्थेची देण आहे.

शरद पवार-मुलायम सिंह हे काही फक्त त्या त्या राज्याचे नेते नव्हेत. ते देशाचे नेते आहेत. देशाला पुढे नेणाऱ्या दोन महत्त्वाच्या राज्यात त्यांना मान्यता आहे. या दोन राज्यांच्या समस्या या साऱ्या देशाच्याच आहेत. त्या सुटल्या नाहीत तर देशाचा गाडा अडेल. पंचाहत्तरी हे निमित्त. या निमित्ताने देशापुढच्या या आव्हानांना भिडण्याचा विचार या नेत्यांनी द्यावा, यासाठी लोक या दोघांच्या राजकारणाच्या उण्यादुण्यावर चर्चा करत आहेत. फळ लागलेल्या झाडावर दगड मारावाच लागतो. आपली ती परंपराच आहे!

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०८/१२/२०१५


No comments:

Post a Comment