सत्ता ही विविध रूपांत आपल्या
आसपास वावरत असते. सरकार, मंत्रिमंडळ, राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी हे सत्तेचे
एक महत्त्वाचे रूप. त्यांचे वर्तन, स्वभाव, कारभार, व्यवहार, निर्णय आपल्या जगण्यावर
भलेबुरे परिणाम करतात. या साप्ताहिक सदरातून राज्यातल्या सत्तावर्तनाची साधकबाधक चर्चा
आणि सत्तावर्तनाच्या आत-बाहेरच्या कंगोऱ्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाईल.
काहींना या लेखाचा हा मथळा
वाचून आश्चर्य वाटू शकेल, तर काहींना हा खोडसाळपणाही वाटेल. मात्र हा मथळा १९८० साली
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या एका लेखाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वतंत्र
विचारांच्या हिंदूंना प्रवेश मिळेल काय, असा प्रश्न त्यावेळी साळुंखे यांनी विचारला
होता. त्याचे अधिकृत उत्तर आजपर्यंत संघाने दिलेले नाही. कालच्या रविवारी संघाचे पुण्यात
शिवशक्ती संगम शिबीर पार पाडले. जवळपास दीड लाख स्वयंसेवक आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह
मंत्रिमंडळाचे अनेक ज्येष्ठ सदस्यही त्यात सहभागी झाले होते. या संगमाचे बौद्धिक घेताना
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदी हीच आपल्या समाजाची ओळख असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम राज्यात संघ
परिवाराची सत्ता आल्यानंतर दिमाखात होणे स्वाभाविक होते. पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात
मारूंजी गावाजवळ साडेचारशे एकराच्या विस्तीर्ण जागेत हे शिबीर झाले. रायगडावरील राजदरबाराच्या
रूपातील भव्य मंच उभारून संघाने स्वत:चे वैभव दाखवले. शिस्तबद्ध स्वयंसेवक, त्यांचे
गणवेश, नियोजन यांचा गौरव झाला. पूर्वी असेच पुण्यात संघ शिबीर झाले होते. त्यावेळी
स्वयंसेवकांच्या लांबच लांब रांगांची चर्चा रंगली, तेव्हा थोर लेखक पु. ल. देशपांडे
म्हणाले होते, रांगेत मुंग्याही चालतात. त्यात काय एवढे विशेष? त्यावर वाद झडला होता.
पु. ल. देशपांडे यांना सूचवायचे होते की, शिस्त, रांगा, संख्या, नियोजन ठीक आहे. त्याचा
विधायक उपयोग झाला पाहिजे. तो झाला तर याला अर्थ आहे. नाही तर भव्यतेला अर्थ काय? असो.
हा झाला इतिहास
....तर आता राज्यात संघाची
सत्ता असताना हा भव्य शिबीर घेतले गेले. ते होत असताना संघ परिवाराच्या काही संघटना
राममंदिर उभारणीची तयारी करत आहेत. त्याला या शक्तिप्रदर्शनाने जोर येणार आहे. या शिबिराला
संघाने शिवशक्ती संगम असे नाव दिले होते. त्यातला हेतू स्पष्ट होता की, छत्रपती शिवरायांशी
संघ स्वत:ला जोडू पाहत आहे. शिवरायांचे प्रत्यक्ष असे नाव आजपर्यंत संघाने कधी वापरले
नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात संघ शिवरायांचे नाव वापरून मराठा आणि बहुजन समाजाला संदेश
देऊ पाहत आहे हे उघड आहे. पण शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना या मित्रपक्षालाही काही सुचवू
पाहत आहे का? त्याविषयी पुढच्या काळात त्यांच्या वाटचालीत काही खाणाखुणा दिसू शकतील.
शिवसेनेतून यावर काय प्रतिक्रिया येते तेही बघावे लागेल. संघाची भाषा नेहमीपेक्षा यावेळी
काहीशी मवाळ दिसली. काही वादग्रस्त बोलले जाऊ नये याची पुरेपूर काळजी भागवतांनी घेतली.
पण मुळात साळुंखे यांनी जो प्रश्न विचारला, तसे काही प्रश्न भागवतांच्या वक्तव्यातून
उभे राहिले आहेत. त्यांविषयी चर्चा करणे अनाठायी ठरणार नाही. पहिल्यादा संघ स्वतंत्र
विचारांच्या हिंदूंना प्रवेश देईल काय, हा प्रश्न बघू.
आजपर्यंत संघाचे वर्तन बघितले
तर स्वतंत्र विचारांच्या हिंदूंचा स्वयंसेवकांनी तिरस्कारच केलेला आहे हे दिसून येईल.
स्वत:ला हिंदूंचे संघटन म्हणायचे आणि स्वतंत्र विचारांच्या हिंदूंना दूर लोटायचे, असे
संघ का करतो? याचे उत्तर शोधायचे तर संघाची विचारसरणी अभ्यासावी लागते. त्यात अनेक
विसंगती आहेत. म्हणजे असे बघा- या शिबिरात भागवतांनी सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख
केला, पण शिबिरात सावित्रीच्या लेकी किती होत्या? मुळात संघ ही फक्त पुरुषांची संघटना
आहे. स्त्रियांसाठी वेगळी सेविका समिती आहे. त्यामुळे संघ हा पुरुषपात्री प्रयोग आहे
असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्धा स्त्री समाज, म्हणजे हिंदू महिलांविषयी संघाची
दुय्यम भूमिका दिसते. ते असो.
मुद्दा असा की, स्वतंत्र
विचारांच्या हिंदूंचे संघाला वावडे का आहे? तर हिंदू धर्म आणि संघ धर्म या दोन वेगळ्या
गोष्टी आहेत. संघाचा धर्म पारंपरिक हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. संघ आपल्या स्वयंसेवकांमध्ये
आपण वेगळे, खास लोक आहोत अशी अहंगंडाची भावना सतत पेरतो. इतर लोक हिंदू असले तरी पथभ्रष्ट,
पतित असून त्यांना पावन करून घ्यायचे आहे. त्यासाठी खूप काम करायचे आहे, ही संघाची
भूमिका आहे. त्यासाठी संघ प्रचारक तयार करतो. त्यांना वेगवेगळ्या भागांत प्रचारासाठी
पाठवतो. ते स्वत:ला हिंदू धर्माचे प्रचारक म्हणवत नाहीत, तर संघाचे कट्टर समर्थक प्रचारक
म्हणवतात. ते त्यांच्याशी सहमत नसणाऱ्या हिंदूंना पाखंडी म्हणतात. त्यांच्यावर बहिष्कार
टाकला पाहिजे, अशी भूमिका घेतात आणि आपल्या संघधर्माची शिकवण पुढे रेटतात. त्याला ते
ईश्वरी कार्य मानतात.
कृष्ण, ज्ञानेश्वर हे यज्ञयागावर
टीका करणारे हिंदू होते. त्यांना संघाने कधी फारसे जवळचे मानले नाही. राजा राममोहन
रॉय, म. फुले या हिंदू धर्मातल्या कर्मकांडावर टीका करणाऱ्यांचा संघाने कायम दु:स्वास
केला आहे. आता डॉ. आंबेडकरांचे नाव संघ घेऊ लागला आहे. पण त्यात तोंड देखलेपण जास्त
आहे. डॉ. आंबेडकरांच्या जातीनिर्मूलनाच्या भूमिकेवर संघ तोंड उघडत नाही. सारा भारत
बौद्धमय व्हावा ही डॉ. आंबेडकरांची इच्छा होती. त्याबद्दल संघ मौन पाळतो. या शिबिरातही
भागवत म्हणाले की, कायद्याने समता येणार नाही. त्यासाठी संस्कार व्हावा लागेल. तो कोणता?
भागवतांना ज्या पूर्वजांचा, त्यांच्या गुणांचा, संस्काराचा गर्व आहे, ते संस्कार आजपर्यंत
कामी आले नाहीत म्हणून तर आजही हिंदू समाजात विषमता आहे. ती जावी असा भागवत उद्घोष
करतात. मात्र नव्या समतावादी विचारांना नकार देतात, ही विसंगती संघ किती काळ लपवणार
आहे कोण जाणे? हे संघविचार बाबासाहेबांच्या विचाराला छेद देणारे आहेत.
संघ स्वत: बद्दल हेतूत:
काही भ्रम पेरतो. त्यातला एक मोठा भ्रम म्हणजे आम्ही नि:स्वार्थी समाजसेवा करतो. खरे
तर संघ हे सत्ता मिळवण्याचे हत्यार आहे, हे संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर
गुरुजी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्याच्या बंच ऑफ थॉट्स आणि वुई आर अवर नेशनहूड
डिफाइन्ड या दोन पुस्तकांत त्यांची ही सत्ताप्राप्तीची भूमिका स्पष्ट झालेली आहे. संघाची
वाटचाल बघितली तर जेव्हा संघ सत्तेच्या जवळ येतो, तेव्हा तो फोफावतो. आणीबाणीनंतरच्या
जनता पक्षाच्या राजवटीचा संघाने देशभर संघटन वाढण्यासाठी उपयोग केला होता. त्याच काळात
गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत संघाने प्रशासन, शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे,
उद्योग अशा विविध क्षेत्रांत हातपाय पसरले. आज ही राज्ये भाजपची मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात
हे होत नव्हते, हे संघाचे दु:ख होते.
संघाची नागपूर ही जन्मभूमी
आणि पुणे प्रेरणाभूमी आहे. पण तरीही महाराष्ट्रात संघाला स्वत:च्या बळावर आजवर सत्ता
कधी मिळाली नव्हती. ती आता मिळाली आहे. त्याचे सेलिब्रेशन करणे आणि अधिक विस्ताराची
तयारी करणे, यासाठी या शिबिराचे निमित्त होते. संघ सत्तेवर स्वत:चा दबाव ठेवू इच्छितो.
मंत्रिमंडळाला भागवतांनी इशारा दिला की, तुम्हीच केवळ समाजाचे भले करू शकणार नाही.
तुम्ही चांगले काम केले ते टिकायचे असेल तर समाज जागृत झाला पाहिजे. शक्तिवान झाला
पाहिजे. समाज जागृत होणे म्हणजे संघ वाढणे. समाज शक्तिवान होणे म्हणजे संघाची शक्ती
वाढणे, हे आडवळणाने भागवतांनी सांगितले. स्वयंसेवकांना ते बरोबर समजले असेल. ज्याच्याजवळ
शक्ती त्याचे सत्य जग स्वीकारते, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातून संघ स्वत:च शक्ती
वाढवून सत्य पटवू पाहणार, हे लपून राहत नाही.
भागवतांच्या भाषणातून सरकारवर
प्रभाव टाकण्याची संघाची रणनीती स्पष्ट झाली. याचा अर्थ असा की, सध्याच्या राज्य सरकारवर
संघ स्वत:चा अजेंडा राबवावा म्हणून यापुढे दबाव वाढवेल. त्यासाठी ते शक्तिप्रदर्शन
होते असेही म्हणता येईल. म्हणून संघाच्या या शिबिराकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.
या शिबिरापूर्वी भागवतांच्या हस्ते मुंबईत जैन मुनी श्रीमद विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी
महाराज यांचे मारू भारत, सारू भारत हे गुजराती भाषेतील पुस्तक प्रकाशित केले गेले.
माझा भारत, सर्वांचा भारत हा विचार भागवत बोलले खरे, पण तो प्रत्यक्ष आचारणात दिसला
तर देशाचा फायदा होईल. स्वतंत्र विचारांच्या हिंदूंकडे त्यांनी तिरस्काराने नव्हे,
तर समजून घेण्याच्या भूमिकेतून बघितले तर भागवतांनी पुण्यात पाहिलेले एकतेचे स्वप्न
प्रत्यक्षात यायला मदत होईल.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : ०५/०१/२०१६
No comments:
Post a Comment