Thursday, October 1, 2015

गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, ‘तमाशा’ कराच!













गांधींचा सामान्य हिंदू माणूस जागा असेल, तर नथुरामींची पीछेहाट ठरलेली असते. बाबासाहेबांचा संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता सक्रिय असेल तर अन्याय करणाऱ्यांची दातखीळ बसते. त्यांची अन्यायाची भाषा बोलण्याचीदेखील हिंमत होत नाही. हे यापूर्वी दिसले, घडले आहे. आज पुन्हा गांधींचा सामान्य माणूस आणि बाबासाहेबांचा संविधानवादी कार्यकर्ता यांना पुढे यावे लागेल. त्यासाठी गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, राजकीय तमाशा करून दाखवण्याची वेळ आली आहे.

आम्हाला कमी समजू नका. तुम्ही रक्तरंजित लढाईची भाषा करत असाल, तर आमच्या बाजूने डावे नक्षलवादी आहेत.
- अॅड. प्रकाश आंबेडकर

कट्टरवादी शक्तींचा वैचारिक प्रतिवाद करता येणे शक्य नाही. त्यांना विचार करणे ही प्रक्रियाच मान्य नाही. त्यांचा बंदोबस्त झाला नाही, तर महाराष्ट्राचा पाकिस्तान बनेल.
- श्याम मानव

या दोन प्रतिक्रिया बोलक्या आणि गंभीर आहेत. त्या मोठ्या अस्वस्थ वास्तवातून आल्या आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पानसरे हत्या प्रकरणातले संशयित पकडले गेले. त्यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदा रंगल्या. वकिलांचे ताफे उभे राहिले. त्या वकिलांचे दैनिकांत फोटेसेशन दिसले. मुलाखती, चर्चा यातून, माध्यमांत खुनाचे खुलेआम समर्थन सुरू झाले. विचार मांडणे आणि धमक्या देणे यांतले अंतर मिटले. ज्या आदरणीयांचे खून झाले, त्यांचा उल्लेख ‘आरेतुरे’ने करून जाहीर अवमान केला गेला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मानव यांच्या प्रतिक्रियांनी पुरोगामी चळवळीसमोर काय वाढून ठेवलेय त्याची दिशा स्पष्ट केली.

‘आमच्याकडे डावे नक्षलवादी आहेत’ किंवा ‘महाराष्ट्राचा पाकिस्तान बनेल’ या दोन्ही प्रतिक्रियांपैकी पहिली प्रतिक्रिया खचलेल्या पुरोगामी चळवळीला लढण्याचा विश्वास देण्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी प्रतिक्रिया आपण लढलो नाही, तर काळ मोठा बाका आहे याची जाणीव करून देणारी आहे. 

कट्टरवादी शक्तींना रक्तरंजित लढाई हवीच असते. लोकशाही कायद्याच्या राज्यात कट्टरवाद्यांचा मुकाबला कट्टरवादाने होणार नाही. गोळीला उत्तर गोळी हे कधी नसतेच. आता खरी लढाई राजकीय आहे. ही लढाई आक्रमक पद्धतीने, जनतेचा अजेंडा सोबतीला घेऊन लढावी लागेल. पुरोगामी चळवळीला भाबडे विचार गुंडाळून ठेवावे लागतील. माणूस मारून विचार मरत नाही, हा भोळा आशावाद झाला. माणसेही मारता येतात आणि विचारांचीही पीछेहाट करता येते हा इतिहास आहे. हे होऊ द्यायचे नसेल, तर कणखर राजकीय लढाया कराव्या लागतात. त्या लढाईची महाराष्ट्रात वेळ आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र उठवावा लागेल.

हे कसे घडेल?
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी जे संघर्ष उभे केले त्यातून सूत्र सापडेल. सामान्य हिंदू माणूस जेव्हा गांधींच्या बाजूने उभा होता तेव्हा गांधी हत्या करून नथुरामी शक्तीने स्वत:चा घात करून घेतला होता. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात मोठा वैचारिक झंझावात उभा राहिला. त्याने नथुरामी शक्तींना तोंड लपवण्याची वेळ आणली. लोक सजग असतील, तर कट्टरवादी दळणातल्या खड्यासारखे बाजूला पडतात. अर्थात पुस्तके लिहिणे, व्याख्याने देणे, नथुरामच्या जयंत्यामयंत्या साजऱ्या करणे, अस्थिपूजा करणे, पुतळे उभे करण्याची भाषा करणे, मंदिरे उभे करण्याच्या घोषणा करणे, नथुरामचे नाटक सादर करणे या कृतीतून गांधीहत्येचे छुपे समर्थन जरूर सुरू होते. पण त्या कारवायांचा आवाज क्षीण होता. समाजात त्याला प्रतिष्ठा नव्हती. नथुरामी चोरचिलटासारखे वावरत होते. आता पुन्हा नथुरामी शक्तींनी उभारी घेतली आहे. कट्टरवादी शक्ती धर्माचे नाव घेतात. पण त्यांना समाजात अधर्म पेरायचा असतो. ते लोकांचे भले करण्याचे दावे करतात, पण त्यांना लोकांचे जीणे कठीण करून सोडायचे असते. जेव्हा जेव्हा कट्टरवादी शक्ती वाढतात तेव्हा लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न दडपून टाकणे हा त्यांचा अजेंडा असतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. म्हणूनच कट्टरवाद्यांनी दुष्काळात लोकांना मदत कधी केली नाही. पण पुण्यात मानाचे गणपती पाणीटंचाईमुळे हौदात बुडवणे म्हणजे पाप होय अशी आरोळी ठोकली. गणपती हौदात बुडवू नका, म्हणून पुण्यात आंदोलन झाले. कट्टरवादी संघटना लोकविरोधी असतात, हे जनतेला समजावून सांगावे लागेल. कट्टरवादी संघटनांच्या कारवायांनी रोजगार, नोकऱ्या, दुष्काळ, शेतीमालाला हमी भाव, शिक्षण, आरोग्य, घर हे कळीचे प्रश्न बाजूला पडतात. हे लोकांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी कट्टरवाद्यांची ताकद क्षीण होईल.

गांधींचा सामान्य हिंदू माणूस जागा असेल, तर नथुरामींची पीछेहाट ठरलेली असते. बाबासाहेबांचा संविधानावर प्रेम करणारा कार्यकर्ता सक्रिय असेल तर अन्याय करणाऱ्यांची दातखीळ बसते. त्यांची अन्यायाची भाषा बोलण्याचीदेखील हिंमत होत नाही. हे यापूर्वी दिसले, घडले आहे. आज पुन्हा गांधींचा सामान्य माणूस आणि बाबासाहेबांचा संविधानवादी कार्यकर्ता यांना पुढे यावे लागेल. त्यासाठी गांधी, बाबासाहेबांच्या माणसांनो, राजकीय ‘तमाशा’ करून दाखवण्याची वेळ आली आहे.

तमाशा हा महाराष्ट्रीय माणसाच्या जीवनशैलीत भिनलेला शब्द आहे. हा केवळ मनोरंजनाचा लोककला प्रकार नाही. आजही गावात जा. काही वेगळे करून दाखवायचे असेल, तर ते सुचवताना माणसे म्हणतात, तमाशा करून दाखवतो, तमाशा घालतो, तमाशा होऊ द्याच. इतिहासात ‘तमासे करून दाखवा’ म्हणजे ‘पराक्रम घडवा’ या अर्थाने शब्दयोजना करण्यात आली आहे. छोटी-मोठी वेगळी गोष्ट करण्यापासून तर पराक्रम गाजवण्यापर्यंत ‘तमाशा’ करा असे म्हटले गेलेले दिसून येते. पूर्वी राजे, सरदार ‘तमाशा’ हा शब्द वापरत. लढाया, स्वाऱ्या करायला जाणाऱ्या शूर सरदारांना इतर म्हणत ‘तमासे’ करून या म्हणजे पराक्रम गाजवून या, यशस्वी होऊन या. तमाशातल्या वगनाट्यात चांगल्याचा विजय, वाईटाचा पराभव दाखवला जातो. गणगौळणी, पोवाड्यात कृष्णांच्या पराक्रमाची वर्णने असतात. असा तमाशा करून दाखवण्यासाठी महाराष्ट्राची सद्यस्थिती अनुकूल आहे. राजकीय, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते अस्वस्थ तर आहेतच. विचारवंत, लेखक, कलाकारही बैचेन आहेत. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गीची गोळी त्यांनाही चाटून गेली आहे. राजकीय क्षेत्रात प्रकाश आंबेडकरांसारखेच आमदार कपिल पाटील नथुरामी शक्तीविरोधात आहेत. पुण्यात डॉ. अभिजीत वैद्य, अजित अभ्यंकर आहेत. औरंगाबादला भालचंद्र कांगो, सोलापूरला नरसय्या आडम मास्तर आहेत. नाशिकला डी. एल. कराड आहेत. आणखी शेकडो लढाऊ नेते, कार्यकर्ते राज्यात विविध ठिकाणी कंबर कसून आहेत. गरज आहे, या सर्वांची मोट बांधण्याची.

महाराष्ट्रात कट्टरवाद्यांशी लढताना बिहारपासून काही धडे घेता येतील. बिहारात विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे. या संग्रामात नीतिश कुमारांनी आखलेली रणनीती उल्लेखनीय आहे. नीतिश कुमारांनी आरक्षणविरोधी आवाज काढणाऱ्यांना गप्प केले. ते कशाच्या बळावर? नीतिश कुमारांमागे मध्यम जाती, मागास, अल्पसंख्यांक यांची भक्कम एकजूट उभी दिसते. त्या एकजुटीपुढे आरक्षणाचा फेरविचार करणाऱ्यांची भाषा बंद होते. खोटा प्रचार करणारे उघडे पडतात. हे केवळ सामान्य हिंदू माणूस नीतिश कुमारांना बळ देतो म्हणून घडते आहे. बिहारसारखी मध्यम जाती, मागास, दलित, अल्पसंख्यांकांची फळी महाराष्ट्रात उभी केली तर राजकीय ‘तमाशा’ जरूर होईल. गांधी, बाबासाहेबांच्या माणसांना तो करावाच लागेल. अन्यथा फार मोठी किंमत चुकवावी लागेल.

गांधी जयंती तोंडावर आहे. राजकीय तमाशा करायचा, तर गांधी किती उपयुक्त आहे बघा. विज्ञानवाद, समाजवाद, निधर्मीवाद या अपूर्व कोलाहलात भारताचा मूळ प्राणस्वर जाणला पाहिजे. कबीर, तुलसी, मीरा, नामदेव, तुकाराम, नरसी मेहता, संत एकनाथ, स्वामी विवेकानंद हा तो प्राणस्वर. गांधींनी हाच प्राणस्वर विसाव्या शतकात रुजवला. साने गुरुजी, गाडगे महाराज, प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर हे याच कुळातले आहेत. गांधींच्या या कुळात सामान्य जनतेला ‘स्व’ सापडतो. गौतम बुद्ध त्या कुळात भेटतो.

तमाशा करायचा, तर गांधींची विलक्षण स्ट्रॅटेजी समजून घेतली पाहिजे. टिळक म्हणत, ‘शठं प्रतिशाठ्यं’. गांधी म्हणत, ‘शठं प्रति सत्यं’. गांधी टिळकांचा राजकीय संघर्ष पुढे नेत होते. पण नामदार गोखले माझे राजकीय गुरु आहेत, असं म्हणत होते. चळवळीची प्रेरणा जहाल. पण भाषा, प्रतिमा वगैरे सामग्री सौम्य, सभ्य.

या विलक्षण स्ट्रॅटेजीने ‘तमाशा’ करून दाखवता येईल. असा तमाशा झाला, तर तख्ताचीही उलटपालट होते.



राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २९/०९/२०१५

No comments:

Post a Comment