दरवर्षी दसऱ्याला महाराष्ट्रात
दोन मेळावे होतात. खरे तर ती शक्तिप्रदर्शनेच असतात. परवाच्या दसऱ्याला शिवसेना मुंबईत
आणि रा.स्व.संघ नागपुरात काय करतो हा कळीचा मुद्दा असेल. एका म्यानात दोन तलवारी राहू
शकत नाहीत. ज्या दिवशी सेनेने हिंदुत्वाचे राजकारण करणारी भूमिका घेतली, तेव्हाच हे
स्पष्ट झाले की राज्यात हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या दोन पक्षांपैकी
एकच वरचढ ठरेल, दुसरा हळूहळू दुबळा होईल. भाजप वरचढ ठरत असून, शिवसेनेची वाटचाल घसरणीच्या
दिशेने निदान सध्यातरी होताना दिसते आहे.
या
दसऱ्याला राज्यात दोन मोठी शक्तिप्रदर्शने होणार आहेत. पहिले-मुंबईत शिवाजी पार्कवर
शिवसेनेचे. दुसरे-नागपुरात रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. शिवसेनेची स्थापना
१९ जून १९६६ ला झाली. त्याला आता ५० वर्षे होत आहेत. ३० ऑक्टोबर १९६६ ला दसऱ्याला शिवाजी
पार्कवर पहिली मोठी सभा झाली. त्यालाही ५० वर्षे होत आहेत. २२ ऑक्टोबर २०१५ला दसऱ्याला
सेना आपली पन्नाशी साजरी करत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
९१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. संघाची स्थापना १९२५ साली झाली. २०१५ हे साल संघाच्या
आयुष्यात महत्त्वपूर्ण आहे. या वर्षात ९१वी साजरी करताना संघाच्या विचाराचाच पक्ष देशात
सत्तेवर आहे. संघाचे स्वयंसेवक पंतप्रधान आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळातले बहुतांशी
मंत्री संघाच्या शाखेवर किंवा आसपास घडलेले आहेत. महाराष्ट्रातही संघाचे स्वयंसेवक
मुख्यमंत्री आहेत. संघाच्या विचाराचा पक्ष सत्तेत आहे. एकूण संघात, स्वयंसेवकांत आनंदाचे
वातावरण असताना संघाचा दसरा मेळावा, शक्तिप्रदर्शन नागपुरात होईल.
हे दोन शक्तिप्रदर्शनाचे
कार्यक्रम पार पडत असताना देशातली आणि राज्यातली राजकीय परिस्थिती दोन्ही संघटनांसाठी
तणातणीची आहे. सेनेला सतत असे वाटतेय की, केंद्राच्या, राज्याच्या राजकारणात आपला आब
राखला जात नाही, महत्त्व दिले जात नाही. मंत्रिमंडळ आणि सत्तेतला योग्य वाटाही दिला
जात नाही. शिवाय सेनेशी विधानसभा निवडणुकीत युती तोडून भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या.
सेनेपेक्षा जास्त जागा जिंकून तो राज्यातला एक नंबरचा पक्ष बनला. सेना दोनवर फेकली
गेली. जोपर्यंत बाळासाहेब होते, तोपर्यंत सेना एक नंबरवर होती. भाजपाला कब्जात ठेवायची
बाळासाहेबांची रणनीती नेहमी यशस्वी ठरायची. बाळासाहेब संघाला कधी जुमानत नसत. भाजपने
कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर कमळाबाई म्हणून हिणवत. सेनेला तुमची गरज नाही. तुमची
(भाजपाची) गरज म्हणून सेनेशी तुमची युती आहे हे बाळासाहेब बोलून दाखवायचे. पण ते गेल्यानंतर
भाजपने सेनेवर मात केली. भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सेनेला सत्तेचा
तोकडा वाटा पदरात पाडून घ्यावा लागला. दररोज मानहानी स्वीकारत सेना सत्तेत सहभागी आहे.
सेनेने स्वाभिमान सोडलाय, सेना गुळाला मुंगळे चिकटावे तशी सत्तेला चिकटलीय असले अगदी
जिव्हारी घाव पडावेत असे आरोप सहन करत सेनेची वाटचाल सुरू आहे. सेना नेत्यांना हे सगळे
राजकारण असह्य होत असेल. सामान्य शिवसैनिकाला तर भयंकर चीड येत असेल.
सेनेची ही अशी दयनीय स्थिती
होणे ही एक स्वाभाविक राजकीय घटना मानावी लागेल. ज्यांना संघ आणि भाजप यांची विस्तारवादी
आणि वर्चस्ववादी रणनीती माहीत आहे, त्यांना हे समजून घ्यायला अजिबात अवघड जाणार नाही.
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. ज्या दिवशी सेनेने हिंदुत्वाचे राजकारण करणारी
भूमिका घेतली, तेव्हाच हे स्पष्ट झाले की राज्यात हिंदुत्ववादी भूमिका घेऊन राजकारण
करणाऱ्या दोन पक्षांपैकी एकच वरचढ ठरेल, दुसरा हळूहळू दुबळा होईल.
महाराष्ट्रात यापूर्वी हे
दिसले आहे. संघ परिवाराच्या राजकारणापुढे प्रखर हिंदुत्वाची भूमिका असलेला हिंदू महासभा
हा पक्ष टिकू शकला नाही. हिंदू महासभेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा स्वत:ची प्रतिमा
असलेला नेता लाभला होता. सावरकरांना स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी होती. त्यांचे
स्वत:चे एक राजकीय वलय होते. ते फर्डे वक्ते होते. लेखक, कवी होते. तरीही त्यांच्या
नेतृत्वाखालच्या हिंदू महासभेला घरघर लागली. नंतर तो पक्ष संपला. संघ परिवार मात्र
गेली नव्वद वर्षे घोडदौड करतो आहे. ती इतकी की नव्वदी साजरी करताना या परिवाराने देशाची
सत्ता ताब्यात घेतली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरयाणा,
जम्मू-काश्मीर या महत्त्वाच्या राज्यात संघ परिवाराची सत्ता आहे. लोकसभेत प्रचंड बहुमत
आहे.
संघ परिवाराची राजकारण करण्याची
एक स्वत:ची पद्धत आहे. हिटलरच्या नाझीवादातून ती विकसित झाली आहे. या परिवारात व्यक्तिवाद,
घराणेशाही, कुटुंबशाही या गोष्टींना थारा नाही. संघ परिवाराची ताकद म्हणजे संघटनेची
हुकूमशाही असे समीकरण आहे. संघ एकछत्री म्हणून काम करतो. त्याखाली शेकडो संघटना एकेक
मुद्दा घेऊन कार्यरत आहेत. नव्वद वर्षांत या संघटनेत मतभेदातून फूट पडलेली नाही. लाखो
स्वयंसेवक एका ध्येयाने पछाडून काम करतात. थोर मराठी लेखक पु.ल. देशपांडे यांनी संघाच्या
संघटन शिस्तीला मुंग्यांची रांग असे संबोधले होते. मुंग्या ज्या शिस्तीने रांगेत चालतात,
त्या शिस्तीने स्वयंसेवक काम करतात. हा म्हटला तर टीकेचा, म्हटला तर कौतुकाचाही विषय
आहे. एवढ्या महासमन्वयाने काम करणारी आज देशात दुसरी संघटना दिसत नाही. संघाचे टीकाकारही
हे मान्य करतात.
संघ परिवाराची राजकारणाची
व्याख्या सर्व समाजाला कब्जात घेणारी आहे. निवडणुकांचे राजकारण एका बाजूला करताना संघ
परिवाराने बँका, आरोग्य, शिक्षण, स्वयंसेवा, साहित्यव्यवहार, धर्म, विविध जाती-जमाती,
स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक चळवळ अशा नाना क्षेत्रांत काम करणाऱ्या
संस्था उभ्या केल्या. त्या माध्यमातून समाज जीवनावर कब्जा करायचा, देशाचे संघीकरण करायचा
त्यांचा प्रयत्न आहे. असे संस्थात्मक काम सेनेत मात्र होताना दिसत नाही. सेनेने सुरुवातीला
मराठी माणसांच्या हक्कांची आरोळी दिली. दाक्षिणात्य यंडूगुंडूंचे मराठी माणसावरचे आक्रमण
परतवून लावण्यासाठी शिवसेनेने शिवसैनिकांची नोंदणी केली. पुढे अल्पावधित सेना म्हणजे
मराठी माणूस असे समीकरण झाले. सेनेची आंदोलने नेहमी राडेबाजीची राहिली, तरी सामान्य
मराठी माणसांना सेनेविषयी विश्वास वाटला. त्यामागे बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा करिष्मा
हा एक मोठा घटक होता. सनदशीर आंदोलने, निषेध मोर्चे, अर्ज, विनंत्या करण्यापेक्षा कानाखाली
आवाज काढणे, तोंडाला काळे फासणे, धांगडधिंगा, धूडगूस, राडेबाजी, हुल्लडबाजी या मार्गाने
सेनेने समाजात, सरकार दरबारी स्वत:चा दबदबा वाढवला. काँग्रेस सत्ताधाऱ्यांच्या उग्र
चेहऱ्यामुळे सेनेची ही हिंसक आंदोलने लोकांनी स्वीकारली. त्यातून बाळासाहेब सरसेनापती
झाले. पण जेव्हा बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट झाले, तेव्हा संघ परिवार आणि सेनेत टकराव
झाला. तो अनेकदा दिसला.
हा टकराव हिंदुत्वाचा मुद्दा
कोण जास्त पुढे नेतो यामधून झाला. दोघांनाही हिंदुत्वाचा अजेंडा पुढे न्यायचाय. त्यासाठी
सत्ता मिळवायचीय. या स्पर्धेत सध्या सेना मागे पडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या
सहकाऱ्यांना हे मागे पडणे सतावत आहे. या अगतिकतेतूनच गुलाम अलींना विरोध, सुधींद्र
कुलकर्णींना काळे फासणे, सनातनचा उघड कैवार, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला विरोध या
भूमिका सेनेकडून घेतल्या जात आहेत. तर ते निष्प्रभ करण्यासाठी भाजप सत्तेचा वापर करत
आहे. सुधींद्र कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भक्कम
पोलीस संरक्षण पुरवून, तो कार्यक्रम यशस्वी करवून भाजपने सेनेवर मात केली. तिला दाबण्याचा
प्रयत्न केला.
ही दाबादाबी यापुढेही चालू
राहणार. कारण एका म्यानात कुणी राहायचे हा खरा प्रश्न आहे. आता म्यानात आम्हीच राहणार
हे भाजप-संघ परिवाराने दाखवून दिले आहे. संघ परिवाराच्या या आक्रमणापुढे सेना टिकणार
की, घसरत जाणार हा प्रश्न यापुढे महत्त्वाचा राहणार आहे. सेनेला स्वत:ची आणखी घसरण
नको असेल तर तिने संघ परिवाराशी उघड टक्कर घेतली पाहिजे. पण कधी माघार, कधी समन्वय,
कधी अपमान या खेळात सेना घोटाळत राहिली, तर लवकरच सेनेची हिंदू महासभा झाल्याशिवाय
राहणार नाही. सेनेने संघ परिवाराशी लढण्याची रणनीती ठरवत स्वत:ची विचारधारा निश्चित
करावी. खरे तर प्रबोधनकार ठाकरेंचा मोठा वारसा सेनेने सतत नाकारून आपल्या पायावर धोंडा
मारून घेतला आहे. तो वारसा पुन्हा उजळवला तर सेना संघावर मात करू शकेल. या दसऱ्याला
उद्धवजींची डरकाळी जरूर फुटेल, पण ती नागपूरच्या रेशीम बागेत संघापर्यंत पोचेल काय?
सेना नेतृत्वाने आता संघाचे काय करायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे.
राजा कांदळकर
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी
मराठी live : २०/१०/२०१५