मित्र हो, आजच्या दुहीच्या
वातावरणातून पुढे जाण्यासाठी साने गुरुजींचा वारसा आपल्याला उपयोगी ठरू शकेल काय? तुम्हाला
काय वाटते? तुम्ही सारे महाराष्ट्रातील अठरापगड जातींच्या मोठ्या कुटुंबातील मोठ्या,
शहाण्या भावाची जबाबदारी अंगावर पडलेल्या ब्राह्मण या जातीतले आहात. ही सामाजिक जबाबदारी
पेलण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्हा प्रत्येकात ती शक्ती आहे. महाराष्ट्राला
द्वेषाच्या जाळातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आपला महत्त्वाचा वाटा उचलाल? ती तुम्ही
उचलायला हवी.
प्रिय मित्रहो, सध्याच्या
परिस्थितीबद्दल चर्चा करताना एक मित्र म्हणाला, “ही ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भानगड
दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललीय. कधी संपणार हे? काय केलं पाहिजे? गुंतागुंत
आहे सारी!” या मित्राची अस्वस्थता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. त्यातून पुढे जाण्याचा
एक मार्ग आहे संवादाचा. हे का घडतेय, हे संवादातून समजून घेण्याचा. राज्यात सध्या जे
सुरू आहे, त्याचे मूळ कशात आहे हे समजून घेण्यासाठी हा पत्रसंवाद आहे.
आरक्षणाच्या मागण्यांनी
जाती-जातींत भांडणे भडकू पाहताहेत. पुरस्काराच्या राजकारणाने सामाजिक दुही रुंदावतेय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनांनी जखमा भळभळताहेत. दहशतवाद-कट्टरवादामुळे
नवी आव्हाने देशाला व समाजाला हादरवून टाकताहेत. याकूब मेमनच्या फाशीप्रकरणाच्या गुंतागुंतीने
आव्हाने अधिक जटिल होताहेत. या सगळ्यामुळे एक भांबावलेपण आलेय. त्यातून उद्रेक होताहेत.
हे सारे समजून घ्यायचे, तर महाराष्ट्राच्या पोटात धगधगणारे छोटे-मोठे ज्वालामुखी उमजून
घ्यावे लागतील. त्यासाठी काही तरुणांना भेटावे लागेल.
पहिली भेट आपण संभाजी ब्रिगेडच्या
कार्यकर्त्यांची घेऊ. बिचकू नका, हा तरुण कार्यकर्ता आक्रमक आहे; पण बदल घडवू पाहतोय.
तो म्हणेल की, या महाराष्ट्राचे वाटोळे भट-ब्राह्मणांनी केलेय. त्याच्या बोलण्याने
निराश होऊ नका. त्याची ही भाषा संतापाच्या कडेलोटातून येतेय. त्याची आर्थिक परिस्थिती
समजावून घ्या. त्याचे कुटुंब शेतकऱ्याचे आहे. तीन-चार एकर शेतीवर आज गावात कुणाचीही
उपजीविका होऊ शकत नाही. सतत दुष्काळ पडतो. पाऊस पडून पीक आले, तरी शेतमालाला भाव नाही.
वर्षानुवर्षे अस्मानी-सुलतानी संकटाने अशी लाखो शेतकरी कुटुंबे गांजलेली आहेत. त्यातला
हा मुलगा. हातात पदवी आहे; पण नोकरी नाही. मतदारयादीत नाव आहे; पण गावच्या मतदारयादीत
स्थान नाही. आर्थिक प्रश्नाने मोडलेला हा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमात
स्वत:ला शोधतोय. दररोजच्या मेटाकुटीला आलेल्या भयाण जगण्याला, वास्तवाला सामोरे जाण्यासाठी
चाचपडणाऱ्या या कार्यकर्त्याची भाषा टोकदार बनलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
हे पक्ष त्याच्या जगण्याचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. ते सोडवण्याचा अजेंडाच त्यांनी
कधी घेतला नाही. हा कार्यकर्ता मराठा समाज आरक्षण मागतोय; पण त्यातही खाचखळगे आहेत.
बरे आरक्षणानेही सारे प्रश्न सुटणार नाहीतच. व्यवस्था मला नाकारतेय, चिरडू पाहतेय ही
भावना बळावल्याने हा कार्यकर्ता सैरभैर आहे. त्यातून त्याची भाषा संतापी बनतेय; पण
त्याचे खरे दु:ख स्वत:चा विकास होत नाही हे आहे. अशा सैरभैर कार्यकर्त्याला बहकवणे
सोपे असते. हा कार्यकर्ता आग असतो. त्या आगीने चूलही पेटवता येते आणि घरेही पेटवता
येतात. तिचा सामना यापुढे महाराष्ट्राला करावाच लागणार आहे. असे कार्यकर्ते, अशी आग
इतरही छोट्या-मोठ्या जातींत आहे.
यानंतर तुम्ही मुस्लिम तरुणाला
भेटायला हवे. त्याने ओसामा बिन लादेनसारखी दाढी वाढवलेली असली, तर गैर मानू नका. तसे
राहणे हे त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. जसे शीख दाढी-पगडीत वावरतात, तसेच याचे आहे.
मुस्लिम धर्माचा म्हणून नोकरी नाकारली जाण्याचा अनुभव या तरुणाला आला असणे शक्य आहे.
मुस्लिम तरुणाला शिक्षण कमी असेल, तर नोकरीचे प्रश्न जास्त बिकट होतात. जास्त शिकलेला
असला, तरी शहरात नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाही. बॉम्बस्फोट, दंगेधोपे, दहशतवादी घटना,
धर्मा-धर्मांत तणाव, या प्रश्नांचा या तरुणावर खूप खोल परिणाम होतो. आपण भारतीय समाजाचा
भाग आहोत; पण आपल्याला वेगळे समजले जाते. मांस खातो म्हणून घरही मिळू दिले जात नाही,
यातून या तरुणांना असुरक्षित वाटू लागते. संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता व्यवस्थेला शिवीगाळ
करू शकतो. तसे करताना कुणी त्याला अडवू शकत नाही. मुस्लिम तरुणांची गोची अशी की, ते
शिवीगाळ करायला गेले की अतिरेकी म्हणून शिक्का मारला जाताे. दररोज भयाण जीणे जगणाऱ्या
माणसांना जात-धर्माचे मोर्चे, जमाव, रॅली यात काल्पनिक सुरक्षितता मेहसूस होते. काल्पनिक
सुखाचे चार क्षण तिथे अनुभवता येतात. हा तरुण समाजातल्या सर्व असुरक्षित असलेल्यांचे
प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.
या दोन तरुणांना भेटल्यानंतर
तुम्ही कोणत्याही सामान्य तरुणाला भेटा. त्याची पाटी कोरी असते. तोही शिक्षण, रोजगार,
घर, कुटुंबाची जबाबदारी या प्रश्नांनी भांबावलेलाच असतो. अशा तरुणांच्या हातात आपला
झेंडा, आपल्या घोषणेचा बॅनर देण्यासाठी सगळे राजकीय पक्ष सरसावलेलेच असतात. जो पहिला
भेटेल त्याच्या गोटात तो सामील होतो. सगळ्या पक्षांना असेच कार्यकर्ते मिळतात. त्यांच्या
जिवावर राज्याचे राजकारण, समाजकारण हाकले जाते आहे.
या तिघांना भेटून तुम्हाला
आजचा महाराष्ट्र समजून घ्यायला मदत होईल. आज जे घडतेय, ते अचानक उद्भवलेले नाही. हुबेहूब
अशीच परिस्थिती राज्यात १९४०मध्येही होती. त्या वेळी पुण्यात हिंदुत्व व हिंदुराष्ट्र
या विषयावर परखड बोलल्याबद्दल सेनापती बापट यांना उजव्या विचारांच्या तरुणांनी बेशुद्ध
पडेस्तोवर मारले होते. सेनापती महाराष्ट्राच्या चांगुलपणाचा मूर्तिमंत चेहरा होते.
त्यांच्यावर हल्ला झाला हे ऐकून साने गुरुजी पुढे आले. त्यांनी आंधळे रे आंधळे या शीर्षकाखाली
महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करणारे पत्र लिहिले. सेनापतींवरच्या हल्ल्याचा निषेध
करून साने गुरुजींनी लिहिले होते, “महाराष्ट्रातील तरुणांनो, तुम्ही अत:पर स्वच्छ विचार
केला पाहिजे. स्वच्छ विचारांची आज जितकी जरूर आहे, तितकी पूर्वी कधीच नव्हती. केवळ
हिंदू-हिंदू करून आता भागणार नाही. सर्व राष्ट्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाही...
तुम्ही नवतरुण आंधळेपणा सोडून भारतीय संस्कृतीच्या दिव्य प्रकाशाने दृष्टी भरून घ्या.
आंधळे होऊ नका. आपापल्या डबक्यात बसू नका. जुनी मढी उकरून काढू नका. श्रद्धेचा दिवा
हातात घेऊन भव्य-दिव्य ध्येयासाठी उभे राहा. सेनापतींसारख्यांवर हल्ले करणाऱ्या या
संघांतून शिरू नका. मने विषारी प्रचारापासून दूर ठेवा. तुम्ही पुण्याला मवालीपणा करणाऱ्या
आत्मघातकी आंधळ्या तरुणांप्रमाणे होणार का; राष्ट्राचे तुकडे जोडू पाहणाऱ्या, राष्ट्राची
एक नाडी, एक हृदय, एक बुद्धी करू पाहणाऱ्या खऱ्या भारतीय संस्कृतीचे उपासक होणार?”
मित्रहो, साने गुरुजी मातृहृदयी
होते. म्हणून त्यांना अनेक जण महाराष्ट्र माऊली म्हणत. त्यांची भाषा मवाळ होती; पण
सेनापतीसारख्या देवमाणसावर हात टाकणाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. त्या मारेकरी
लोकांपासून तरुणांना सावध राहायला सांगितले. ७५ वर्षांपूर्वी गुरुजींनी हे आवाहन महाराष्ट्रातील
तरुणांना केले होते. त्याचे मोल आजही तेवढेच आहे. आजच्या ओंगळातून आपल्या देशाला, समाजाला
भारतीय संस्कृतीमधला एकोप्याचा, समतेचा विचारच वाचवेल अशी गुरुजींना खात्री होती. त्या
काळी गुरुजींवरही शाब्दिक हल्ले झाले. गुरुजी वैर पेरणाऱ्यांवर लिहीत, बोलत. तेव्हा
त्यांना मुल्ला साने , खुळचट साने म्हणून हिणवले जाई. त्यावर गुरुजी म्हणत, “मला रेव्हरंड
साने , भिक्खू साने असंही म्हणा. त्यामुळे माझा सन्मान वाढेल?”
साने गुरुजींनी आजच्या अवघड
परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीची वाटच आपल्याला दाखवून ठेवलीय. ब्राह्मण-ब्राह्मणेतर
वादावर मित्राशी चर्चा करताना अमेरिकेतील रंगभेदविरोधी चळवळीचे नेते डॉ. मार्टिन ल्यूथर
किंग यांचे भाषण आठवले. त्यात मार्टिन म्हणतात, “अंधार अंधाराला हटवू शकत नाही, ते
काम उजेड करतो. द्वेष द्वेषाचा नायनाट करू शकत नाही, ती ताकद फक्त प्रेमात आहे?” काळे
आणि गोरे यांच्यात प्रेमसंवाद व्हावा म्हणजे तो प्रश्न सुटेल, यावर मार्टिन यांचा भरोसा
होता. साने गुरुजी तेच मांडत होते. या दोघांचीही गांधींशी नाळ होती, हे विशेष. द्वेष
करणाऱ्यांना प्रेमानेच उत्तर द्यायचे, हे सेनापती बापटांनी पुढे आपल्या जीवनातून दाखवून
दिले. १९४० मध्ये सेनापतींनी रक्तबंबाळ होईस्तोवर मार खाल्ला, तेच सेनापती १९४८ मध्ये
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ब्राह्मण समाजाची
घरे पेटवायला आलेल्यांच्या विरुद्ध उभे राहिले.
गांधींचा मारेकरी मराठी
आपल्याच जातीतला होता, याबद्दल त्यांना दु:ख झाले. साने गुरुजींनी तर मनाला लावून घेतले.
गांधीहत्या शुक्रवारी झाली. म्हणून दर शुक्रवारी गुरुजी कडक उपवास करत. गुरुजी म्हणत,
“आपण सारेच एका अर्थाने गांधीजींचे मारेकरी. नथुराम गोडसे हा आमच्या मनातील जातीयतेची
पुंजीभूत मूर्ती आहे. तुमच्या-आमच्या हृदयातील जातीयतारूपी हिंस्र गोडसेचे निर्मूलन
केल्याखेरीज तरणोपाय नाही.” गौतम बुद्धांनी व्यक्ती, समाजाच्या पराभवाची १२ कारणे सांगितली.
त्यात द्वेष हे नंबर एकच कारण सांगितलेय. द्वेष म्हणजे विनाश.
मित्र हो, आजच्या दुहीच्या
वातावरणातून पुढे जाण्यासाठी साने गुरुजींचा हा वारसा आपल्याला उपयोगी ठरू शकेल काय?
तुम्ही सारे महाराष्ट्रातील या अठरापगड जातींच्या मोठ्या कुटुंबातील मोठ्या, शहाण्या
भावाची जबाबदारी अंगावर पडलेल्या ब्राह्मण या जातीतले आहात. ही सामाजिक जबाबदारी पेलण्यात
तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्हा प्रत्येकात ती शक्ती आहे. महाराष्ट्राला
द्वेषाच्या जाळातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आपला महत्त्वाचा वाटा उचलाल, या अपेक्षेसह
हे पत्र संपवतो.
राजा कांदळकर
rajak2008@gmail.com
पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २६/०८/२०१५