मलाला झियाउद्दीन युसूफझाई या १५ वर्षाच्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर शाळेतून परताना पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी गोळ्या झाडल्या. मळला डोक्यात गोळ्या लागल्याने बेशुद्ध झाली. अगोदर पाकिस्तानात आणि आत्ता इंग्लडमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मृत्यूशी आजही झूंज देणारी मळला आहे तरी कोण? जगभरच्या लोकांचं कुतूहल जागृत झालं.
पाकिस्तानच्या स्वात खोर्यात मिंगोरा हे मलालाचं गाव. वयाच्या १२व्या वर्षापासून मलालाने स्वात खोर्यात कडव्या तालिबानींचा नंगानाच पहिला. साल होतं २००८-०९. तालिबान्यांनी स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणावर बंदीच फर्मान काढलं. मुलींनी टी.व्ही. बघायला नाही. पुस्तक वाचायची नाहीत. कॉम्पुटर, इंटरनेट वापरायचं नाही. मुली बिघडू नयेत म्हणून आम्ही हे फर्मान काढलं, असा तालिबान्यांचा दावा आहे.
या फर्माना विरोधात मलालाने आपल्या शाळा चालवणाऱ्या, कवी असलेल्या वडिलांना प्रश्न विचारून परेशान केलं. सुधारलेल्या विचाराच्या वडिलांनी मलाला हिला तालीबान्याविरोधात लढल्याच बळ दिलं. मुलींच्या स्वातंत्र्यावर, शिक्षणावर बंदी घातली गेली तरी कुणी बोलत नव्हतं. तेव्हा मलालाने प्रश्न विचारला शाळेत जाण्यात काय पाप आहे? स्वत:पुरता मलालाने फर्मानाचा विरोध कॉम्पुटर वापरायला सुरवात केली. ती इंटरनेट स्याव्ही बनली. तालिबान्यांच्या अत्याचारांच्या कथा, शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या कहाण्या तीन गुल मकाई या टोपणनावाने ब्लॉगवर लिहिल्या आणि थेट बीबीसीच्या ब्लॉगवर पाठवल्या. त्या झळकल्या आणि जगभर करोडो तरुणींनी, स्त्री-पुरुषांनी वाचल्या. तेव्हाच मलाला पाकिस्तानातल्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींची प्रतिनिधी बनली होती. मलालाच्या या कामामुळे २०११ साली आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठी तिला नामांकन मिळालं. पुरस्कार मिळू शकला नाही, पण पाकिस्तान सरकारने तिला खास शांतता पुरस्कार दिला आणि तिच्या कामाला सलाम केला.
मलाला म्हणत असे, मला राजकारणात जायचं आहे. समाज बदलायचा आहे. तिचे आदर्श होते, महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढलेले सरहद्द गांधी उर्फ खान अब्दुल गफार खान आणि बेनझीर बुत्तो. सरहद्द गांधी म्हणजे भारत पाकिस्तानच्या फाळणीला शेवटपर्यंत विरोध करणारा, फाळणीनंतर २० वर्षे पाकिस्तानात राहून आपल्या पश्तून संस्कृतीसाठी शेवटपर्यंत लढणारा पठाणी सिंह. बेनझीर भुत्तो म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पाकिस्तानाला आधुनिक बनवू पाहणारी आणि भारत द्वेषापासून दूर ठेवण्याचा विचार मांडणारी, शेवटच्या क्षणापर्यंत दहशतवादाविरुद्ध लढलेली सिंधी वाघीण. या दोघांचा वारसा उराशी बाळगणारी मलाला वेगळी ठरली यात नवल ते काय?
मृत्यूशी झुंज देणाऱ्या मलाला मागे साऱ्या पाकिस्तानातल्या मुली, तरुण उभे राहिले. जगाने तिची पाठराखण केली. आपल्या मुंबईच्या बगलेत असणाऱ्या मुब्र्यामध्ये सहाशे मुलींनी रस्त्यावर येऊन मलालाचा जीव वाचवा म्हणून प्रार्थना केली. मलालाच्या शूर कृतीमुळे ती केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर जगातली बहाद्दूर मुलगी ठरली आहे. तिच्या या लढाईने पाकिस्तानला बदलून टाकलं आहे.
- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)