प्रभाकर
उर्फ भैय्या देशमुख या नावामुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार अडचणीत आले. अजितदादांनी इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील
सभेत देशमुखांच्या नावाचा उल्लेख करून स्वतःवर आफत ओढवून घेतली. देशमुख
मात्र रातोरात हिरो झाले. मुंबईत आझाद मैदानात दोन महिने ते मोहोळ (जि.
सोलापूर) तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, जनावरांना प्यायला पाणी मिळावं म्हणून
धरणे आंदोलन करत आहेत. त्याकडे कुणाचं लक्ष गेलं नव्हतं . या घटनेनंतर
मात्र मिडियाचे लोक आझाद मैदानात देशामुखांभोवती गराडा घालू लागलेत.
कोण आहेत हे भैय्या देशमुख ?
देशमुख
पाटकुल (ता. मोहोळ, जि. सोलापूर) या गावचे रहिवासी, वय - ४०. उन्हाने
रापलेला चेहरा आणि लढायची जिद्द चेहऱ्यावर दिसते. मोहोळ पंचायत समितीचे
सदस्य आहेत. तिथल्याच भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालकही आहेत. सामान्य
शेतकरी कुटुंबात जन्मलेले भैय्या मराठी विषयात पदवीधर झाले अन विजयसिंह
मोहिते पाटील यांचे बंधू माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे
कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. पाच वर्ष मोहिते पाटलांबरोबर काम केलं अन
नंतर भैय्या यांनी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटना स्थापन केली.
खांद्यावर नांगर घेतलेला शेतकरी हे या संघटनेचं चिन्ह आहे. 'कष्टकर्यांच्या
न्याय्य हक्कासाठी लढा' हे या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. शेतकऱ्यांसाठी
अनेक आंदोलनं या संघटनेमार्फत देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी आजपर्यंत
केलीत. ५ फेब्रुवारी २०१३ पासून मोहोळ तालुक्याला उजनी धरणाचं पाणी मिळावं
म्हणून देशमुख आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी आझाद मैदानात धरणं आंदोलन
सुरु केलं.
येत्या १५ एप्रिलला मुंबईत मलबार हिल परिसरातील
अजितदादा यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर देशमुखांच्या नेतृत्वाखाली शेतकरी
मोर्चा नेणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्ष बंगल्यावरही
आंदोलन करण्याचा या शेतकऱ्यांचा निर्धार आहे.
देशमुखांच्या आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय आहेत ?
याविषयी देशमुख आझाद मैदानात बोलताना म्हणाले, 'पुणे जिल्ह्यातील पवना,
भामा आसखेड, खडकवासला किंवा इतर कोणत्याही १६ धरणांतील पाणी उजनी धरणात
सोडण्यात यावं. नंतर हे पाणी उजनीच्या उजव्या-डाव्या कालव्यात आणि आष्टी
येथील तलावात सोडायचं. त्या तलावातून हे पाणी मोहोळसह सोलापूर जिल्ह्यात
इतर तालुक्यातल्या अनेक गावांतील शेतकरी आणि जनावरांना पिण्यासाठी उपयोगी
येईल. त्यातून दुष्काळाची तीव्रता कमी होईल. अशी आम्हां आंदोलकांची मागणी
आहे.'
पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या देशमुखांवर अजितदादा का
घसरले ? देशमुख याविषयी म्हणाले, 'उजनी धरणातले पाणी दुष्काळग्रस्त सोलापूर
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न देता बारामतीच्या डायन्यामिक्स दुध डेअरीला
बेकायदा दिले. असं पाणी मिळावं म्हणून बारामती नगरपालिकेने बेकायदा ठराव
केला. त्यामुळे उजनीच्या उजव्या-डाव्या कालव्याच्या परिसरातील नागरिकांवर
अन्याय झालाय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरांनाही प्यायला पाणी नाही.
१५ हजाराची म्हैस शेतकरी ५०० रुपयाला कत्तलखान्यात विकतोय. माणसं शहरांकडे
स्थलांतर करताहेत. लहान लेकरं उपाशी मरताहेत. मी केंद्रीय कृषिमंत्री शरद
पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही भेटलोय. अजितदादांची
मनमानी जनतेपुढे मांडण्यासाठी आमचं हे आंदोलन आहे.'
डायन्यमिक्स दुध डेअरीला पाणी उपसून घेत अन आम्हाला
देत नाही म्हणून देशमुखांनी अजितदादा, पुणे विभागाचे आयुक्त, सोलापूरचे
जलसंपदा खात्याचे अधिक्षक अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरलीय.
ऐन दुष्काळात पाण्याचं हे राजकारण पेट घेतंय. देशमुख आपल्याला टार्गेट
करतोय हे अजितदादांना सहन झालं नाही. म्हणून त्यांनी इंदापूरच्या सभेत
देशमुखांची खिल्ली उडवली आणि त्यानंतर ते स्वतः अडचणीत आले.
यामुळे एक मात्र बरं झालं देशमुखांच्या आंदोलनाची दाखल
घेतली गेली. सोलापूरच्या शेतकऱ्यांना उजनीचे पाणी द्यावे असा निर्णय आता
उच्च न्यायालयानेही दिला आहे.
मोहोळच्या शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळतंय किंवा नाही हे महाराष्ट्र बघेलच.
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com
Great...All the best...
ReplyDeleteAnoop Awasthi
ex Indian Navy
rti/social activist/human rights defender
president, legal rights society, pune
9921234399