सकळांचे पायी माझे दंडवत , आपुलाले चित्त शुद्ध करा
अहो श्रोते वक्ते सकळही जन , बरे पारखून घ्या रे हाती -
नवी मुंबईत वारकरी साहित्य परिषदेने १६, १७, १८
फेब्रुवारीला अखिल भारतीय संत साहित्य संमेलन घेतलं. या संमेलनात बरे
पारखून घ्या रे हाती हा सूर घुमला. १६ फेब्रुवारीला संमेलनाच्या उदघाटन
समारंभापूर्वी दिंडी सोहळा आयोजित केला होता. नवी मुंबईतल्या नेरुळमधील
गजानन महाराज मंदिर ते संमेलन स्थळापर्यंत दिंडीचा प्रवास झाला. टाळ -
मृदंगाचा गजर व भजनाच्या नाद, सुराने परिसरातील नागरिकांना संमेलनाचं भान
आलं असेल . हजारो विद्यार्थी वारकर्यांच्या वेशात सहभागी झाले. नागरिकही
मोठ्या संख्येने होते. लक्षवेधक अशी हि दिंडी संमेलनस्थळी आली, तेव्हा
संमेलनाचे उदघाटक केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार वेळेवर उपस्थित होते आणि
त्यानंतर रंगला उदघाटन सोहळा… भव्य मंच, हायटेक व्यवस्था हे वैशिष्टय दिसत
होतं. संमेलनावर वारकरी साहित्य परिषद आणि वारकरी सेना यांच्यातल्या वादाचं
सावट होतं. शरद पवार संमेलनाच्या मंचावर जाण्यापूर्वी डॉ. सदानंद मोरे
यांनी त्यांना याची कल्पना दिली होती. याबाबत चित्रलेखाशी बोलताना सदानंद
मोरे म्हणाले, 'वारकऱ्यांत तीन गट आहेत. पहिला गट आहे हिंदुत्ववाद्यांचा.
त्याला विश्व हिंदू परिषद आणि रा.स्व. संघ परिवार संघटीत करतोय. दुसरा गट
आमच्यासारखा पुरोगाम्यांचा आहे. वारकरी साहित्य परिषदेचे उपक्रम त्या
गटाकडून सुरु आहेत. तिसरा गट आहे - गोंधळलेल्यांचा ! त्यांना बरे ते
पारखून घ्या रे हाती अशी आमची विनंती आहे.'
अपेक्षेप्रमाणे उदघाटनाच्या भाषणात शरद पवार म्हणाले,
'वारकरी संप्रदाय समाज एकसंध ठेवण्याचं काम करतोय. संतांचं साहित्य जतन
व्हायला हवं. संतांची शिकवण समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी.
वारकर्यांनी गट-तट संपवावेत. ते समाजाच्या हिताचं नाही. गट-तट संपले नाहीत,
तर समाजाच्या वादिल्कीची भूमिका बजावणाऱ्या वारकरी संप्रदायाला समाजालाच
उत्तर द्यावं लागेल.
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा
मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त
ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी
दया करणे जे पुत्रासी, तेचि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंताची मूर्ती -
या
अभंगाची आठवण करून देत शरद पवारांनी आवाहन केलं, 'मराठवाडा,
पशिम महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आहे. अन्नधान्य आहे, पण पाणी नाही. म्हणून
दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे या. पाण्याचा वापर जपून करा. मदतीचा हात
देण्यासाठी घराघरांतून सुरुवात करा. वारकरी संप्रदायाने या दुष्काळावर मात
करायला समाजाला प्रोत्साहित करावं. पारायणातून प्रबोधन करण्याची मोठी
जबाबदारी वारकरी संप्रदायावर आहे. पारायणात मोठी शक्ती आहे. संतांची शिकवण
आचरणात आणल्यास समाज घडण्यास मदत होईल.'
संतसाहित्याने स्त्रियांची कोंडी फोडली. जनाई,
मुक्ताई, सोयरा, निर्मळा, यांच्यापासून ते बहिणाबाई सिऊरकरांपर्यंतच्या
कवयित्रींची समृद्ध परंपरा संत साहित्याने निर्माण केली. मुक्ताबाईंचं
गुरत्व चांगदेवांनी आणि बहिणाबाईंचं गुरत्व दीनकवी या पुरुषांनी स्वीकारलं
होतं. स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास, मज केले ऐसे साधुसंते हा दिलासा
संतांनी स्त्रियांना दिला. त्याकडे बोट दाखवत शरद पवार म्हणाले, 'संत
साहित्य व वारकरी संप्रदायाने लिंगभेद, जातीभेद, धर्मभेदाला फाटा दिला.
मानवता शिकवली. पण स्त्रियांना अद्यापि पारायणाचा अधिकार नाही. हे कितपत
योग्य आहे ? महिलांना बाजूला ठेवून देशाचा विकास कसा होणार ? समाज
परिवर्तानात सर्वांचा हात लागला पाहिजे.' म्शारद पवार हे बोलत होते, तेव्हा
मंचावरही महिलांची उपस्तिथी नव्हती. हि उलटी खूण म्हणावी का ?
उदघाटन समारंभात भाषण करताना डॉ. सदानंद मोरे यांनी
एका कळीच्या मुद्याला हात घातला. तो मुद्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
केलेल्या धर्मांतराचा होता.
अर्भकाचे साठी, पंते हाती धरिली पाटी
तैसे संत जगी, क्रिया करुनी दाविती अंगी
लोकांनी
कसं वागावं हे त्यांना शिकवताना संत स्वतः तशी क्रिया करून दाखवतात.
अर्थात, संतांचं हे लोकशिक्षकाचं रूपच म्हणायचं. याची जाणीव करून देत डॉ.
सदानंद मोरे म्हणाले, 'संत साहित्य हा मराठी साहित्याचा मुख्यप्रवाह आहे.
पण यातले विचार योग्य प्रकारे मांडले नाहीत. संतांचे विचार नीटपणे
समाजासमोर ठेवले असते, तर कदाचित डॉ. बाबासाहेबांना धर्मांतर करावं लागलं
नसतं. मराठी समाज स्वाभिमानी असायला हवा. संत साहित्याचा खजिना आपल्याकडे
आहे. ते साहित्य माणसाला जगायचं कसं याची शिकवण देतं. अशा जगण्यातूनच संत
साहित्याची निर्मिती झाली आहे. १९३० च्या दरम्यान बाबासाहेबांच्या मनात
धर्मांतराचे विचार घोंघावू लागले होते. त्यावेळी वारकरी संप्रदायाने नीट
पावलं टाकली असती, तर बाबासाहेबांना धर्मांतराचं पाऊल उचलावं लागलं नसतं,
एवढी ताकद संत साहित्यात आहे.'
डॉ. सदानंद मोरे म्हणतात ते खरं आहे. बाबासाहेबांनी
धर्मांतर करताना हिंदू धर्माचा अंगभूत भाग बनलेल्या जाती व्यवस्थेवर प्रहार
केला. त्यावेळी त्यांनी संतांनाही झोडपून काढलं. पण त्याच बाबासाहेबांवर
संत साहित्याचा प्रभावही होता. त्यांच्या मूक नायक आणि बहिष्कृत भारत या
वृत्तपत्रांवरील ब्रीदवाक्य अनुक्रमे तुकोबा आणि ज्ञानोबांचीच होती. बौद्ध
धर्माचा स्वीकार केल्यानंतरही आपल्या अनुयायींनी संत नामदेवांच्या -
देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो-
या धर्तीवर बुद्धपदी दृढ भावो अशा गाठ लिहाव्यात, अशी अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करतात.
उदघाटन
समारंभात मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व ठाण्याचे पालकमंत्री गणेश
नाईक, संमेलनाध्यक्ष डॉ. अभय टिळक, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे,
आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव,
खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार किसन कथोरे,
आमदार नरेंद्र पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील होते.
मंचावर सदानंद मोरे आणि अभय टिळक हे वारकर्यांच्या
पेहरावात होते. टिळक यांनी तर फेटा घातला होता. संत तुकाराम यांचे वंशज
असलेले सदानंद मोरे प्राध्यापक व संतसाहित्य अभ्यासक आहेत; तर अभय टिळक
अर्थविषयतज्ञ आहेत. अध्यक्षीय भाषण करण्यासाठी टिळक कीर्तनकारासारखे उभे
राहिले.
आजिचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संतजन मायबापी
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, श्रुन्गारीके बाळ कवतुके
या
अभंगाची उजळणी करून देत अभय टिळक म्हणाले, 'संतांनी शिकवलेल्या मुल्यांचा
तराजू हातात धरून जीवन जगलं पाहिजे. पूर्वी समाजात धार्मिक आणि सामाजिक
विषमता होती, आताही अशी विषमता आहेच, पण त्याजोडीला आर्थिक विषमत वाढली
आहे. ती दूर करण्यासाठी संत विचार आचरणात आणायला हवे. तरच समाज एकसंध
राहील. माणसाची बुद्धी व्यापक व्हावी, निष्कलंक व्हावी, यासाठी प्रत्येकाने
समता, शांती, प्रेम, बंधुता याविषयी विचारमंथन करावं, हाच संतसाहित्या
संमेलनाचा हेतू आहे. संत साहित्याचे अभ्यासक, प्रसारक, साधक, सांप्रदायिक,
संशोधक, संत विचारप्रेमी अशा सगळ्यांना एका विचारपिठावर आणून संतबोधाचं
आपलं आकलन अधिक प्रगल्भ आणि समृद्ध व्हावं, हा संमेलनाचा हरतु आहे.'
बरवे दुकानी बैसावे, श्रावण मनन करावे
सर असाराची पोटी, ग्राहक पाहोनी कर रिती
उगे चि फुगवू नका गाल, पूर्ण साठवावा माल
सत्य तराजू पै धारा, नका कृत्रिम विकारा-
म्हणजे आजही संत विचार किती उपयोगी आहेत, ते व्यवहार कसा
शिकवतात, याचा भरभक्कम पुरावाच आहे,' असं सांगत डॉ. अभय टिळक म्हणाले,
'आपल्या रोजच्या जीवनात संत विचार अक्षरशः अंक अंगांनी भिडलेला आहे. त्या
विचारातून निर्माण झालेली मूल्यं आपल्या रोजच्या भाषेतून सतत आपल्या ओठांवर
खेळतात.
- शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी
- नाही निर्मळ जीवन, काय करील साबण
- दुर्बुद्धी ते मन, कदा नुपजो नारायणा,
- सुखाचे व्यवहारी सुख लाभ जाला
आनंद कोंदला मग पुढे
- शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख
- जगाच्या कल्याण संतांच्या विभूती,
देह कष्टविती परउपकारे
- ज्या ऐहिक धड नाही, त्यांचे परत्र पुससी काई
- तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे
- अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक
-
सर्वात्मकपण माझे हिरोनि नेतो कोण ? - हे केवळ वानगीदाखल उदाहरणं पाहा. या
संमेलनात आपले रोजचे व्यवहार, समाजकारण, अर्थकारण, शेती व उद्योग,
अभ्यासक्रम यासारख्या जीवनाच्या अन्य अंगणात संत मूल्यं कशी व कुठं
पाझरलीत, झिरपलीत याचा धांडोळा होईल.'
अभय टिळक म्हणाले तसं तुम्ही आम्ही खेळीमेळी या
भावनेने तीन दिवस विविध विषयांवरचे परिसंवाद रंगले. कीर्तन या शब्दाची फोड
म्हणजे कीर्तीचं गान. संतविचार, संतबोध आणि संतप्रणित जीवनमूल्य यांचा जागर
आणि कीर्ती-गान या संमेलनात झालं. हा सगळा महोत्सव म्हणजे एकप्रकारचा
कीर्तन महोत्सवच ठरला. त्यात वारकरी होते, फडकरी होते, दिंडीकरी होते.
मठाधीश, महंत, वाचक, अभ्यासक, संशोधक होते.
उद्घाटनानंतर संत साहित्य आणि शेती या विषयावर
चर्चासत्र झालं. त्यात बद्रीनाथ महाराज तनपुरे, माजी आमदार वामनराव चटप,
माजी आमदार पाश पटेल, पत्रकार निशिकांत भालेराव यांनी विचार मांडले.
राम राज्य राम प्रजा लोकपाळ, एकचि सकळ दुजे नाही
मंगळा वाचोनि उमटेना वाणी, अखंडचि खाणी एक रस
अवघे जन मज झाले लोकपाळ , सोयरे सकळ प्राणसखे -
लोकशाहीत
राजा आणि प्रजा समान पातळीवर असतात. तुकोबांची रामराज्याची कल्पना अशीच
होती. आजचे राज्यकर्ते ती विसरले म्हणून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ हे सूत्र रुजलं म्हणून सहकार चळवळ
फोफावली. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, हे विचार
शेतकरी समाज प्रत्यक्षात जगाला म्हणून तो टिकला. संतांनीच वृक्षवल्ली
आम्हां सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, असा पर्यावरणाचा पुरस्कार
शेतकऱ्यांना शिकवला.
बळबुद्धी वेचोनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती- हा संतविचार राज्यकर्ते विसरले आणि आज पाण्याचा दुष्काळ पडलाय.
शुद्ध
बीजापोटी, फळे रसाळ गोमटी या वचनात शेतीचं सार आहे. बीज आणि पाणी म्हणजे
शेती. त्या शेतीवर आज नष्टचर्य का ओढवलं ? याविषयी ऊहापोह करताना
चर्चासत्रात बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, 'भारत कृषीप्रधान देश आहे.
शेतकरी त्याचा आत्मा आहे. शेतकऱ्याला भिकेचं दान नको, त्याच्या मालाला
योग्य दाम द्या. शेतकरी कच्चा माल तयार करतो. त्यात भेसळ करत नाही. भेसळ
करणार्यांना मोबदला जास्त मिळतो. शेतकरयांना मोबदला कमी मिळतो. शेतीची
परवड, शेतकऱ्याचं दुःख थांबलं पाहिजे, यासाठी वारकरी संमप्रदायाने कंबर
कासावी.'
शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला व प्रत्यक्ष बाजारभाव
यामध्ये मोठी तफावत आहे. याविषयी विवेचन करताना वामनराव चटप म्हणाले,
'स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत एका दाण्याचे शंभर दाने करणारा
शेतकरी आत्महत्या करू लागलाय. संतांनी समाज घडवला. सध्या देशात उलटी
व्यवस्था काम करते आहे. शेतकऱ्यांना दाबून ठेवलं जातंय; तर सरकार जनतेची
लूट करत आहे.'
पाशा पटेल यांनी त्यांच्या ग्रामीण शैलीत घणाघाती भाषण
केलं. ते म्हणाले, ' शेतीचं अर्थशास्त्र हे अत्यंत प्रामाणिकपणे
लिहिण्याचं काम राष्ट्रीय संतांनी केलंय. सरकारने शेतकऱ्यांकडे बघण्याचा
दृष्टीकोन बदलावा. नाहीतर पिळला जाणारा शेतकरी आज आत्महत्या करतोय. उद्या
तो राज्यकर्त्यांविरुद्ध उभा ठाकेल.'
त्यानंतरचा परिसंवाद संत साहित्य आणि उद्योग हा होता.
त्यात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उद्योगपती अशोक खाडे, किशोर
धारिया हे सहभागी झाले.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी-
हा तुकोबांचा अभंग मला प्रेरणा देतो असं सांगून
दर्डा म्हणाले, 'भगवान बुद्धांनी सम्यक उपजीविकेचं सूत्र मांडलं.
दुसऱ्याच्या उपजीविकेची मोडतोड न करता आपली उपजीविका करावी, असं ते सूत्र
सांगतं. माणसाने व्यवसाय करावा, पण गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, असं
महावीरांनी सांगितलं. महात्मा गांधींनीही तेच सांगितलं . पण हे सगळे विचार
आपल्या संतांच्या साहित्यात सापडतात. स्वतःची गरज सारून जी संपत्ती उरते,
त्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून आपण वावरायचं. या विचारातूनच मोठे
उद्यागपति घडले. त्यांच्या हातून समाजोपयोगी प्रकल्प उभे राहिले.' अशोक खडे
यांनीही यावेळी मी वारकरी असल्यानेच यशस्वी उद्योगपती होऊ शकलो, असं मत
मांडलं.
शेती आणि उद्योग यावरचे परिसंवाद सुरु असताना
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तीनशे मुलं संमेलन मंडपात भाषणं लक्ष देऊन ऐकत
होती. दुष्काळ आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या करू नये, असं दुःख
कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असंच जणू ही मुलं इतरांना सांगत होती. ही
मुलं नाशिकच्या आधारतीर्थ आधाराश्रमात राहून शिक्षण घेत आहेत. आत्महत्या
केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी या मुलांचा सांभाळ करीत आहेत. संमेलनाच्या
दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला झालेल्या संतसाहित्य आणि पाठ्यक्रम हा
परिसंवाद लक्षवेधक ठरला. त्यात विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके, प्राचार्य
दिलीप धोंडगे, महसूल विभागाचे उपसचिव माणिक गुट्टे, रंगनाथ नाईकडे यांनी
भाग घेतला.
आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने, शस्त्रे करू.
शब्दची आमुच्या, जीवाचे जीवन, शब्द वाटू, धन जनलोका
तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव, शब्देची गौरव, पूजा करू -
'हा तुकोबांचा अभंग मला प्रेरणा देतो म्हणून
माझ्यासारख्या आदिवासी समाजातला एक मनुष्य प्राध्यापक झाला. पुढे
शिक्षणमंत्री व्हायला बळ मिळालं आणि आता उपसभापती आहे,' असं वसंत पुरके
बोलले, तेव्हा सभागृह भारावून गेलं होतं. 'संत बोलीभाषेत बोलले. त्यामुळे
त्यांचं शब्दधन शेकडो वर्षं मनामनांत रुंजी घालतंय. संत्विचार पाठ्यक्रम,
अभ्यासक्रमात असले पाहिजे. ते शिकवायला चांगले शिक्षकही निर्माण झाले
पाहिजेत,' असं सर्वच वक्त्यांनी बोलून दाखवलं.
१८ फेब्रुवारीला तिसऱ्या दिवशी संमेलनाचा समारोप झाला.
समारोपाच्या कार्यक्रम पत्रिकेत बांधकाममंत्री छगन भुजबळ, विनोद तावडे,
गणेश नाईक, भाई जगताप यांची नावं होती, पण ते आले नाहीत. भारिप बहुजन
महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकमेव वक्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेने राज्यामध्ये सर्व धर्मांच्या
धर्मस्थळांच्या सुव्यवस्थेसाठी, संवर्धनासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर
महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र देवस्थान मंत्रालय निर्माण करावं, असा ठराव
केला. आळंदी, देहू, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांसाठी शहर विकास
अराखड्यापेक्षा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करावा, राज्यातल्या सर्व
विद्यापीठांत संत अध्यासनं सुरु करावीत, त्यातून संतसाहित्याचा प्रचार
व्हावा, संतसाहित्या संमेलनाला २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी शासनाने
द्यावा, इंद्रायणी, भीमा, नीरा, गोदावरी, तापी या नद्यांचं शुद्धीकरण
करावं, हे महत्वाचे ठरावही केले.
निम्न भरलिया उणे, पाणी ढळोची नेणे
तेवी श्रांता तौषौनी जाणे, सामोरेया
'पाणी
वाहतं. तेव्हा पाण्याच्या प्रवाहाला शेजारी खड्डा दिसला, तर ते आपला मार्ग
सोडून प्रथम खड्डा भरतं. मगच पुढे जातं. अभावग्रस्ततेची पुरती करतं मग
पुढे सरकतं. पाण्याच्या या गुणधर्माप्रमाणे आपल्या जगण्याची रीत असावी.
दुसऱ्याचं दुःख दूर करून त्याच्या ओंजळीत संतोषाचं दान घालूनच पुढे गेलं
पाहिजे. हा संतविचार मला आज मोलाचा वाटतो,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जात आता टाकाऊ झालीय ती टाका, असं आवाहनही त्यांनी केलं. भ्रष्टाचार
निर्मूलनावर उपाय सुचवताना ते म्हणाले, 'कायदे करून भ्रष्टाचार संपणार
नाही. भ्रष्ट राजकारणी आपल्यातलेच आहेत. त्यांनी आपण लोकसेवक आहोत, हा
संतांचा विचार आचरणात आणला, तर भ्रष्टाचाराला आळा बसेल.'
तीन दिवसांचा हा उत्सव संतविचारांची कीर्ती-गान करणारा
ठरला. वारकरी संप्रदायातले पुरोगामी प्रवाह इथे दिसले. देहूकर फडाचे
बापूसाहेब देहूकर, आजरेकर फडाचे तुकाराम काळेमाऊली, तनपुरे महाराज, डॉ.
रामकृष्ण लहळीतकर अशी वारकरी संप्रदायातली मोठी मंडळी या संमेलनात होती.
वारकरी संप्रदाय कर्मठ विचारांच्या आहारी जातोय, अशी टीका होत असते. इथं
कुणी कर्मठ नव्हते, सुधारणावादी होते. हा पुरोगामी प्रवाह वाढला तर वारकरी
संप्रदाय शाहू, फुले, आंबेडकरांच्या वाटेने जाईल, तो जावा याचसाठी आमचा
अट्टाहास आहे, असं सदानंद मोरे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते. या
आत्मविश्वासाचं वर्तमान होण्यासाठी झटलं पाहिजे, सनातन्यांशी झगडलं पाहिजे.
अज्ञानाची काजळी दूर केल्याशिवाय संतविचारांची दिवाळी होणार नाही.
बोला, पुंडलिक वरदा
हरी विठ्ठल
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com