पडदा उघडतो. नाटक पाहायला आलेल्या रसिकांना महाराष्ट्राचा नकाशा दिसू लागतो. या नकाशात बेळगाव सीमाभाग आणि महाराष्ट्र राज्य यात ठळक सीमारेषा दिसते. मग नकाशावर 'झालाच पाहिजे' हे नाव येतं. त्यानंतर सीमारेषा गायब होते. आता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा दिसू लागतो आणि रंगमंचावर शाहीर प्रवेश करतो.… डफावर थाप पडते… शाहिराचं गीत सुरु होतं.
… झालाच पाहिजे या नव्या नाटकाची सुरुवात हि अशी आहे. नाट्यसंपदा या नाटकाची निर्मिती असलेलं हे नाटक. नितेश राणे मुख्य प्रवर्तक असलेल्या महाराष्ट्र कलानिधी या संस्थेने ते रंगमंचावर आणलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असणाऱ्या बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर,भालकी, औराद, बसव-कल्याण, हलियाळ या मराठी भाषिक बहुल भागातल्या मराठी माणसांवर कर्नाटक सरकार करत असलेल्या अन्याय-अत्याचारांचं ज्वलंत दर्शन घडवण्यासाठी या नाटकाचा घात घातला आहे. या मराठी बांधवांचं दुःख, असंतोष मांडत त्यांना न्याय मिळावा, म्हणून समस्त मराठीजनांना त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची हक या नाटकातून देण्यात आलीय.
१ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये दुपारी ४ वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. तिथे दुसरा प्रयोग होईल. नितेश राणे आणि नाट्यसंपदाचे अनंत पणशीकर यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या नाटकाची घोषणा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना स्मरून अभिनेता नाना पाटेकर, सुबोध भावे यांच्या खास उपस्थितीत करण्यात आली होती. त्याचा गाजावाजा करण्यात आला होता. तेव्हाच मराठी माणसांचं या नाटकाकडे लक्ष वेधलं गेलं होतं.
या नाटकाची कल्पना कशी सुचली ? नाटकाची निर्मिती कशी साकार होत गेली ? काय काय तयारी केली ?
याविषयी निर्माते अनंत पणशीकर चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'आमच्या नाट्यसंपदा या संस्थेला यावर्षी पन्नास वर्षं पूर्ण झालीत. आम्ही अनेक चांगली नाटकं आजपर्यंत केलीत. काही नवं, वेगळं, सामाजिक संदेश देणारं नाटक करावं याच्या शोधत आम्ही होतो. दरम्यान, नितेश राणे यांची भेट झाली. त्यांनी महाराष्ट्र कलानिधी हि संस्था काढली. नाटक, टीव्ही, चित्रपट अशा कलाक्षेत्रात सकस काही करावं, अशी इच्छा असल्याचं त्यांच्या बोलण्यात आलं. मी आपण एखादं नवं नाटक करूया असं त्यांना बोललो. ते म्हणाले, सीमावासियांचं दुःख मोठं आहे. तो प्रश्न दररोज भळभळतोय. त्यांच्यावर दररोज अन्याय होतोय. त्यावर नाटक करा. त्यांनी सुचवलेला विषय आम्हा सर्वांना भावला. त्यातून 'झालाच पाहिजे' नाटकाची कल्पना मूर्त रुपात आली. प्रदिप्र राणे यांना लेखनाची जबाबदारी दिली. आणि आम्ही सीमा भागात दाखल झालो. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०५ हुतात्मे झाले. त्यापैकी ५ जण बेळगाव परिसरातले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यांची दुःख ऐकली. सीमा प्रश्नांसाठी लढणारया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना भेटलो. आणि त्यातून हे नाटकाचं कथानक आमच्या मनात पूर्ण झालं.
सीमावासियांच्या प्रश्नांवर आजवर नाटक, चित्रपट अशा कलाकृती निर्माण झाल्या नाहीत. यावर वैचारिक लेखन पुष्कळ झालं. म्हणून अशा सामाजिक, भाषिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर नाटक लिहिणं, हे मोठं आव्हान असतं.
या नाटकाचे लेखक प्रदीप राणे 'झालाच पाहिजे' च्या लेखनाबद्दल चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'सीमावासीयांची भळभळती जखम काय आहे, हे या नाटकात उलगडून दाखवलंय. त्यांचं नुसतं दुःख मांडणं हा उद्देश नाही. त्यांच्या लढाईला बळ देण्यासाठी उभा महाराष्ट्र जागा करणं, त्यांच्या मागे साऱ्या मराठी माणसाचं बळ उभं करणं, यासाठी हे नाटक आहे. महाराष्ट्रभर आणि सीमा भागात याचे प्रयोग व्हावेत, असा आमचा संकल्प आहे. या नाटकाच्या लेखनासाठी सीमावासीयांच्या लढ्याविषयीचे अनेक संदर्भग्रंथ,वर्तमानपत्रातले लेख, संबंधित पुस्तकं, सरकारी दस्तऐवज, इतर साहित्य यांचा अभ्यास केला. हा विषय वैचारिक - सामाजिक असला तरी तो मनोरंजक स्वरुपात करत सादर करावा, अशी कल्पना सर्वांचीच होती. म्हणून लोकनाट्याचा फॉर्म निवडला. गण-गवळण, महाराष्ट्र गीत, काताव, लोकशाहीर अमर शेख यांची गाणी, पोवाडा, कविता, बतावणी, सीमावासीयांचे - अभ्यासकांचे व्हिडिओ क्लिपिंग इंटरव्ह्यू अशा फॉर्ममध्ये नाटक सादर होत जातं. या नाटकातून मनोरंजन करत सीमाप्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.'
या नाटकाचं संगीत अजय-अतुल, लोकशाहीर संभाजी भागात आणि कमलेश भडकमकर यांनी दिलंय. नेपथ्य सुबोध सावजी यांनी केलंय. नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांचं आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे.
नाटकाचा गण नाटकाचा उद्देश काय आहे, ते रसिक प्रेक्षकांना उलगडून दाखवतो, तो गण असा -
रसिक जनांचा जमला मेळा, रंग चढू दे आमच्या खेळा
सल कळू दे, व्यथा भिडू दे; आत्मप्रतिष्ठा महाराष्ट्र हलू दे
सुबुद्धी देण्या झणी अवतरा, गणपती बाप्पा मोरया.
अजय-अतुल यांनी या गणाला संगीत दिलंय. खेळाला रंग चढू दे आणि सल कळू दे, व्यथा भिडू दे, या उद्देशाने नाटक पुढे साकारलं जातं. कृष्ण, पेंद्या, मावशी, रेखा-सीमा या गवळणी राजपुत्र, प्रधान, राणी यांच्या संवादातून नाटक रंगत जातं. हलके-फुलके विनो, चुटके, चिमटे, इशारे, प्रश्न, टवाळक्या अशा खेळीमेळी प्रकारांतून नाटकातून प्रेक्षकांशी थेट संवाद होतो. सीमा व रेखा या गवळणीच्या लावणी आणि नृत्यातून सीमा प्रश्न मांडलाय, तो असा -
वाट पाहुनी शिणली काया, नाही का तुमची मजवर माया !
या सीमा-रेखेचा खद पहारा, भेदु कशी मी राया !
साजणा जर या सीमेला झुलवा
मर्द रे जरा या रेखेला डूलवा
राया तुम्ही सीमा रेखेला हलवा हलवा हलवाना
सीमावासीयांच्या लढाईकडे उदासीनतेने पाहणाऱ्या आणि दूर राहणाऱ्या मराठी बांधवांना याच लावणीतून लढ्यात सामील होण्याचं प्रियकर प्रेयसीला करतो तसं अर्जाव केलं जातं, ते असं -
किती सहन करू मी, एकटी कशी लढू मी
टीमही घातलीय हाताची घडी, बावरली थकली मी बापुडी
नातं आपलं युगायुगाचं, इतिहास आहे साक्षी
हि रेखा आडवी येते कशी ?
सीमावासीयांच्या लढ्याशी नातं जोडण्याचं प्रेमळ आवाहन करत ही लावणी मराठी बांधवांना मर्दपणाच्या वारशाची आठवण करून देते. आणि सीमा लढ्यात उडी घेण्याचं, शौर्य गाजवण्याचं आवाहन करते, ते असं -
तू मर्द मावळा गाडी, चाल मार एक तू उडी
भेद सीमेची कडी, शह देणारे मारतील दडी,
हीच आहे ती घडी
राया तुम्ही सिमारेखेला हलवा हलवा हलवाना.
मावशी, कृष्ण, पेंद्या यांच्या हलक्या-फुलक्या सीमाप्रश्न नेमका काय आहे, यावर नाटकात भाष्य होतं. त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली जाते. या समस्येचं मूळ समजावण्याचा प्रयत्न केला जातो. सीमा भागातले कार्यकर्ते, नेते, अभ्यासकांचे इंटरव्ह्यू अधूनमधून येतात. त्यातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे ? बेळगावचं दुखणं कसं आहे ? हे समजतं
१९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. तेव्हा बेळगाव जिल्हा मुंबई प्रांताचा भाग होता. १९४८ मध्ये बेळगाव नगरपरिषदेने सीमा आयोग आणि भारत सरकारला विनंती केली की, बेळगाव जिल्ह्याला नियोजित संयुक्त महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करा . कारण आम्ही बहुसंख्य मराठी भाषा बोलतो. तेव्हा मराठी भाषिक राज्यात जाण्याचा आमचा हक्क मान्य करा.
पण ते होणं नव्हतं. १९५६ मध्ये बेळगाव जिल्ह्याचा समावेश नव्याने निर्माण झालेल्या म्हैसूर (आताचं कर्नाटक) राज्यात करण्यात आला. तेव्हा बेळगाव जिल्ह्यात दोन तृतीयांश मराठी लोक वास्तव्यास होते. तरी बेळगाव कन्नड भाषिक राज्यात जावं लागणं, हे दुःखद होतं. यात सरळ मराठींच्या हक्काची गळचेपी झाली.
आता थोडा इतिहास बघू. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याबद्दल म्हटलं जाई, कि ते अटक ते कटक पर्यंत पसरलं आहे. आताच्या कर्नाटकचा उत्तर भाग बहुतांशी तेव्हाच्या मराठा साम्राज्याचा भाग होता. ब्रिटीशांची सत्ता असतानाही या भागात सुरुवातीच्या काळात मराठा सरदारांच्या जहागिरया होत्या. असं असलं तरी, बेळगाव परिसरावर अन्याय झालाच आणि सीमावासियांचा न्यायासाठी संघर्ष सुरु झाला. महाराष्ट्रात येण्याची त्यांची मागणी जोर धरू लागली. १९५३ - ५४ मध्ये संघर्षाची लढाई मूळ धरू लागली. मग वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने ५ जून १९६० रोजी महाजन आयोग नेमला. या आयोगाने महाराष्ट्राचे दोन आणि कर्नाटकचे दोन प्रतिनिधी असा चार सदस्यांचा समावेश होता. या आयोगाने चार मुद्यांवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा, असा महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा आग्रह होता. ते मुद्दे असे -
१) खेडं हे युनिट ठरवावं.
२) भौगोलिक सलगता बघावी.
३) मराठी व कन्नड भाषा बोलणार्यांची संख्या बघावी.
४) लोकांची इच्छा काय, ते बघावं.
या मुद्द्यांवर दोन्हीकडच्या प्रतिनिधींचं एकमत होऊ शकलं नाही. तेव्हा हे प्रकरण बारगळलं.
सेनापती बापट यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, उपोषण सुरु केलं. त्यांनी मागणी केली की, सीमाप्रश्नावर तोडगा काढायला नवा आयोग नेमा. तेव्हा महाराष्ट्र सरकारने केंद्राला विनंती केली . मग केंद्राने पुन्हा २५ ऑक्टोबर १९६६ रोजी महाजन आयोग स्थापला. त्यावेळचे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे तिसरे मुख्य न्यायाधीश मेहेरचंद महाजन हे या आयोगाचे अध्यक्ष होते.
सेनापती बापटांनी उपोषण केलं त्याही आधी सीमावासियांचा संघर्ष सुरूच होता. खरं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेते साठी एसेम जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत दंगे, आचार्य अत्रे यांनी सीमावासियांना लढ्यात येण्याची गळ घातली. या मोठ्या लढ्यामुळे सीमालढा झाकला गेला. पुढे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला. त्यात शाहीरांसह सामान्य जनतेचं स्वप्न बेळगाव, डांगसह संपूर्ण महाराष्ट्र व्हावा, हेच होतं. ते स्वप्न लोकशहिर आत्माराम पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ या गाण्यातून व्यक्त झाला आहे, ते गीत असं -
संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा
द्विभाषिकाचा दुतोंडी कावा, उडतोय माझा डोळा डावा
साडेतीन कोट सिंहाचा छावा,पकडलाय मांडलाय पिंजरा नवा
वळीखलाय आम्ही जवाच्या तवा,
शाहिरी साद गेली गावोगावा
बेल्हारी बेळगाव, पंढरी पारनाव, बोरी उंबरगाव, राहुरी जळगाव
सिन्नरी-बरतार-भंडारा-चांदा सातारा सांगली
कारवार डांग अन मुंबई माऊली
जागृत केलाय दक्खनपुरा,
खुशाल कोंबडं झाकून धरा -
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सीमावासीय एकजूटीने उतरले. या आंदोलनाचा रेटा मोठा होता. तेव्हा आपल्यालाही न्याय मिळेल, असं सीमावासियांना वाटलं होतं. शिवाय गुजरात विभागातल्या डांग परिसरातल्या मराठी जनतेलाही संयुक्त महाराष्ट्रात यायची तीव्र आस होती. बेळगाव आणि डांगच्या मराठी जनतेचं स्वप्न एक झालं होतं. ते स्वप्न त्यावेळी शाहिर भास्कर मुणगेकर यांच्या गाण्यात उमटलं होतं, ते असं -
सीमेच्या वादाला सीमाच नाय मुळी न्यायच नाय
करबंदी वाचून इलाज नाय आता नाय नाय
माझं ते माझं नि तुझं ते माझं हे जमायचं नाय
खंडणीचा सौदा पटायचा नाय आम्हा नाय नाय
डांगाच्या रानाचं ,सागाच्या झाडाचं, मानाचं पण
मानाचं पान आम्ही देणार नाय
बेळगाव, बिदर, निपाणी, कारवार,
कानडी सरकार टिकायचं नाय, तिथं चालायचं नाय
दुतोंडी त्याचं चालणार नाय, चोरांना कुरण देयाचं नाय
संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या राज्यस्थापनेनं पूर्ण झालं खरं. पण संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव, डांग काही आलं नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी तिथल्या जनतेची भावना झाली. तीच भावना आज बळावताना दिसतेय. नेमक्या अशा काळात हे नाटक येतंय. सीमाप्रश्नाची तीव्रता हे नाटक कशी सादर करणार, याविषयी चित्रालेखाशी बोलताना नितेश राणे म्हणाले, 'बेळगाव, निपाणीचे मराठी लोक दररोज भरडले जात आहेत. बेळगाव महापालिकेचे माजी महापौर विजय मोरे यांच्या तोंडाला काळं लावण्यापर्यंत कन्नड लोकांची मजल गेली. शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा त्यांनी जाळला. मराठी शाळांवर अत्याचार केले जातात. बेळगावला कर्नाटकाचं विधानभवन बांधलं. बेळगाव शहराला कर्नाटकाची उपराजधानी घोषित करण्यात आलं. गुढीपाडव्याला मराठी बांधवांनी लावलेले banner फाडले, उतरवले. हा वाद डिसेंबर २००५ पासून सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालय त्यावर सन्माननीय निकाल देईल. पण तोपर्यंत तिथल्या मराठी जनतेवर अन्याय व्हायला नको. महाराष्ट्रात कन्नड नागरिक बांधव सुरक्षित राहतात. मग कर्नाटकात मराठींवर अन्याय का ? इथल्या कन्नड बंधूनी हे नाटक बघावं. मराठी सीमावासियाचं दुःख समजावून घ्यावं. कर्नाटकातील सरकार व जनतेला हे दुःख समजावून सांगावं. अन्यथा तिथल्या मराठींवर होणारे अन्याय थांबले नाहीत, तर उद्या इथल्या कन्नडीगांवरही लोक रागावतील. त्याची प्रतिक्रिया हिंसक उमटू शकेल. आम्ही आज समंजस भूमिका घेतोय, पण उद्या अनर्थ घडू नये. शिवाय सीमावादाबद्दल सातारा, कोल्हापूर, सांगली भागात लोकांना आस्था आहे, तशी मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, विदर्भातील लोकांत दिसत नाही. त्यांना या प्रश्नाची तीव्रता कळावी म्हणून हे नाटक आहे. महाराष्ट्रातल्या कन्नड आणि मराठी बांधवांमध्ये हे नाटक नक्कीच जाग आणील.'
संयुक्त महाराष्ट्र चळवळीने सीमावासीय फसवले गेले आणि महाजन आयोगाने दिलेल्या अहवालाने तर त्यांच्या जखमेवर acid ओतलं. महाजन आयोगाने २ हजार २४० लोकांकडून सूचना स्वीकारल्या, ७ हजार ५७२ लोकांची मतं जाणून घेतली आणि अहवाल दिला. महाराष्ट्राने बेळगाव जिल्ह्यातली ८१४ गावं मागितली होती, तिथे या अहवालाने २६२ गावं देण्याचं सुचवलं. निपाणी, खानापूर, आणि नंदगडचा त्यात समावेश होता. कर्नाटकला ५१६ गावं देण्याची सूचना केली. त्यातली २६० गावंच फक्त कन्नड भाषिक बहुल आहेत . शिवाय सोलापूर शहर जिल्ह्यातल्या काही गावांसह २४७ गावं कर्नाटकला द्यावी, अशी खुंटी महाजन आयोगाने ठोकली.
महाजन आयोगाचा अहवाल थोडक्यात असा -
* बेळगाव कर्नाटकातच राहील,
* जत, अक्कलकोट, सोलापूरसह २४७ खेडी, गावं कर्नाटकला द्यावीत.
* चंदगड, निपाणी, खानापुरसह २६४ गावं महाराष्ट्राला द्यावीत.
* कासारगाडे हा केरळचा भागही कर्नाटकला द्यावा.
हा अहवाल कर्नाटकधार्जिणा आहे. असं सीमावासियांसह समस्त महाराष्ट्राचं जनमत झालं. केरळलाहि हा अहवाल मान्य नव्हता. असंतोष धुमसत राहिला. १९४८ सालापासून सीमाप्रश्नावर काम करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सुरु झालेलं सीमा आंदोलन तेव्हापासून आजपर्यंत धुमसत आहे.
हे नाटक ३ मे रोजी बेळगावात सादर होईल. ते एका वेगळ्या पार्श्वभूमीवर ५ मे रोजी कर्नाटक राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे. नुकतंच बेळगावातील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर भावना भडकवणारं भाषण केलं म्हणून कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार सीमाप्रश्नावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वातावरण गरमागरम आहे. कर्नाटकात राजकीय अस्थिरता आहे . कुठल्याही पक्षाला बह्हुमत मिळणार नाही. समितीचे पाच-सहा आमदार निवडून आले, तर त्यांच्याकडे राज्याच्या सत्तेची चावी येऊ शकते.
अशा वातावरणात या नाटकाने भाषा प्रांतवादात काही ठिणगी पडेल का? ते आता काही सांगता येणार नाही. हे नाटक विजय केंकरे आणि संतोष पवार या दोन वेगळे बाज असणाऱ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलंय. मुंबईत दादरच्या याश्वत नाट्य मंदिराच्या संकुलात या नाटकाचा सराव सुरु असताना संतोष पवार चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'राजकीय वादात आम्ही जाऊ इच्छित नाही. कर्नाटकात नाटककार गिरीश कर्नाड सारखे चांगले लोकही आहेत. या नाटकात सीमावासियांचा प्रश्न मनोरंजनातून समजावून देण्याचा प्रयत्न आहे. सात प्रमुख कलाकार आणि त्यांच्या जोडीला इतर ५० जन असा भरगच्च संच आहे. नृत्य, लावणी, पोवाडे, गाणी, सुरेल लोकसंगीत, हसवणूक, मध्येच गंभीर चर्चा, मुलाखती, मत-मतांतरं असं नाटक रंगत जातं. त्यात कुठे प्रक्षोभक, टोचणारी भाषा नाही. हि एक प्रबोधन घडवणारी कलाकृती आहे.'
लोकशाहीर संभाजी भागात यांचं वेगळ्या बाजाचं संगीत या नाटकात आहे. या नाटकात शाहीर म्हणतो-
ऊठ महाराष्ट्रा ऊठ
वारस तू शूरांचा, वीरांचा, शिवबांचा, हुतात्म्यांचा
पाच दशके लढत राहिले
न्याय, हक्क, अस्मितेसाठी त्याचा साठी होशील का ?
'झालाच पाहिजे' अशी गर्जना पुन्हा देशील का ?
नाटकाच्या संगीताबद्दल संभाजी भागात चित्रलेखाशी बोलताना म्हणाले, 'या नाटकामुळे शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे व गवाणकर यांची आठवण महाराष्ट्राला पुन्हा येईल. त्यांचा वारसा जागवणारी गाणी, पोवाडे व लावण्या नाटकात आहेत. त्याचप्रमाणे आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली पोवाडा आहे, तो असा-
वाजली तुतारी, भेदी नगारे ; माझा डफही तापला
प्रथम वंदितो हुतात्म्यांना, मी या वक्ताला !
महाराष्ट्र मिळाला, मुंबई आमची
काय आम्ही गुन्हा केला ?
सीमा भाग का दिला कर्नाटकला ?
महाराष्ट्र प्रेम, भाषा, संस्कृती जपली
महाराष्ट्रात येण्याची आस बाळगली
हाच का तो गुन्हा ? मग गप्प का बोला ?
- सीमावासियाचं दुःख, भावना पुन्हा चव्हाट्यावर मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून कलात्मक पद्धतीने होणार आहे ? तसा खटाटोप आम्ही केला आहे.'
या नाटकाचा उद्देश किती सफल होईल ? त्याला लोकांचा किती प्रतिसाद लाभेल हे पुढे दिसेलच. पण सीमावासीयांच्या असंतोषाचं काय ? त्यांना न्याय कधी मिळणार ? त्यांची फसवणूक वारंवार होतेय त्याचं काय ? याच नाटकात कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, त्या कवितेतल्या जनतेसारखी सीमावासीयांची परिस्थिती आहे, ती कविता अशी -
जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे,
जनतेच्या डोळ्यामध्ये शंकराचा राग आहे.
जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे,
जनतेच्या बाहुंमध्ये सागराचे बळ आहे.
जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे,
जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे
जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे,
आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे.
सीमावासीय मराठी जनतेचा महाराष्ट्रीयन होण्याचा आग्रह अमर आहे. त्या आग्रहाची पूर्ती होण्यासाठी समस्त मराठींनी 'डांग-बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्र … झालाच पाहिजे !' या नाट्यपूर्ण आरोळीला दाद आणि साथ दिलीच पाहिजे.
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com