Tuesday, July 28, 2015

कॅलिडोस्कोप











राचेलबाई तुहा रंग कंचा?
अमेरिकेतल्या न्युयॉर्क टाईम्सया दैनिकात जून महिन्यात आलेली एक स्टोरी खूप गाजली. सोशल मीडियातही तिचा गाजावाजा झाला. ही स्टोरी आहे राचेल डोलेझल या प्रतिष्ठित बाईची. राचेलबाई वॉशिंग्टनमधील स्पोकेन इथं राहतात. त्या प्राध्यापिका असून प्रतिष्ठित मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. या बाई आहेत गोऱया. पण त्यांनी स्वतची ओळख मी ब्लॅक वंशाची आहे, अशी सांगितल्याने खळबळ माजली. राचेलबाइं&च्या आईवडिलांनी तात्काळ जाहीर केलं की, ‘आमची मुलगी खोटारडी आहे. आम्ही गोरेच आहोत. मुलगीही गोरी आहे. आमचा वंश युरोपियन आहे. आम्ही ब्लॅक वंशाचे असण्याचा प्रश्नच नाही.’ अमेरिकेत सोशल मीडियासह विविध माध्यमांत राचेल बाईंना विचारलं गेलं की, ‘तुम्ही खोटं का बोलता? तुमचा रंग, वंश नेमका कोणता?’ राचेलबाई आपल्या मतावर ठाम होत्या. त्यामुळे त्या ज्या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत, त्या संस्थांचीही गोची झाली.

माध्यमांनी राचेल बाईंबद्दल माहिती काढली तर कळलं की, त्यांना बाल वयापासून ब्लॅक लोकांबद्दल आकर्षण वाटत होतं. त्यांच्या वडिलांनी चार काळी मुलं दत्तक घेतली. या मुलांबद्दलही त्यांना माया वाटत असे. पुढे त्यांनी कॉलेजातही काळ्या लोकांसाठी लढे दिले. लग्नही एका काळ्या माणसाबरोबरच केलं. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. राचेल बाई दिसतात सुंदर. त्या विद्वानही आहेत. कर्तबगार, धाडसी आहेत. त्यांच्यावर टीका करणारे जसे अनेक आहेत, तसे त्यांचे समर्थकही पुष्कळ आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत म्हटलं की, रंग, वंश हे मुद्दे आता अमेरिकेसारख्या पुढारलेल्या समाजात महत्त्वाचे आहेतच कुठे?अमेरिकन समाजात अंशत काळे पण गोऱयांसारखे दिसणारे असे खूप लोक आहेत. विसाव्या शतकात एकपंचमांश एवढी लोकसंख्या अशा लोकांची आहे. काही गोरे लोक काळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात. त्यांच्यासारखंच जीवन जगतात. पण कुणी आपली ओळख लपवत नाही. राचेल बाईंच्या बाबतीत मात्र ओळख लपवल्याचा आरोप होतो आहेअमेरिकेत रंग, वंश याबद्दल माहिती लपवणं हा मोठा सामाजिक अपराध मानला जातो. राचेल बाईंच्या विरोधात सोशल मीडियावर धमक्या देण्यापासून तर उपहासात्मक टीका करण्यापर्यंत अनेक प्रकार सुरू आहेत. या प्रकरणाचा शेवट काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी काळेपण मिरवणारी ही गोरी बाई लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे.


फ्रेंच हटके  विचार कसा  करतात?
मासा मेल्यानंतर त्याचं शरीर सडायला डोक्यापासून सुरूवात होते. मानवी समाजाचंही असंच काहीसं आहे. डोकं म्हणजे विचार. डोकं जिवंत असणं म्हणजे विचार सुरू असणं. डोकं मेलं की विचारही मेलाच. विचारशैली जिवंत, सळसळती असलेला समाज अधिक ताजातवाना, प्रगतीशील असतो. युरोपमधील प्रेंच समाज असा प्रगतिशील मानला जातो. या समाजाबद्दल असं म्हणतात की, तो विद्वानांचा समाज आहे. फ्रान्स हा विचारवंतांचा देश आहे. विचार तर सर्व मानवसमूह करत आलेला आहे. पण प्रेंचांचं वैशिष्ट्य असं की, ते हटके विचार करतात. म्हणून जगात त्यांचं नाव आहे. जॅक्स् डेरीदा, जॉ पॉल, सार्त्र, अल्बर्ट कामू आणि आताचा नवं भांडवल लिहिणारा थॉमस पीकेटी या प्रेंच विचारवंतांचा जगभर दबदबा आहे. प्रेंच माणसांच्या या वैभवशाली विचारशैलीच्या इतिहासाचा मागोवा घेत आज प्रेंच समाज बुद्धीच्या क्षेत्रात मागे का पडत आहे, याचा धांडोळा घेणारं एक पुस्तक सध्या चर्चेत आहे.
इकॉनॉमिस्टया जगप्रसिद्ध मॅगझीनमध्ये जून महिन्याच्या अंकात या पुस्तकावर लेखन प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाचं नाव आहे हाऊ फ्रेंच थिंक अॅन अॅफेक्शनेट पोट्रेट ऑफ अॅन इंटलेक्चुअल पिपल’. पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर हजारी सिंग. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी या पुस्तकात फ्रान्समध्ये विचारशैलीला महत्त्व कसं आहे, याचा ऐतिहासिक मागोवा घेत घेत आताच्या फ्रान्सचं विश्लेषण केलं आहे.

लेखक पुस्तकात सांगतो, प्रेंच माणूस हटके विचार कसा करतो? त्याच्या विचार करण्यावर पाच घटकांचा प्रभाव असतो.
1. प्रेंच समाजाचा इतिहास हा सामाजिक बंड, अराजक, त्यानंतर क्रांती आणि ती स्थिर झाल्यानंतर प्रगती असा अवघड वाटा-वळणांचा आहे. या इतिहासाचा फ्रेंच माणसावर मोठा प्रभाव आहे.
2. फ्रेंच समूहाला सामूहिक ओळख आहे. त्यामुळे तो समाज आत्मविश्वासाने विचार करतो.
3. प्रेंच समाजाला सामूहिक वाद संवादाची आवड आहे. घरी, सार्वजनिक ठिकाणी आणि विविध संस्थांमध्ये हे वाद संवाद घडत असतात. विचार कुटाळक्या, भांडणं, घनघोर चर्चाखोरी, छोट्या छोट्या गोष्टींवर कीसपाडीवृत्ती, चिकित्साखोरी अशा गुणांचा या समाजात भरपूर विकास झालेला आहे.
4. लोक विचारवंतांना खूप मान-सन्मान देतात, जपतात.
5. क्रांतिकारी विचार परंपरा आणि सर्जनशीलता यांच्यात फ्रेंच समाजाने पिढ्यान्पिढ्या संवादाचं वातावरण विकसित केलं आहे.

या पाच घटकांमुळे या समाजात विचार करणाऱयाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे, असा निष्कर्ष लेखकाने काढलाय. पण पुस्तकाच्या शेवटी हा लेखक आजच्या फ्रेंच समाजाचं विश्लेषण करताना थबकतो. बिचकतो. अल्बर्ट कामूचा देश आज सकस विचार करायला नकार का देतोय? विचाराच्या क्षेत्रात थॉमस पीकेटीचा अपवाद सोडला तर मोठे विचारवंत फ्रान्समध्ये जवळपास नाहीत. लेखकाला या मागचं कारण असं दिसतं की, समाजात विचार करायला प्रतिकूल वातावरण तयार झालं की, जे काही वासरात लंगडी गाय म्हणता येतील असे विचारवंत उरतात. त्यांचाही मेंदू आक्रसतो. मग त्यातून सुरू होतो छोट्या विचाराचा प्रदेश. आजच्या फ्रान्सचं असं काही तरी होतंय का? लेखकाने हा प्रश्न पुस्तकात मांडलाय.

जगभरातले नव्या जमान्याचे प्रेरणादायी सोशल लिडर
टाईम या मॅगझीनमध्ये दरवेळेला काहीना काही नवं हमखास वाचायला मिळतं. जून महिन्यात या अंकात नेक्स्ट जनरेशन लिडर्स् अशी एक स्टोरी प्रसिद्ध झाली आहे. या स्टोरीमध्ये चीन, पाकिस्तान, फ्रान्स, तुर्कस्तान, अमेरिका, केनिया या निवडक देशातील नव्या कल्पना निवडून त्यावर झपाटल्यासारखं काम करणाऱया तरुण, तरुणींच्या प्रेरक कथा दिलेल्या आहेत.


चिनी डिझाईनर माशा
यातली पहिली कथा आहे चीनमधील शांघाय येथील माशा मा हिची. जगभर चिनी वस्तूंचं मार्केटिंग जोरदारपणे चालु असतं. मेड इन चायना असं लिहिलेल्या विविध चिनी ब्रँडच्या वस्तू जगभर पाठवल्या जातात. मात्र या ब्रँडची डिझाईन नजरेस भरणारी नसते. विदेशातली ही चिनी वस्तूंविषयीची तक्रार लक्षात घेऊन डिझायनर माशा हिने स्वतचा स्टुडिओ उभा केला. आणि चीनमध्ये आकर्षक वस्तू बनवण्याचा सपाटा लावला. लंडनमध्ये फॅशन डिझाईन या विषयात पदवी मिळवलेल्या माशा हिने विशेषत स्त्रियांच्या वापराच्या फॅशनेबल वस्तू विदेशात पाठवायला सुरूवात केली. दोन वर्षांपासून माशा हा व्यवसाय करतेय. सुरूवातीला डझनभर ब्युटिकमधून तिने हा व्यवसाय सुरू केला. आता युरोप, अमेरिकेत तिच्या वस्तूंना मागणी आहे. मेड इन चायना या स्लोगनचं तिने डिझाईन इन चायनाअसं रूपांतर केलं. लेडी गागासारख्या प्रतिष्ठित महिला तिच्या वस्तू विकत घेऊन वापरतात. आणि अभिमानानं मिरवतातही. अल्पावधित जगभर फॅशन डिझाईनर म्हणून या 29 वर्षांच्या चिनी मुलीचं नाव झालं. म्हणूनच काहींनी तिची दखल घेतली.

डिजिटल राईट अॅडव्होकेट
पाकिस्तानातल्या 34 वर्षीय निघत दाद या लाहोर येथे राहणाऱया तरुणीचीही कहाणी कमालीची प्रेरणादायक आहे. तिने पाकिस्तानातल्या पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱया ऑनलाईन हॅरॅशमेंटच्या विरोधात जागृती करणारी संस्था उभी केली. तिचं नाव डिजिटल राईट फाऊंडेशन असं आहे. निघत वकील आहे. क्रिमिनल लॉ आणि फॅमिली लॉ हे तिचे आस्थेचे विषय आहेत. तिचे वडील तिच्या पाठिशी सावलीसारखे उभे राहिले. पाकिस्तानातल्या कायदा विभागाने आणि पोलीस खात्याने तिच्या या प्रयत्नांना सहकार्य केलं. तरुण मुलींना ऑनलाईन हॅरॅशमेंट पासून स्वतचा बचाव कसा करायचा, यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम निघत आणि तिची टीम करते. ज्या मुली, महिला यांना ऑनलाईन छळाचा अनुभव येतो, त्यांनी पुढे येऊन तक्रार केल्यानंतर अशा पीडितांना निघत न्याय मिळवून देते. तिचं काम अल्पावधित एवढं लोकप्रिय झालं की, नोबेल प्राईझ विनर मलाला युसुफजाई हिनेही त्याची स्तुती केली. निघतचं काम आता पाकिस्तानात एवढं फोफावलं आहे की, ऑनलाईन हॅरॅशमेंट करणारे पुरुष वचकून असतात. तिच्या कामाला मिळालेली ही पावतीच म्हणता येईल, म्हणूनच जगभर तिची दखल घेतली गेली.

आचारी तुमच्या घरी
असंच वेगळं काम फ्रान्समध्ये पॅरिस येथे राहणारा स्टिफन लेगुईलॉन करतोय. त्याचं काम म्हटलं तर साधं आहे. म्हटलं तर घरातल्या किचनची दुनिया बदलून टाकणारं. स्टिफन आणि त्याचे साथीदार ग्राहकांना (गरजू कुटुंबांना) सेफ (आचारी) पुरवण्याचं काम करतात. ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करायचं. सेफने काय मेन्यू तयार करुन द्यायचा हे सांगायचं. एकदा बुकिंग झालं की, ठरलं त्या वेळेला सेफ घरी येईल. दार उघडून ग्राहकाने फक्त त्याचं स्वागत करायचं. त्याला  किचन दाखवून द्यायचं. हा सेफ सोबत मेन्यूचं सगळं साहित्य (किराणा बाजार, भाजीपाला वगैरे) बरोबरच घेऊन येतो. आणि कुटुंबाला मस्त सुग्रास भोजन आवडीनं तयार करून देतो. या कामामुळे 26 वर्षांचा स्टिफन फ्रान्समध्ये अल्पावधीतच प्रत्येक कुटुंबातल्या गळ्यातला ताईत बनला.

इंगिनचा अल्टरनेट जरनॅलिझम
स्टिफन सारखं काम करायला कल्पकता लागते आणि धाडसही. असं धाडस तुर्कीमधल्या इस्तंबुलमध्ये राहणाऱया इंगिन ओंडर या 23वर्षांच्या तरुणाने दाखवलं आहे. त्याने तुर्की प्रस्थापित मीडियाला आव्हान उभं करत स्वतचा अल्टरनेटीव्ह मीडिया तयार केला आहे. हे त्याने कसं घडवून आणलं? त्याला कारण ठरली एक घटना. 28 डिसेंबर 2011 रोजी तुर्की लष्कराच्या लढाऊ विमानांनी तुर्क आणि इराकच्या सीमेवर बॉम्बवर्षाव केला. कुर्दीश फुटीरतावादी अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी हा हल्ला केला गेला, असं सांगितलं गेलं. त्यात 34 लोक मारले गेले. मात्र सत्य वेगळंच होतं. या हल्ल्यात मारले गेलेले सर्वजण स्थानिक रहिवासी खेडूत होते. त्यात बहुतेकजण तरुण मुलं होती. ती मुलं सीमेवर इंधन आणि सिगरेटचं स्मगलिंग करून तुर्कीमध्ये नेत असत. तुर्कीमधील मुख्यप्रवाहातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने ही बातमी लपवली. इंगिन आणि त्याच्या विद्यार्थी सहकाऱयांनी ट्विटरवर ही बातमी दिली. त्याच्या मागचं सत्य उलगडून सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रस्थापित मीडिया इंगिनवर नाराज झाला. मात्र तुर्की जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यानंतर 140 नवशिक्या पत्रकारांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचं हत्यार वापरून इंगिनने सिटीझन जरनॅलिझम जोरात सुरू केला. आता तुर्कीमध्ये इंगिन आणि त्याच्या सहकाऱयांचा पर्यायी मिडिया उभा राहिला आहे. आणि बातमी लपवण्याची कुणाचीही बिशाद नाही.

फोटोग्राफर्स्ची चळवळ
अमेरिकेतल्या मे बोइव्ह आणि केनियाचा बोनिफेस मवांगी यांची कहाणीही डेअरिंगबाज आहे. 31 वर्षांची मे न्यूयॉर्कमध्ये राहते. 350स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं करून तिने पर्यावरणवादी गट बनवला आहे. पर्यावरणाचं नुकसान करणाऱया व्यवस्थेविरोधात जागृती करणं, मोर्चे काढणं, सरकारवर दबाब आणणं असं तिचं काम चालू आहे. 31 वर्षांचा बोनिफेस अप्रतिम फोटोग्राफर आहे. तो जिथे अन्याय, अत्याचार होईल तिथे धडकतो. त्याचे फोटो काढतो आणि दडपलेल्यांचा आवाज बनतो. त्याच्या फोटो काढण्याच्या पद्धतीमुळे त्याला जगभर गनिमी काव्याचा फोटोग्राफरम्हणून ओळख मिळत आहे.अशा समदृष्टी फोटोग्राफर्सची टीम बनवून बोनिफेस आणि त्याचे सहकारी केनियातल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना फोटो चळवळीच्या माध्यमातून उघडं पाडतात. अशा नव्या कल्पना घेऊन काम करणारे हे सोशल लिडर आहेत. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, ही तरुणाई या तरुण नेत्यांपासून प्रेरणा घेईल काय? एकेका प्रश्नावर काम करणारे तरुण भारतातही वाढोत.










गाववाली अॅण्टी हिरोईन
भारतात कंगना राणावत या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नटीबद्दल जून महिन्यात न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियात खूप छापून आलं. तन्नू वेड्स मन्नू रिटर्नस् या तिच्या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा बिझनेस केला. क्वीन या चित्रपटासाठी तिला नॅशनल अवॉर्डस् मिळालं. या दोन गोष्टींमुळे तिची चर्चा झाली असली तरी ही नटी पहिल्यापासून काहीना काही स्वतचं वेगळेपण दाखवत आली आहे. हे वेगळेपण काय आहे? ‘डर्टी पिक्चरहा सिनेमा तिने नाकारला होता. या चित्रपटाची गोष्ट आवडल्याने तिने हा निर्णय घेतला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर ही पोरगी बावळी आहे, तिला अक्कल नाही, अशी तिच्यावर टीका झाली होती. मात्र मी तत्त्व म्हणून असे चित्रपट यापुढेही नाकारेन, या मतावर कंगना ठाम दिसली. तोंडाला लावायच्या एका क्रीमची करोडो रुपयांची जाहिरातही तिने अशीच लाथाडली. तिचं असं म्हणणं आहे की, एक कोटी बुडाले म्हणून काय झाल? क्रीम तोंडाला लावल्याने कुणी गोरी कशी बनेल? जे घडणार नाही. ते मी जाहिरातीतून कसं सांगू? माझी बहीण सावळी आहे. तिला मी सामोरं कसं जाऊ? खोटं नको, करोडो रुपयेही नकोत.

अशी ही बॉलिवुडमधली हटके नटी आहे. सोळा-सतरा वर्षांची होती; तेव्हा ही पोरगी मुंबईत आली. हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिह्यात भांबला हे तिचं छोटं गाव. आधी दिल्लीत मग मुंबईत करिअरच्या शोधात असलेल्या या मुलीला नीट इंग्रजीही बोलता येत नव्हतं. मुंबईत नवखी होती. फिल्म इंस्डस्ट्रीत कुणी ओळखीचं नाही. तरी या मुलीने धीराने तडजोड करता काम शोधायला सुरुवात केली. चांगली काम मिळाली, ती केली. तत्त्वाशी तडजोड केली नाही. छोट्याशा गावातून आलेली ती आज देशातल्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून बसली आहे. हम थोडे बेवफा क्या निकले, आप तो बदचलन हो गये, हे आपल्या नवऱयाला सांगणारी डेरिंगबाज तन्नू तिने साकारली. मै अपने हनिमून पे अकेले आई हूँ, असं समोरच्याला बेधडकपणे सांगणारी ही नायिका म्हणूनच तरुणाईची लाडकी झाली आहे. तिच्या भूमिका सोज्वल, रडक्या, अन्याय सहन करणाऱया बुळ्या हिरोईनसारख्या नाहीत. म्हणून बॉलिवुडचे चित्रपट समीक्षक तिला अॅण्टी हिरोईन म्हणतात. कंगनाचा त्याला आक्षेप नाही. तिचं म्हणणं असं की, मी आजची बेधडक तरुणी पडद्यावर साकारते. त्याचा मला अभिमान आहे.

 इंदिराजी आणि मोदीजी
नवभारत टाईम्स या दैनिकात संपादकीय पानावर देशातले जानेमाने पत्रकार, विचारवंत, लेखक विविध विषयांवर लिहित असतात. अत्यंत मूलभूत मांडणी काही लेखांमधून होत असते. ज्येष्ठ पत्रकार चंद्रभूषण यांनी जूनमध्ये इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन आजी माजी पंतप्रधानांची तुलना करत देशासमोरील आव्हानांची चर्चा करणारा लेख लिहिला आहे.

त्यांचं म्हणणं असं की, देशात, केंद्रात एकाधिकारशाहीने चालणारं सरकार आलं की, त्या सरकारचा दबदबा वाढतो जरूर. लोकांना त्याचं आकर्षणही वाटतं. त्या नेत्याची वाह! काय ताकदवान नेता आहे, काय धडाकेबाज निर्णय घेतो, कसा सर्वांना नमवतोअशी स्तुती जरूर होते. पण या हुकूम सोडणाऱया नेत्यांच्या काळातच देशात, विविध राज्यांत पहिल्यांदा अस्वस्थता पसरते. मग गोंधळ माजतो. दंगली भडकतात. दहशतवादी कारवाया वाढतात. आणि याचा शेवट फुटीरवादी शक्ती फोफावतात. देश फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहतो.

इंदिरा गांधी यांची जूनमध्ये आठवण जरूर होते. कारण 26 जून 1975 रोजी त्यांनी देशात आणीबाणी लागू करून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला होता. हा अतिरेक लोकांना आवडला नाही. त्यानंतर मतपेटीतून लोकांनी इंदिराजींना घरचा रस्ता दाखवला होता. याच इंदिरा गांधी 1980 साली दुर्गा बनून परत सत्तेवर आल्या. त्यांचा 1980 ते 1984 हा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ दबदबा निर्माण करणारा होता. मात्र त्याच काळात पंजाबात खलिस्तानी आंदोलन वाढलं. आसाममध्ये सांप्रदायिक दंगे भडकले. जम्मू-काश्मिरमध्ये इंदिराजींचा शेख अब्दुला परिवाराशी इगोचा झगडा झाला. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये फुटीरवादी कारवाया माजल्या. या फुटीरतावादी शक्तींनीच पुढे इंदिराजींचा बळी घेतला.

मोदीजींचं सरकारही इंदिराजींच्या सरकार सारखंच ताकदवान आहे. बहुसंख्याकांचा त्याला जोरदार पाठिंबा आहे. या सरकारच्या पहिल्या वर्षातच काही वेगळ्या घटना बघायला मिळाल्या. 6 जून 2015 ला ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेचा 31वा स्मृतिदिन पंजाबात आणि जम्मूमध्ये साजरा करण्यात आला. यादिवशी एकेकाळी पंजाबात फुटीरवादी शक्तींची ज्योत पेटवणाऱया जर्नल भिंद्रनवाले यांना शीख फुटीरवाद्यांनी मानवंदना दिली. त्यांच्या समर्थनार्थ सुवर्णमंदिरात तलवारी उगारून घोषणाबाजी केली. पंजाबात अकाली दल आणि भाजपचं सरकार आहे. मात्र या सरकारचा या फुटीरतावाद्यांना धाक राहिलेला दिसत नाही. जम्मू-काश्मिरमध्ये जून महिन्यातच पाकिस्तानचे झेंडे फडवण्यात आले. या राज्यातही भाजप आणि पिडीपीचे सरकार आहे. पाकिस्तानधार्जिणे फुटीरतावादी नेते या राज्यात मोकाट आहेत. केंद्रात मोदीजी बलवान आहेत. पण त्यांचा या फुटीरतावाद्यांना धाक दिसत नाही. तमिळनाडूतल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर केंद्र सरकारने बंदी घालून तिथल्या विद्यार्थ्यांना डिवचलं. त्यातून तमिळ तरुण मोदीजींच्या विरोधात घोषणा देत हा देश आमचा आहे की नाही? या देशात आम्हांला चर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? असा सवाल करू लागलेत. नॉर्थ ईस्ट राज्यात अशांतता सुरू आहेच. देशात उत्तर प्रदेश सारख्या राज्यात राम मंदिराचा प्रश्न डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात नथुरामी कारवाया वाढताहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील लालकृष्ण अडवाणी यांची मुलाखतही लक्षवेधक ठरली. अडवाणींनी म्हटले आहे, लोकशाही चिरडणाऱया शक्ती आजही दखलप्राप्त आहेत. अडवाणींच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत चंद्रभूषण यांनी आपल्या देशात सीमेवरच्या राज्यांतून खतरनाक इशारे येऊ लागले आहेत, याचं भान आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रात हिंदूंचा दबदबा असणारं सरकार अंतिमत राज्या- राज्यात विभाजनवादी, देशतोडक ताकदीला बळ देतं, हा चंद्रभूषण यांचा निष्कर्ष आपल्याला नक्कीच काळजी करायला लावणारा आहे.

(सौजन्य लोकमुद्रा जुलै 2015)

-        राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा