फडणवीस
सरकारचं सत्तांतर एका अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत झालंय. सन
1978 मध्ये जनता पक्षाच्या आमदारांची मोठी संख्या असताना जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
एस.एम.जोशी यांनी 'पुढची 25 वर्षे ब्राम्हण मुख्यमंत्री होऊ शकत नाही' म्हणून स्वतः
मुख्यमंत्रीपदाकडे पाठ फिरवली. शरद पवारांना मुख्यमंत्री केलं. त्या समाजपरिवर्तनाच्या
विचाराला 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी छेद देत मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. आता
2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवरांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केला.
एस.एम.जोशींचे विचार बाळासाहेब ठाकरेंना मान्य नव्हते, हे उघड आहे, पण शरद पवारांनाही
एस.एम.जोशी यांचे विचार पेलवले नाही की काय ? अशा विसंगतीपूर्ण अवस्थेत महाराष्ट्र
उभा आहे. फडणवीस सरकारकडे त्यांचं कारभारीपण आलंय. तो कारभार गोळवलकरांच्या विचारांनी
होणार की छत्रपती शिवरायांच्या, हे आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे.
कोल्हापूरचे
स्वतंत्रसेनानी माधवराव बागल यांनी 'गोळवलकरगुरुजींचे राज्य आले तर...' अशी पुस्तिका
1976 मध्ये लिहिली होती. देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव तेव्हा वाढत होता.
संघाचे सरसंघचालक माधवराव सदाशिव गोळवलकर यांच्या विचारांचा तेव्हा बोलबाला होता. त्यांचे
विचारधन विविध पुस्तकांतून गाजत होते. वादग्रस्त ठरत होते. बागल यांनी त्यांच्या पुस्तिकेत
शेटजी-भटजींचे राज्य कसे असेल, याचं चित्र रंगवलं होतं. त्यात शेतकऱयांची लुबाडणूक
कशी होईल, दलाल-व्यापारी शिरजोर बनतील, धर्मांधांची चलती होईल आणि गरिबांवर अवकळा येईल,
अशा मांडणी बागलांनी केली होती. याउलट, आमचे राज्य आले तर हिंदूंचे कल्याण होईल, व्यापार-उदीम
फळफळेल. न्याय, नीतीचा सुकाळ येईल. अल्पसंख्यांक वठणीवर येतील, गाई आणि जनावरांचं रक्षण
होईल, धर्मराज्य अवतरेल अशी भविष्यवाणी गोळवलकर यांनी केली होती.
सन
1976 चा हा संदर्भ आठवण्याचं कारण आहे. फडणवीस यांच्या सरकारकडून लोक, माध्यमे, विचारी
माणसं वेगवेगळ्या अपेक्षा बाळगून आङेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील
नव्या सरकारात शिवसेना सहभागी झाली. त्यांचं खातेवाटप जाहीर झालं. नागपुरात महाराष्ट्र
विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी-विरोधक यांचे आरोप-प्रत्योरप, पेच-डावपेच
रंगत आहेत. फडणवीस सरकार स्थिर होऊन वाटचाल करत आहे. 'मी गोळवलकरगुरुजींच्या विचारांचा
पाईक आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, गोळवलकर आणि संघविचाराने आम्हाला राज्य चालवायचं आहे,'
हे फडणवीस यांनी लपवून ठेवलेलं नाही.
फडणवीस
मुख्यमंत्री झाले आणि माध्यमांत त राज्याचे तिसरे 'ब्राम्हण' मुख्यमंत्री झाले आहेत,
असा उल्लेख झाला. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आता फडणवीसांच्या हाती, अशी टीका खुद्द
'सामना' या दैनिकातून छापून आली होती. त्यावर माध्यमांनी उलट-सुलट चर्चाही केली होती.
फडणवीस या नावाला पेशवाईच्या इतिहासाचा संदर्भ आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात नाना फडणवीस
हे बडे प्रस्थ होते. पेशवाईत बारभाईंचे कारस्थान गाजले. या कारस्थानात साडेतीन शहाण्यांपैकी
एक म्हणून नाना फडणवीस इतिहासप्रसिद्ध झाले.
देवेंद्र
फडणवीस कसा कारभार करणार यानिमित्ताने ही सगळी चर्चा झाली. ते पेशवाईसारखा महाराष्ट्र
चालवणार की, छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य हाकणार, हे यापुढे दिसेल. गोळवलकरगुरुजींच्या
विचारांचं त्यांच्या निर्णयात काय प्रतिबिंब दिसणार, हेही आपल्याला पाहायला मिळेल.
देवेंद्र हे कायदा, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांची जाण असलेले
नव्या पिढीतले कर्तबगार नेते आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वर्तनावर अटलबिहारी
वाजपेयी यांचा प्रभाव दिसतो. त्यांचे वडिल संघ-स्वयंसेवक गंगाधरराव फडणवीस हे नागपूर
पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. गंगाधररावही वाजपेयींच्या उदारमतवादी मतांचे पुरस्कर्ते
होते. समन्वयी वृत्तीचे होते. देवेंद्र यांना तो वारसा आहे. कारभार हाकताना त्यांचा
कस लागेल.
सुरुवातीला
अस्थिर वाटणारं फडणवीस यांचं सरकार आता सेनेच्या सहभागाने मजबूत झालंय. या सरकारला
भाजप 122 अधिक सेन 63 असं 185 आमदारांचं भक्कम पाठबळ आहे. छोटे पक्ष त्यांच्या सोबतीला
आहेत. या सरकारने दुसरा मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात सेनेसोबत खात्यांची वाटणी स्पष्ट
झाली. स्वतः फडणवीस यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवून घेतलंय. नगरविकास हे खातंही त्यांच्याकडे
आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल, अल्पसंख्याक विकास, कृषी, दुग्धविकास ही महत्त्वाची
खाती आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण, प्रकाश
मेहता यांच्याकडे गृहनिर्माण, चंद्रकांत पाटील सहकार व पणन, पंकडा मुंडे यांच्याकडे
ग्रामविकास व जलसंधारण, विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास ही लोकांवर प्रभाव असणारी
खाती आहेत. जलसंपदा हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे, अन्न खातं गिरीश बापट यांच्याकडे
आहे. शिवसेनेकडे उद्योग, परिवहन, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य ही खाती देण्यात
आली आहेत.
सुभाष
देसाई यांना उद्योगमंत्री करण्यात आले, दिवाकर रावते यांना परिवहन मंत्रालय दिलंय,
रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण, एकनाथ शिंदेंना सार्वजनिक बांधकाम, दीपक सावंतांकडे
आरोग्यखातं आहे. या सगळ्या मंत्र्यांना नागपूर अधिवेशनात काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या
विरोधाला तोंड द्यावं लागणार आहे. गोंधळ, घोषणा, निषेध, सभागृह दणाणणं असं सगळं होणार.
भाजप-सेनेचं खातेवाटप बघितलं, तर लोकांच्या दृष्टीने कळीची आणि परिणामकारक, प्रभावी
खाती भाजपने स्वतःकडे ठेवून घेतली आहे. उद्योग, परिवहन, आरोग्य ही खाती वगळता सेनेकडे
महत्त्वाचं खातं नाही. सेनेला हे कमीपण सतत टोचत राहणार आहे. या कमीपणाचं असंतोषात
कधीही रुपांतर होईल. फडणवीस यांच्यापुढे पुढची वाटचाल करताना दुष्काळ हा प्रश्न डोकेदुखीचा
असणार आहे. राज्यात पुढच्या सहा महिन्यांत 19 हजार गावांत दुष्काळ भीषण रूप धारण करणार
आहे. दुष्काळी गावांची संख्या वाढणार आहे. अतुल देऊळगावकर यांच्यासारखे अभ्यासक या
दुष्काळाची तीव्रता मांडत आहेत. पूर्व विदर्भात वर्धा जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या
परिसरात तर 1972 पेक्षाही भयावह दुष्काळ आताच जाणवू लागलाय. वर्धा जिल्ह्यातील 1 हजार
341 गावांपैकी 1 हजार 49 गावांत पाणीटंचाईने भीषण रुप धारण केलंय. नागपूर विभागात
8 हजार पैकी 2 हजार गावं दुष्काळाशी झुंजत आहेत. अमरावती विभागात 7 हजार 350 गावं दुष्काळाच्या
छायेत आहेत. ही शासनाची आकडेवारी आहे. वास्तव त्यापेक्षा जास्त विदारक असणार आहे. रोजगार,
पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, शेतमालाचे भाव हे प्रश्न सरकारला सोडवावे लागतील.
मराठवाड्याचा
पाणीप्रश्न या दुष्काळात पूर्वीपेक्षा जास्त पेटणार आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने
नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी धरणात 8 टीएमसी पाणी भंडारदरा धरणातून मुळा
व प्रवरा या नद्यांच्या प्रवाहातून सोडण्यात आलंय. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात नेते-शेतकऱयांनी
त्याविरोधात आताच निषेध मोर्चे काढायला सुरुवात केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याची
पातळी सर्वात कमी झाल्याची नोंद करण्यात आली. सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. तेथील
जमिनीतील पाण्याच्या तुटीचं पुनर्भरण झालं नाही, तर हा भाग वाळवंट बनू शकेल. विशेषतः
भूम-परांडा, कळंब, बार्शी हा परिसर वाळवंट बनण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे सरकारच सांगू
लागलंय. असे वाळवंट बनू शकणारे पट्टे बीड (आष्टी), अहमदनगर (कर्जत-जामखेड), सोलापूर
(सांगोला), सातारा (माण-खटाव) या जिल्ह्यांतही तयार होत आहेत. वाळवंट बणण्याच्या तोंडावर
असणाऱया या भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
या
दुष्काळाशी फडणवीस सरकारला झुंजावं लागेल. त्या दृष्टीने त्यांचं मंत्रिमंडळ नागपूर
अधिवेशनात शेतकऱयांच्या पदरात काय टाकतंय, हे दिसेल. ती मदत लोकापर्यंत कशी पोचते,
ते बघावे लागेल. विदर्भात शेतकरी आत्महत्यांची, कर्जबाजारीपणाची समस्या मोठी आहे. या
प्रदेशातून भाजपा 64 पैकी 44 आमदार निवडून आणता आले. याचा अर्थ भाजपकडून लोकांच्या
मोठ्या अपेक्षा आहेत. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी विदर्भ, मराठवाड्याला शेतकऱयांची
स्मशानभूमी असं दुःखाने म्हटलं होतं. मरणाच्या दारात उभ्या येथील शेतकऱयांना भाजप-सेना
सरकार कसा धीर देतं, हे दिसेल.
फडणवीस
सरकारला मोदी-शहा यांच्याशी संवाद साधून, सेनेशी समन्वय करत पुढे जावं लागणार आहे.
ही कसरत वाटते तेवढी सोपी नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री यांना चोंबाळून कारभार
करणं कटकटीचं ठरणार आहे. सेनेच्या मंत्र्यांमध्ये दिवाकर रावते हे फडणवीस यांच्या जवळचे
आणि ज्येष्ठ आहेत. त्यांची फडणवीस यांच्या जवळचे आणि ज्येष्ठ आहेत. त्यांची फडणवीसांना
या कसरतीत मदत होऊ शकेल. रावते भाजपमध्ये मित्र जमवून आहेत. सेनेत उद्धव यांचे विश्वासू
आहेत. शिवसैनिकांत प्रभाव ठेवून आहेत. फडणवीस मंत्रिमंडळात सेनेचा उपमुख्यमंत्री नसला
तरी ती भूमिका रावते निभावत आहेत. भाजप-सेनेची बोलणी, सेनेचा सत्तासहभाग होत असताना
हे दिसून आलंय.
फडणवीस
सरकारचं सत्तांतर एका अभूतपूर्व राजकीय सामाजिक, आर्थिक परिस्थितीत झालंय. सन 1978
मध्ये जनता पक्षाच्या आमदारांची मोठी संख्या असताना जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एस.एम.जोशी
यांनी 'पुढची 25 वर्षे ब्राम्हण मुख्यमंत्री होऊ शकत नाही' म्हणून स्वतः मुख्यमत्रिपदकडे
पाठ फिरवली. शरद पवारांना मुख्यमंत्री केलं. त्या समाजपरिवर्तनाच्या विचाराला 1995
मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी छेद देत मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. आता 2014 मध्ये
फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवरांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केला. एस.एम.जोशींचे
विचार बाळासाहेब ठाकरेंना मान्य नव्हते, हे उघड आहे, पण शरद पवारांनाही एस.एम.जोशी
यांचे विचार पेलवले नाही की काय ? अशा विसंगतीपूर्ण अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. फडणवीस
सरकारकडे त्यांचं कारभारीपण आलंय. तो कारभार गोळवलकरांच्या विचारांनी होणार की छत्रपती
शिवरायांच्या, हे आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे.
राजा कांदळकर
rajak2008@gmail.com