Friday, January 23, 2015

नथुरामजादे मनोरुग्ण आहेत काय ?















या लेखाचा मथळा महात्मा गांधी यांना अजिबात आवडला नसता. मलासुद्धा नथुराम गोडसेविषयी हा लेख लिहितान जाम कंटाळा आलाय. चावून चोथा झालेल्या एखाद्या विषयावर काय लिहायचे ? राष्ट्र हिंदू सभेचे नथुरामजादे लोक या माथेफिरुचे पुन्हा पुन्हा गोडवे का गातात ? त्याला देशभक्त म्हणून जाहीर करतात. उत्तर प्रदेशात मेरटला तर काहींनी नथुराम मंदिराचं भूमिपूजन केलंय. एक बरं, राज्य सरकारनं त्याला हरकत घेतली. अन्यथा मंदिर उभंही राहिलं असतं. कुणी सांगावं आत्तापर्यंत मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या असत्या. हिंदू महासभावाले नथुरामवर चित्रपट काढणार आहेत. त्याच्यावर बंदीची चर्चाही सुरु आहे. अजून चित्रपटाचा पत्ता नाही. बंदीची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. नथुरामचे पुतळे उभे करण्याची मोहीम, मागणी सुरु आहे.

या साऱया प्रकारची जाम चीड येते. दुर्लक्ष करावं असं वाटतं, पण हे जे घडतंय ते साधं सरळ सोप्प नाहीये. म्हणून त्याकडे कंटाळा, दुर्लक्ष, चीड, निष्क्रियता या भावनांनी बघून चालणार नाही. नथुरामचं उदात्तीकरण हे एका मोठ्या राजकारणाचा कट आहे. जर्मनीचा क्रूर हुकूमशहा हिटलर याचा गोबेल्स नावाचा हिकमती प्रचारप्रमुख होता. आपल्या विचारांचा प्रसार कसा करावा याची त्याची काही सूत्र होती. 'बाजारात बोलणाऱयाच्या करड्या विकतात, मुखदुर्बलांच्या गव्हाकडेही कोणी पाहत नाही' अशी म्हण आपल्या गावात प्रसिद्ध आहे. गोबेल्सनं असंच तत्त्व मांडलं, त्याचे प्रयोगही करुन बघितले, खोटी मते, विचार, तथ्य पुन्हा पुन्हा सांगितले. कानीकपाळी आदळवून मांडली की ती काही काळाने खरी वाटू लागतात. समाज हीच मतं, विचार खरे मानतो. प्रसिद्धी माध्यमं, पुस्तकं, चित्रपट यातही ती खरी म्हणून स्थिरावतात. मग हाच विचार लोकांच्या मनाची पकड घेतो. इतिहास बनतो. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा परिवार हिटलर, गोबेल्स यांना देवासमान मानतो. त्यामुळे त्यांची गोबेल्सनीतीवर श्रद्धा आहे. गोबेल्सनीती वापरुन या परिवाराने समाजात असंख्य खोट्या गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिलेला, गुन्हेगार, भारतीय समाज त्याला माथेफिरु, वेडगळ समजतो त्या नथुरामाला देशभक्त ठरविण्याचा घाट, त्याची मंदिर उभारण्याचा उपद्व्याप हा गोबेल्सनीतीचाच एक भाग आहे. खरं तर 'नथुराम भारतातला आद्य राजकीय दहशतवादी आहे' असं कोर्टानं म्हटलंय. तरी त्याचं उदात्तीकरण, दैवीकरण का होतंय ?

हिंदूमहासभा, संघ परिवाराचा नथुरामचे भूत नाचवण्याचा खरा उद्देश महात्मा गांधींची बदनामी करायची हा आहे. गांधींचा दररोज खून करायचा. ते त्याला वध म्हणतात. अशी ही किडक्या मेंदूतली विकृती काम करीत आहे. या विकृतीतून हे सुरु आहे. हे लोक दररोज महात्मा गांधीजींची बदनामी, हरदिन खून करण्याचा प्रयत्न का करतात ?
'गांधी हत्या आणि मी' या पुस्तकाची थोर समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सखोल चिकित्सा केली आहे. हे नथुरामी लोक विकृत आणि कांगावखोर आहेत हे त्यांनी सप्रमाण मांडलंय. 'महात्म्याची अखेर' हे महाराष्ट्रातील थोर पत्रकार जगन फडणीस यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात नथुरामजादे आणि त्यांचे विचार चुकीचे आणि भंपक आहेत. त्यांचा गांधीद्वेष विकृत मनोवृत्तीचा भाग आहे हे उदाहरणासह मांडले आहे. वाचकांना हे पुस्तक उपलब्ध आहे.

'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं उदाहरण घेऊ. शरद पोंक्षे या नटाच्या नाटकातला खोटेपणा ख्यातनाम संशोधक डाॅ. य. दि. फडके यांनी 'नथुरामायण' या पुस्तकात मांडलाय.

आज हे नाटक संघविचाराच्या संस्थांच्या पैशावर पुण्या-मुंबईत चालतंय. शरद पोंक्षे हा नट नथुरामाच्या आवेशात समाजात विविध मंचावर कार्यक्रमात मिरवत असतो. चॅनलवरच्या चर्चांमध्ये विचारवंताच्या आवेशात तो नथुरामची भलामण करीत असतो. महात्मा गांधींच्या बदनामीचा हा असा व्यवसाय करुन या नाटकामार्फत पोंक्षे पोट भरतात. याबद्दल खरं तर त्यांची कीव करावी अशी परिस्थिती आहे. पण यांना आपल्या या उपद्व्यापाची कधीही शरम वाटत नाही हे विशेष. ते स्वतःला सावरकरवादी म्हणवतात. त्यांनी फडके यांचे पुस्तक वाचलंय की नाही माहिती नाही.

कुरुंदकर, फडके, फडणीस यांच्यासह देशातल्या, परदेशातल्या अनेक पत्रकार, लेखक, विचारवंतांनी लिहून ठेवलंय की महात्मा गांधींसारख्या महामानवाला मारणाऱया नथुराम आणि त्यांच्या समर्थकांनी एका विकृत, फॅसिस्ट राजकीय विचाराने प्रेरित होऊन हे कृत्य केलंय. हे कृत्य मानव समाजाला काळिमा फासणारं आहे. जगाने ज्याला महामानव मानलं त्या महामानवाला कुणी मारलं हे चांगलं झालं असं कुणी म्हणत असेल, तो मारणारा थोर, देशभक्त, देव आहे अशी कांगावाखोरी करीत असेल तर त्याच्या माणूसपणाबद्दल शंका घेतली पाहिजे. त्यांचे मेंदू मनोरुग्ण तर नाहीत ना असा संशय घेतला पाहिजे. शुद्ध बुद्धी असलेला, संवेदना असलेला, माणूस म्हणून लाज असणारा माणूस नथुराम समर्थक बनू शकणार नाही.

कुरुंदकर, फडके, फडणीस यांनी सप्रमाण दाखवून दिलंय की, महात्मा गांधींची हत्या ते दलितांना चोंबाळत, कुरवाळत होते, मुसलमानांचे लाड करत होते, पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले म्हणून त्यांची हत्या झाली हे खरं नाही. हे प्रश्न यायच्या आधी गांधीजींवर संघ परिवारातील लोकांनी जीवघेणे हल्ले केले होते. खून करायचे प्रयत्न केले होते. एकदा तर प्रबोधनकार ठाकरे यांनीच गांधीजींच्या मारेकऱयांना दूर केलं होतं.

गांधीजींशी नथुराम समर्थकांचं खरं भांडण काय होतं ?

गांधीजी स्वतःला हिंदू म्हणवत. राम, कृष्ण, शिव यांना ते मानत असत. 'वैष्णवजन तो तेणे कहिए जो पीड पराई जान रे' असा वैष्णवपंथी मी आहे, असं गांधी म्हणत. गांधी गुजराथी बनिया होते. आताच्या भाषेत अोबीसी होते. उच्चवर्णीय नसलेला हा माणूस हिंदू समुदयाशी एकजीव झालेला होता. भारतातले सारे हिंदू गांधीजींना 'बापू' म्हणत. आपला प्रतिनिधी मानत. घरातला मोठा माणूस मानत. अखिल हिंदूंचा पुढारी, महात्मा, राष्ट्रपिता, महामानव असलेल्या मोहनदास करमचंद गांधींशी संघ परिवार, हिंदू महासभेचं भांडण सुरु झालं. कारण या संघटनांना हिंदूंचा एकगठ्ठा समुदाय एका मंचावर आणून 'आर्यावर्त' हे राष्ट्र उभं करायचं  होतं. मनुस्मृतीवर ते आधारित असणार होतं. बुडालेली पेशवाईच त्यांना अशा मार्गाने पुनर्जिवीत करायची होती. त्या राज्यात पुरोहितांच्या हातात सत्ता आणि बाकी समाज चातुर्वर्ण्यात सांगितल्याप्रमाणे ज्याच्यात्याच्या पायरीने वागणार होता. या आर्यावर्तात अल्पसंख्याक वठणीवर आणायची सोय होती. दलितांना त्यांची जागा दाखविलेली होती. स्त्रियांना दाबलं जाणार होतं. पण गांधीच्या मागचे हिंदू हटून संघ परिवाराच्या मागे आल्याशिवाय हे आर्यावर्त राष्ट्र कसं आकाराला येणार ? उलट 1920 ते 1948 या काळात चढत्या क्रमाने गांधीना हिंदूंचा पाठिंबा मिळत होता. ते म्हणवत होते, हा समाज अहिंसक बनवायचा. महिलांना सार्वजनिक जीवनात पुढे आणा. त्यांना बरोबरीने वागवा. सारे धर्म समान आहेत. एकोप्यानं नांदा. दलित-आदिवासींना हक्क मिळाले पाहिजेत. जाती निर्मूलन झाले पाहिजे. आंतरजातीय लग्न असेल तरच मी लग्नाला येईल. मी भंगीमुक्ती करेन. भारत स्वच्छ झाला पाहिजे. सर्व मुलं-मुली शिकली पाहिजेत. शेतकरी-कामगार-कष्टकऱयांचं राज्य येऊ द्या. मागासांना पुढे येऊ दे. जनसेवा हीच ईश्वरसेवा. गरिबात नारायण बघा. हा गांधीजींचा अजेंडा आर्यावर्तवादी संघ परिवाराच्या थोबाडीत मारणारा होता.

हा अजेंडा आर्यावर्ताचं स्वप्न धुळीस मिळवील हे संघ परिवारानं अोळखलं. आता भारतरत्न मिळालेले पं. मदन मोहन मालवीय, विनायक दामोदर सावरकर या हिंदू महासभेच्या नेत्यांना, संघ परिवाराच्या केशव बळीराम हेडगेवार, माधवराव सदाशिव गोवळकर यांना हा अजेंडा पटणे शक्य नव्हते. तिकडे मुस्लीम लीगच्या महंमद अली जिना यांच्या मनातही मुस्लीम राष्ट्राची कल्पना, स्वप्न होतं. त्यांना ईस्लामी राष्ट्र उभं करण्याच्या भावनेने घेरलं होतं.

गांधीपासून हिंदू समाज तुटेना, आर्यावर्ताचं स्वप्नं धुळीस मिळतंय हे पाहून गांधी विरोधकांना निराशेचा झटका आला. या झटक्यातून देशात गांधीद्वेष निर्माण झाला. तो एवढा की गांधींवर शस्त्र, शब्द हल्ले वाढले. वैयक्तिक अमाप बदनामी सुरु झाली. त्याचं टोक गाठलं गेलं, गांधी खउनाचा कट गोडस, करकरे, आपटे यांनीच तडीस नेला आणि गांधींचा दिल्लीत खून झाला. गांधींचे मारेकरी मराठी निघाले. मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी आपल्यातून शरीराने गेले.

या 30 जानेवारीला गांधीजींचा स्मरणदिन, हुतात्मा दिन आहे. देशात मोदिंच्या नेतृत्वाखाली उजव्यांची सत्ता आली. ही सत्ता येण्याचं एक वैशिष्ट्य आहे. मोदी टिमने सार्वत्रिक निवडणुकांआधी मिडीया, सोशल मिडीया पैशाच्या बळावर अंबानी-अदानीसारख्या पैसेवाल्यांच्या साथीने ताब्यात घेतला. मिडीयात गोबेल्सनीती वापरुन सामान्य मतदारांच्या मेंदूवर विविध प्रयोग केले. मतदारांच्या मेंदूला अच्छदिनाचं स्वप्न दाखवून, भुलवून त्यांचे हात मतदानाच्या दिवशी कमळाच्या बटणापर्यंत नेले. नवं तंत्रज्ञान, जाहिरातबाजी, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, इलेक्शन मॅनेजमेंट अशी साधनं हुशारीनं वापरली हे आता लपून राहिलेलं नाही.

तेव्हाच आता याच तंत्राचा वापर करुन गांधींच्या भारताला उखडून त्याचं रुपांतर आर्यावर्तात करायचे पुढचे प्रयोग सुरु झाले आहेत.

रामजादे, हरामजादे, नथुरामजादे, घरवापसी, बहु लाअो बेटी बचाअो, नथुराम मंदिर, 2021 पर्यंत ख्रिश्चन-मुस्लीम संपवायचे, स्कील इंडिया अभियान आणून गरीबांच्या पोरांना पुढे शिकू न देता फुटकळ रोजंदारी कामात गुंतवायचं, रेल्वेचं खाजगीकरण करायचं, स्वच्छतेवाला गांधी पुढे आणून क्रांतिकारक गांधीची वाट लावायची - म्हणजे पुन्हा एकदा खूनच.

हा सारा अजेंडा संघपरिवाराचा आहे. हा अजेंडा यशस्वी झाला म्हणजे आर्यावर्त राष्ट्र व्हायला मदत होईल. नथुरामने गांधीजींना मारुन पहिलं पाऊल टाकलं म्हणून नथुराम देशभक्त आहे. पण तो भारत देशाचा भक्त नाही. आर्यावर्त राष्ट्राचा भक्त आहे.

संघ परिवाराचं हे राजकारण तरुण पिढीच्या आता लक्षात येत आहे. नथुरामचे पुतळे बसवायची मागणी हिंदू महासभेने केल्यावर फेसबुकवर एक पोस्ट एका कार्यकर्त्याने टाकली ती अशी, 'कसा देशभक्त नथुराम? त्याला पिस्तूल चालवता येत होतं. पण त्याने ते इंग्रजांवर एकदाही चालवलं नाही. फकीरीवृत्तीने देशासाठी झिजणाऱया महान म्हाताऱयावर त्यानं ते चालवलं. छातीत तीन गोळ्या मारल्या. वा ! केवढा शूरपणा की भेकडपणा?'

फेसबुक, ट्वीटर हे सोशल मिडियाचे माध्यम वापरणारा तरुण वर्ग उत्साही असतो. त्यातल्या अनेकांनी नथुरामच्या ढोंगी देशभक्तीवर हलक्या भाषेत शेरेबाजी केली. उद्या यातले काही तरुण येत्या 30 जानेवारीला नथुरामजादे असलेल्या सर्वांचे मेंदू तपासा, त्यांची मानसोपचार चाचणी करा, नथुराम समर्थक मनोरुग्ण तर नाहीत ना ? याची सरकारने चाचणी करा अशी सवंग मागणीही करु शकतील. अशा शेरेबाज्या, मागण्या, प्रतिक्रिया यातून विषयाचे गांभीर्य़ जाऊ नये. कारण गांधीद्वेष करणारे एक गंभीर खेळ खेळत आहेत. जर्मनीत हिटलरने नाझी समर्थकांच्या मदतीने साऱया जर्मन राष्ट्राला वेड लावले होते. सारा जर्मन देश हिंसक, रक्तपिपासू, पुरुषी अहंकाराने पछाडलेला, विजयासाठी वखवखलेला, अपयशाच्या भितीने झोप पळालेला अशा जर्मन राष्ट्राची लक्षणं आपल्या देशात दिसताहेत की काय ?

राष्ट्रपिता महात्मा गांधींना हे बघून क्लेश झाले असते. त्यांनी सहिष्णू, अहिंसक, समतावादी, जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा भेद संपलेल्या भारत देशाचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न जर भंगलं तर या जमिनीवरील महात्मा गांधींच्या शेवटच्या अवशेषाचाही मुडदा पडेल.

राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com