डॉक्टर, तुमच्या संबंधीची भयंकर बातमी
कळाली. एसएमस येत गेले. आमदार कपिल पाटील यांचा फोन आला. खात्री झाली. भोवती भूकंप
होत आहे असं जाणवलं. कपिल पाटील, संभाजी भगत, येशू पाटील, जयवंत पाटील यांच्या सोबत
साताऱ्याला तुमच्याकडे निघालो. मनात तुच्यासंबंधीच्या आठवणी, विचार घोंघावत होते. तुमची
साधनाच्या कार्यालयातली भेट टक्क समोर उभी राहिली. तुम्ही साधना मिडिया सेंटरच्या वरच्या
मजल्यावरच्या साधनाच्या ऑफिसमध्ये बसला होता. समोर प्रा. ग. प्र. प्रधान सर होते. बाजूला
प्रा. रा. ग. जाधव सर होते. तुम्ही म्हणालात, ये.... ये.... बस... अगोदर जुजबी भेटलो
होतो. त्या भेटीत तुम्हाला कळलं होतं, हा जर्न्यालिझमचा अभ्यासक्रम रानडे इन्स्टिटयूटमध्ये
शिकतोय, काही बाही इकडे तिकडे लिहितोय. तुम्ही प्रधान सर, जाधव सरांना म्हणालात, हा
राजा कांदळकर. संगमनेरचा आहे. चांगलं लिहितो बर का? शिवाय वाचतो चांगलं. चळवळीतल्या
कार्यकर्त्यांमध्ये फिरतो.अरे व्वा! चांगलं आहे, प्रधान सर म्हणाले
होते तेव्हा.
तुमची ही खास पध्दत असावी. तरूण मुलाला
आत्मविश्वास देण्याची. खरं म्हणजे मी काही तेव्हा फार लिहिलं नव्हतं. चळवळीतल्या लोकांमध्ये
चाचपडत होतो. तरी तुम्ही मला चांगलं लिहितो असं म्हणालात. आज त्याच महत्व कळतयं. डॉक्टर
या तुमच्या त्या शाबासकीच्या थापेनं खूप आत्मविश्वास दिला होता. त्या भेटीनंतर तुम्ही
मला साधना परिवारात घेतलं. येत जा, म्हणालात. भेटलात की विचारायचा, काय विषय डोक्यात आहे!
एकदा म्हणालात, गोसी खूर्द परिसरात प्रकल्पग्रस्तांचं
आंदोलन सुरू आहे. जातोस का तिकडे? विदर्भात आहे. नागपूरला जा. सुभाष लोमटे, विलास भोंगाडे
यांचा त्यात पुढाकार आहे. त्यांच्याशी संपर्क कर. ग्राऊंड रिपोर्ट साधनासाठी लिही.
तुम्ही माझ्या मागेच लागलात. संंबंधितांचे फोन दिले. मला पाठवलं गोसी खुर्दला. आंदोलनाचा
रिपोर्ट साधनात छापला. पुढे भेटल्यावर सगळयांना सांगत सुटलात याने गोसी खुर्दचा रिपोर्ट
फार चांगला लिहिला.
तुम्ही हे करत होतात त्यातून मला किती
उर्जा मिळत होती. म्हणून सांगू डॉक्टर! तुम्हाला माझ्याबददल सगळं माहित होतं.... हा
मुलगा खेडयातला आहे. शेतकरी घरातला आहे. पुण्यात शिककतोय पण गांगारलेला आहे. शेतकरी
घरातला आहे. याच्या मनात गोंधळ आहे. पुढे कसं जावं, काय करावं हे याला स्पष्ट नाही...
घरात वाचनाची लिहिण्याची परंपरा नाही. विचार करण्याची परंपरा नाही... अनेक दोष आहेत...
मलाही ते जाणवत होतं. पण तुम्ही कधी त्या दोषांबददल बोलला नाहीत. सतत पुढे ढकलायचा
प्रयत्न करत होतात.
त्यावेळी साधना साप्ताहिकात तुम्ही अनेक
प्रयोग करत होतात. युवा संपादक निवडून त्यांच्यामार्फत काही विषयांवर अंक काढावेत ही
तुमची कल्पना होती. माझ्यासारखेच तुमच्याकडे मंजिरी घाटपांडे, प्रसाद मणेरीकर हे यत
असत. तुम्ही एकदा तिघांना एकत्र बसवून म्हणालात तुम्ही तिघं युवा संपादक व्हा. काही
अंक संपादीत करा. वेगवेगळे नवे विषय त्यात आणा. काही जणांना लिहायला सांगा. आम्ही तिघांनी
काही अंकांचं संपादन केलंही. त्याचं तुम्ही भरपूर कौतुक केलं. दोष मात्र उगाळत बसला
नाहीत.
असंच एकदा तुम्ही म्हणालात आजचे युवक
काय विचार करतात. त्यांची जीवनशैली कशी आहे. याबददल तुम्ही एक विशेषांक काढा. तेव्हा
विनोद शिरसाठ आणि मी तुमच्याकडे येत होतो. सारीका शिंदे कधी कधी यायची. तिघांवर
तुम्ही जबाबदारी सोपवली. विशेषांक निघाला. त्याचं प्रकाशन निखिल वागळेंच्या
हस्ते केले. साधना सभागृहात कार्यक्रम घडवून आणला. अंक संपादन, प्रकाशन कार्यक्रम सगळं
सुरू असताना तुम्ही मोकळेपणाने आम्हाला वावरू देत होता. शाबासकीची थाप देत होता. करा
रे. होईल चांगलं... असं बिनधास्त प्रोत्साहन देत होता.
पुढे विनोदला तुम्ही तरुणांच्या विचार
विश्वावर लाटा-लहरी हे सदर लिहायला लावलं. त्याच्या मागे लागून अक्षरशः लिहून घेतलं.
पहिल्यांदा विनोदच्या मनात कसं लिहावं याविषयी दवीधा होती. मला तुम्ही सारखं बजावायचं,
विनोद चांगला लिहिलं. त्याच सांग. लिही म्हण. मग मीही विनोदला गळ घालायचो. ते सदर चांगलं
झालं. सर्वांना आवडलं.
हे सर्व करण्यामागे तुमचा हेतू स्पष्ट
होता. साधनेत तुम्ही एका बाजूला मान्यवरांना लिहितं करत होता. तर दुसऱ्या बाजूला नवे
लोक हेरून त्यांना साधनेशी जोडत होता. धडपडणाऱ्या,
लिहिणाऱ्या मुलांचं तुम्हाला खूप कौतुक आहे असं दिसायचं. अनुभवाला यायचं इथे तुमची
नाळ मला साने गुरूजी आणि यदुनाथ थत्ते यांच्याशी जोडलेली दिसत होती. धडपडणारी लिहिती
मुलं, माणसं तुम्ही साधनेकडे अक्षरशः खेचून
आणत होतात. तुम्ही कबडडीपटू संघात अव्वल दर्जाचे कॅचर होतात, असं ऐकून होतो. मला साधनेत
नव्या लोकांना पकडून तुम्ही लिहीतं करत होता तेव्हा तुमचं कॅचर असणं अनुभवाला येत होतं.
पुढे मी मुंबईत आलो. माध्यमांत कार्य
करत राहिलो. मुंबईत आलात की, तुम्ही फोन करायचाच. अंधश्रध्दा निर्मूलन कायदयासाठी मंत्रालयात
फेरी मारायचा. अनेकदा तुमच्या बरोबर मंत्रालयात वावरायचो. मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडे
तुम्ही या कायदयाचा विषय, त्याचा पाठपुरावा करताना पहायचो. या लोकांच्या अपॉइन्टमेंट
मिळण्यात अडचणी येत. मुख्यमंत्र्यांना भेटताना नाकी नउ येत तुमच्या. एकदा अविनाश पाटील
आणि तुम्ही होतात. मुख्यमंत्री भेट होत नव्हती.
विधीमंडळाचं अधिवेशन चालू होतं. अर्धा दिवस तुम्ही विधीमंडळ परिसरात हिंडत होता. तरी
तुम्ही न चिडता पाठपुरावा करत होतात. म्हणायचा, त्यांचीही महत्वाची कामं असतात. आपण
धीर धरला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नोकरशहा यांना कळत होतं का?
मुंबईत तुम्ही भेटायचा तेव्हा नवं काय
लिहितोय, काय वाचतोय असं विचारायचा. पुढे माझी काही पुस्तकं प्रकाशित झाली. एका पुस्तकाचा
प्रकाशन समारंभ रावसाहेब कसबे यांच्या उपस्थित पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या
सभागृहात होता. तुम्ही विनोदला घेवून कार्यक्रमात आलात. तिथही शाबासकीची थापं दयायला
विसरला नाहीत. चष्मयाच्या आडून तुमचे डोळे कौतुकानं बघत होते. नंतर तुम्ही म्हणालात,
लिहित राहा. पण नुस्तं लिहू नको. लोकांत फिर. खूप वाच. आणि लढं.... तुम्ही काय म्हणत
होता हे आज कानात सारखं घुमतंय. त्याचं महत्व कळू लागलंय याची भीषणता अनुभवत होतो.
मंडपात अनेक कार्यकर्ते सैरभैर झालेले पाहत होता. काही रडत होते, काही फुंदत होते.
काहींच्या डोळयात नुसते पाणी. काही सुन्न... तेव्हा आठववलं तुम्ही आणि सुभाष वारेंनी
मला एकदा सांगितलं महाराष्ट्रभरातल्या काही कार्यकर्त्यांवर तू लिही. त्यांना भेटायचं
त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. त्याच्याशी जोडलेल्या लोकांशी चर्चा करायची आणि लिहायचं.
तुम्ही उत्साहाने यादी काढली. दत्ता इस्वलकर, प्रतिभा शिंदे, सुबोध मोरे, किशोर ढमाले
यांच्यावर मी लिहिलं. तुम्ही म्हणायचा, आत्ताचा काळ चळवळींसाठी विपरित. कार्यकर्ते
एकाकी आपल्या कार्यक्षेत्रात लढत आहेत. त्यांना उभारी देणं हे साधनेचं काम. तुम्ही
अनेकांना ही उभारी देत होतात. म्हणूनच तुम्ही
गेलात आणि कार्यकर्त्यांना पायाखालची जमीन खचल्यागत वाटलं.
मी काही मोठा लेखक नाही पण तुम्ही साधनेच्या
एका कार्यक्रमात मला बोलण्यासाठी बोलावलं. अभिमानानं उपस्थितांना सांगितलं., राजा हा
साधनेचा लेखक.
साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखेरचा
निरोप देवून निघालो तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक!
साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखरचा निरोप
देवून निघालो. तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक! केवढा मोठा विश्वास तुम्ही
दाखवला होता. मी अगदी नवखा लिहिता होतो तेव्हा तुम्ही मला उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात
या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं रिपोर्टींग करायला पाठवलं. हातात मुबलक पैसे दिलेत.
कसं जा, कुठं रहा. कुणाशी बोल. काय विषय कव्हर कर, हे लहान मुलाला बोट धरून शिकवावं
तसं सांगितलं. पुन्हा पाठीवर थाप. खांदयावर मायेनं हात ठेवून छान कर सगळं असे प्रोत्साहन!
गुजरातची विधानसभा निवडणूक तर तेव्हा
ऐतिहासिक होती. दंगे नुकतेच झाले होते. माणसं मारली, कापली, जाळली गेली होती. सगळा
गुजराती समाज खदखदत होता. दुःखाने आणि द्वेषानेही. तेव्हा तुम्ही म्हणालात, अशा काळात
पत्रकाराने समाजात जावं. समाज क्रायसिसमध्ये, विसंगतीत जास्त कळतो. तू जा गुजरातमध्ये,
समजून घे, रिपोर्टींग पाठव. लोकांना वाचायला आवडेल. गुजरातमध्ये नथुराम प्रवृत्तीनं
केलेला हैदोस जवळून पाहत आला तो तुमच्यामुळेच. द्वेषाची विचारसरणी समाजावर हावी झाली
की काय होवू शकतं हे अनुभवलं तेव्हा आणि आता द्वेषाच्या प्रवृत्तीनचं तुमचा घात केला.
आता कळू येतंय, तुम्ही मला लिहितं करता करता काय काय पेरत होतात माझ्यात. माझ्या सारख्या
अनेकांत. म्हणजे या समाजात.... तुमही या जमिनीत पेरत होतात नव्या नागरिकांचं बी. नवे
नागरिक ज्यांचा हिंसेवर विश्वास नाही. भारताच्या राज्यघटनेवर ज्यांची श्रध्दा आहे.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य, सामाजिक न्याय यांच्यावर ज्यांचा भरोसा
आहे असे नागरिक. डॉक्टर, तुम्ही गेला आणि ते बीज तरारलेलं दिसलं. महाराष्ट्रात. तुमच्या
हत्येची बातमी ऐकूण हा समाज निषेध करत रस्त्यावर आला तुमच्यासाठी.... तुम्ही पेरलेल्या
मुल्यांसाठी... लोक म्हणाले, तुम्ही अमर आहात. तुम्हाला कोण मारू शकेल!
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com