नागपूरचा तरुण महापौर, तरुण आमदार असलेले देवेंद्र फडणवीस उच्चशिक्षित आणि ध्येय्यवादी म्हणून राजकारण करीत आहेत. यामुळेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकले. त्यांची राजकीय वाटचाल तरुणांसाठी आदर्श ठरावी अशी आहे.
देवेंद्र गंगाराव फडणवीस (वय - ४३ वर्ष) हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले, तेव्हा कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. उलट, ते आता पुढे काय करतील? याकडे अनेकांचं लक्ष आहे. देवेंद्र यांनी आमदार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीच होती. त्याहीआधी १९९७ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांनी सन्मान मिळावला. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले, तेव्हा या पोर्वायीन, चिकन्या चोपड्या उमेदवाराचं नागपूरकरांना खूप कौतुक वाटलं होतं. नागपूर विद्यापीठातून देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कायद्याची पदवी मिळवली होती. हिंदू कायदा या विषयात त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. बिझिनेस मँनेजमेंट पदव्युत्तर पदवी आणि प्रोजेक्ट मँनेजमेंटमधील मेथड्स आणि टेक्निक्समध्ये बर्लिन विद्यापीठातून डिप्लोमा असं आधुनिक शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस नागपूरचे मध्यवस्तीतले आमदार झाले.
गेली १३ वर्ष देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून काम करत आहेत. या काळात त्यांनी राज्य सरकारचे अनेक घोटाळे उघड केले. विधानसभा सभागृहात सरकारला धारेवर धरणारा आमदार, विविध संसदीय आयुधं वापरून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता, अशी प्रतिमा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केली. news channel च्या चर्चेत स्वतःचा ठसा उमटवताना ते दिसू लागले. आता नव्या जबाबदारीने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्यात. दिल्लीहून पक्षाध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालून देवेंद्र मुंबईत विधानभवन परिसरात दाखल झाले, तव्हा फक्त भाजपचे कार्यकर्तेच नव्हे, तर इतरही लोक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत होते. विधानभवन परिसरात पत्रकारांच्या - कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे देवेंद्र चित्रलेखाशी बोलताना नव्या जबाबदारीविषयी म्हणाले, ' भाजपमध्ये पक्षाचा अध्यक्ष ही व्यवस्था आहे. मी सर्वांना घेऊन काम करीन. आता राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळी जनतेला धीर देत त्यांना मदत होईल, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल, यासाठी भाजपचे आम्ही नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, दुष्काळी भागात जाऊ, भ्रष्ट, अकार्यक्षम, आणि असभ्य राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आम्ही लढू. सर्व विरोधी पक्षांना एक व्हा, असं आवाहन मी केलं. राज्यात शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआय, शेकापसह सर्वांची एकजूट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. उद्याची राज्यातली सत्ता आमचीच असणार !'
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा लढाऊ नेता आहे. ते स्वतंत्र विदर्भवादी आहेत. महाराष्ट्रावाद्यांना त्यांनी नागपूरच्या विधानभवनातून चले जाव असं एकदा सुनावलं होतं. तेवढा एक वाद सोडता ते फारसे वादग्रस्त कधी झाले नाहीत. सौजन्यशील आणि अभ्यासुपनाचा वारसा त्यांनी त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून घेतलाय. गंगाधरराव फडणवीस पदवीधर मतदारसंघातून एकदा आमदार होते. पण त्यांचं अकाली निधन झालं. गंगाधरराव शरद पवार, यांचे जवळचे मित्र होते.
देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात येण्याचा निर्णय काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवून घेतला. करियर कसं करायचं याविषयी त्यांच्या मनात स्पष्टता होती. त्यांचा शैक्षणिक बायोडाटा उत्तम होता. वकिली सुरु करून लोकांची कामं करायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, हा एक मार्ग होता. दुसरी वाट होती, राजकीय पक्षात काम करून व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत उतरण्याची ! त्यांनी राजकारणाची वात निवडली. याविषयी चित्रलेखाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो. संघाच्या विचारांचा माझ्या कुटुंबावर पगडा होताच. वडील गंगाधरराव स्वयंसेवक आणि मोठे नेते होते. त्यांना त्यावेळच्या जनसंघात मोठा मान होता. विदर्भात सर्वजन त्यांची इज्जत करत. राजकीय पक्षापलीकडे त्यांना मान्यता होती. मी शालेय वयात नंतर कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम नागपुरात करू लागलो. पूर्णवेळ कार्यकर्ता बनावं, असं माझ्या मनात होतं. पण नंतर काही ज्येष्ठ सहकारयानी आग्रह केला. मी भारतीय जनता पक्षात दाखल झालो. राजकीय पक्ष हे सर्वंकष परिवर्तनाचं एक मध्यम आहे. आपण लोकशाही मानतो. लोकशाहीत राजकारणाच्या माध्यमातूनच प्रभावी सामाजिक काम करता येतं. हा मार्ग मी स्वीकारला. खरं तर मला लंडनला जाऊन barrister होण्याची इच्छा होती. नागपुरात मी कायद्याचा पदवीधर झालोच होतो. परदेशात जाऊन शिकण्याची तीव्र इच्छा होती. कायद्याच्या शेवटच्या वर्षाला असतानाच नगरसेवक झालो, महापौर झालो. माझ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. माझं barrister बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.'
राजकारणातली देवेंद्र फडन्विस्यांची इंनिंग जोरात सुरु झाली. देशातला दुसऱ्या नंबरचा सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांनी रेकॉर्ड नोंदवला. नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी एका दिवसात मुंबईहून १२० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी मंजूर झालेल्या या योजनेमुळे आजही नागपूरकरांना पाणीटंचाई जाणवत नाही. एवढी ही योजना महत्वाची ठरली. महापौर, आमदार म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर वडिलांकडून झालेले संस्कार प्रभावी ठरले. वडील लवकर गेले, पण त्यांच्या संस्कारांची शिदोरी आठवली की, देवेंद्र फडणवीस भाऊक होतात. याबाबत ते म्हणाले, 'माझे वडील लवकर गेले, त्यांचं जीवन म्हणजे साधेपणा आणि उच्च जीवनमूल्यं यांचा संगम होता. ते अजातशत्रू होते. संघटना- पक्ष यांच्यापलीकडे सामान्य लोक त्यांच्यावर आपला माणूस म्हणून प्रेम करत. विदर्भातला कुणीही माणूस त्यांच्याकडे काम घेऊन येई. प्रत्येकाला विश्वास असे की, गंगाधरराव आपलं काम करतील. वडिलांच्या मृत्युनंतर मी लोकांमध्ये जात असे. तेव्हा लोक मला गंगाधार्रावांचा मुलगा म्हणून खूप मान देत. गंगाधार्रावांचा मुलगा आहे म्हणजे नक्कीच याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, अशी लोकांची धारणा होती. मला लोकांची ती धारणा जबाबदार बनवून गेली आहे. हे वडिलांचं ऋण मी कधीही विसरणार नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी वाटचाल करतोय.'
सध्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. राजकारणातला माणूस म्हणजे चोर, लबाड, ढोंगी, अशी अनेकांची भावना असते. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाबद्दल आशावादी आहे. त्यांच्यावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा प्रभाव मोठा आहे. याविषयी ते म्हणाले, 'राजकारणात राहून खूप काही करता येतं. स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं आहे की, काही बनणं हे ध्येय नसावं. काही चांगलं करणं हे उद्दिष्ठ हवं. या उक्तीचा प्रत्यय वाजपेयी यांच्या जीवनात मला दिसला. मला प्रेरणा देणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांना स्टेटसमन म्हणता येइल. राजकारणातला बेंचमार्क म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. त्यांना फॉलो करत मी इथपर्यंत आलोय. मूल्य, विचार, कारभार आणि कार्यक्षमता याबाबतीत त्यांना मी आदर्श मानतो. वाजपेयी नेहमी म्हणत, पद म्हणजे प्रतिष्ठा नाही तर जबाबदारी होय. वाजपेयींचे हे विचार समजून घेतले, तर मला कूप आशावादी वाटतं. तरुणांना मी आवाहन करीन की त्यांनी मोठ्या संख्येने राजकारणात यावं. इझी मनी मिळवायचं साधन म्हणून इकडे येऊ नका. इझी मनी मिळवनाऱ्यांचं सार्वजनिक जीवन थोडक्यात संपतं. ते कुणाचंही भलं करत नाहीत. म्हणून मी तरुणांना म्हणेन की, कोणती तरी विचारसरणी घेऊन राजकारणात काम करा. तुम्ही समाजवादी असा, कम्युनिस्ट असा, अगर हिंदुत्ववादी. मी हिंदुत्ववाद स्वीकारला, रा. स्व. संघाचा वारसा खांद्यावर घेतला आहे.'
देवेंद्र हे चांगले वक्ते आहेत. वरच्या पट्टीत बोलतात. त्यांच्याशी बोलताना ते जाणवत होतं. पण त्यांना आता 'स्वतंत्र विदर्भ' ची पट्टी सोडावी लागेल. कारण ते आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com