Sunday, December 30, 2012

डॉ. सुनिलम यांना जन्मठेप का झाली?


































अण्णांच्या आंदोलनात सक्रिय असलेले एक धडाडीचे कार्यकर्ते डॉ. सुनिलम यांना नुकतीच मध्यप्रदेशातील बैतूल न्यायालयाने आजीवन जन्मठेपेची शिक्षा दिली. आता ते तुरुंगवासात आहेत. दीड दशकापूर्वी १२ जानेवारी १९९८ रोजी मुलताई विभागातील शेतकऱ्यांची पीक नुकसान भरपाई मिळावी म्हणून डॉ. सुनिलम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. या आंदोलनात शेतकऱ्यांनी उपस्थिती मोठी होती. या आंदोलनाला नंतर हिंसक रूप मिळाले. पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात बैतूल नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या वाहनांनी तोडफोड केली. या हिंसाचारात वाहन चालक धीरसिंह याचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या गोळीबारात २४ आंदोलक शेतकरी मारले गेले होते. जवळपास २५० लोक घायाळ झाले होते. आत्ता वाहन चालक धीरसिंह याची हत्त्या केली असा आरोप होता म्हणून डॉ. सुनिलम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आजीवन जन्मठेप आणि ५० हजाराचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे. सुनिलम  यांच्या समवेत प्रल्हाद अग्रवाल आणि शेषराव या दोघांनाही अशी शिक्षा झाली आहे.

सध्या तुरुंगात असलेल्या डॉ. सुनिलम यांनी तुरुंगातून चळवळीतल्या सहकाऱ्यांसाठी एक खुलं पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलंय की, माझ्यावर शेतकरी आंदोलनात काम करताना आठ वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. सरकारच्या हस्तकांनी ते केले होते. त्यांनीच षड्यंत्र रचून मला शिक्षा व्हावी असा कट केला आहे. सत्य माझ्या बाजूने आहे. मुलताई आंदोलनात २४ शेतकऱ्यांचा जीव गोळ्या घालून घेणाऱ्या राज्यकर्ते, पोलिस आणि प्रशासन यांना कुणी काहीही करू शकत नाही. पण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस घालून दीड शतक खोटे खटले चालवून आम्हाला तुरुंगात घातलंय. ही लढाई सामाजिक न्यायाची आहे.

आम्हाला शिक्षा देऊन हि व्यवस्था यापुढे न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांना इशारा देवू पाहतेय की, बघा यापुढे आंदोलनाच्या मार्गाने जाल तर तुमची अवस्था सुनिलम आणि त्यांच्या सहकाऱ्यासारखी करू. आमच्या आंदोलनात शेतकर्यांनी हिसांचार केला नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने हे सगळं घडवून आणलं. ठपका मात्र आमच्यावर ठेवला. आम्हाला बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सुनिलम यांचं  म्हणणं  आहे.

डॉ. सुनिलम कोण आहेत?
२७ जुलै १९६१ रोजी भोपाळ (मध्यप्रदेश) इथं जन्मलेल्या सुनिलम  यांचं मूळ नाव सुनिल मिश्रा. ग्वालेहरला केंद्रीय विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. इथल्याच सरकारी सायन्स कॉलेजातून ते एम. एससी झाले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी बायोमेडिकल मेलबर्न इथल्या बर्नस इन्स्टीत्यूटमध्ये काही काळ त्यांनी काम केलं. तिथून परतल्यावर ते पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते बनले.

असा हा उच्चशिक्षण घेतलेला सधन कुटुंबातला कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या चळवळीत पडला. देशात-विदेशात सामाजिक प्रश्नांवर झालेल्या विविध चर्चासत्र, परिसंवादात त्यांनी जाऊन भाग घेतला. आपली मतं मांडली. मुलताईतले शेतकरी अडचणीत होतेतेव्हा ते तिथं धावून गेले. मुलताई किसान संघर्ष समितीची स्थापना केली. म. गांधीजींच्या मार्गाने शांततेने आंदोलन करण्याचा मार्ग निवडला. १२ जानेवारी १९९८ च्या घटनेनं  त्यांच्या जीवनाला कलाटणीच दिली. या घटनेनंतर त्यांच्यावर ६६ केसेस मध्यप्रदेश सरकारने दाखल केल्या. तेव्हा त्यांना तीन महिने तुरुंगात जावं लागलं होतं. या आंदोलनानंतर ते मुलताई विभागातून लोकांचे उमेदवार म्हणून मध्यप्रदेश विधानसभेसाठी उभे राहिले. आमदारही झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना काही प्रमाणात न्यायही मिळाला.

सुनिलाम देशभरात होणाऱ्या चळवळीत सक्रिय असायचे. नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्यासोबत पहिल्यापसून ते काम करायचे. अण्णांच्या आंदोलनात ते आघाडीवर होतेच. अशा लढाऊ कार्यकर्त्याला तुरुंगात जावं लागतंय याची खंत चळवळीतल्या सर्वांनाच आहे. सुनिलाम यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्रभर, देशभर विविध गट -संघटना प्रयत्न करत आहेत. अर्थात शांततेच्या मार्गाने हे प्रयत्न सुरु आहेत.

म्यानमार, भूतान या देशाच्या नागरिकांच्या स्वातंत्र्य लढ्यांना भारतातून मदत करणाऱ्या सुनिलम यांना स्वत:लाच तुरुंगात जावं लागतंय हा केवढा मोठा विरोधाभास!

त्यांच्या सुटकेसाठी वरच्या न्यालयात न्यालायाची लढाई सुरु आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सुनिलम यांना न्याय मिळायला हवा.

- राजा कांदळकर (rajak2008@gmail.com)