Wednesday, October 25, 2017

रावतेंची रागबाजी, चंद्रकांतदादांची चालबाजी

मुंबई हायकोर्टाने एसटी कामगारांच्या संपात हस्तक्षेप केल्याने अखेर चौथ्या दिवशी संप मिटला. भाऊबीजेच्या दिवशी एसटी कामगार आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. एसटीच्या चाकांना पुन्हा गती आली खरी पण एसटी महामंडळाच्या खऱ्या दुखण्यावर तोडगा निघणार काय? या प्रश्नावर ना चर्चा झाली ना त्या दिशेनं सरकारनं काही पाऊल उचलल्याचे संकेत दिले. त्यामुळे एसटीच्या चाकांना गती मिळाली असली तरी खऱ्या आजाराचं काय? हा प्रश्न तसाच आ वासून आहे. त्या प्रश्नाला भिडण्याचं सरकारनं टाळलं की काय? सरकार असं का वागत आहे, यावर चर्चा व्हायला हवी. 

 १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री एसटी कामगार संघटना संपावर गेल्या होत्या. सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ व्हावी ही त्यांची मागणी होती. ४० दिवस अगोदर कामगार संघटनांचे नेते परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी बोलणी करत होते. अनेक बैठका होऊनही चर्चा पुढे जात नव्हती. तोडगा निघत नव्हता. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगारांना संप करावा लागला, असं कामगार संघटनांचे नेते म्हणत आहेत. तर दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळ तोट्यात असल्याने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ देता येणार नाही, अशी कडक भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवर ठाम राहत मीडियासमोर रावतेंनी ऐन संप काळात चिडून असं वक्तव्य केलं की, "पुढच्या २५ वर्षातही एसटी महामंडळ सातवा वेतन आयोग देऊ शकणार नाही." मीडियाशी बोलताना रावते रागात बोलत होते. त्यांचा संताप दिसत होता. रावते रागबाजीत व्यस्त होते. तर दुसऱ्या बाजूला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संप ऐन टिपेला असताना "लोक एसटी कर्मचाऱ्यांना धडा शिकवतील", अशी विधाने करत होते. या विधानात अप्रत्यक्षपणे लोकांना एसटी कामगारांविरुद्ध चिथावणी दिली जात होती. म्हणजे प्रवासी आणि एसटी कामगार यांच्यात लढाया व्हाव्यात असे चंद्रकांतदादांच्या वक्तव्यात सूचन होते, ते जास्त गंभीर होते. त्याची सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटली. भाजप मंत्र्यांना लोक ठोकतील, निवडणुकीत हरवतील, असं म्हटलं गेलं. रावते, चंद्रकांतदादा हे दोन्ही वरिष्ठ मंत्री या संपकाळात ज्या पद्धतीने वागत होते, ती पद्धत जबाबदारीचं भान असणारी नक्कीच नव्हती. ऐरवी चंद्रकांतदादा हे संयमी, मोजून-मापून बोलणारे, अंगावर वाद येणार नाही अशी जरा जास्तीच सावध भूमिका घेणारे म्हणून ओळखले जातात. पण ते नेमके प्रवाशांचे संप काळात हाल होत असताना, एसटी कामगार पराकोटीचे नाराज असताना अशी एकमेकांशी लढवण्याची भाषा वापरून काय साधू पाहत होते? राज्यात बसडेपोवर अशांतता माजावी, अशी त्यांची इच्छा होती की काय? सरकारला हे शोभादायक नव्हतं. 

रावते यांनी १९९५ च्या युती सरकारमध्येही एसटीचा कारभार सांभाळला होता. आताही तीन वर्षे ते एसटी महामंडळ हाताळत आहेत. एसटीचं दुखणं त्यांना पुरेपूर माहीत आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीडा त्यांना तोंडपाठ आहेत. ज्या पीडा तोंडपाठ आहेत त्या रावतेंच्या ह्रदयाला का भिडत नाहीत. ते या पिडांकडे संवेदनशिलतेनं का पाहत नाहीत? एसटी खात्याचे पालक म्हणून हा संप कुशलतेनं हाताळण्याऐवजी रावतेंनी "संप सुरूय, प्रवाशांचे हाल होताहेत?" या मीडियाच्या प्रश्नावर "मी काय करू?", "मुख्यमंत्री ऐकत नाही!" अशी तद्दन बेजबाबदार, चालढकल करणारी विधाने केली. रावतेंची प्रतिमा ऎरवी शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारा नेता अशी वेगळी आहे. पण परिवहनमंत्री म्हणून त्यांचं वर्तन अत्यंत उथळ आणि चीड आणणारं होतं. काहीसं केविलवाणंही होतं. 

रावते, चंद्रकांतदादा हे ज्येष्ठ मंत्री अटीतटीच्या वेळी गंभीर प्रश्नावर असं का वागत होते? रागबाजी, चालढकलबाजी का करत होते? या प्रश्नांची चर्चा करत असताना लक्षात येतं की, या मंत्र्यांना प्रश्नाच्या मुळाशी जाण्यात रस नसावा. एसटी महामंडळाच्या मूळ दुखण्यावर काही कायमस्वरूपी उपाय काढण्यात त्यांना आस्था नसावी, असं वाटण्याइतपत हे संशय निर्माण करणारं प्रकरण आहे. 

एसटी सेवा १९४८ ला मुंबईत सुरु झाली. १९६० साली तिचा राज्यभर विस्तार झाला. आज ७० लाख प्रवाशांना दररोज एसटी सेवा देते. १८,५०० मार्गांवर जवळपास १६,५०० लाल गाड्या ये-जा करतात. गेली ५० वर्षे एसटी हे गावागावात सामान्य प्रवाशांना विश्वासाने सेवा देणाऱ्या यंत्रणेचं नाव बनलं आहे. जिथं सरकार पोहोचत नाही तिथे एसटी पोहोचते. एवढा एसटीवर लोकांचा भरोसा आहे. पोस्टाच्या टपालसेवेचं काम एसटी करते. विद्यार्थी, विद्यार्थिनींना एसटी शाळेत, कॉलेजात नेते. त्यांचे डबे पोहोचवते. शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात आणते. इतरही अनेक सेवा एसटी भरोशानं देते. त्यामुळे एसटीची विश्वासार्हता वाढली. ही विश्वासार्हता वाढण्यामागे एसटी कर्मचाऱ्यांचा त्याग मोठा आहे. पण त्या एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला साडेआठ हजार रुपये पगार मिळतो. (शेजारील राज्यात तो २० ते ३४ हजार इतका आहे.) एसटीत १५-२० वर्षे नोकरी केली की त्या कर्मचाऱ्यांना फक्त १४ ते १६ हजार पगार मिळतो. सरकार इतर क्षेत्रात महागाई भत्ता १३६% देतं. एसटी कर्मचाऱ्यांना ११५% द्यायचं. सततच्या मागणीनंतर तो वाढवला. १२६% केला म्हणजे १०% कमीच. ही रक्कमही गेली अकरा महिने दिली जात नाही. तुटपुंजे पगारही वेळेवर होत नाहीत अशी दैना आहे.

२०१६ ला एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनकरार संपला. पण तो वाढवण्यात आला नाही. नवा वेतन करार होऊ शकला नाही. दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांना शिवसेना ५ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करते. पण एसटी कर्मचाऱ्यांना २५०० रुपये बोनस रावते जाहीर करतात. गेली अडीच वर्षे एसटीत बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी गोळा केला जातो. प्रत्येक प्रवाशांकडून तिकिटाच्या मूळ रकमेशिवाय एक रुपया जादा जमा केला जातो. दररोज ७० लाख प्रवाशांकडून ७० लाख रुपये  जमा होतात. या पैशातून एसटी महामंडळाला मोठा निधी जमा होतो. त्याच्या हिशोबाबद्दल कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. महाराष्ट्रात प्रवासी कर म्हणून राज्य सरकार १७.५% कर घेतं. इतर राज्यात, मध्यप्रदेशात हा कर ९% इतकाच आहे. हा पैसा कुठे जातो? असा प्रश्न कर्मचारी विचारताहेत. एसटी महामंडळाला असे अनेक उत्पन्नाचे मोठमोठे स्रोत आहेत. तरी महामंडळ तोट्यात जातं कारण नोकरशहा आणि राज्यकर्ते यांची मिलीभगत एसटी महामंडळाला गोत्यात आणतेय. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत जातोय. त्यात कर्मचाऱ्यांची कुटुंबे भरडली जाताहेत, असा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे. 

एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. हा भ्रष्टाचार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं सुखनैव चालू दिला. तीन वर्षांपासून भारतीय जनता पार्टी-शिवसेना महा युतीच्या सरकारनेही त्यावर काही रामबाण उपाय काढलेला नाही. त्यामुळे एसटीचा घाटा वाढत चाललाय. आता या संपाने सव्वाशे कोटींची त्यात भर पडलीय. हजारो कर्मचारी, लाखो प्रवासी यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा राज्यकर्ते चालबाजी करण्यात धन्यता मानताना दिसले. रावते शिवसेनेचे मंत्री म्हणून संपात सेना बदनाम होत असेल तर भले होऊ द्या, असं चंद्रकांतदादांसह इतर भाजप मंत्र्यांचं वागणं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांनी हा संप मनावर घेतलाच नाही. सरकार काही करत नाही म्हणून मुंबई हायकोर्टाला पुढं येऊन संप मिटवावा लागला. फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेवर हा खूप मोठा डाग लागला आहे. प्रत्येक वेळी न्यायालयानं सांगावं आणि सरकारने नंदीबैलासारखी मान डोलवावी, हे राज्य चांगलं चालल्याचं लक्षण नव्हे. 

- राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा मासिक

Tuesday, October 10, 2017

वारकरी, साईभक्तांना सरकार का डिवचतंय?


देवेंद्र फडणवीस सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या समाज घटकांची दिवसेंदिवस वाढच होताना दिसतेय. आधीच शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी रागात आहेत. मुंबईत लोकल प्रवासी २३ जणांच्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूने संतप्त आहेत. पेट्रोलच्या भाववाढीने मध्यमवर्गात अस्वस्थता आहे. जीएसटीने छोटे व्यापारी चिडलेत. त्यात आता वारकरी आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्तही सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. वारकरी काल १० ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदानात जमून सरकारचा टाळ-मृदंग वाजवून हरिनामाचा गजर करत निषेध केला. तिकडे शिर्डीत साईभक्त पत्रकं काढून निषेध नोंदवताहेत. सरकार साईबाबांच्या स्मृतिशताब्दी वर्षात बाबांच्या विचाराला मारक कृती करतंय, आमच्या श्रद्धा-भावनांना डिवचतंय, असा साईभक्तांचा रोष व्यक्त होतोय.

वारकरी का आंदोलन करताहेत?

वारकऱ्यांनी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली होती की, श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीवर राजकारण्यांना न घेता वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करा. वारकऱ्यांचा देव वारकऱ्यांच्या ताब्यात द्या, पुढाऱ्यांची मुजोरी इथं नको. आम्ही ४० वर्ष संघर्ष करून बडवे, उत्पात, सेवेकरी हटवले. आता पुन्हा आमच्या देवाला पुढाऱ्यांचा गराडा पडलाय. मंदिर समितीच्या ११ सदस्यांपैकी बहुतांश पुढारी आहेत. अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे कराड (सातारा)चे अतुल भोसले यांची नेमणूक केलीय. ही नियुक्ती ३ जुलै २०१७ रोजी झाली. तेव्हापासून वारकरी संघर्षाच्या पवित्र्यात होते. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसमोर वारकऱ्यांनी, प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली तरी काही दाद मिळाली नाही. त्यानंतरही वारकऱ्यांनी सरकारला वेळ दिला, पण काहीच घडत नव्हतं. त्यामुळे नाईलाजानं वारकऱ्यांना मुंबईत यावं लागतंय, असं वारकऱ्यांचे नेते राजाभाऊ चोपदार यांचं म्हणणं आहे.

कालच्या आंदोलनाला फडणवीस सरकार काय प्रतिसाद देतंय ते दिसलंच. या वारकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; तर पुढचं आंदोलन राज्यभर नेण्याचा बंडातात्या कराडकर, राजाभाऊ चोपदार, श्यामसुंदर सोन्नर यांचा निर्धार आहे. राज्यातले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार या आंदोलनात आघाडीवर आहेत. वारकरी संस्था, संघटनांची संघटित शक्ती आहे. या शक्तीला प्रतिसाद न देणं सरकारला खूप महागात पडेल. कारण कीर्तनकार, प्रवचनकार यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडतो. या वर्गानं सरकारविरोधी रान उठवलं, तर सरकारच्या विश्वासार्हतेला नक्कीच झटका बसेल. वारकऱ्यांना असं वाटतंय की, आपल्याला हे सरकार सन्मान देत नाही. तसंच साईभक्तांनाही वाटू लागलंय की, आपल्या श्रद्धांना हे सरकार डिवचत आहे. जाणूनबुजून एक शक्ती साईबाबांच्या विचारांवर हल्ला करतेय.

साईभक्तांना असं का वाटतंय?

सध्या साईभक्तांची स्मृतिशताब्दी सुरू आहे. १८५८ साली साई शिर्डीत १६ व्या वर्षी प्रकटले आणि १५ ऑक्टोबर १९१८ रोजी साईंनी समाधी घेतली. स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी जि. परभणी हे गाव असून त्या गावाचा विकास सरकार करेन. राष्ट्रपतींचा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. त्या भाषणाचं सरकारी रेकॉर्ड होतं. पाथरीच्या उल्लेखानं शिर्डीकर दुखावले गेले. पाथरीचा जावई शोध कुणी लावला? खरं म्हणजे स्वतः साईबाबांनी त्यांचं कूळ आणि मूळ गुढ ठेवलं. त्यांची जात, त्यांचा धर्म याबद्दलची माहिती संदिग्ध आहे. त्यामुळे साई सर्व धर्मियांना आपले वाटतात. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत असे वेगवेगळ्या धर्माचे लोक म्हणूनच ‘शिर्डीस पाय लागो’ची भावना मनी धरतात. लांबहून येतात. साईंचा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा, ‘सबका मलिक एक है’ हा विचार घेऊन जातात. एका अर्थानं शिर्डी हे ‘सेक्युलर’ देवस्थान बनलंय. पण राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पाथरीचा उल्लेख झाल्यानं पाथरीत प्रति शिर्डी उभी करायचा तर सरकारचा मानस नाही ना? अशी शंका शिर्डीकरांनी व्यक्त केलीय. यापूर्वी साईभक्तांनी प्रति शिर्डी, प्रति साई मंदिर उभारायला संघटित विरोध केला होता, हा इतिहास आहे.

पाथरीच्या उल्लेखाविषयी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की,  साईंच्या कुठल्याही अधिकृत चरित्रात पाथरीचा उल्लेख नाही. मग बाबांचा पाथरीचा जन्म ही माहिती राष्ट्रपतींना कुणी दिली? ही माहिती खोटी आहे, असं साईभक्त मानतात. उद्या राष्ट्रपतींना माहितीच्या अधिकारात कुणी साई भक्तानं विचारलं की, ही खोटी माहिती तुम्हाला कुणी पुरवली? तर राष्ट्रपतींना माफी मागावी लागेल. या प्रकरणात राष्ट्रपतींची केवढी विश्वासार्हता पणाला लागेल. खोटी माहिती एक विशिष्ट अजेंडा ठेवून पुरवण्यात येतेय, असा साईभक्तांना संशय आहे. हा संशय बळावणाऱ्या इतरही काही घटना राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी शिर्डीत घडल्या. सगळीकडे भगवे झेंडे लावले गेले. यापूर्वी असे झेंडे शिर्डीत कधी दिसले नव्हते. मंदिर परिसरात ध्वजस्तंभ उभारला. हा ध्वजस्तंभ कुंभ मेळ्यातला आहे. ध्वजस्तंभावर त्रिशूळ आहे. या त्रिशुळाचं शिर्डीत काय काम? असा प्रश्न साईभक्त विचारताहेत. साईबाबांनी सबुरीचं सुफी तत्त्वज्ञान सांगितलं. तिथं एका धर्माशी संबंधित आणि परत ते हिंस्त्रतेचं प्रतीक, कुणाला तरी मारण्यासाठीचं शस्त्र शिर्डीत का आणलं जातंय? याची चर्चा आता हळूहळू सर्वदूर साई भक्तांत पोहोचत चाललीय. ध्वजस्तंभ हे वैदिकांच्या विजयाचं प्रतीक चिन्ह मानलं जातं. साईभक्तांमध्ये वैदिक-अवैदिक, हिंदू, मुस्लीम असे सर्व जात-धर्मीय आहेत. त्यांना साईबाबांच्या शिर्डीत ध्वजस्तंभ उभारणं खटकल्याशिवाय राहणार नाही. उद्या हा ध्वजस्तंभ हटवा, अशी चळवळ उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा जर भाजपविरोधी राजकीय पक्षांनी फायदा घेतला तर शांत शिर्डीत अशांतता पसरायला वेळ लागणार नाही.

यापूर्वी एका शंकराचार्यांनी साई हे देव नव्हेत, तिथं हिंदूंनी जाऊ नये, अशी साईबाबांची निंदानालस्ती केली होती. त्याला उत्तर म्हणून शंकराचार्यांचा शिर्डीत निषेध झाला होता. साईभक्तांनी तीव्र आंदोलनं केली होती. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नवी मुंबईतले बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हावरे यांच्यावर बांधकाम व्यवसायात आर्थिक गुन्ह्यांच्या केसेस दाखल झाल्या होत्या. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधीलकी सर्वज्ञात आहे. हावरे यांच्या नियुक्तीलाही साईभक्तांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता नव्यानं राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर साईभक्तांची अस्वस्थता आणखी वाढली आहे.

पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्र आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशुळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं. भक्तांच्या श्रद्धा दुखावणं. या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोयीस्कर असतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा या नाजूक गोष्टींशी खेळणारे राज्यकर्ते बदनाम होतात. पुढे धुळीस मिळतात, हा इतिहास सर्वच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलेला बरा. अन्यथा सिंहासन संकटात आहे, हे खुशाल समजावं.

राजा कांदळकर संपादक ‘लोकमुद्रा’
rajak2008@gmail.com

Thursday, August 18, 2016

माणूस मोठा ताकदीचा, पण...


















१९६५ नंतरची दोन दशके महाराष्ट्रातील तरुण वर्गात मोठी जागृती आणि चळवळ निर्माण करणार्या युवक क्रांती दल या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत, अहमदनगरचे माजी आमदार, सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त येत्या २१ ऑगस्टला पुण्यात गौरव समारंभ होत आहे, त्या निमित्ताने हा लेख...
 
‘पाव्हणं रामराम... घ्या तमाकू, मळा अन् चुनाबी घ्या. बरं, काय म्हणतंय राजकारण? काय चाललंय गावात, शिवारात? काय म्हणत्यात नेते? तुमच्या पुढार्यांचं कसंय? पुढारी अन् तमाकू यावरून आठवलं- आपण कार्यकर्ते म्हंजी तमाकूच समजत्यात की नेते! तलप आली की मळायची, टाकायची तोंडात. जरूर असंल तवर चघळायची, गरज संपली की टाकायची थुकून...’

लोकसत्ता वर्तमानपत्र वाचत असताना बावीस-तेवीस वर्षांपूर्वी भेटलेला हा मजकूर- डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘रामराम पाव्हणं’ या कॉलममधला. अधाशासारखा कॉलम वाचला. त्यानंतर दर आठवडय़ाला वाचत गेलो. या लेखकाविषयी मनात काही प्रतिमा साकारत गेली. त्याचा फोटो पाहिला. त्याची दाढी, डोक्यावरच्या केसांचा कोंबडा, खादीचा झब्बा. त्याच्या भाषेत भलताच दम जाणवला. गावातल्या पारावरची भाषा, लोकांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या जिनगानीतले प्रसंग-उदाहरणं घेऊन या कॉलमात चर्चा होई. राजकारण, समाजकारण, शेती, धर्म, अर्थकारण, गावगाडा, स्त्री-पुरुष समता, शिक्षणव्यवस्था, गावच्या पाटलांची दादागिरी, टग्या राजकारण्यांची मनगटशाही- असे नाना प्रश्न. त्यांची चर्चा. डॉक्टर अत्यंत भेदक पद्धतीने करत.

या लेखकाला भेटलं पाहिजे, असं मनात ठाम झालं. कॉलमच्या मजकुरात भेटलेले डॉक्टर पुढे पुण्यात शिकायला गेलो अन् जवळचे झाले. पुण्यात एस. पी. कॉलेजच्या समोर सत्याग्रही मासिकाचं ऑफिस होतं. त्याचं नाव ‘क्रांतिनिकेतन’ ठेवलेलं. मोठं बोलकं नावं. चार मजले चढून डॉक्टरांना भेटायला जावं लागे. चार मजले चढून आलेल्याला डॉक्टर म्हणत, ‘हे चार मजले जो चढतो, तो निरोगी असल्याचं सर्टिफिकेट मी देतो.’

आपण माणसांचा डॉक्टर असल्याचं ते वारंवार सांगत. त्याचा त्यांना अभिमान असावा, हे जाणवायचं. डॉक्टरांकडे गेल्यावर त्या ऑफिसचे काही नियम दिसले. न सांगता ऑफिसातल्या मावशी प्रत्येकाला चहा देत. दुधाचा चहा मोठा रुचकर. गावाकडचा आहे, असं वाटे. चहा पिता-पिता डॉक्टरांचं बोलणं चालू. ते ऐकणं हा मोठा आनंददायी, विचार करायला लावणारा तरीही करमणुकीचा भाग असे. डॉक्टर या गप्पा-चर्चांमध्ये विविध विषय हाताळीत असत. इतिहास, तत्त्वज्ञान, उत्क्रांतीशास्त्र, सामाजिक विज्ञान, विकास, राजकारण, नेत्यांचे विचारविश्व, खेळ, आहार, स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक जीवन, भांडवलशाही, समाजवाद, साम्यवाद, जडवाद, गांधीवाद, कादंबर्या, आत्मचरित्रं, चित्रपट, संपूर्ण क्रांती, खरं अध्यात्म, खरं वैराग्य, बुद्धाचा धम्म, महावीराचं तत्त्वज्ञान, चार्वाक, फुले-आंबेडकरवाद, जातिव्यवस्थेचं गौडबंगाल, गावगाडा, गावच्या पाटलांचे विचित्र मनोविश्व, घमेंडी पाटलांच्या गंमतीजमती, क्रौर्य, फजित्या... अशा नानाविध विषयांवर चर्चा चाले. वेळ-काळाचे भान हरपून डॉक्टर बोलत असत. हा अखंड विचारमहोत्सव असे. या महोत्सवाचा आपण भाग आहोत, ही जाणीव खूप सुखद असे. खूप माहिती मिळे. चर्चेनंतर आपण नवे झालोत, असं वाटे.

डॉक्टरांचा एक विशेष होता. त्यांच्यासमोर जसा माणूस येई, तसा ते त्याच्याशी संवाद साधत. अडचणीतला माणूस असेल, तर त्याच्याशी त्याच्या अडचणीपुरतं बोलायचं. शिक्षक-वकील असेल, तर त्याच्याशी त्यांच्या व्यवसायाविषयी. आमच्यासारखे कॉलेजातले विद्यार्थी पाहिले की, डॉक्टर अधिक मोकळे होत असावेत. डॉक्टर आपल्याशी मनमोकळं बोलतात, अखंड बोलतात- हा आम्हालाही सन्मान वाटे. दुपारी दोन वाजता भेटायला गेलेल्या आमच्याशी डॉक्टर रात्री आठपर्यंत चर्चा करत. ऑफिसात सकाळी दहा वाजता आलेले शेषराव, शीलवंत, दशरथ चव्हाण यांना याचा त्रास होई. ते आमच्यावर कधी कधी वैतागत. म्हणत, ‘तुम्हाला काही कामं नाहीत का रे?’ अर्थात् हे तिघेही इतर वेळी खूप प्रेमाने वागत. पण कधी कधी त्यांना या चर्चा, उशीर यांचा मनस्ताप होत असावा.

एकदा डॉक्टर म्हणाले, “चल येतोस का? उद्या मी राशीनला चाललोय, शाळेवर! पण लवकर निघावं लागेल. तू विद्यापीठातून सकाळी सात वाजताच घरी ये.” मला आनंदच झाला. दिवसभर डॉक्टरांचा सहवास, घनघोर चर्चा, प्रवास अन् शाळा पाहणं. त्या वेळी डॉक्टरांची पांढरी ऍम्बॅसिडर कार होती. दशरथ ड्रायव्हर. सकाळी ७ वाजता डॉक्टरांना जॉइन झालो. तेव्हा डॉक्टर संगमनेरी गायछाप तंबाखू खात. एकदा विडा तोंडात टाकला की, बोलू लागत.

या प्रवासात मला कळलं की, डॉक्टरांनी ग्रामीण भागात ग्रामविकासाचे प्रयोग करावेत म्हणून शाळा काढली. राशीन (ता.कर्जत, जि.अहमदनगर) हे डॉक्टरांचं मूळ गाव. या गावावर त्यांचं खूप प्रेम. बोलण्यात ते दिसे. राशीनचा माणूस भेटला की, डॉक्टर लहान मुलासारखे हरखून जात. त्याच्याशी गावातला एक होऊन समरसून बोलत. याचं काय चाललंय, तो कसा आहे, असं विचारून गावमय होत. राशीनला जाता-जाता डॉक्टरांनी युवक क्रांती दलाची स्थापना, त्यांची आंदोलनं, राशीनमधले लढे, राशीनच्या पाटलांशी झालेले झगडे याविषयी सांगितलं.

त्यांच्या बोलण्यातून एक विशेष जाणवे. ते खूप संवादी बोलत. तमाशात जशा बतावण्या, सवाल-जवाब असत तसं ते चाले. चर्चा एवढी लाइव्ह करणारा माणूस माझ्या पाहण्यात अन्य कोणी नव्हता. गावात पाटीलशाहीचा अंमल किती प्रभावी आहे, हे सांगताना डॉक्टर सांगत... गावात पाटील म्हणतो, “काय रे गणप्या, कसं?” गणप्या लागलीच म्हणे, “मालक, तुमी म्हंत्याल तसं.” ग्रामीण भागातले असे असंख्य लाडके संवाद म्हणत डॉक्टर चर्चा रंगवीत जात. पण ही चर्चा मनोरंजनातून लगेच उंच वैचारिक पातळीवर जाई. सरंजामशाही, पाटीलशाही संपवून युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी (युक्रांदीयांनी- हा  शब्द डॉक्टरांचा जीव की प्राण) गावात लोकशाही कशी आणली, हे ते पोटतिडकीने कथन करत. आपण त्या काळातच आहोत, असं वाटे.

मी संगमनेर तालुक्यातील खेडेगावातला. शेतकरी कुटुंबातला. गावगाडा अनुभवलेला. मला डॉक्टरांचं विचारविश्व खूप जिवंत वाटे. माझं गाव आणि राशीन यात तसं काही अंतर दिसत नसे. गरीब, मागासांना, महिलांना गावगाडा कसा दाबतो; पाटील, टगे आणि दांडगे यांची दादागिरी गावात कशी चालते, हे डॉक्टर जेव्हा सांगत तेव्हा ते माझ्या गावाविषयी बोलताहेत असं वाटे. मग मीही राशीनमय होई.

राशीनची शाळा- नाव ः लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय- कशी सुरू झाली, जमीन कशी घेतली, झाडं कशी लावली, इमारत कशी बांधली, तिथले शेतीतले प्रयोग याची तपशीलवार वर्णनं डॉक्टर ऐकवीत. त्यात डॉ. बाबा आमटेंकडे ते कसे गेले, त्यांच्यापासून काय घेतलं, त्यांचं काय पटलं नाही- याचं विश्लेषण ऐकत राहावं, असं वाटे. या माणसाला प्रयोग करण्याची अनिवार ओढ आहे. हा नुसता चर्चाळू नाही, हे जाणवत असे.

पुणे ते राशीन आणि उलट राशीन ते पुणे या प्रवासात डॉक्टर सतत बोलत होते. मला त्याचं खूप कौतुक वाटे. हा माणूस एवढा बोलतोय; त्यात रीपिटेशन नाही, सतत नवा विषय. परत चर्चा रटाळ होत नसे. घडीत तिरकस कॉमेंट, घडीत विनोदी प्रसंग. पुढे लगेच तत्त्ववैचारिक मांडणी. मधेच साभिनय संवाद म्हणत एखादी घटना सांगत. मनात येई, काय अजब माणूस! एवढा मालमसाला याच्याजवळ कसा? नंतर उलगडे. डॉक्टर विद्यार्थिदशेपासून जे जगले-लढले ते समरसून... म्हणून त्यांच्याजवळ एवढं सांगण्यासारखं जमा झालेलं आहे. बरं, हा माणूस नुसता बोलत नाही; त्याचं वाचन अफाट आहे, हे कळे! इंग्रजी, हिंदी, मराठी महत्त्वाच्या पुस्तकांचे संदर्भ बोलण्यात येत.

राशीनची शाळा, विद्यार्थी, ग्रामविकासाचे प्रयोग, तिथली संस्था, माणसं यांच्यावर डॉक्टरांनी आईची माया लावलेली आहे, हे जाणवायचं. मी जो विचार करतो तो इथं उगवतोय, याचं समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसे.

डॉक्टर वरून तर्ककठोर वाटत; पण ते खूप हळवे आहेत, हे अनेक प्रसंगांत जाणवे. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्यावर डॉक्टरांची खास माया आहे, हे उमजे. त्यातही गांधी-जयप्रकाश यांची डॉक्टरांच्या जीवनावर गहिरी छाप दिसे. चर्चेत अर्ध्या तासात एकदा तरी गांधी-जयप्रकाश यांचं नाव-विचार येई, एवढी त्यांची या दोन महामानवांशी ऍटॅचमेंट जाणवे. जयप्रकाशांच्या तर बरोबर ते वावरले होते. तो ओलावा चर्चेत पाझरे.

एकदा आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या होस्टेलवर डॉक्टरांचं व्याख्यान घडवून आणलं. नितीन कोत्तापल्ले, अजित देशमुख, नारायण भोसले, दत्ता कोकाटे, अशोक अडसूळ यांचा त्यात पुढाकार होता. अजित सरदार आणि डॉक्टर दोघे आले. अजित सरदार जास्त बोलले नाहीत. म्हणाले, “कुमारला जास्त बोलता यावं म्हणून मी माझा वेळ त्याला देतो.” आणि त्यानंतर डॉक्टर जवळपास दीड तास बोलले... मग प्रश्नोउत्तरं झाली. खूप मजा आली. युक्रांदचे लढे, आणीबाणीतले संघर्ष, डॉक्टरांची तुरुंगवारी, विद्यार्थी आंदोलनं, जयप्रकाशांच्या भेटी, बिहारच्या दुष्काळातलं काम, मराठवाडा विकास आंदोलनं, विद्यापीठ नामांतर, मराठवाडय़ातले दलित अत्याचाराचे प्रश्न... आंदोलनं... इथपासून तर ‘नवा विचार काय केला पाहिजे, कोणते जुने विचार टाकले पाहिजेत’ अशी धुंवांधार मांडणी डॉक्टरांनी केली. हे व्याख्यान म्हणजे एक उद्बोधनच ठरलं. उद्बोधन हा डॉक्टरांचा खास लाडका शब्द. प्रबोधनाच्या पुढचा टप्पा. प्रबोधन म्हणणं त्यांना काही तरी अपूर्ण वाटे. शब्द वापरण्यात डॉक्टर खूप काटेकोर.

या व्याख्यानानंतर मला एक नाद लागला- स्वतःला पडलेले प्रश्न डॉक्टरांना भेटून विचारायचा. ते प्रश्न कसेही असोत, डॉक्टरही त्याला गांभीर्याने उत्तरं देत. त्या प्रश्नांभोवती चर्चा रंगवत. माझा अहं सुखावे. एवढा मोठा माणूस आपल्या प्रश्नांना गांभीर्याने घेतो, हे मनोमन आवडे. या नादापायी मी सत्याग्रहीचं ऑफिस सतत गाठी. तिथं रेंगाळत राही. राजन खान तेव्हा सत्याग्रहीचं संपादन करत. ते होते मायाळू, पण नुसती रिकामटेकडी चर्चा करणार्या पोरांवर वसकत. मला म्हणाले, “काय रे नुस्त्या क्रांत्या करणार्या बाता मारतोस; काही कामं करा की जरा. रिकामा वेळ घालवू नका. गमज्या मारू नका. आणखी एक- जरा वाचा की मूलभूत अशी पुस्तकं...” राजन खान आमच्यावर तडकत, तरी सत्याग्रहींवर जाण्याचा नाद चालूच राहिला. एकदा एक लेख लिहून राजन खानांकडे दिला. त्यांनी त्याची घनघोर चिरफाड केली. मी नाराज झालो. धसका घेतला की, आपल्याला लिहिताच येणार नाही यापुढे.

डॉक्टर सत्याग्रहीवर असले की, हमखास जायचो. संजय आवटे, विनोद शिरसाठ, सुगंध देशमुख, राजेंद्र अनभुले, असीम सरोदे यांपैकी कुणी बरोबर असेल, तर डॉक्टर जास्तच खुलत. संजय करमाळा तालुक्यातला. डॉक्टरांनी तिथून आमदारकीची निवडणूक लढविलेली. निवडणूक प्रचाराचे किस्से सांगताना डॉक्टर रंगून जात. विनोद पाथर्डी तालुक्यातला. हा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग. डॉक्टरांनी इथून लोकसभा दोनदा लढवली. नगरचे मतदार कसे खट-हुशार, हे ऐकावं ते डॉक्टरांच्या तोंडून. सुगंध हा अकोले तालुक्यातला. मग मधुकर पिचड, आदिवासींचे प्रश्न यावर चर्चा नेत. असीमचे वडील गांधीवादी, सर्वोदयी. मग सर्वोदयी लोकांच्या गमतीजमती सांगत. त्यांच्या त्यागाबद्दल आदर ठेवून, त्यांच्या भाबडेपणामुळे काय भानगडी झाल्या, ते कथन करत. त्या वेळी गांधीवाद आमच्यापुढे उलगडत जाई.

विश्लेषण करण्याची विलक्षण मेथड डॉक्टरांकडे आहे. भाई वैद्य, बाबा आमटे, अण्णा हजारे, बाबा आढाव, चंद्रशेखर या प्रत्येकाचं भेदक विश्लेषण डॉक्टरांकडून ऐकायला मिळे. भाईंनी चहा प्यायला कसं शिकवलं, तो किस्सा डॉक्टरांनी अनेकदा रंगवून सांगितला. बाबा आढावांची भाषण करण्याची पद्धत बाबांविषयी आदर व्यक्त करत मिमिक्रीसह ते साभिनय सांगत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचं यश आणि मर्यादाही ऐकाव्यात डॉक्टरांच्या चर्चेत. ‘डॉक्टरांना हाऊस ऑफ ऍनालिसिस’ म्हणत, ते प्रत्ययास येई.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे डॉक्टरांचे वीक पॉइंट असावेत. एकदा मला म्हणाले, “चंद्रशेखर परंदवडीत भारत यात्रा केंद्रात आलेत. तू येणार असशील तर चल. पुण्याच्या जवळच आहे. मी भेटणार आहे त्यांना.” मला संधीच दिसली. लगेच दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर गेलो. चंद्रशेखर एका हॉलमध्ये बसलेले, समोर माणसांचा गराडा. माजी पंतप्रधानांचा असावा तसा ताफा सभोवताली होता. चंद्रशेखर रुबाबदार माणूस, नेता वाटले. चंद्रशेखरांचे धाकटे भाऊ शोभावेत असे डॉक्टर भासले तेव्हा मला. तशीच दाढी. तसाच डोक्यावरचा केसांचा कोंबडा. उभट चेहरा. दरारा वाटावा असा चेहर्यावरचा भाव. हा चेहरा हसल्यावर मायाळू वाटे. चंद्रशेखर आणि डॉक्टर दोघंही गावाकडची माणसं वाटली तेव्हा. त्या दोघांचा संवाद खूप जवळिकीचा वाटला. एका कुटुंबातली माणसं बोलतात, तसला. थोरल्या अन् धाकल्या भावातलं हितगूज चालावं तसा. परंदवडीहून परताना डॉक्टर भारावून त्यांच्या आणि चंद्रशेखर यांच्या संबंधाबद्दल बोलत होते. चंद्रशेखरांमध्ये जयप्रकाशांना शोधताहेत डॉक्टर, हे जाणवलं तेव्हा.

आज डॉक्टरांबद्दल लिहिताना मनात येतं की, १९६५ ते ८५ या काळात हा माणूस राज्यात विविध चळवळी-घडामोडींत केंद्रस्थानी होता. युक्रांदीयांचा तर हीरोच होता. युक्रांदचा प्रभाव ८५ नंतर ओसरला; तरी युक्रांदने घडवलेले अनेक जण लेखन, कला, चळवळी, शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान, शेती, पत्रकारिता, राजकारण, स्त्री चळवळी, पर्यावरण चळवळी, स्वयंसेवी संस्था अशा नानाविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने काम करताना दिसतात. आपापल्या कामात योगदान देताना आढळतात. जातिमुक्त समाज, शेवटच्या माणसाला प्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समता, आदर्श ग्रामजीवन, धार्मिक-आर्थिक-सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संपूर्ण क्रांती हा युक्रांदचा अजेंडा घेऊन विविध क्षेत्रांत, विविध राजकीय पक्षांत युक्रांदीय ठसा उमटवताना दिसतात. त्या सर्वांवर डॉक्टरांची अमिट अशी छाप दिसते. ती माणसंही डॉक्टरांचं मोठेपण मान्य करतात. ‘आम्ही डॉक्टरांच्या वाटेनेच जात आहोत’, हे नोंदवतात.

हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, नीलम गोर्हे, रत्नाकर महाजन, सुभाष लोमटे, अन्वर राजन हे आणि यांसारखे शेकडो युक्रांदीय राज्यात काम करत आहेत. युक्रांदचा अजेंडा पुढे नेत आहेत. डॉक्टरांच्या प्रभावाखालील अशी हजारो माणसं महाराष्ट्र घडवण्यात खारीचा वाटा आज उचलत आहेत.

डॉक्टर सार्वजनिक जीवनात पन्नास वर्षे अथक काम करीत आहेत. आजही ते तरुण पोरं बघितली की, हरखून जातात. आईच्या मायेनं त्यांच्याशी बोलतात. त्यांच्यात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ संपूर्ण क्रांतीचं स्वप्न पेरण्याचा जीवापाड अट्टहास करतात. सत्याग्रहीच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा म्हणाले होते, “डॉक्टर, तुम्ही सत्याग्राही आणि आम्ही सत्ताग्राही.” या शब्दकोटीवर बालगंधर्व सभागृह खळखळून हसलं. पण मला वाटतं की, डॉक्टरांनी सत्याग्राही आणि सत्ताग्रही दोन्ही असायला हवं होतं का? त्यामुळे त्यांच्या ताकदीचा महाराष्ट्राला आणखी फायदा झाला असता, नाही का? तुम्हाला काय वाटतं?

rajak2008@gmail.com
Mob. : 9004315221
 


Tuesday, January 12, 2016

तुम्हांला महाराष्ट्राच्या मार्क झुकेरबर्गला भेटायचंय?














अजिंक्य लोहकरे या 20 वर्षांच्या तरुणाने एजेबुक हे फेसबुक आणि व्हॉटस्अॅपला मागे टाकणारे मोबाईल अॅप्लीकेशन शोधले. आणि भारतासह जगभर आयटी क्षेत्रात, सोशल मिडियात याला नवा मार्क झुकेरबर्ग असं म्हटलं गेलं. कोण हा अजिंक्य? त्याच्या शोधाचं असं काय महत्त्व आहे?

फेसबुक आणि व्हॉटस्अॅप यांना टक्कर देणारं एजेबुक हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवलं. त्यासाठी अॅपल या अमेरिकेतील कंपनीने अजिंक्य लोहकरेला दोन कोटी तीस लाखांचं वार्षिक पॅकेज ऑफर केलं. वीस वर्षांच्या अजून पदवीही मिळालेल्या अजिंक्यला एवढं यश मिळालं आणि देशभर त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱया वर्षाला अजिंक्य शिकतोय. सोशल मीडियात आणि न्यूज चॅनल्स्सह दैनिकांत या संबंधी बातम्या झळकल्यानंतर हा मुलगा कुठला आहे, याचा शोध सुरू झाला. ऐन दिवाळीत ही बातमी धडकली होती. मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याचं घर गाठलं तेव्हा माहिती पुढे आली, अजिंक्य शिवाजी लोहकरे हा कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर इथला आहे. या खेड्यामध्ये तो जन्माला आला. बारावी पर्यंत त्याचं शिक्षण स्थानिक माध्यमिक शाळेत झालं. बारावीनंतर तो भुजबळ नॉलेज सिटीत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी दाखल झाला. अजिंक्यच्या घरात कॉम्प्युटरबाबत किंवा उच्च शिक्षणाबाबत जागरूक असं वातावरण नव्हतंच मुळी. वडिलांचं गावात चपलांचं छोटं दुकान आहे. ‘अजिंक्य फुटवेअरअसं त्याचं नाव. वडील आणि भाऊ या दुकानात काम करतात. आईचं नाव मालन. त्या गृहिणीच आहेत. अजिंक्य कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला पहिल्या वर्षाला गेला तेव्हा त्याच्याकडे लॅपटॉपही नव्हता. कॉम्प्युटर कसा हाताळायचा याविषयी आत्मविश्वासही नव्हता.

मग अजिंक्यला कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अॅप्लिकेशन या गोष्टीत रस कसा निर्माण झाला? एवढं जगप्रसिद्ध आणि सोशल मीडियाला आतून, बाहेरुन बदलून टाकणारं क्रांती करणारं अॅप्लिकेशन त्याने बनवलं कसं? याची मुळं त्याच्या शालेय जीवनात दिसतात. त्याविषयी अजिंक्य म्हणतो, “मी काही फार हुशार विद्यार्थी नाही. दहावी-बारावीला मला जेमतेम फर्स्ट क्लास आहे. वर्गामध्ये शिक्षकांना वाटायचं, हा सर्वसाधारण मुलगा आहे. एक मात्र होतं, मी अनेकदा असं का? तसं का? असे प्रश्न शिक्षकांना विचारायचो. बऱयाचवेळा शिक्षक रागवायचे. याची काय कटकट, असं म्हणायचे. पण मी मात्र एखाद्या गोष्टीविषयी समाधान होईपर्यंत पाठपुरावा करत राहायचो. एखाद्या गोष्टी मागचा कार्यकारण भाव शोधायची सवय मला शालेय वयापासून होती. कॉलेजला ती वाढली.’’

अजिंक्य सांगतो, “कॉलेजला मला कॉम्प्युटरमध्ये रस निर्माण व्हायला लागला. आपण काही तरी केलं पाहिजे, अशी इच्छा बळावत होती. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची नुसती डिग्री घेऊन उपयोग नाही, हे दिसत होतं. ही डिग्री घेतलेले अनेक विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये काम करताना आम्हांला दिसायचे. दहा हजार रुपये पण पगार मिळत नाही, अशी अवस्था आहे. म्हणायला इंजिनिअर आणि सायबर कॅफेत काम पैसाही नाही. असे अनेक मित्र मी पाहिले. ही डिग्री घेऊन नोकरी मिळत नसेल, पैसा मिळत नसेल, प्रतिष्ठा मिळत नसेल तर तिचा उपयोग काय? या परिस्थितीमुळे आमच्या कॉलेजला मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय, हे सांगायची आम्हांला लाज वाटायची. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स् या कोर्सना प्रतिष्ठा आहे. कारण कंपन्यांमध्ये मोठा पगार मिळतो. म्हणून त्या कोर्सची मुलं आमच्यापेक्षा ताठ मानेने वावरत. आम्हांला मात्र खाली मान घालून चालावं लागे. मलाही परिस्थिती खटकली. स्वभावाने मी एकलकोंडा आहे. आपण काहीतरी नवे शोधू या. नुसता वर्गातला अभ्यासक्रम शिकू या नको. याविषयी मनात चलबिचल सुरू होती. रुटीन अभ्यासक्रमात मला रसही वाटत नव्हता.’’

पाठ्यपुस्तकातलं तीच तीच रटाळ माहिती आणि समिकरणं ऐकून, वाचून बोअर व्हायचो. त्यापासून दूर जात, कॉम्प्युटरशी सतत खेळायचो. सोशल मीडियातील अॅप्लिकेशन हाताळायचो. फेसबुक कसं बनवलं असेल? व्हॉट्अॅप कसं चालतं? ट्विटर कसं तयार केलं असेल? गुगलची कार्यपद्धती कशी चालते? इतरही छोटे मोठे सोशल मीडियातले अॅप्लिकेशन कसे तयार झाले असतील. ते कुणी केले? कसे केले? या प्रश्नांनी मला झपाटून टाकलं. रात्र रात्र जागायचो. प्रश्नांचा शोध घ्यायचो. रात्रंदिवस नेटवर सर्चिंग चालू होतं. नवनवी माहिती मिळवायचो.’’

एजेबुक नेमकं कसं आहे?
नवं काही शोधायचं, तयार करायचं या ध्यासाने पछाडलेल्या काळात अजिंक्यने एजेबुक तयार केलं. ते कसं केलं याची स्टोरीही मोठी भन्नाट आहे.

त्याविषयी अजिंक्य सांगतो, “आम्ही मित्र फेसबुक, व्हॉटस्अॅप वापरायचो. पण त्यात अनेक त्रुटी होत्या. त्याचा वापर करताना अनेकदा अडचणी येतात, हे जाणवायचं. मग त्या अडचणी दूर करण्यासाठी काय करता येईल याविषयी मित्रांमध्ये भन्नाट कल्पना लढवल्या जायच्या. कोण काय सांगे. तर एखाद्याची भलतीच, चमत्कारिक सूचना असे. विनोद चालायचे. असं करु या, तसं करा रे, अशा सूचनांचा पाऊस पडे. तारुण्य सुलभ कल्पनाच त्यात जास्त असत. व्यवहाराशी  त्याचा ताळमेळ नसे. पण मी ते एन्जॉय करायचो. मित्रांशी चर्चा संपल्यानंतर रात्रभर कॉम्प्युटरशी, लॅपटॉपशी खेळायचो. रात्रंदिवस अशा खेळण्यातून, विचार करण्यातून एजेबुकचा जन्म झाला. व्हॉटस्अॅपमध्ये फक्त 100 एमबी पर्यंत डाटा शेअरिंग करता येतो. ही अडचण असल्याने त्यावर मात करण्यासाठी एजेबुकमध्ये 2जीबीपर्यंत डाटा शेअरिंग होऊ शकेल अशी व्यवस्था मी केली. खेडेगावात इंटरनेट नसल्याने व्हॉटस्अॅप चालत नाही. मी एजेबुक अॅप्लिकेशनमध्ये इंटरनेट नसतानाही साडेतीन किलोमीटरच्या अंतरात मोबाईल डिव्हाईस कनेक्ट करून डाटा शेअरिंग करण्याची व्यवस्था केली. शिवाय व्हॉटस्अॅपमध्ये एकादा मेसेज फॉरवर्ड करताना तो प्रत्येकाला वेगळा फॉरवर्ड करावा लागतो. एजेबुकमध्ये मात्र सर्वांना एकदाच मेसेज फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय फेसबुक आणि व्हॉटस्अॅप ज्या सुविधा देतं त्या एकत्रितपणे एजेबुकमध्ये देण्यात आल्या आहेत. सोप्या भाषेत असंही म्हणता येईल की, व्हॉटस्अॅप आणि फेसबुक एकत्रित स्वरूपात वापरायला मिळणं म्हणजे एजेबुक होय. अशा प्रकारचा अॅप बनवणारा पहिला विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो.’’

एजेबुकचे फायदे काय?
एजेबुकमध्ये इंटरनेट कनेक्शन शिवाय डाटा शेअरिंग करताना तीन किलोमीटरच्या अंतरात मोफत शेअरिंग करता येतं. याला फक्त दीड मिनिटांचा वेळ लागतो. त्याचबरोबर तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल मोफत करता येणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून फेसबुक सारख्याच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता येतील. या अॅपवर लॉगईन केल्यानंतर तीन ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यात फॅमिली मेंबर, कास्ट मेंबर आणि ऑल वर्ल्ड असे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे मित्रांची संख्या वाढवता येईल. व्हॉटस्अॅपमध्ये मित्रांचा ग्रूप करताना संख्येची मर्यादा होती. शंभरच ग्रूप मेंबरर्स करता येतात. आता एजेबुकमध्ये 2500 पर्यंत ग्रूप मेंबर्स वाढवता येतील. याचा अर्थ असा की, जास्तीत जास्त डाटा शेअर करता येणं, जास्तीत जास्त लोकांचं नेटवर्पिंग करता येणं आणि तेही इंटरनेटची सोय नसलेल्या दुर्गम भागात, खेड्यापाड्यात ते करता येणं हे एजेबुकचं वैशिष्ट्य आहे. शिवाय हे अॅप युजर प्रेंडली आहे. अडाण्यातल्या अडाणी माणसालाही ते सहज वापरता येईल . कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱयांपासून तर गावातल्या शेतकरी मजुरांपर्यंत सर्वांना हे अॅप आपलेसे वाटणारे आहे.

20 वर्षांचा मुलगा पगार घेणार 2 कोटी 30 लाख
हे अॅप अजिंक्यने कॉर्पोरेट कंपन्यांना दाखवले. विप्रो, इन्फोसिस, फेसबुक सारख्या कंपन्यांनीही त्याला आकर्षक ऑफर दिल्या. कारण या अॅपचा उपयोगच तेवढा बहुगुणी आहे. फेसबुकने त्याला 1 कोटी 67 लाखांची ऑफर दिली. नंतर अॅपलने त्याला वर्षाला      2 कोटी  30 लाख विविध सवलतींसह देउढ केले. अॅपलची ऑफर मोठी असल्यामुळे अजिंक्यने ती स्वीकारली. अॅपल ही अमेरिकेतली कंपनी असली तरीही अजिंक्यला अॅपलच्या पुण्यातल्या ऑफिसमधूनही काम करता येणार आहे. इथे राहून त्याला त्याचं अर्धवट शिक्षणही पूर्ण करता येईल. 2016 या वर्षात एजेबुक हे अॅप लोकांना वापरायला मिळेल.

अजिंक्यने यापूर्वी इन्फोसिस कंपनीसाठी एक लॅपटॉप सिक्युरिटी सॉफ्टवेअरही बनवलं होतं. त्यासाठी तो काही काळ आस्ट्रेलियात सिडनी येथे या कंपनीच्या एका प्रोजेक्टवर कामही करून परत आला आहे. या प्रोजेक्टवर काम करताना खेडेगावातल्या अजिंक्यला नवं जग पाहायला मिळालं. दृष्टी व्यापक झाली. या व्यापक दृष्टीतूनच त्याची पुढच्या यशाची पायाभरणी झाली होती. त्याविषयी अजिंक्य म्हणतो, “मी खेडेगावातल्या शाळेत शिकलो. इंग्रजी फारसं उत्तम येत नव्हतं. गणितातही मी फार हुशार विद्यार्थी कधीच नव्हतो. मला, रूटीन शालेय अभ्यासक्रमात फारसा रसही नव्हता. अभ्यासक्रमाचा आपल्याला कंटाळा येतोय. वर्गात बसण्यात आपल्याला फार आनंद वाटत नाही. हे मला तेव्हा कळायचं. शालेय वयात मला मित्रही फारसे नव्हते. एकटाच असायचो. शिक्षक मला फार जवळ करत नसत. त्यांचं लक्ष वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांकडे असे. त्यांच्यादृष्टीने माझ्यासारखे विद्यार्थी सामान्य असायचे. फक्त पास होणारी मुलं म्हणून आम्हांला बघीतलं जायचं. पण त्याही काळात मला सतत नवं काही शोधावंसं वाटत असे. त्याविषयी आईशी मी गप्पागोष्टी करी. लॅपटॉप सिक्युरिटी सॉफ्टवेअर कॉलेजात पहिल्या वर्षालाच बनवलं आणि आपण जी वाट शालेय वयात शोधत होतो, ती सापडल्याची जाणीव मला झाली. सिडनीमध्ये राहत असताना खूप आत्मविश्वास आला. शालेय वयात माझ्यात न्यूनगंड होता. आपण काय सामान्य विद्यार्थी. आपण शिकून पुढे काय करणार? हे न्यूनगंड ऑस्ट्रेलियात गळून पडले. आणि आपणही कुणीतरी आहोत, काही तरी करू शकतो, या आत्मविश्वासाने मी भारतात परत आलो. त्या आत्मविश्वासानेच मला एजेबुक शोधण्यास मदत केली.’’

वेगळा शाळकरी मुलगा
अजिंक्यचे वडील शिवाजी काशिनाथ लोहकरे हे कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याजवळ छोटसं चपलांचं दुकान चालवतात. मुलाच्या या यशाने त्यांच्या चेहऱयावर सांगता येणारा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. मुलाबद्दल सांगताना ते म्हणतात, “शालेय वयात अजिंक्य वेगळा होता. इतर मुलांपेक्षा लाजाळू होता. घरामध्ये त्याचं एकट्याचंच काहीतरी चाललेलं असायचं. पण तो एवढं मोठं यश मिळवील याची आम्हांला कल्पना नव्हती. त्याला कॉम्प्युटर इंजिनिअEिरगला घातला तेव्हा आमच्या जवळ लॅपटॉप घ्यायलाही पैसे नव्हते. त्यासाठी कशीतरी जमवाजमव करावी लागली. मी चर्मकार समाजात जन्माला आलो. खूप गरिबी बघीतली. पण माझ्या कुटुंबात परिस्थितीशी सामना केलाच पाहिजे अशी शिकवण आहे. मी स्वत सायकलवर हिंडून गावोगाव, परिसरात सायकलच्या सिटचे कव्हर विकण्याचा व्यवसाय केला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आजचं छोटं दुकान उभं राहिलं. या संघर्षात माझी पत्नी मालन हिची सतत साथ लाभली. अजिंक्यला घडवण्यात तिचा मोठा वाटा आहे. अजिंक्यमध्ये वेगळं नवं काही करण्याची जी उर्मी आहे, ती त्याच्या आईपासून आली आहे असं मला वाटतं. आमच्या कष्टाचं अजिंक्यने चीज केलं. आता मला सर्वजण अजिंक्यचे वडील म्हणून ओळखतात. सन्मानाने वागवतात. कौतुक करतात. अजिंक्यचे महाराष्ट्रभर सत्कार झाले. खरोखर आमच्या कुटुंबाचे कष्ट कामी आले, याचे खूप समाधान आहे. अजिंक्यने असंच नवं काही करत राहावं. देशाच्या विकासात योगदान द्यावं. अशी आमची इच्छा आहे.’’

अजिंक्यचं कोळपेवाडीतलं घर अगदी साधं आहे. तीन खोल्या. त्यातलं एक स्वयंपाक घर. दुसरं सामान ठेवण्याची जागा आणि तिसरी खोली आलेल्या- गेलेल्यांच्या पाहुणचारासाठी. घरात गेल्यानंतर साधेपणा जाणवतो. गरिबीतून संघर्ष करीत पुढे आलेल्या कुटुंबाचा इतिहास त्यातून दिसतो.

आईच त्याची आयडॉल
अजिंक्यची आई त्याच्याविषयी भरभरून बोलते. अजिंक्यविषयी ती म्हणते, “तो लॅपटॉपवर काय खेळतोय हे आम्हांला समजायचं नाही. रात्रंदिवस सारखा काहीतरी करीत असायचा. कधी मी रात्री 2 वाजता उठून बघे तर त्याचं काहीतरी चाललेलं असायचं. जेवणाकडे लक्ष नाही. झोपेकडे लक्ष नाही. शिवाय त्याची प्रकृती नाजूक आहे. हवापाण्यात बदल झाला की ताबडतोब आजारी पडतो. जास्त ताणतणाव वाढला की तब्बेत बिघडते. मनानेही तो खूप हळवा आहे. आम्हांला त्याच्या एजेबुकमधलं काही समजत नाही. पेपरात, टिव्हीत बातम्या यायला लागल्या तेव्हा कळलं, काही तरी मोठं काम याने केलं आहे. आम्हांला त्याचा खूप अभिमान वाटतो.’’

अजिंक्यचे वडील म्हणाले तसं अजिंक्यने नवं काही करायचा गुण आईकडून घेतला. ते अगदी खरं आहे. अजिंक्यची आई कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अडचणीत असतानाच्या ओढाताणीच्या काळात सायकलचे सीटकव्हर बनवायची. या कव्हरमध्ये विविध कलर, विविध कलाकुसरी यांची भर टाकून आकर्षक कव्हर बनवायची. तिने बनवलेली कव्हर्स लोकांना आवडत. विक्री जास्त होई. नफा मिळे. यांच्याकडे चांगले सीटकव्हर मिळतात, असा अजिंक्यच्या वडिलांचा परिसरामध्ये नावलौकिक होता. तो आईचा वारसा आज अजिंक्य एजेबुकच्या माध्यमातून पुढे चालवतोय असं म्हणता येईल.

जातिव्यव्स्थेचा कोलदांडा 
आपल्या देशात गावगाड्यामध्ये राहणाऱया अठरापगड जातींकडे विविध व्यवसायांचं कौशल्य (स्किल) आजही शाबूत आहे. या लोकांकडे स्किल होतं पण जाती व्यवस्थेमुळे माणसाच्या विकासाला म्हणजे कौशल्य दाखवायला, त्यात अधिक संशोधन करायला आणि त्यातून नवं काही निर्माण करायला वर्षांनुवर्षे कोलदांडा घालून ठेवला आहे. त्यामुळे चर्मकार चांगल्या चपला बनवायचं ज्ञान असूनही बाटासारखा उद्योगपती बनू शकत नाही. गवंड्याकडे हरहुन्नरी कला असून सुद्धा तो डीएस कुलकर्णींसारखा  मोठा बिल्डर बनू शकत नाही. लोहाराला लोखंडाचं सारं काही कळतं पण तो लक्ष्मी मित्तल बनू शकत नाही. ही यादी विविध जातींबद्दल वाढवता येईल. सांगायचा मुद्दा असा की, जातिव्यवस्थेने हात छाटले, ज्ञान छाटले आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास रोखला. त्यामुळे खेड्यातून तंत्रज्ञान आणि संशोधन येऊ शकले नाही. जागतिकीकरणामुळे काही संधी मिळाल्या त्यात बहुजन समाजातून विविध जातीतली मुलं आता शिकायला लागली. जाती व्यवस्थेने घातलेला कोलदांडा ढिला होऊ पाहत आहे. नव्या संधी निर्माण होत आहेत. अशी नवी संधी अजिंक्यच्या वाट्याला आली आहे. या नव्या संधीचं सोनं करण्याची इच्छा असलेला अजिंक्य म्हणतो,‘मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून एजेबुक विषयी सांगायचे आहे. त्याचबरोबर राज्याच्या आणि देशाच्या आयटी क्षेत्रात मी योगदान देऊ इच्छितो. आयटी क्षेत्र आणि देशाच्या विकासासाठी माझ्याकडे काही कल्पना आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले तर मला त्या राज्यात निश्चित राबवता येतील. राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्या सारख्या नव्या कल्पना घेऊन काम करणाऱया तरुणांच्या मागे उभे राहील अशी मला खात्री आहे. आपल्या देशात परदेशी सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन वापरण्यापेक्षा देशातल्या तरुणांनी तयार केलेलं तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी सरकारने देशी संशोधकांना मदत करावी असं मी आवाहन करतो.’

अजिंक्यने बनवलेले एजेबुक हे अॅप  साधे सुधे नाही. मार्क झुकेरबर्ग याने फेसबुकची निर्मिती करून सोशल मीडियात जी क्रांती घडवली त्याच्या पुढची क्रांती अजिंक्यच्या एजेबुकने होऊ घातलीआहे. एवढं त्याचं महत्त्व आहे. या अर्थानं अजिंक्यला महाराष्ट्राचा मार्क झुकेरबर्ग असं म्हणता येईल.


...

(सौजन्य लोकमुद्रा जानेवारी 2016)

राजा कांदळकरसंपादकलोकमुद्रा
rajak2008@gmail.com