Thursday, January 7, 2016

संघात हिंदूंना प्रवेश मिळेल?













सत्ता ही विविध रूपांत आपल्या आसपास वावरत असते. सरकार, मंत्रिमंडळ, राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी हे सत्तेचे एक महत्त्वाचे रूप. त्यांचे वर्तन, स्वभाव, कारभार, व्यवहार, निर्णय आपल्या जगण्यावर भलेबुरे परिणाम करतात. या साप्ताहिक सदरातून राज्यातल्या सत्तावर्तनाची साधकबाधक चर्चा आणि सत्तावर्तनाच्या आत-बाहेरच्या कंगोऱ्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

काहींना या लेखाचा हा मथळा वाचून आश्चर्य वाटू शकेल, तर काहींना हा खोडसाळपणाही वाटेल. मात्र हा मथळा १९८० साली डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या एका लेखाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वतंत्र विचारांच्या हिंदूंना प्रवेश मिळेल काय, असा प्रश्न त्यावेळी साळुंखे यांनी विचारला होता. त्याचे अधिकृत उत्तर आजपर्यंत संघाने दिलेले नाही. कालच्या रविवारी संघाचे पुण्यात शिवशक्ती संगम शिबीर पार पाडले. जवळपास दीड लाख स्वयंसेवक आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे अनेक ज्येष्ठ सदस्यही त्यात सहभागी झाले होते. या संगमाचे बौद्धिक घेताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदी हीच आपल्या समाजाची ओळख असल्याचे सांगितले.

हा कार्यक्रम राज्यात संघ परिवाराची सत्ता आल्यानंतर दिमाखात होणे स्वाभाविक होते. पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात मारूंजी गावाजवळ साडेचारशे एकराच्या विस्तीर्ण जागेत हे शिबीर झाले. रायगडावरील राजदरबाराच्या रूपातील भव्य मंच उभारून संघाने स्वत:चे वैभव दाखवले. शिस्तबद्ध स्वयंसेवक, त्यांचे गणवेश, नियोजन यांचा गौरव झाला. पूर्वी असेच पुण्यात संघ शिबीर झाले होते. त्यावेळी स्वयंसेवकांच्या लांबच लांब रांगांची चर्चा रंगली, तेव्हा थोर लेखक पु. ल. देशपांडे म्हणाले होते, रांगेत मुंग्याही चालतात. त्यात काय एवढे विशेष? त्यावर वाद झडला होता. पु. ल. देशपांडे यांना सूचवायचे होते की, शिस्त, रांगा, संख्या, नियोजन ठीक आहे. त्याचा विधायक उपयोग झाला पाहिजे. तो झाला तर याला अर्थ आहे. नाही तर भव्यतेला अर्थ काय? असो. हा झाला इतिहास

....तर आता राज्यात संघाची सत्ता असताना हा भव्य शिबीर घेतले गेले. ते होत असताना संघ परिवाराच्या काही संघटना राममंदिर उभारणीची तयारी करत आहेत. त्याला या शक्तिप्रदर्शनाने जोर येणार आहे. या शिबिराला संघाने शिवशक्ती संगम असे नाव दिले होते. त्यातला हेतू स्पष्ट होता की, छत्रपती शिवरायांशी संघ स्वत:ला जोडू पाहत आहे. शिवरायांचे प्रत्यक्ष असे नाव आजपर्यंत संघाने कधी वापरले नव्हते. पश्चिम महाराष्ट्रात संघ शिवरायांचे नाव वापरून मराठा आणि बहुजन समाजाला संदेश देऊ पाहत आहे हे उघड आहे. पण शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना या मित्रपक्षालाही काही सुचवू पाहत आहे का? त्याविषयी पुढच्या काळात त्यांच्या वाटचालीत काही खाणाखुणा दिसू शकतील. शिवसेनेतून यावर काय प्रतिक्रिया येते तेही बघावे लागेल. संघाची भाषा नेहमीपेक्षा यावेळी काहीशी मवाळ दिसली. काही वादग्रस्त बोलले जाऊ नये याची पुरेपूर काळजी भागवतांनी घेतली. पण मुळात साळुंखे यांनी जो प्रश्न विचारला, तसे काही प्रश्न भागवतांच्या वक्तव्यातून उभे राहिले आहेत. त्यांविषयी चर्चा करणे अनाठायी ठरणार नाही. पहिल्यादा संघ स्वतंत्र विचारांच्या हिंदूंना प्रवेश देईल काय, हा प्रश्न बघू.

आजपर्यंत संघाचे वर्तन बघितले तर स्वतंत्र विचारांच्या हिंदूंचा स्वयंसेवकांनी तिरस्कारच केलेला आहे हे दिसून येईल. स्वत:ला हिंदूंचे संघटन म्हणायचे आणि स्वतंत्र विचारांच्या हिंदूंना दूर लोटायचे, असे संघ का करतो? याचे उत्तर शोधायचे तर संघाची विचारसरणी अभ्यासावी लागते. त्यात अनेक विसंगती आहेत. म्हणजे असे बघा- या शिबिरात भागवतांनी सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केला, पण शिबिरात सावित्रीच्या लेकी किती होत्या? मुळात संघ ही फक्त पुरुषांची संघटना आहे. स्त्रियांसाठी वेगळी सेविका समिती आहे. त्यामुळे संघ हा पुरुषपात्री प्रयोग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्धा स्त्री समाज, म्हणजे हिंदू महिलांविषयी संघाची दुय्यम भूमिका दिसते. ते असो.

मुद्दा असा की, स्वतंत्र विचारांच्या हिंदूंचे संघाला वावडे का आहे? तर हिंदू धर्म आणि संघ धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संघाचा धर्म पारंपरिक हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. संघ आपल्या स्वयंसेवकांमध्ये आपण वेगळे, खास लोक आहोत अशी अहंगंडाची भावना सतत पेरतो. इतर लोक हिंदू असले तरी पथभ्रष्ट, पतित असून त्यांना पावन करून घ्यायचे आहे. त्यासाठी खूप काम करायचे आहे, ही संघाची भूमिका आहे. त्यासाठी संघ प्रचारक तयार करतो. त्यांना वेगवेगळ्या भागांत प्रचारासाठी पाठवतो. ते स्वत:ला हिंदू धर्माचे प्रचारक म्हणवत नाहीत, तर संघाचे कट्टर समर्थक प्रचारक म्हणवतात. ते त्यांच्याशी सहमत नसणाऱ्या हिंदूंना पाखंडी म्हणतात. त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी भूमिका घेतात आणि आपल्या संघधर्माची शिकवण पुढे रेटतात. त्याला ते ईश्वरी कार्य मानतात.

कृष्ण, ज्ञानेश्वर हे यज्ञयागावर टीका करणारे हिंदू होते. त्यांना संघाने कधी फारसे जवळचे मानले नाही. राजा राममोहन रॉय, म. फुले या हिंदू धर्मातल्या कर्मकांडावर टीका करणाऱ्यांचा संघाने कायम दु:स्वास केला आहे. आता डॉ. आंबेडकरांचे नाव संघ घेऊ लागला आहे. पण त्यात तोंड देखलेपण जास्त आहे. डॉ. आंबेडकरांच्या जातीनिर्मूलनाच्या भूमिकेवर संघ तोंड उघडत नाही. सारा भारत बौद्धमय व्हावा ही डॉ. आंबेडकरांची इच्छा होती. त्याबद्दल संघ मौन पाळतो. या शिबिरातही भागवत म्हणाले की, कायद्याने समता येणार नाही. त्यासाठी संस्कार व्हावा लागेल. तो कोणता? भागवतांना ज्या पूर्वजांचा, त्यांच्या गुणांचा, संस्काराचा गर्व आहे, ते संस्कार आजपर्यंत कामी आले नाहीत म्हणून तर आजही हिंदू समाजात विषमता आहे. ती जावी असा भागवत उद्घोष करतात. मात्र नव्या समतावादी विचारांना नकार देतात, ही विसंगती संघ किती काळ लपवणार आहे कोण जाणे? हे संघविचार बाबासाहेबांच्या विचाराला छेद देणारे आहेत.

संघ स्वत: बद्दल हेतूत: काही भ्रम पेरतो. त्यातला एक मोठा भ्रम म्हणजे आम्ही नि:स्वार्थी समाजसेवा करतो. खरे तर संघ हे सत्ता मिळवण्याचे हत्यार आहे, हे संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्याच्या बंच ऑफ थॉट्स आणि वुई आर अवर नेशनहूड डिफाइन्ड या दोन पुस्तकांत त्यांची ही सत्ताप्राप्तीची भूमिका स्पष्ट झालेली आहे. संघाची वाटचाल बघितली तर जेव्हा संघ सत्तेच्या जवळ येतो, तेव्हा तो फोफावतो. आणीबाणीनंतरच्या जनता पक्षाच्या राजवटीचा संघाने देशभर संघटन वाढण्यासाठी उपयोग केला होता. त्याच काळात गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांत संघाने प्रशासन, शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे, उद्योग अशा विविध क्षेत्रांत हातपाय पसरले. आज ही राज्ये भाजपची मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात हे होत नव्हते, हे संघाचे दु:ख होते.

संघाची नागपूर ही जन्मभूमी आणि पुणे प्रेरणाभूमी आहे. पण तरीही महाराष्ट्रात संघाला स्वत:च्या बळावर आजवर सत्ता कधी मिळाली नव्हती. ती आता मिळाली आहे. त्याचे सेलिब्रेशन करणे आणि अधिक विस्ताराची तयारी करणे, यासाठी या शिबिराचे निमित्त होते. संघ सत्तेवर स्वत:चा दबाव ठेवू इच्छितो. मंत्रिमंडळाला भागवतांनी इशारा दिला की, तुम्हीच केवळ समाजाचे भले करू शकणार नाही. तुम्ही चांगले काम केले ते टिकायचे असेल तर समाज जागृत झाला पाहिजे. शक्तिवान झाला पाहिजे. समाज जागृत होणे म्हणजे संघ वाढणे. समाज शक्तिवान होणे म्हणजे संघाची शक्ती वाढणे, हे आडवळणाने भागवतांनी सांगितले. स्वयंसेवकांना ते बरोबर समजले असेल. ज्याच्याजवळ शक्ती त्याचे सत्य जग स्वीकारते, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यातून संघ स्वत:च शक्ती वाढवून सत्य पटवू पाहणार, हे लपून राहत नाही.

भागवतांच्या भाषणातून सरकारवर प्रभाव टाकण्याची संघाची रणनीती स्पष्ट झाली. याचा अर्थ असा की, सध्याच्या राज्य सरकारवर संघ स्वत:चा अजेंडा राबवावा म्हणून यापुढे दबाव वाढवेल. त्यासाठी ते शक्तिप्रदर्शन होते असेही म्हणता येईल. म्हणून संघाच्या या शिबिराकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. या शिबिरापूर्वी भागवतांच्या हस्ते मुंबईत जैन मुनी श्रीमद विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांचे मारू भारत, सारू भारत हे गुजराती भाषेतील पुस्तक प्रकाशित केले गेले. माझा भारत, सर्वांचा भारत हा विचार भागवत बोलले खरे, पण तो प्रत्यक्ष आचारणात दिसला तर देशाचा फायदा होईल. स्वतंत्र विचारांच्या हिंदूंकडे त्यांनी तिरस्काराने नव्हे, तर समजून घेण्याच्या भूमिकेतून बघितले तर भागवतांनी पुण्यात पाहिलेले एकतेचे स्वप्न प्रत्यक्षात यायला मदत होईल.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com


पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०५/०१/२०१६

Wednesday, January 6, 2016

पुन्हा एकदा राम के नाम ...











अशोक सिंघल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच माझ्या हयातीतच राम मंदिर उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर अयोध्येत ताबडतोब हालचाली सुरू झाल्या. विश्व हिंदू परिषदेने दगड, विटा जमा करणे सुरू केले. यामागचे खरे कारण आहे उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका. जसजशी या निवडणुका जवळ येतील तसतसे राममंदिराचे राजकारण पेट घेईल असे दिसते.

उत्तर प्रदेशातील अयोध्येतल्या राममंदिर उभारणी आंदोलनाविषयी जाणून घ्यायचे असेल तर नव्या पिढीने आनंद पटवर्धन यांचा राम के नाम हा वृत्तपट बघितला पाहिजे. रामजन्मभूमीचा वाद, रामरथ यात्रा, बाबरी मशिद पाडण्याचा संघ परिवाराचा पराक्रम आणि देशभर त्यानिमित्ताने पसरलेले उन्माद कसा होता, हे या वृत्तपटात बघायला मिळते. २ मार्च १९९७ पर्यंत या वृत्तपटावर बंदी होती, नंतर ती उठवली गेली. हा वृत्तपट पाहताना लक्षात येते की, राममंदिराचा वाद हा राजकीय होता. या मुद्द्याला संघ परिवार निवडणुका येताच कसा बढावा देतो. सोयीस्कररित्या कसा बासनात बांधून ठेवतो, हे वेळोवेळी दिसून आले आहे. बरोबर दीड वर्षांनी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बिहारात नाक कापले गेले. आता उत्तर प्रदेशात परत हार झाली तर संघ परिवाराचे पुरते कंबरडेच मोडेल. विशेषत: भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे राजकीय खच्चीकरण होईल. कारण अच्छे दिन आणू असे सांगत मोदी सत्तेवर आलेत. अच्छे दिन तर जाऊ देत, पण परिस्थिती बिघडत चालली आहे. अशा परिस्थितीत जनतेला गुंगवणारा भावनिक मुद्दा उभा केला नाही, तर भाजप, संघ परिवाराचे वस्त्रहरण लवकरच होईल.

हे वस्त्रहरण उत्तर प्रदेशात भाजप हरला तर ठळक दिसेल. ते होऊ नये म्हणून संघ परिवाराकडे राममंदिराचे महत्त्वाचे हत्यार आहे. १९९० साली भाजपची राजकीय परिस्थिती नाजूक होती. त्याआधी १९८४ साली फक्त दोन खासदार निवडून आले होते. या पक्षाला जनाधार नव्हता. अशा परिस्थितीत हातपाय हलवावे, जनाधार मिळवावा म्हणून भाजपने १९९० साली रामरथ यात्रा सुरू केली. जपानी टोयोटा गाडीला रामरथ नाव दिले. ही यात्रा गुजरातमधून सुरू झाली. तेव्हाचे भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी या यात्रेचे नेतृत्व करत होते. रथावर आक्रमक शैलीतील रामाचे चित्र लावले होते. अडवाणी जणू अंगात राम संचारला आहे, अशा जोशात भाषणे ठोकत वातावरण पेटवत निघाले होते. प्रमोद महाजन या चतुर, कुशल नेत्याच्या देखरेखीखाली उत्तम नियोजन सुरू होते. पुढे रथ चाले, मागून हिंसाचार उसळे.

राममंदिर आंदोलन पेटवण्यात संघपरिवाराचा तेव्हा आणखी एक हेतू होता. ऑगस्ट १९९० मध्ये तेव्हाचे पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केला होता. सारे मागासवर्गीय या मंडलचे लाभार्थी असल्याने ते आपल्यापासून दूर जातील ही संघ परिवाराची भीती होती. मागासवर्ग म्हणजे मधल्या जातींचा लोंढा रोखण्यासाठी संघाने राममंदिराचा भावनिक मुद्दा मंडल विरुद्ध कमंडलू असा उभा केला. अर्थात त्यावेळी संघाला त्या राजकारणत काही प्रमाणात यशही मिळाले. बाबरी मशीद तोडण्याच्या घटनेने या आंदोलनाचा शेवट झाला. ही भाजपने स्वत:चा पाय कुऱ्हाडीवर मारण्यासारखी कृती ठरली. त्यात भाजपची पिछेहाट तर झालीच, पण देशात धर्म-जातीयवादी राजकारणाने जे डोके काढले ते आजतागायत सुरूच आहे. त्यानंतर दंगली, बॉम्बस्फोट ही सत्रे सुरू झाली. शिवाय मनामनांत धर्मांधतेचा विखार साचून आहे तो निराळाच.

आता उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राममंदिराचा मुद्दा पुन्हा उपयोगी येईल अशी भाजपची रणनीती दिसते. त्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाला पुढे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणाची चावी दलित, मागासवर्ग आणि मुस्लीम मतदारांच्या हातात आहे. दलितांची ताकद मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या मागे उभी आहे. मागासवर्ग (मध्यजाती) आणि मुस्लीम मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आहेत. भाजप तीन कंबरवर आहे. अशा राजकीय परिस्थितीत मतदारांचे विभाजन करावे लागते. ते धार्मिक आधारावर करायचे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असे वातावरण पेटले तर दलित, मागासवर्गाची मते फुटतात. जातीवर धर्म एकदा हावी झाला की, बहुसंख्य मतदार स्वत:ची जात विसरून स्वत:ला हिंदू म्हणवून भाजपाई होतो असा अनुभव भाजपला आहे. कारण राममंदिर आंदोलन पेटवल्यावर १९९१ साली एकदाच उत्तर प्रदेशात बहुमत मिळाले होते. तेव्हा या राज्यात ४२५ पैकी २२१ जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर एकदाही या राज्यात भाजपला बहुमत मिळाले नाही.

सरकारी आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात २७ टक्के मागासजाती, २३ टक्के दलित आणि १६ टक्के मुस्लीम मतदार आहेत. या समीकरणामुळे उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव आणि मायावती यांना अनुक्रमे मागास आणि दलितांचे महानायक म्हणून मान्यता मिळाली. मागासवर्ग आणि दलितांमध्ये संघ परिवाराला कधीही मान्यता मिळालेली नाही. संघाने कल्याण सिंह, ओमप्रकाश सिंह आणि विनय कटियार असे मासबेस असलेले नेते उभे केले, त्यांना बळही दिले, पण तरी मुलायम व मायावतींची जादू काही ते कमी करू शकले नाहीत. मंडल विरुद्ध कमंडलू या राजकारणाचा फायदा मुलायम, मायावती यांनाच झाला. काँग्रेसही दिवसेंदिवस गाळात रुतली.

या राज्यात मुस्लीम मतदार मुलायम सिंहांना आपला मोठा भाऊ मानतो. मुलायमही स्वत:ला मुल्ला मुलायम असे अभिमानाने म्हणवून घेतात. त्यामागे मतांच्या राजकारणाचा भाग मोठा आहे. इथल्या मुस्लीम मतदारांची मानसिकता अशी आहे की, मुलायम आणि मायावती यांच्यापैकी जो संघ परिवाराला हरवेल त्याला मत देऊन घरी यायचे. त्यामुळे संघ परिवाराला मुस्लीम मते सोडून आपले राजकारणाचे गणित मांडावे लागते. या विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे तथाकथित वरिष्ठ जातीय राजकीय नेतेही निवडून येण्यासाठी मायावती आणि मुलायम यांच्या पक्षाची तिकिटे घेण्यात धन्यता मानतात. यामुळेच मायावतींमागे ब्राह्मण, राजपूत या जाती काहीकाळ उभ्या राहिल्या होत्या. हे राजकीय चित्र विस्कळीत करून नवी मतदाररचना उभी करायची तर संघ परिवाराला राममंदिर मुद्दा पुन्हा पुढे आणावाच लागेल. त्यादृष्टीने अशोक सिंघल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच माझ्या हयातीतच राममंदिर उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर अयोध्येत ताबडतोब हालचाली सुरू झाल्या. विश्व हिंदू परिषदेने दगड, विटा जमा करणे सुरू केले. खरे तर हा प्रश्न आता न्यायालयासमोर पुढील निर्णयासाठी अधिन आहे. न्यायालय राममंदिरासंबंधी जो निर्णय देईल, तो सर्व पक्षांना मान्य व्हावा, अशी अपेक्षा आहे. बाबरी मशीद अॅक्शन कमिटीच्या लोकांनी आम्ही न्यायालयाचा निर्णय मानू असे म्हटलेय. भाजपनेही न्यायालयाचा निर्णय आम्ही मानू अशी भूमिका घेतलीय. पण राममंदिर प्रश्नावर एकूण संघ परिवाराची भूमिका संधीसाधू राहिली आहे. विश्व हिंदू परिषदेची भूमिका संदिग्ध आहे. निर्णय बाजूने लागला तर ठीक, नाही लागला तर आम्ही म्हणतो तेच खरे करू. इथे वाद उभा राहतो. ही भूमिका धार्मिक हिंसाचाराला जन्म देते.

उत्तर प्रदेशची निवडणूक जशी जवळ येईल तसा हा मुद्दा आणखी पेटेल. आरक्षणाच्या मुद्द्याने जसा बिहार निवडणुकीत संघाला फटका बसला, तसा या निवडणुकीत मंदिर मुद्द्याने बसू शकतो का, अशी चर्चा सध्या होते आहे. ते कसे घडेल हे येत्या काळात कळेलच.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com


पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २९/१२/२०१५

Tuesday, January 5, 2016

पवारसाहेब, ढोंग ढासळणार कसे?


पवारसाहेब, तुमची माणसांना बरोबर घेऊन चालण्याची आणि कामाला लावण्याची क्षमता मोठी आहे. ती अनेकदा दिसली आहे. नव्या महाराष्ट्रासाठी नवा सर्वसमावेशक अजेंडा बनवला आणि साऱ्यांनी पुढे जायचे ठरवले तर ढोंग ढासळेल. राज्याला नवी वैचारिक कृतीशील ऊर्जा मिळेल. विकासाला गती मिळेल. अन्यथा ढोंग असेच चालू राहिल. आपण स्मार्ट सिटी करण्याच्या गोष्टी करत राहू. शेतकरी, ग्रामीण भाग मात्र भुकेलेला, तहानलेलाच राहील.


आदरणीय, 
शरद पवारसाहेब,

सप्रेम नमस्कार!
आपण नुकतेच पुण्यात पत्रकारांच्या कार्यक्रमात वर्तमानपत्र आणि पत्रकारितेबद्दल झणझणीत भाष्य केले. पूर्वी बातमी आणि अग्रलेख याकडे लोकांचे बारीक लक्ष असायचे. हल्ली वर्तमानपत्राचा ताबा व्यवहाराने घेतला आहे. त्यातून गडबडी ओढवल्या. अग्रलेखापेक्षा पेज थ्री संस्कृती महत्त्वाची बनली. या बदलाचे नव्या पिढीला आकर्षण वाटते. पण तुमच्यासारखे वाचक आऊटडेटेड झालेत, अशी खंत तुम्ही व्यक्त केलीत.

साहेब, आपण गेली ५० वर्षांहून अधिक काळ मराठी समाज, भारतीय समाज जवळून पाहत आहात. राजकारण हे क्षेत्र सर्वात महत्त्वाचे, कळीचे आहे. त्यात लोकनेते म्हणून तुम्ही वावरत आहात. त्यामुळे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांचे मोल मोठे आहे. या मतांमागे अनुभवाची शिदोरी असल्याने त्याबद्दल कुणाचे दुमत होऊ शकणार नाही. पण आपण मांडलेले निरीक्षण सर्वच क्षेत्रांला लागू पडेल, असे आहे. मूल्ये ढासळत आहेत ही तक्रार सर्व क्षेत्रांतून ऐकू येत आहे. उद्योग, शिक्षण, संस्कृती, आरोग्य, राजकारण, क्रीडा आणि अशा विविध क्षेत्रांत मूल्य घसरण सुरू आहे. आपल्या राज्यापुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्राचे जीवन खुरटे आणि दुबळे झाल्याची अनेकांची भावना आहे. भौतिक संपत्तीचे आपल्याला भान नाही. बौद्धिक सामर्थ्याचा विश्वास नाही. नवविचारांच्या संघर्षात जुने जीवन उदध्वस्त झालेय. नवे अजून निर्माण व्हायचेय. नव्या जीवनाच्या निर्मितीसाठी कोणती तत्त्वे पूरक म्हणून स्वीकारावीत; कोणती मूल्ये उन्नतीला पोषक आहेत; कोणती अंगीकारावीत, कोणती नाकारावीत, अशा एका संभ्रमाच्या मनोवस्थेत समाज आहे. त्यामुळे बौद्धिक अराजक सध्या पराकोटीला गेले आहे, अशी तक्रार जाणते लोक करत आहेत. पत्रकारितेबद्दल आपण व्यक्त केलेले मतही या बौद्धिक अराजकाचा भाग म्हणूनच गांभीर्याने घेण्यासारखे आहे.

साहेब, या अराजकाने गेल्या ६० वर्षांत आपल्या राज्यात, समाजात सर्व क्षेत्रे व्यापून टाकलीत. राजकारण हे क्षेत्र घ्या. समाजवादी नेते एस. एस. जोशी, यशवंतराव चव्हाण, नानासाहेब गोरे, नाथ पै, मधु दंडवते, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे अशा समाज पुढे नेणाऱ्या नेत्यांची परंपरा आता जवळपास संपली आहे. लोकांमध्ये राजकारणाबद्दल घृणा निर्माण झाली आहे. राजकारणातला माणूस तिरस्काराचा विषय झालाय. यात दोष नेत्यांचाही आहे. त्यांचे आर्थिक-राजकीय व्यवहार, त्यांच्या मालमत्ता, त्यांची घराणेशाही, त्यांचे हितसंबंध हे जनतेला समजत गेले. त्यातून त्यांच्यामध्ये आपण फसवले जातोय ही भावना वाढीस लागली. १९९० नंतर तर राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली. निवडून येणे हे सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. पैसा, कार्यकर्त्यांचे बळ, धाब्यावर जेवू घालण्याची नेत्याची ऐपत, जात दांडगेपण हे लोकनेता होण्याचे महत्त्वाचे गुण बनले. सायकलवर फिरणाऱ्या, एस.टी बसने प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेड्यात काढण्यात आले. गाडी जेवढी किमती, मोठी तेवढी नेत्याची पक्षांत उठबस, वट दांडगी असा शिरस्ता तयार झाला. सत्ता, पैसा, घराणेशाहीने राजकीय जीवन घृणास्पद बनले. त्यातून भ्रष्टाचाराचा भस्मासूर उगम पावला.

साहेब, हे सारे आपल्या अवतीभवती घडत होते. तुम्हाला ते खटकतही असेल. प्रवाहाचा रेटा एवढा की, या अराजकाने सारे पक्ष एक सारखे झाले. पक्षात अभ्यासू कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकिटे देणे बंद झाले. म्हणजे भाजपमध्ये माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्याकडे फक्त अभ्यास करून न्यूज चॅनेलवर चर्चेत भाग घ्यायचा एवढीच कामगिरी आली. काँग्रेसमध्ये हीच वेळ रत्नाकर महाजन, सचिन सावंत यांच्या सारख्यांवर आली. हे एक प्रकारचे नवे चातुर्वर्ण्यच आहे. या रहाटगाडग्यात नवे एस. एस. जोशी, रामभाऊ म्हाळगी, बाळासाहेब भारदे, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख तयार कसे व्हावेत? ही घसरण सर्व क्षेत्रांत उदाहरणांसह दाखवता येईल. सुमारांची सद्दी आली, गुणी बाजूला ढकलले गेले. हे असे का व्हावे? मुंबईत पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड हे अस्थिरोज तज्ज्ञ आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन त्यांनी केले होते. शुश्रृषा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सहकारी तत्त्वावर आरोग्य सेवेची चळवळ चालवतात. ते एकदा म्हणाले होते, “हे असे होण्याचे प्रमुख कारण असे की, आपण समाज म्हणून एक खूप मोठ्या ढोंगाला कुरवाळत आहोत. आपण खोटे बोलत आहोत. आपण समाज म्हणून स्वत:चे दोष लपवत आहोत. जोपर्यंत ढोंग ढासळणार नाही, तोपर्यंत आपल्याला या संक्रमणकाळातून पुढे जायला योग्य वाट सापडणार नाही. वाट सापडली तरी त्या दिशेने जायला ऊर्जा मिळणार नाही. आपण आपल्या ढोंगावर हल्ला केलाच पाहिजे.”

साहेब, हे ढोंग आपल्याकडे फक्त राजकारणी नेत्यामध्येच आहे असे नाही. त्या ढोंगाच्या मायाजालात तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, पत्रकार, उद्योगपती, नोकरशहा, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे सर्वजण अडकलेत. सारेच एका कोशात फिरताहेत. आपले काही चुकते आहे असे वाटणारे कमी आहेत. त्यांचा आवाज दुबळा आहे. या साऱ्याच क्षेत्रात सुमारांची शिरजोरी आहे.

आज समाजाला हलवू शकणारे साहित्यिक कुठे आहेत? साने गुरुजी समाज हलवू शकत, तरुणांना कृतीप्रवण करू शकत. झडझडून कामाला लावणारे किती साने गुरुजी आज आपल्या समाजात आहेत?

साहेब, तुम्ही ज्या स्थानावर आहेत तिथे तुमच्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. आणखी काही तुम्हाला मिळवायचे आहे, अशीही शक्यता तुमच्या बोलण्यातून दिसत नाही. तुम्ही ठरवलेत तर राज्यातल्या या परिस्थितीला नवी दिशा देऊ शकाल! जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आहे –
आदमी को जिंदगी में जब कोई नाजूक मक़ाम आया.
जुनूहीने कयादत की खुलूसे ग़मही काम आया.
(आयुष्यात मनुष्य जेव्हा नाजूक मुक्कामावर येऊन ठेपतो, तेव्हा वेडी भावनाच त्याला वाट दाखवते, पवित्र यातनाच त्याच्या उपयोगी पडतात.)

काळ नाजूक आहे, पण त्यातून निभाव वैतागाने किंवा त्राग्याने लागणे अशक्य आहे. वेडे प्रेम आणि सात्त्िवक दु:ख हीच आशा सामाजिक कसोटीच्या वेळची दोन अस्त्रे असतात. तीच कामी येतात.

तुमची माणसांना बरोबर घेऊन चालण्याची आणि कामाला लावण्याची क्षमता मोठी आहे. ती अनेकदा दिसली आहे. नव्या महाराष्ट्रासाठी नवा सर्वसमावेशक अजेंडा बनवला आणि सारे विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, साहित्यिक, उद्योगपती यांनी एका दिशेने पुढे जायचे ठरवले तर ढोंग ढासळेल. राज्याला नवी वैचारिक, कृतिशील ऊर्जा मिळेल. विकासाला गती मिळेल. अन्यथा ढोंग असेच चालू राहिल. आपण स्मार्ट सिटी करण्याच्या गोष्टी करत राहू. शेतकरी, ग्रामीण भाग मात्र भुकेलेला, तहानलेलाच राहील. आपण भारत महाशक्ती करण्याच्या बाता मारत राहू. बेरोजगारी, गुन्हेगारी वाढत राहील. आपण परदेशी विद्यापीठांना बोलावू. पाठ्यपुस्तके नाहीत म्हणून मुले आत्महत्या करतच राहतील. पुन्हा महाराष्ट्र हा देशात अग्रेसर आहे, हे छाती ठोकपणे सांगायला आपण मोकळे आहोतच. हे ढोंग ढासळण्यासाठी आपण काहीतरी करावे ही विनंती. थांबतो.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २२/१२/२०१५

Saturday, December 19, 2015

मस्तानी, तुला न्याय मिळाला नाही!

 

मस्तानी, इतिहासात, मराठी मुलखात, तुझी वाईट प्रतिमा रंगवणाऱ्यांनी तुझी बुद्धिमत्ता, तुझा प्रणामीपंथाचा वारसा, तुझे शौर्य, तुझी मुत्सद्दी वृत्ती, बाणेदारपणा, उदारवृत्ती, प्रामाणिकपणा या गुणांना झाकून ठेवले. प्रणामीपंथाचे थोर साधू मस्ताना यांचे स्मरण म्हणून तुझे वडील छत्रसाल यांनी तुझे नाव मस्तानी ठेवले. सुरुवातीचे तीन वर्षे तुझा संसार नीट चालला. तुला समशेर हा मुलगा झाला अन पेशवे कुटुंबात वादाची वादळे उठू लागली. त्यासाठी तुझ्या बदनामीचा घाट घातला गेला. तुला रखेल ठरवण्यापर्यंत मजल गेली. तुला दारुडी ठरवले गेले. खरे म्हणजे तुला रखेल ठरवणारे त्यांच्या स्त्रियांना तरी कुठे पुरुषांच्या बरोबरीचे मानत होते?


आदरणीय मस्तानी, एक मराठी माणूस म्हणून हे पत्र तुला लिहितोय. सध्या बाजीराव-मस्तानी या हिंदी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. त्यातली गाणी वादात अडकलीयत. पेशव्यांचे आणि तुझेही वंशज त्या वादात हस्तक्षेप करताहेत. त्यानिमित्ताने बाजीराव पेशवे, काशीबाई आणि तुझी चर्चा सुरू आहे.

मराठी कथा, कादंबऱ्या, इतिहासाची पुस्तके, चित्रपट, मालिका, घरादारातल्या चर्चा यामध्ये तुझा विषय अधूनमधून असतो. तुझी प्रतिमा, ओळख मराठी मुलखात बाजीरावाची रखेल अशी रंगवली गेली. नाची, कंचन अशी स्त्रीत्वाचा अपमान करणारी दूषणे तुला जोडण्यात आली. तुझी अशी एक ओळख सांगण्यात येते की, तू पान खायचीस, तेव्हा पानाची पिंक तुझ्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची. तू पान खाऊन सज्जात बसायची. आधीच पान खाणारी बाई म्हणजे वाईट चालीची असा समज. त्यात ती सुंदर आहे म्हटल्यावर तर गुन्हाच. आणि परत सज्जात बसते म्हणजे जवळपास बदफैलीच!

इतिहासात, मराठी मुलखात, तुझी ही अशी वाईट प्रतिमा रंगवणाऱ्यांनी तुझी बुद्धिमत्ता, तुझा प्रणामीपंथाचा वारसा, तुझे शौर्य, तुझी मुत्सद्दी वृत्ती, बाणेदारपणा, उदारवृत्ती, प्रामाणिकपणा या गुणांना झाकून ठेवले. प्रणामीपंथाचे थोर साधू मस्ताना यांचे स्मरण म्हणून तुझे वडील, छत्रसाल यांनी तुझे नाव मस्तानी ठेवले. छत्रसाल बुंदेलखंडाचे राजे होते. त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याची शिकवण देणारा प्रणामीपंथ स्वीकारला. वेद आणि कुराण यातला ईश्वर एक आहे असे सांगत इबादत (भक्ती) आणि पूजा यांचा समन्वय या पंथाने आपल्या अनुयायांना शिकवला. हिंदू-मुस्लीम भेद गाडून सर्व माणसे समान मानू, हे या पंथाचे वैशिष्ट्य आहे. समानता, धार्मिक सहिष्णूता आणि निरामय प्रेम भावना या पंथाने शिकवली. भगवान श्रीकृष्ण आणि महंमद पैगंबर यांना हा पंथ आदर्श मानतो. तो मूर्तीपूजा, कर्मकांड नाकारतो. देशभर प्रणामीपंथाचे अनेक थोर साधू-संत-फकीर होऊन गेले. मराठी मुलखात संत तुकारामांचे समकालीन संत शेख महंमद महाराज होऊन गेले. त्यांना शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी गुरूपद बहाले केले. ते प्रणामीपंथीय होते. मालोजीराजे यांनी या गुरूला श्रीगोंदे (जि. अहमदनगर) येथे मठ बांधून दिला होता. संत शेख महंमदांनी भागवत धर्म व प्रणामीपंथ यांच्या विचारांचा समन्वय घडवून भेदभाव विरहित भक्तितत्त्वाचा विचार मांडला. भेदाभेद आणि दांभिकतेवर प्रहार करणाऱ्या या प्रणामी पंथीय संताचा मराठी मुलखाला मोठा वारसा आहे. संत महमंदांचा एक अभंग आहे –
भुते मागती सांडणे
नर्क त्यांच्या हो भजणे
मागोन करविती हिंसा
भक्त उद्धरेल कैसा
पाणी पाषाण प्रतिमा
तेथे उन्मत्त होती जमा
वोळखीन ज्ञानदृष्टी
शेख महंमद निजभेटी

असा पाखंडी चालीरीतींवर प्रहार करत सामाजिक एकता आणि विवेकवादी, ज्ञानदृष्टीची शिकवण देणाऱ्या प्रणामीपंथाचा वारसा तू पुण्यात घेऊन आलीस. तुझ्याबरोबर वडिलांचा लोकोत्तर वारसाही होता. तुझे वडील काही साधासुद्धा माणूस नव्हते. राजा छत्रसालाला लोक प्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उदगाते, बुंदेलखंडाचे भाग्यविधाते म्हणत. आजही त्या भागात देवाआधी तुझ्या वडिलांची पूजा केली जाते. छत्रसाल महाबली, कर दे भली, कर दे भली अशी प्रार्थना म्हणून आजही लोक छत्रसालाचे आशीर्वाद घेतात. आलम दुनियेत असे प्रेम कुण्या राजाच्या वाट्याला आले नसेल. अशा वडिलांची तू लाडकी कन्या होतीस.

पराक्रमी, लोकोत्तर वडिलांचे तुझ्यावर संस्कार झाले. नृत्य, गायन, तलवारबाजी, तिरंदाजी या विद्येत तू लहानपणापासून प्रवीण झालीस. संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांच्या अभंगरचना तुला तोंडपाठ होत्या. कुराण, उर्दू साहित्याचा तुझा अभ्यास होता. जन्मानेच तुला वैभव लाभले. गजान्त लक्ष्मीचा तुला अनुभव होता. असे म्हणत की, तुझ्या अंगरख्याला गुंडी म्हणून हिरे झळकत असत. तुझा नवाबी थाट पोशाख आणि चालीरीतींत दिसे. तुझा बाजीराव पेशव्यांशी खांडा पद्धतीने विवाह झाला. विवाहावेळी छत्रसालाने बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. पन्ना इथल्या हिऱ्याच्या खाणीतला तिसरा हिस्साही भेट दिला. बुंदेलखंडावर संकट आणणाऱ्या महमंद बंगशाला अडवले, पराभूत केले म्हणून ही भेट होती.

बाजीरावासोबत तू पुण्यात आलीस. मराठे मुलुख आणि बुंदेलखंडाचे नाते यानिमित्ताने प्रस्थापित झाले. पेशव्यांनाही बुंदेलखंडाशी नाते होणे गरजेचे होते. कारण दिल्ली ताब्यात ठेवण्याचा रस्ता बुंदेलखंडातून जात असे. बुंदेलखंड कायम मोगलांचे शत्रू राज्य होते. हा श्रीमंत प्रदेश होता. तो आपल्या सोबतीला राहावा अशी बाजीरावांची धोरणी दृष्टी होती. मराठी मुलुख आणि बुंदेलखंड मैत्रीचे प्रतीक म्हणून बाजीराव आणि तुझ्या विवाह झाला असला तरी तुमचे नाते काही राजकीय व्यवहाराचा भाग नव्हते. बाजीरावाचे तुझ्यावर खरे प्रेम होते. दोघांच्या एकमेकांवर पक्क्या निष्ठा होत्या. तुझ्या प्रणामीपंथाचा विचार बाजीरावाने अंगीकारला होता. तुझी मराठी मुलखावरची निष्ठा काळजातून आली होती. मराठी मुलुख तुला मनोमन आवडला होता.

बाजीरावाने तुला आणि तुझ्या प्रणामीपंथाला पुण्यात, शनिवारवाड्यात नेले, पण पुण्याला ते आव्हान वाटले. सुरुवातीचे तीन वर्षे तुझा संसार नीट चालला. तुला समशेर हा मुलगा झाला अन पेशवे कुटुंबात वादाची वादळे उठू लागली. समशेर पेशव्यांचा वारस होऊ नये यासाठी व्यूहरचना करण्यात आल्या. त्यासाठी तुझ्या बदनामीचा घाट घातला गेला. तुला रखेल ठरवण्यापर्यंत मजल गेली. तुला दारुडी ठरवले गेले. तू निजामाच्या रक्षेची मुलगी, शहाजन खानाची कलावंतीण म्हणून बिगर खानदानी, कमी प्रतीची, इतर स्त्रियांच्या बरोबरीची नाही असे ठरवले गेले. खरे म्हणजे तुला रखेल ठरवणारे त्यांच्या स्त्रियांना तरी कुठे पुरुषांच्या बरोबरीचे मानत होते? स्त्री ही पायातली वहाण, मुले पैदा करण्याचे मशीन अशीच भूमिका होती. त्यांनी तुला कमी मानले, हे त्यांच्या मनोभूमिकेला धरूनच घडले. पण इतिहास असे सांगतो की, तुझ्या आणि बाजीरावाच्या विवाहाला पिलाजी जाधव, राणोजी शिंदे, गोविंद पंत खेर, दावलजी सोमवंशी, नारोशंकर, तुकोजी पवार असे मराठ्यांचे सारे मातब्बर सेनापती, कारभारी उपस्थित होते. त्यांची खुशी तुमच्या दोघांसोबत होती. बाजीरावाची पहिली पत्नी काशीबाई हिच्यावरही अन्याय झाला नाही. बाजीरावाचे तुझ्याएवढेच तिच्यावरही प्रेम होते. तू शनिवारवाड्यात आल्यानंतरही काशीबाईंना तीन अपत्ये झाली. तुला पुण्याजवळ पाबळाला तीन गावे इनामे दिली. मोठी हवेली बांधून दिली बाजीरावाने. समशेरच्या मुंजेचीही तयारी सुरू झाली होती. त्यानंतर वाद विकोपाला गेले. समशेरला पेशव्यांचा वारस मानायला बाजीरावांच्या कुटुंबातली मंडळी तयार नव्हती. त्यात बाजीरावांचे अकस्मात निधन झाले. त्या धक्क्याने तूही हे जग सोडून गेलीस. समशेरलाही पेशव्याच्या कुटुंबाने, मराठी मुलखाने आपले मानले नाही.

खरे तर तू बाजीरावाची झालीस आणि पेशवाई भरभराटीला आली. मराठी राज्याची घोडदौड प्रगतीकडे सुरू होती. या राज्यावर, प्रजेवर तुझी बाजीरावाइतकीच निष्ठा होती. बुंदेलखंडाचे वैभव सोडून आई-बाप सोडून तू हजारो किलोमीटर दूरवर आलीस. मराठी भाषा शिकलीस. तू मराठी संस्कृती अंगीकारली. पण मराठी मुलखाने तुझ्याशी न्याय केला नाही. तुझा सन्मान करण्याऐवजी बदनामी, टिंगलटवाळी झाली. गेल्या ३०० वर्षांत तुझ्या लढाऊपणाचा, बुद्धिमान, सहिष्णू परंपरेचा सन्मान म्हणून एकाही मराठी माणसाने घरात एकाही नवजात बालिकेचे नाव मस्तानी ठेवले नाही. इतका या मुलखाने तुझा दुस्वास कसा केला? या मुलखात तुला न्याय मिळाला नाही, तुझा सतत अपमान झाला. एक मराठी माणूस म्हणून मस्तानी मी तुझी सपशेल माफी मागतो, बाई!

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : १५/१२/२०१५



Saturday, December 12, 2015

दोन महानेते आणि काही उणेदुणे













मुलायमसिंह यादव आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये साम्यस्थळे काय आहेत? त्यांची तुलना होऊ शकेल की नाही? दोघांच्या नेतृत्वशैलीत फरक काय आहेत? दोघांना कायमचे भावी पंतप्रधान म्हटले जाते. यात कौतुकाचाही भाग असतो, अनेकदा उपहासानेही त्यांचे विरोधक या वस्तुस्थितीचा वापर करतात. दोघे यावर्षी पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत. वयाच्या हिशेबाने मुलायमसिंह पवारांपेक्षा काही महिन्यांनी थोरले आहेत. गेली ५० वर्षे हे दोघेही देशाच्या जनमाणसावर स्वत:चा ठसा उमटवत आलेले आहेत. त्या निमित्ताने या लोकनेत्यांच्या राजकारणाविषयी चर्चा सुरू आहे. फळे लागलेल्या झाडाकडे काळजीने, मत्सराने पाहण्याची आपल्याकडची रीत आहे. दोघेही त्यांच्या त्यांच्या राज्याचे तीनदा मुख्यमंत्री होते. दोघांचीही मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द गाजली, वाजली आणि वादग्रस्तही ठरली. दोघेही देशाचे संरक्षणमंत्री होते. दोघांचीही पंचाहत्तरी धुमधडाक्यात सुरू आहे. विविध कार्यक्रम त्यानिमित्ताने होत आहेत.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, म्हणून महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन म्हणता येईल. उत्तर प्रदेश म्हणजे छोटा भारत . हे राज्य देशाच्या राजकारणाला दिशा देते. देशाचा पंतप्रधान ठरवते. दिल्लीचे तख्त कुणाच्या ताब्यात असणार हे उत्तर प्रदेश ठरवतो. या अर्थाने हे राज्य देशाचे राजकीय इंजिन आहे. म्हणूनच अशा या दोन राज्यांतील मोठा जनाधार असणाऱ्या या दोन नेत्यांविषयी देशभर सतत कुतूहल राहिलेले आहे.

या दोन्ही नेत्यांची राजकीय जडणघडण १९६० च्या दशकात झाली. हा काळ देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. सर्वांना स्वराज्याचे सुराज्य करण्याचे वेध लागले होते. दारिद्र्य, अज्ञान, गुलामीतून बाहेर पडण्याची भूक साऱ्या समाजालाच लागली होती. देशात सुराज्य आणायचा रस्ता म. गांधींनी दाखवला होता. पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देश सुराज्याकडे वाटचाल करत होता. अशा वेळी बहुजन समाजातून, मध्यम जातीतून कर्तबगार तरुणांची एक पिढी जीवनाच्या विविध क्षेत्रांत पुढे येत होती. या पिढीचे नेते म्हणून शरद पवार आणि मुलायमसिंह पुढे आले. या दोघांनाही सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आहे. समाज अस्वस्थ होता. काळ गतीमान होता. त्यात या दोघांच्या जीवनाला दिशा मिळाली.

मुलायमसिंह हे उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या सैफई या गावातला, यादव जातीतला, शेतकरी कुटुंबातला मुलगा. एम.ए.,बी.टी. झाला. शिक्षक म्हणून काम करू लागला. त्याला कुस्तीची आवड होती. कुस्तीने त्याला जीवनात पुढे जायला रग, धमक दिली. शिक्षणाने विचार दिला. हा तरुण समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या सहवासात आला. लोहिया हे गांधींचे शिष्य. समाजवादाला त्यांनी भारतीय चेहरा दिला. भारतीय समाजातल्या जात या शोषण माध्यमाकडे त्यांनी लक्ष वेधले. जातिव्यवस्था निर्घृण असून तिने केवळ इथल्या माणसांना गुलामच केले नाही, तर त्यांच्यातली सर्व निर्मितीक्षमता चिरडून, छाटून मारून टाकली याची प्रभावी मांडणी लोहियांनी केली. समाजवादाला त्यांनी जातिनिर्मूलनाची जोड दिली. जातीचे चटके सोसलेल्या मुलायमसिंहांना हा विचार झपाटून टाकणारा होता. ते लोहियांचे शिष्य, समाजवादी बनले. सामाजिक न्यायाच्या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते झाले. समाजात सर्व प्रकारची समता आणण्यासाठी झटण्याचे त्यांनी ठरवले. उत्तर प्रदेश या राज्यात जातव्यवस्थेचे जाळे तर जास्तच गुंतागुंतीचे आहे. उच्चजातीयांच्या उलट्या कर्तबगारीचे तिथले किस्से भयावह आहेत. दबलेल्या जातींना गुलामासारखे वागवण्याची तिथली अनेक उदाहरणे ऐकताना अंगावर काटे उभे राहतात. अशा राज्यात कार्यकर्ता म्हणून मुलायमसिंहांना काम करायचे होते. घरात वारसा नव्हता, विचार हीच प्रेरक शक्ती होती. कुस्तीची आवड असणाऱ्या या पैलवानाने विषमतेविरोधात शड्डू ठोकला.

या उलट शरद पवारांच्या आई डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या होत्या. घरात मार्क्स, लेनिन यांचे फोटो होते. लाल झेंड्याचा परिचय होता. समतेचे विचार लहानपणापासून माहीत होते. काटेवाडी या गावानेच बालवयात पवारांना समतेचा परिचय दिला होता. पवारांना पुण्यासारख्या प्रगत विचारांच्या शहरात शिकायची संधी मिळाली. विद्यार्थी असताना त्यांना यशवंतराव चव्हाणांसारखा नेता जवळून पाहायला मिळाला. चव्हाण मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांनी प्रभावीत झालेले. त्यांनी समाजवादाचा व्यवहारीदृष्ट्या सोयीचा आविष्कार असलेल्या सहकाराची कास धरली. सहकारातून समाजवादाकडे हा विचार अंगीकारला. पवारांना घरातल्या समाजवादाने भुरळ घातली नाही, तेवढी या व्यवहारी, उपयुक्त सहकाराने घातली. आज बारामतीत जे विकासाचे बेट उभे राहिले ते सहकारातूनच आकाराला आले आहे. सामाजिकदृष्ट्या पवारांचे विचार पुढारलेले आहेत. यशवंतराव जात मानत नव्हते, पण त्यांना मराठा समाजाचा नेता म्हणून मान्यता मिळाली. पवारही जात मानत नाहीत, पण त्यांचा उल्लेखही मराठा नेता असाच सतत केला जातो. दिल्लीत तर तो जास्त ठळकपणे होतो. पवारांनी अठरापगड जातींना बरोबर घेतले. सर्वच जातीतून नवे नेते घडवले. म्हणून राज्यातल्या छोट्यामोठ्या ओबीसी-दलित-आदिवासी-भटक्याविमुक्त समूहात पवारांविषयी प्रेम आहे. मराठा समाजानेही पवारांवर जीव लावला. या शिदोरीमुळेच त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करता आले. महिलांना सत्तेचा वाटा देता आला. मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करता आली, मुस्लीम ओबीसींना सवलती मिळवून देता आल्या. त्यातून पवारांची प्रतिमा एक सामाजिक न्यायवादी नेता अशी उभी राहिली.

मुलायमसिंह यांनी त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर मंडल आयोग, धर्मनिरपेक्षता, राखीव जागा हा अजेंडा पुढे रेटला. बाबरी मशीदविरोधी आंदोलन हाताळले. आज समाजवादी पक्षात उत्तर प्रदेशातल्या आठरापगड जातीतले नेते पुढे आलेले दिसतात. सुरुवातीच्या काळात मुलायम आणि कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष हातात हात घालून पुढे आले. दोघांचे अजेंडे एकसारखे असल्याने दोघांनाही त्यातून बळ मिळाले. हे दोन्ही पक्षच आज उत्तर प्रदेशचे तारणहार बनले आहेत. संघ परिवाराची नकारात्मक, समाजात दुही पेरणारी आंदोलने या राज्यात सतत सुरू असतात. ती निष्प्रभ करण्याचा फॉर्म्युला मुलायमसिंह यांनी मध्यम जातीच्या एकजुटीतून तयार केला आहे. त्या राज्यात मुस्लीम बांधव त्यांना मोठा भाऊ मानतात. ही त्यांच्या नेतृत्वाची मोठी विश्वासार्हता म्हणता येईल. ही विश्वासार्हता त्यांनी सतत केलेल्या सोशल इंजिनिअरिंगमधून तयार झाली आहे. म्हणून सारेजण त्यांना नेताजी म्हणतात. हे दोन्ही नेते ५० वर्षे आपापल्या राज्याचे नेतृत्व करत आले आहेत. पन्नास वर्षांच्या वाटचालीत या दोघांनी अनेक प्रश्न सोडवले. अनेक आव्हाने परतवून लावली. त्याबद्दल लोकांनी त्यांच्या कर्तबगारीला सलाम केला. मुलायमसिंहांना लोकांनी नेताजी ही पदवी दिली, तसे पवारांना महाराष्ट्र जाणता राजा म्हणून संबोधतो. असे असामान्य झालेल्या नेत्यांकडून लोकांच्या अपेक्षाही तेवढ्याच वाढतात. लोक या नेत्यांबद्दल जास्त पझेसिव्ह होतात. त्यांच्यावर जास्त जबाबदारी लादतात.

त्या भावनेतूनच महाराष्ट्रात पवारांकडे जास्त अपेक्षेने पाहिले गेले. एवढा मोठा महानेता आपल्याजवळ असताना राज्यातल्या असहाय्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाही, असे विश्लेषण केले गेले. शेतकरी मराठा समाजातले दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतेय. त्या समाजातल्या तरुण वर्गात रोजगार संधीचा अभाव असल्याने मोठा असंतोष खदखदतोय. या राज्यातली शेती, ग्रामीण समाज, गावगाडा जवळपास शेवटचे आचके देत आला दिवस ढकलतोय. तो केव्हाही मोडून पडेल अशी स्थिती आहे. या पडझडीत सर्वात जास्त झळ मध्यमजातींना पोचणार आहे. पवारांसारखा जाणता नेता आपल्याजवळ असताना हे होते आहे याची बोच आहे. हा काळाचा घाला असेल पण त्यावर काहीच उपाय नाही काय? पवारांनी या अरिष्टात हस्तक्षेप करावा, यासाठी लोक आशाळभूतपणे त्यांच्याकडे पाहत आहेत. शिक्षण, आरोग्य या व्यवस्थाही आजारी आहेत. लोक त्यात भरडले जाताहेत. राज्यातले सरकारही या प्रश्नांकडे गांभीर्याने बघत नाही.

अशीच भीषण परिस्थिती उत्तर प्रदेशातही आहे. रोजगाराचा अभाव, शेती अरिष्ट, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचे रोगटपण याचा सामना का करत नाही म्हणून लोक मुलायमसिंहांना दोष देत आहेत. या रोगटपणातून गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचा महारोग फोफावतो. असहिष्णुता धगधगते, धर्माची गिधाडे झेपावतात. दंगली होतात, दादरी कांड होते, गुन्हेगारी वाढते ही या रोगट व्यवस्थेची देण आहे.

शरद पवार-मुलायम सिंह हे काही फक्त त्या त्या राज्याचे नेते नव्हेत. ते देशाचे नेते आहेत. देशाला पुढे नेणाऱ्या दोन महत्त्वाच्या राज्यात त्यांना मान्यता आहे. या दोन राज्यांच्या समस्या या साऱ्या देशाच्याच आहेत. त्या सुटल्या नाहीत तर देशाचा गाडा अडेल. पंचाहत्तरी हे निमित्त. या निमित्ताने देशापुढच्या या आव्हानांना भिडण्याचा विचार या नेत्यांनी द्यावा, यासाठी लोक या दोघांच्या राजकारणाच्या उण्यादुण्यावर चर्चा करत आहेत. फळ लागलेल्या झाडावर दगड मारावाच लागतो. आपली ती परंपराच आहे!

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०८/१२/२०१५


Thursday, December 3, 2015

धर्मनिरपेक्षला भाजप-संघाचा आक्षेप जुनाच













संघ परिवाराचा फक्त धर्मनिरपेक्षतेला विरोध नाही तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, समाजवाद या मूल्यांसह संविधानालाच आक्षेप आहे. वाजपेयी सरकारने संविधान पुनरावलोकन समिती नेमली होती. संघाला अशोकचक्र, सत्यमेव जयते, जनगणमन राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज याबद्दल प्रेम नाही.

२६ नोव्हेंबरला संसदेत संविधान दिनी संविधानावर चर्चा झाली. लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली. केंद्र सरकारची आणि भाजपची भूमिका मांडताना त्यांनी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हा शब्द आम्हाला खटकतो, या शब्दाचा भारताच्या राजकारणात सर्वात जास्त दुरुपयोग झाल्याचे सांगितले. या शब्दाला आमची हरकत असल्याचे त्यांनी जाहीरपणे नोंदवले. राजनाथ सिंह ही भूमिका भाजपचे प्रवक्ते म्हणून मांडत असले तरी भाजप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय हत्यार आहे. भाजप नेहमी संघाची भूमिका राजकीय क्षेत्रात पुढे नेत असतो. संघ बोले, भाजप चाले अशी पद्धत आहे.

भाजप-संघाची धर्मनिरपेक्ष या शब्दाला हरकत का आहे, हे समजून घ्यायचे असेल तर मुळात संघाची संविधानाविषयीची भूमिका बघावी लागते. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९४७-४९ या काळात संविधान तयार होत होते, तेव्हा संघाचे नेते सतत संविधानविरोधी वक्तव्ये करत असत. त्यातून त्यांना संविधानाबद्दल किती तिटकारा वाटतो हे स्पष्ट होत असे. संविधानाचा मूळ पाया, चौकट, मूलभूत मूल्ये त्यांना मान्य नाहीत. आधी स्वातंत्र्यलढ्यात, नंतर संविधान बनवण्यात संघाचा काडीचाही सहभाग नव्हता. या संविधानाबद्दल म्हणूनच संघवाल्यांना प्रेम, आस्था, आदर वाटण्याचे काही कारण नाही. संघ कधीही आपल्या शाखा, कार्यालयावर २६ जानेवारीला वा १५ ऑगस्टला तिरंगा फडकवत नाही. स्वातंत्र्यदिन मानत नाही. संविधानात समता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समता ही मूल्ये नमूद करण्यात आली, त्याची प्रेरणा म. फुले, छ. शाहू महाराज, म. गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांतून आलेली आहेत. या महान नेत्यांबद्दल संघवाल्यांना तिटकारा आहे.

भारतात प्राचीन काळी बौद्ध प्रभावात काही प्रजासत्ताक राज्ये होती. त्यात लोकशाही होती. अध्ययन, अध्यापन करण्यासाठी विहार होते. समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा प्रभाव होता. मधल्या काळात वैदिकांनी हे सर्व नष्ट केले. वैदिकांनी प्रजासत्ताके नष्ट केली. मग फक्त राजेशाही राहिली. राजा हा धर्मानुसार वागणारा ठरला. विहार तोडण्यात आले. ज्ञानाच्या, समतेच्या परंपरांना सुरुंग लावण्यात आले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांनाच मूठमाती देण्यात आली. हे सर्व ज्या वैदिकांनी केले, त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत हे संघ परिवार गर्वाने सतत मिरवत असतो. ज्यांनी १९९२ साली बाबरी मशीद तोडली, त्यांच्याच क्रूर पूर्वजांनी भारताला अंधार युगात ढकलले. या अंधारयुगाचे गोडवे संघवाले आजही गातात.

मुद्दा असा की, संघवाल्यांची फक्त धर्मनिपरेक्ष शब्दाला हरकत नाहीए, तर संविधानालाच हरकत आहे. त्यातल्या सर्व तत्त्वांना विरोध आहे. तो का आहे याची अत्यंत विद्वत्तापूर्ण मांडणी संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांनी केली. त्यांनी बंच ऑफ थॉट्स 
( विचारधन) हे पुस्तक संविधानाला विरोध करण्यासाठी लिहिले. मूळ इंग्रजी ग्रंथ १९६६ साली प्रकाशित झाला. त्याची मराठी आवृत्ती १३ ऑगस्ट १९७१ रोजी हिंदुस्थान साहित्य या पुण्यातल्या संघाच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली. गुरुजी पंचवीस वर्षे संघाचे नेतृत्व करत होते. या ग्रंथातील विचार चुकीचे आहेत किंवा आम्हाला ते मान्य नाहीत असे आजपर्यंत झालेले संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंहजी, के. एस. सुदर्शन आणि आताचे मोहन भागवत यापैकी कुणीही सांगितलेले नाही. भाजपचे नेते, प्रवक्ते कधी या ग्रंथाला नाकारत नाहीत.

विचारधन मध्ये गोळवलकर गुरुजींनी भारतीय समाज, हिंदु-मुस्लीम संबंध, भारताचे संविधान या मुद्द्यांचा सविस्तर उहापोह केला आहे. गुरुजींना संविधानातील केवळ धर्मनिपेक्षताच नव्हे तर राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेची तत्त्वे मान्य नाहीत. व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारी एकता मान्य नाही. गुरुजी म्हणतात, समानता नव्हे तर सुसंवादित्व हवे. हा सुसंवाद धर्माच्या नियंत्रणामुळे निर्माण होणार. तो धर्म वैदिक धर्म हे ओघाने आले. संघाचा धर्म हिंदू धर्म नसून वैदिक धर्म आहे ही चलाखीही आपण समजावून घेतली पाहिजे. व्यक्ती व समाज यांच्या परस्परसंबंधाबद्दल संघवाले म्हणतात, समाजपुरुषात व्यक्ती गौण. तिला स्वतंत्र स्थान, भूमिका नाही. व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. स्वातंत्र नाही, व्यक्तीने स्वत्व अर्पण करून समाजात समरस व्हावे. विलिन व्हावे ही ती भूमिका आहे. वर्ग, जात, प्रांत, धर्म, भाषा यांचे अस्तित्व संघाला मान्य नाही. ते मान्य न करता समरसता स्थापन करण्याचा संघाचा विचित्र खटाटोप आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चातुर्वर्ण्याची गोळवलकर गुरुजींनी केविलवाणी भलावण केली. पुरोहित वगळता बाकी व्यक्ती कस्पटासमान आणि वैदिक धर्म श्रेष्ठ असा हा सिद्धान्त आहे. संघ जातीप्रथेचे समर्थन करतो. वैदिकांच्या मूल्यश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवतो. लोकशाहीबद्दल गुरुजींची काय भावना आहे पहा! ते म्हणतात, गणसत्तेपासून राजसत्तेपर्यंत अनेक शासनपद्धती आपण येथे राबवून बघितल्या. आपल्याला असे दिसते की पश्चिमेत ज्या राजेशाही शासन पद्धतीत पराकोटीचा जुलूम व रक्तरंजित राज्यक्रांत्या झाल्या, ती राजेशाही आपल्या इथे मात्र अत्यंत हितकारक ठरली. हजारो वर्षे चालत राहिलेल्या त्या शासन व्यवस्थेमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य होते आणि सर्वत्र शांततेचे समृद्धीचे साम्राज्य नांदत होते. (पान २१). लोकशाही राज्यव्यवस्था नको हे सांगण्यासाठी गुरुजी ही राजेशाहीची तळी उचलताहेत, हे उघड आहे.

भारत हे हिंदुराष्ट्र असल्याने ख्रिश्चन, मुसलमान यांना परके (एलियन्स) मानावे, त्यांना दुय्यम नागरिकत्व काही अटींवर द्यावे ही गुरुजींची भूमिका होती. आता संघवाल्यांचा ख्रिश्चन, मुसलमानांवरच फक्त राग आहे असे नाही. ख्रिश्चन, मुसलमान मुळात परके नाहीत. ते इथले भूमिपूत्र आहेत. सर्वांसारखा त्यांचाही या भूमीवर हक्क आहे. पण संघवाले त्यांच्याबरोबरच शीख, जैन, बौद्ध, लिंगायत, दलित, आदिवासी, ओबीसी यांच्याशीही दुजाभाव करतात. आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचा अपमान करणे, पददलितांना पावन करून घेण्याची भाषा करणे, शीख, जैन, लिंगायत, बौद्ध या स्वतंत्र धर्मांना वैदिक धर्माचा भाग आहेत हे जाहीर करून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे प्रकार संघ करत आला आहे. स्त्रियांचे समान हक्क, त्यांनी पुरुष वर्चस्वातून मुक्त होणे यालाही गुरुजींची हरकत आहे. गुरुजींची ही मते म्हणजे पुरोहित वर्गाशिवाय इतर साऱ्यांची मानहानीच होय.

धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझम. याचा अर्थ निधर्मी राज्य. आपल्या सरकारला कोणताही धर्म नाही. राजनाथ सिंह म्हणतात, धर्मनिरपेक्षतेऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द हवा. त्यांच्या मते सेक्युलॅरिझमचे भाषांतर चुकीचे झाले. ही खूप मोठी चलाखी आहे. राजनाथ पंथनिरपेक्ष शब्दमध्ये का आणतात हे राजकारण समजून घेतले पाहिजे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माप्रती राज्यसंस्था समान अंतर ठेवील... आदर ठेवील. भारत हिंदूराष्ट्र असल्याने ख्रिश्चन, मुसलमानांविषयी समान आदर का ठेवायचा ही खरी राजनाथसिंह यांची भूमिका आहे. इतर धर्म शीख, जैन, बौद्ध, लिंगायत हे हिंदू धर्माचे खरे म्हणजे त्यांच्या मते वैदिक धर्माचे उपपंथ आहेत. त्यांच्याविषयी पंथनिरपेक्षता चालेल, हेच ते संघ-भाजपचे राजकारण!

संघाचा समाजवादाला विरोध आहे. गुरुजी म्हणतात- हे विकृत तत्त्व पश्चिमेकडून आले. आता संघ परिवाराचे गंभीर राजकारण बघा. संविधानातील लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या संकल्पना म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण आहे असे गुरुजींना वाटते. पण भांडवलशाही आणि राजेशाही, पुरोहितशाही या कल्पना गुरुजींना आकर्षक वाटतात. साम्राज्यशाही भांडवलशाही ही कल्पना संघाला पाश्चात्य वाटत नाही. तिने लोकांना लुबाडले तरी संघ परिवाराची हरकत नाही. पण गरिबांची बाजू घेणाऱ्या समाजवादाला हरकत आहे. म्हणूनच जगातल्या गरिबांना ओरबाडणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेबद्दल संघ परिवाराला प्रेम वाटते. पाकिस्तानला शस्त्रे विकून उदध्वस्त करणाऱ्या, दहशतवाद वाढवणाऱ्या अमेरिकेबद्दल संघ ममता दाखवतो, अशी ही विचित्र भूमिका आहे.

थोडक्यात, संघ परिवाराचा फक्त धर्मनिरपेक्षतेला विरोध नाही तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, समाजवाद या मूल्यांसह संविधानालाच आक्षेप आहे. संघ परिवाराचे लाडके विचारवंत अरुण शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खोटा देव म्हणून घोषित केले होते. वाजपेयी सरकारने संविधान पुनरावलोकन समिती नेमली होती. एक सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी कॉन्िस्टट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड अशी मागणी २००० साली केली होती. गुरुजींनी घटनाकारांचे वर्णन पाश्चिमात्य कल्पनांच्या मागे वेडेपणाने धावणारे नेते असे केले होते. संघाला अशोक चक्र, सत्यमेव जयते, राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज याबद्दल प्रेम नाही. संघाला खरोखरच बाबासाहेब, संविधान यांबद्दल प्रेम असेल तर येत्या २६ जानेवारीला संघ शाखांवर, कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवावा... तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. अन्यथा या राजकीय चलाखीने लोकांमध्ये संभ्रम वाढत जाईल.


राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०१/१२/२०१५

Wednesday, December 2, 2015

स्मारके उदंड, नवविचार थंड!




























कुणाकुणाचे स्मारक करावे? कुठे करावे? सरकारी खर्चाने ते करावे का? स्मारकांतून खरेच प्रेरणा मिळते? कशा प्रकारचे स्मारक प्रेरणादायी ठरेल, समाजाला, राज्याला पुढे नेणारे ठरेल? अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेत नवे नवे मुद्दे पुढे येत आहेत. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, नेत्यांची स्मारके झाल्याने खरेच समाज पुढे जातो का? की स्मारके उदंड होत आहेत आणि नवविचार थंड आहे? नवविचाराला चालना कशाने मिळते? स्मारके ही कुणाची गरज आहे, समाजाची की वारसांची?

महाराष्ट्राने देशाला सतत नवविचार देण्यात पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात नेत्यांची एक मोठी प्रभावळ इथे तयार झाली होती. समाजचिंतक, विचारवंत, कार्यकर्ते यांची फळी या काळात राज्यात उभी राहिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, या भूमीत कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. विचारी लोकांचे मोठे दळ या राज्यात नेहमीच पाहायला मिळे. लेखक, पत्रकारांची प्रभावशाली मांदियाळी याच काळात इथे तयार झाली. नवविचार मांडणाऱ्या मंडळींनी मराठी समाजाची मान उंचावली होती.

आज स्मारकांची चर्चा सुरू असताना समाजातले चित्रे फारसे आशादायक नाही. एकेकाळी खुलेपणा हे आपल्या समाजाचे गौरवशाली वैशिष्ट्य होते. हा खुलेपणा आपल्या समाजजीवनातून हरवत चालला आहे. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारा आपला शत्रू, अशी शिकवण काही संघटना समाजात रुजवत आहेत. सर्वांनी शेळ्या-मेंढ्यांसारखे एका सूरात ब्या ब्या करावे अशी सक्ती केली जात आहे. खुनाचे समर्थन करणे हा खरे तर मानसिक रोग होय. जर्मनीत हिटलरच्या विचारांचे, कृत्यांचे समर्थन करणाऱ्यांना मनोरुग्ण (सायको) ठरवले जाते. कायद्याने त्यावर बंदी आहे. आपल्या समाजात खूनाचे समर्थन, खुन्यांचे समर्थन करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली जाते आहे. त्यांच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होतात. खूनी माणसांचे गौरवपर सोहळे, जयंत्या साजऱ्या करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. त्यांना आता समाजात प्रतिष्ठा मिळत आहे. मनोरुग्णतेचे गौरवीकरण होत आहे.

भीती बाळगणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, हिंसेचे समर्थन करणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत, असे आता जगभरच्या मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. पण आपल्या समाजात द्वेषपूर्ण, हिंसक भाषणे करणाऱ्यांना अमूकतमूक म्हणतात. त्याच्या अशा विखारी विचार, भाषणांना खास शैली आहे, असे म्हणून खुद्द पत्रकार गौरवताना दिसतात. तेव्हा आपल्या समाजात काही बिघडत चालले आहे, हे लक्षात येते. हिंसेचे समर्थन करणाऱ्यांना दवाखान्यात भरती करायचे सोडून त्यांचे जयजयकार होत आहेत.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खूनानंतर त्याचे समर्थन करणारे महाभाग खुलेआम दिसले. वर्तमानपत्रांनी त्यांच्या वृत्तांना खमंग प्रसिद्धी दिली. या महाभागांच्या पत्रकार परिषदा म्हणजे खुलेआम धमक्या, इशारे, द्वेष पेरणे असा कार्यक्रम होता. पण त्याविषयी कुणी फार झोड उठवली नाही. संपादकांच्या लेखण्या त्या विरोधात चालल्या नाहीत. हे आता आम आहे, हे चालायचे, असेच सर्वांनी मान्य करून गप्प राहणे पसंत करायचे? की आपण आतून हिंस्त्र बनत चाललो आहोत? बोथट झालो आहोत? सामंजस्य, उदारता या गोष्टी आता जणू लयाला जात आहेत. त्या बदल्यात हिंसक प्रतिक्रिया, संकुचित अस्मिता आणि उन्माद या गोष्टी प्रभावी ठरू लागल्या आहेत. कर्ते सुधारक संपादक गोपाळ गणेश आगरकरांचा या राज्याला वारसा आहे, त्या राज्यात संपादकच हिंसक अग्रलेख, दुही पेरणारे अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानू लागलेत. याला काय म्हणावे?

दुष्काळात माणसे मरत असताना स्मारकांवर सरकारी खर्च कशाला करता हे म्हणणारे आपल्या समाजात बहुसंख्येने निघू नयेत याचा अर्थ काय? आपला समाज नवविचार करायला नकार देतो आहे काय? हे कसल्या समाजरोगाचे लक्षण? विवेकशीलतेचे मूल्य आपल्या समाजातून लोप पावत चालले आहे की काय? का विवेकशीलता आपल्याला नकोच आहे?

आपल्या राज्यात लेखकांनी असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार परत केले. त्यावर खूप कडव्या प्रतिक्रिया उमटल्या. खूप लोक कडवट बोलले. राजकीय पक्षांच्या राजकीय प्रवक्त्यांना या लेखक-कवींबद्दल, त्यांच्या मतांबद्दल जराही सहानुभूती दिसली नाही. या प्रवक्त्यांनी मुजोरीने बजावले की, तुम्ही कुणाचे तरी हस्तक आहात. तुम्ही कट कारस्थानाच सहभागी आहात. हे प्रवक्ते लेखकांना तुम्ही लिहायचे बंद केले तरी काही फरक पडणार नाही एवढेच सुनवायचे बाकी राहिले होते. दुसरी बाजू ही हिणकस ठरवायची. तिचा तिरस्कार करणारी, नि:पात करायची भाषा काहींनी बोलायची, काहींनी त्यांना ठार मारायचे अशी ही कलाबाज व्यूहरचना दिसते. पण या विरोधात समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत कशा नाहीत? लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, अभिनेते, शास्त्रज्ञ, पत्रकार, हे समाजाचे डोळे असतात. म्हणून त्यांच्याकडे जास्त संवेदनशील माणसे म्हणून पाहिले जाते. या डोळ्यांना फोडणाऱ्या शक्तीविरोधात आपला समाज एकवटत कसा नाही? की आपल्याला डोळ्यांचे महत्त्वच नाही? आजची तरुणाई सोशल मीडियाचा वापर करण्यात पुढे आहे याचे कौतुक आहे. ही तरुणाई नवा विचार, वेगळा विचार मांडणाऱ्या, समाज पुढे नेणाऱ्या या संवेदनशील माणसांची नालस्ती चालू असताना काय करत होती? तर ती पुरस्कार परत करणाऱ्यांना शिवीगाळ करत होती. संपादक अग्रलेखांतून या वेगळा विचार करणाऱ्यांना दूषणे देत होते. पण मुळात हे का घडत आहे? ही वेळ कुणी आणली याचा विचार ना तरुणाईने केला ना थोर पत्रपंडित संपादकांनी. शब्दबंबाळ सामने रंगवण्यातच सर्वांनी मनापासून रस घेतला. पुरस्कार वापसी जशी सरकार विरोधात होती तशी ती अपप्रवृत्तींना पोसणाऱ्या, नवा विचार करण्याचे नाकारणाऱ्या समाजविरोधातही होती हे झाकून ठेवण्यात आले. त्यात माध्यमे पुढे होती. ज्यांनी नवविचारांचा आरसा व्हायचे त्यांनीच तो होण्याचे नाकारणे हे कशाचे लक्षण आहे?

महाराष्ट्र आज कोणत्या दिशेने निघाला आहे? असमंजसपणा, अस्मितांची संकुचितता, सनातनी आत्मगौरव, कालबाह्य परंपरांचे उदात्तीकरण, हिंसेचे समर्थन, खूनांचे समर्थन, या गोष्टी आज महाराष्ट्रात प्रतिष्ठित होऊ लागल्या आहेत. आज जे वातावरण आपल्या इथे आहे त्याची तुलना फेब्रुवारी १९१९ या वर्षी मुसोलिनीने इटलीत सुरू केलेल्या कारनाम्यांशी करता येईल. त्याने फॅसिस्ट संघटना बळकट केली. विरोधकांच्या सभा उधळणे, त्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न केले. अनेक विरोधकांचे खून केले. समाजात यथेच्छ अनाचार माजवून त्याने स्वत:ची दहशत माजवली. विरोधी विचारवंत, नेत्यांचे खूनसत्र घडवून विधिमंडळात स्वत:चे बहुमत स्थापन केले. नंतर स्वत: पंतप्रधान झाला. त्याने इटालियन जनता कलाबाज मार्केटिंगच्या तंत्राने, दहशतीने कब्जात घेतली.

या फॅसिस्ट संघटनेला त्यावेळच्या अनेक इटालियन लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञांनी पाठिंबा दिला होता. मुसोलिनीने इटलीत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने त्या समाजाची दशकभर नवविचारांशी फारकत झाली होती. फॅसिस्टांचे मार्केटिंग एवढे डोळे दिपवणारे, बुद्धी गुंग करणारे होते की, भले भले त्याला बळी पडले.

सांगायचा मुद्दा असा की, स्मारकांची केवढी रेलचल झाली आहे! त्यातून हितसंबंधीयांची दुकानदारी चालेल, बाकी काही होणार नाही. समाजात नवविचार वाढीला लागतील, अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. उलट ज्यांनी नवविचार मारले, त्यांची स्मारके सरकारी खर्चाने उभी करणे म्हणजे समाजाला आणखी गाळात घालण्याचे कृत्य होय. समाजाने याबाबत सजग राहिले पाहिजे. सतत जागरूक राहणे हीच स्वातंत्र्याची किंमत असते!

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २४/११/२०१५