Tuesday, January 5, 2016

पवारसाहेब, ढोंग ढासळणार कसे?


पवारसाहेब, तुमची माणसांना बरोबर घेऊन चालण्याची आणि कामाला लावण्याची क्षमता मोठी आहे. ती अनेकदा दिसली आहे. नव्या महाराष्ट्रासाठी नवा सर्वसमावेशक अजेंडा बनवला आणि साऱ्यांनी पुढे जायचे ठरवले तर ढोंग ढासळेल. राज्याला नवी वैचारिक कृतीशील ऊर्जा मिळेल. विकासाला गती मिळेल. अन्यथा ढोंग असेच चालू राहिल. आपण स्मार्ट सिटी करण्याच्या गोष्टी करत राहू. शेतकरी, ग्रामीण भाग मात्र भुकेलेला, तहानलेलाच राहील.


आदरणीय, 
शरद पवारसाहेब,

सप्रेम नमस्कार!
आपण नुकतेच पुण्यात पत्रकारांच्या कार्यक्रमात वर्तमानपत्र आणि पत्रकारितेबद्दल झणझणीत भाष्य केले. पूर्वी बातमी आणि अग्रलेख याकडे लोकांचे बारीक लक्ष असायचे. हल्ली वर्तमानपत्राचा ताबा व्यवहाराने घेतला आहे. त्यातून गडबडी ओढवल्या. अग्रलेखापेक्षा पेज थ्री संस्कृती महत्त्वाची बनली. या बदलाचे नव्या पिढीला आकर्षण वाटते. पण तुमच्यासारखे वाचक आऊटडेटेड झालेत, अशी खंत तुम्ही व्यक्त केलीत.

साहेब, आपण गेली ५० वर्षांहून अधिक काळ मराठी समाज, भारतीय समाज जवळून पाहत आहात. राजकारण हे क्षेत्र सर्वात महत्त्वाचे, कळीचे आहे. त्यात लोकनेते म्हणून तुम्ही वावरत आहात. त्यामुळे तुम्ही व्यक्त केलेल्या मतांचे मोल मोठे आहे. या मतांमागे अनुभवाची शिदोरी असल्याने त्याबद्दल कुणाचे दुमत होऊ शकणार नाही. पण आपण मांडलेले निरीक्षण सर्वच क्षेत्रांला लागू पडेल, असे आहे. मूल्ये ढासळत आहेत ही तक्रार सर्व क्षेत्रांतून ऐकू येत आहे. उद्योग, शिक्षण, संस्कृती, आरोग्य, राजकारण, क्रीडा आणि अशा विविध क्षेत्रांत मूल्य घसरण सुरू आहे. आपल्या राज्यापुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्राचे जीवन खुरटे आणि दुबळे झाल्याची अनेकांची भावना आहे. भौतिक संपत्तीचे आपल्याला भान नाही. बौद्धिक सामर्थ्याचा विश्वास नाही. नवविचारांच्या संघर्षात जुने जीवन उदध्वस्त झालेय. नवे अजून निर्माण व्हायचेय. नव्या जीवनाच्या निर्मितीसाठी कोणती तत्त्वे पूरक म्हणून स्वीकारावीत; कोणती मूल्ये उन्नतीला पोषक आहेत; कोणती अंगीकारावीत, कोणती नाकारावीत, अशा एका संभ्रमाच्या मनोवस्थेत समाज आहे. त्यामुळे बौद्धिक अराजक सध्या पराकोटीला गेले आहे, अशी तक्रार जाणते लोक करत आहेत. पत्रकारितेबद्दल आपण व्यक्त केलेले मतही या बौद्धिक अराजकाचा भाग म्हणूनच गांभीर्याने घेण्यासारखे आहे.

साहेब, या अराजकाने गेल्या ६० वर्षांत आपल्या राज्यात, समाजात सर्व क्षेत्रे व्यापून टाकलीत. राजकारण हे क्षेत्र घ्या. समाजवादी नेते एस. एस. जोशी, यशवंतराव चव्हाण, नानासाहेब गोरे, नाथ पै, मधु दंडवते, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब भारदे, वि.स. पागे अशा समाज पुढे नेणाऱ्या नेत्यांची परंपरा आता जवळपास संपली आहे. लोकांमध्ये राजकारणाबद्दल घृणा निर्माण झाली आहे. राजकारणातला माणूस तिरस्काराचा विषय झालाय. यात दोष नेत्यांचाही आहे. त्यांचे आर्थिक-राजकीय व्यवहार, त्यांच्या मालमत्ता, त्यांची घराणेशाही, त्यांचे हितसंबंध हे जनतेला समजत गेले. त्यातून त्यांच्यामध्ये आपण फसवले जातोय ही भावना वाढीस लागली. १९९० नंतर तर राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली. निवडून येणे हे सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. पैसा, कार्यकर्त्यांचे बळ, धाब्यावर जेवू घालण्याची नेत्याची ऐपत, जात दांडगेपण हे लोकनेता होण्याचे महत्त्वाचे गुण बनले. सायकलवर फिरणाऱ्या, एस.टी बसने प्रवास करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेड्यात काढण्यात आले. गाडी जेवढी किमती, मोठी तेवढी नेत्याची पक्षांत उठबस, वट दांडगी असा शिरस्ता तयार झाला. सत्ता, पैसा, घराणेशाहीने राजकीय जीवन घृणास्पद बनले. त्यातून भ्रष्टाचाराचा भस्मासूर उगम पावला.

साहेब, हे सारे आपल्या अवतीभवती घडत होते. तुम्हाला ते खटकतही असेल. प्रवाहाचा रेटा एवढा की, या अराजकाने सारे पक्ष एक सारखे झाले. पक्षात अभ्यासू कार्यकर्त्यांना निवडणुकीची तिकिटे देणे बंद झाले. म्हणजे भाजपमध्ये माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्याकडे फक्त अभ्यास करून न्यूज चॅनेलवर चर्चेत भाग घ्यायचा एवढीच कामगिरी आली. काँग्रेसमध्ये हीच वेळ रत्नाकर महाजन, सचिन सावंत यांच्या सारख्यांवर आली. हे एक प्रकारचे नवे चातुर्वर्ण्यच आहे. या रहाटगाडग्यात नवे एस. एस. जोशी, रामभाऊ म्हाळगी, बाळासाहेब भारदे, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख तयार कसे व्हावेत? ही घसरण सर्व क्षेत्रांत उदाहरणांसह दाखवता येईल. सुमारांची सद्दी आली, गुणी बाजूला ढकलले गेले. हे असे का व्हावे? मुंबईत पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड हे अस्थिरोज तज्ज्ञ आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन त्यांनी केले होते. शुश्रृषा हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सहकारी तत्त्वावर आरोग्य सेवेची चळवळ चालवतात. ते एकदा म्हणाले होते, “हे असे होण्याचे प्रमुख कारण असे की, आपण समाज म्हणून एक खूप मोठ्या ढोंगाला कुरवाळत आहोत. आपण खोटे बोलत आहोत. आपण समाज म्हणून स्वत:चे दोष लपवत आहोत. जोपर्यंत ढोंग ढासळणार नाही, तोपर्यंत आपल्याला या संक्रमणकाळातून पुढे जायला योग्य वाट सापडणार नाही. वाट सापडली तरी त्या दिशेने जायला ऊर्जा मिळणार नाही. आपण आपल्या ढोंगावर हल्ला केलाच पाहिजे.”

साहेब, हे ढोंग आपल्याकडे फक्त राजकारणी नेत्यामध्येच आहे असे नाही. त्या ढोंगाच्या मायाजालात तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, पत्रकार, उद्योगपती, नोकरशहा, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे सर्वजण अडकलेत. सारेच एका कोशात फिरताहेत. आपले काही चुकते आहे असे वाटणारे कमी आहेत. त्यांचा आवाज दुबळा आहे. या साऱ्याच क्षेत्रात सुमारांची शिरजोरी आहे.

आज समाजाला हलवू शकणारे साहित्यिक कुठे आहेत? साने गुरुजी समाज हलवू शकत, तरुणांना कृतीप्रवण करू शकत. झडझडून कामाला लावणारे किती साने गुरुजी आज आपल्या समाजात आहेत?

साहेब, तुम्ही ज्या स्थानावर आहेत तिथे तुमच्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. आणखी काही तुम्हाला मिळवायचे आहे, अशीही शक्यता तुमच्या बोलण्यातून दिसत नाही. तुम्ही ठरवलेत तर राज्यातल्या या परिस्थितीला नवी दिशा देऊ शकाल! जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आहे –
आदमी को जिंदगी में जब कोई नाजूक मक़ाम आया.
जुनूहीने कयादत की खुलूसे ग़मही काम आया.
(आयुष्यात मनुष्य जेव्हा नाजूक मुक्कामावर येऊन ठेपतो, तेव्हा वेडी भावनाच त्याला वाट दाखवते, पवित्र यातनाच त्याच्या उपयोगी पडतात.)

काळ नाजूक आहे, पण त्यातून निभाव वैतागाने किंवा त्राग्याने लागणे अशक्य आहे. वेडे प्रेम आणि सात्त्िवक दु:ख हीच आशा सामाजिक कसोटीच्या वेळची दोन अस्त्रे असतात. तीच कामी येतात.

तुमची माणसांना बरोबर घेऊन चालण्याची आणि कामाला लावण्याची क्षमता मोठी आहे. ती अनेकदा दिसली आहे. नव्या महाराष्ट्रासाठी नवा सर्वसमावेशक अजेंडा बनवला आणि सारे विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, साहित्यिक, उद्योगपती यांनी एका दिशेने पुढे जायचे ठरवले तर ढोंग ढासळेल. राज्याला नवी वैचारिक, कृतिशील ऊर्जा मिळेल. विकासाला गती मिळेल. अन्यथा ढोंग असेच चालू राहिल. आपण स्मार्ट सिटी करण्याच्या गोष्टी करत राहू. शेतकरी, ग्रामीण भाग मात्र भुकेलेला, तहानलेलाच राहील. आपण भारत महाशक्ती करण्याच्या बाता मारत राहू. बेरोजगारी, गुन्हेगारी वाढत राहील. आपण परदेशी विद्यापीठांना बोलावू. पाठ्यपुस्तके नाहीत म्हणून मुले आत्महत्या करतच राहतील. पुन्हा महाराष्ट्र हा देशात अग्रेसर आहे, हे छाती ठोकपणे सांगायला आपण मोकळे आहोतच. हे ढोंग ढासळण्यासाठी आपण काहीतरी करावे ही विनंती. थांबतो.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २२/१२/२०१५

No comments:

Post a Comment