Monday, October 12, 2015

नूरजहाँच्या बाळा, त्या महिलांनी विखाराला हरवले











आजच्या ते आणि आम्ही अशी फाळणी झालेल्या काळात अॅण्टॉप हिलच्या काही महिला भारतातल्या चांगुलपणाच्या प्रतिनिधी आहेत. अख़लाक़चा खून, दानिशच्या स्वप्नाचा मृत्यू, खानचे गाय वाचवणे, अॅण्टॉप हिलच्या हिंदू महिलांचा चांगुलपणा हे आपल्या देशातले संमिश्र वास्तव आहे. जगप्रसिद्ध गायिका शकिराचाही असाच जगाला सांगावा आहे.

नूरजहाँच्या बाळा,तीन दिवसांपूर्वीच तुझा जन्म झालाय. तू जन्माला आला, त्याची बातमी झाली. असे खूप कमी जणांच्या आयुष्यात घडते. मुंबईच्या अॅण्टॉप हिल परिसरातून तुझी आई- नूरजहाँ जात होती. अचानक तिला रस्त्यातच बाळंतकळा येऊ लागल्या. आता काय करावे? जवळच्या चाळीतल्या शहाण्या महिल्या धावल्या. त्यांनी तुझ्या आईला समोरच्या गणेश मंदिरात नेले. तिथे सुखरूप बाळंतपण केले. बाळ-बाळंतीण सुखरूप बघून सर्व महिलांनी मंदिरात आनंदोस्तव साजरा केला. एक महिला म्हणाली, छान बाळ आहे, गणेशच जन्माला आला की!

हिंदू महिला मुस्लिम महिलेचे बाळंतपण करताहेत... जन्माला आलेल्या तुला देवाच्या रूपात पाहताहेत. किती विलोभनीय घटना म्हणायची! हा आपल्या देशाचा खरा स्वभाव आहे. तो वारंवार दिसून येतो. सामान्य माणूस जात, धर्म, वर्ग, लिंग, भाषा या भेदांपलीकडे जाऊन दररोज जगतो. जशा अॅण्टॉप हिलच्या महिला जगल्या, वागल्या. असे चांगले वागल्याबद्दल त्यांचे कुणी गौरवसोहळे नाही करणार. त्यांनाही त्याची इच्छा नाही. गरज तर अजिबात नाही. चांगले वागणे हा सामान्य माणसे स्वत:ला मिळालेला मागच्या पिढ्यांचा वारसा समजूत पुढे चालवत असतात.

बाळा, तुझ्या जन्माच्या बातमी अगोदर आठवडाभरापूर्वी एक भयंकर घटना घडून गेली आहे. आपल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्लापासून ५० किलोमीटर अंतरावर बिसाहडा गावात ५२ वर्षांच्या मोहम्मद अख़लाक़ यांची त्यांच्या घरात बिफ शिजतेय या अफवेवरून अमानवी पद्धतीने हत्या झाली. त्याची चिथावणी शेजारच्या मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून दिली गेली. तुझा तर जन्मच मंदिरात झाला. किती मोठ्या विसंगतीत आपला देश जगतोय नाही? मुंबईतल्या अॅण्टॉप हिलच्या मंदिरात जीव जन्माला येतो आणि बिसाहडाच्या मंदिरात जीव घेण्याच्या कारस्थानाचा पुकारा होतो! हजारो माणसे एक दिलाने, निर्धाराने एक खून करतात. मंदिर ही देवाशी संवाद करण्याची जागा. इथे ती आपसातही हितगूज करतात...देवाची तशीच अपेक्षा असते. मुंबईतल्या मंदिरात चांगले काम झाले. पण बिसाहडाच्या मंदिरात वाईट घोषणा का झाली? हे कोण घडवते आहे? त्यासाठी कुणी विष पेरणी केली आहे?

बिसाहडा गाव उत्तरप्रदेशात येते. त्याच राज्यातल्या राजधानीच्या शहरात, लखनऊमधील एक घटना मोठी बोलकी आहे. इथे ऐशबाग हा हिंदूबहुल शहरी विभाग आहे. या भागात शीतल खेडा नावाच्या परिसरात शुक्रवारच्या दिवशी एक गीर गाय विहिरीत पडली. विहीर जुनाट, गाळाने भरलेली. लोकांनी क्रेन मागवली. गाय विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, पण जमले नाही. गाय विहिरीतल्या गाळात तडफडत होती. कुणी विहिरीत जाण्याचे धाडस दाखवेना. जवळून शुक्रवारच्या नमाज़साठी एक मुस्लिम तरुण जात होता. त्याचे नाव पेंटर मोजकी खान. तो गायीची परिस्थिती बघून थांबला. त्याने अंगावरचे कपडे उतरवले आणि क्रेनच्या मदतीने अंगाला पट्टे बांधून विहिरीत उतरला. गाय तडफडत होती. गायीची शिंगे त्याला खरचटली. थोडी जखमही झाली. धीर धरून त्याने गायीला चुचकारले. पट्ट्याने बांधले. बाहेर काढले. अर्धा तास हा खटाटोप चालू होता. खानची शुक्रवारची नमाज टळली, पण गाय वाचली.

गाय वाचवल्याबद्दल गौरव करावा अशी मोजकीची इच्छा नाही. त्यासाठी त्याने हे केलेलेही नाही. आपल्या समाजाने चांगुलपणाचा जो वारसा त्याच्यात पेरलाय, तो या घटनेतून उगवलेला दिसला एवढेच. अशी सर्व धर्मातली असंख्य अनाम माणसे दररोज सभ्यपणे वागताना दिसतात. त्याच्या ना बातम्या होतात, ना गौरवसोहळे. पण या देशाचे तेच संचित आहे. हा चांगुलपणा वाढवण्यासाठी लोक का पुढे येत नाहीत? उलट या संचिताला नख लावायचे काम काही लोक करत आहेत, त्यांच्यापासून सावध राहायला हवे. बिसाहडात माणसे हिंस्त्र झाली. त्यातून विद्रूप घटना घडली. आपल्या देशाचा विखारी चेहरा जगभर गेला. त्याला जबाबदार कोण?

बिसाहडात मारला गेलेल्या अख़लाक़विषयी आणखी एक गोष्ट. हा माणूस काही ऐरागैरा नव्हता. त्याने खस्ता खाऊन आपली मुले शिकवली. मोठा मुलगा मोहम्मद सरताज़ याला भारतीय हवाई दलात पाठवले. तिथे तो तांत्रिक खात्यात मोठ्या पदावर आहे. टेक्नीशियन म्हणून त्याच्याविषयी इंडियन एअर फोर्सचे प्रमुख चीफ मार्शल अरूप राहा यांना आस्था आहे. सरताज़च्या वडिलांना असे क्रूरपणे मारले गेले याचे दु:ख अरूप राहा यांनी जाहीरपणे व्यक्त केले. अख़लाक़ बरोबर त्यांचा छोटा मुलगा दानिश यालाही जमावाने घायाळ होईस्तोवर मारले. दानिश शिकत होता. त्यालाही भावाच्या पावलावर पाऊल ठेवून हवाई दलात भरती व्हायचे होते. त्याची तो तयारी करत होता. दानिश आता हॉस्पिटलात जगण्या-मरण्याची लढाई लढतोय. वडिलांचे डोळ्यादेखत मारले जाणे, स्वत:च्या आयुष्याच्या स्वप्नाचा चुराडा होत असताना दानिश कॉटवर पडून काय विचार करत असेल? दानिशला आता हवाई दलात घेतले जाईल काय? त्याचे स्वप्न मरेल की साकार होईल? अशी किती स्वप्न अजून खुडली जाणार आहेत?

बाळा, हे लिहिताना जगप्रसिद्ध गायिका शकिरा हिने आयलान कुर्दी आणि त्याच्या भावाला श्रद्धांजली वाहण्यासाठी गायलेले गाणे आठवतेय. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७० व्या अधिवेशनात हे गाणे तिने गायले. शकिरा ही युनिसेफची राजदूत आहे. जगभरातल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ती काम करते. हे इमॅजिन नावाचे गाणे जॉन लेनॉन या कवीने लिहिले आहे. ते असे -
कल्पना करा की, स्वर्ग नाहीए
आपल्या बुडाखाली नरकही नाहिए
वरती फक्त मुक्त आकाश आहे
आपल्याला भराऱ्या घ्यायला
कल्पना करा, सर्व लोक
‘आज’ साठी भरभरून जगताहेत.

कल्पना करा, कोणताही देश नाहीए
आणि धर्मही नाहीए
कुणासाठी मरायचे नाहीए
कुणाला कुणासाठी मारायचेही नाहीए

कल्पना करा, सर्व लोक खुशीत,
मस्त शांततेत जगताहेत.
तुम्ही म्हणाल, मी स्वप्नाळू आहे
पण मी काही एकटा नाहीए
मला आशा आहे,
एक दिवस तुम्हीही माझ्या सोबतीला याल
आणि त्यादिवशी जग एक होईल.

कल्पना करा, कुणी कुणाचे मालक नाहीए
सर्व स्वच्छंदपणे वावरतील
हाव आणि भूकेचा नायनाट होईल
बंधूभाव ओथंबेल
कल्पना करा, सर्व लोक पृथ्वीवर
होतील सारखेच हिस्सेदार
तुम्ही पुन्हा म्हणाल, हा वेडा स्वप्नाळू आहे
पुन्हा सांगतो, मी एकटा नाहीए
पक्की आशा आहे तुम्ही सोबत याल
एक दिवस ते घडेल
आणि अख्खे जग एक होईल
एकमय जगेल.

हे गाणे गाताना शकिरा गदगदून गेली होती. हे गाणे युट्युबवर आपल्याला ऐकता येते. त्या बापुड्या दोन वर्षांच्या कोवळ्या मुलाचा काय दोष होता? सिरियन निर्वासिताच्या पोटी तो जन्मला. कुटुंबाचे पोट भरेना म्हणून आसरा देईल त्या देशाकडे मदत मागायला निघालेल्या निर्वासितांच्या लोंढ्यात आयलान आणि त्याचा भाऊ आईसोबत एका बोटीतून निघाले होते. अपघात झाला. आईसह दोघेही भाऊ बुडून मेले. आयलानचा मृतदेह तुर्की देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला. त्या हृदयद्रावक घटनेची आठवण, त्यातले दु:ख या गाण्याने पुन्हा जगाच्या वेशीवर टांगले गेले आहे.

बाळा, अख़लाक़चा खून, दानिशच्या स्वप्नाचा मृत्यू, खानचे गाय वाचवणे, अॅण्टॉप हिलच्या हिंदू महिलांचा चांगुलपणा हे आपल्या देशातले संमिश्र वास्तव आहे. या वास्तवात विखारीपणा आज बळकट दिसतोय. या विखारीपणाला चाप कोण लावू शकेल? अख़लाक़ यांच्या सतरा वर्षांच्या मुलीने बापाला मारणाऱ्या विखारी जमावाला भिडणारा प्रश्न विचारला होता, आमच्या घरात बिफ शिजत नव्हते हे सिद्ध झाले, तर माझा बाप मला परत आणून द्याल काय? ही मुलगी विखाराला भिडली जरूर, पण बापाला वाचवू शकली नाही. कुणी सांगावे, तिला योग्य साथ मिळती तर विखाराचा पराभवही झाला असता. पण ती हरली. मात्र अॅण्टॉप हिलच्या महिला जिंकल्या. त्यांनी आजच्या ते आणि आम्ही अशी फाळणी झालेल्या काळात नूरजहाँला साथ दिली.बाळा, त्या महिला भारतातल्या चांगुलपणाच्या प्रतिनिधी आहेत. ते विखाराला कधीही जिंकू देणार नाहीत.

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०६/१०/२०१५

No comments:

Post a Comment