Tuesday, September 15, 2015

भाजपचे नवे टार्गेट टिपू सुलतान














हिंदुस्थानच्या भूमीवरून इंग्रजांना उखडवून त्याच्या देशात पळवून लावल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही अशी विष्णूपुढे दररोज पूजा-प्रार्थना करणाऱ्या टिपूचा भाजपवाल्यांनी द्वेष का करावा? देशप्रेमी, इंग्रजविरोधी टिपू त्यांचा नावडता का आहे? भाजपवाल्यांना मिसाईल मॅन कलाम यांच्याविषयी प्रेम आहे, पण कलाम ज्याला भारताचा पहिला मिसाईल मॅन म्हणाले होते, त्या टिपूविषयी प्रेम का नाही?

दक्षिण भारतात सध्या एक वाद खदखदतोय. म्हैसूरचा १८व्या शतकातला राज्यकर्ता टिपू सुलतान याच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने हा वाद उद्भवलाय. टिपू हा असा कोण टिकोजीराव लागून गेला की, त्याच्या जीवनावर कन्नड आणि तमिळमध्ये चित्रपट निघावा? त्याची भूमिका रचनीकांतसारख्या मातब्बर नटाने का करावी? हिंदूविरोधी टिपूला हे सारे उद्योग करून हिरो का बनवावे? असे प्रश्न विचारत तामिळनाडू आणि कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टिपूच्या जीवनावरच्या चित्रपटाला हरकत घेतलीय. रजनीकांतलाही या नेत्यांनी टिपूची भूमिका करू नको, असा दम भरला आहे. रजनीकांतने त्याला अजून उत्तर दिलेले नाही.

कन्नड चित्रपटनिर्माते अशोक खेणी यांच्या डोक्यात टिपूवर चित्रपट करण्याची कल्पना आहे. त्याचे शूटिंग अजून सुरू व्हायचे आहे. कथा, पटकथा, संवाद या पातळीवर जमवाजमव सुरू आहे. अशोक यांनी रजनीकांतला टिपूच्या भूमिकेविषयी विचारले, तेव्हा त्याने या कथेत रस घेतला. चित्रपटाची कल्पनाही त्याला आवडली. अॅटेनबरोचा गांधींसारखा टिपू साकारायची निर्मात्याची कल्पना आहे. आता टिपूचा चित्रपट येणार, ती भूमिका रजनीकांत करणार, म्हणजे सारे अवाढव्य काम होणार. त्याला अगडबंब प्रसिद्धी मिळणार. त्यातून टिपूचे जीवन उजळून निघणार, या भीतीने भाजपवाले रागावलेत. कट्टर दक्षिणपंथी हिंदू मुन्नानी आणि हिंदू मक्कल कतची या संघटनांनी रजनीकांतला इशारे देत चित्रपट चालू देणार नाही, अशी भूमिका घेतलीय. या संघटना तोडफोड करण्यात मशहूर आहेत.

या वादाच्या निमित्ताने टिपूच्या जीवनाबद्दल नव्याने प्रसारमाध्यमांत चर्चा सुरू झालीय. रजनीकांतसारख्या ख्यातनाम व्यावसायिक नटालाही ज्याचे जीवन आकर्षित करते असे टिपूच्या जीवनात काय आहे? तो खरेच हिंदूविरोधी होता काय? नेमका सत्य इतिहास काय आहे?

टिपू हा म्हैसूरचा वाघ म्हणून प्रसिद्ध आहे. २० नोव्हेंबर १७५० ला तो जन्मला. सुलतान हैदर अली यांचा तो थोरला मुलगा. तो विद्वान होता, कवी होता. तो ५० वर्षांचे आयुष्य जगला. त्या काळात त्याची ख्याती दक्षिण आशियातला सर्वात लढाऊ आणि थोर राज्यकर्ता अशी होती. त्याने स्वत:चे चलनी नाणे सुरू केले. कॅलेंडर सुरू केले. मौलुदी लुनीसोर असे त्याचे नाव होते. नवी महसूल व्यवस्था त्याने आणली. म्हैसूरची सिल्क इंडस्ट्रीही त्यानेच भरभराटीला आणली. ब्रिटिशांविरोधात त्याने फ्रेंच सेनापती नेपोलियन बोनापार्टबरोबर आघाडी केली. मराठा, निजाम-मोगल या सर्वांची युती करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. स्वत:चे सैन्य फ्रेंच आर्मीच्या धर्तीवर उभे केले. त्याने बनवलेले म्हैसूर रॉकेट जगप्रसिद्ध आहे. युद्धात रॉकेटचा वापर करणाऱ्या टिपूला भारताचा पहिला मिसाईल मॅन असे म्हणतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया त्याने घातला. म्हणून इंग्रजांविरोधात लढणारा तो पहिला स्वातंत्र्ययोद्धा होय. हे वैभव, वारसा जगाला अभिमाने सांगायचा की, दाबून टाकून विचारदारिद्र्य दाखवायचे?

टिपूचे वडील कॅन्सरने वारले. १७८२ मध्ये तो म्हैसूरच्या गादीवर बसला. त्याने इंग्रज राज्यकर्त्यांचा धोका ओळखला. त्यांना देशातून हुसकावण्यासाठी नेपोलियनची मदत घेतली. स्वत:च्या लष्कराचे फ्रेंचाकडून ट्रेनिंग करून घेतले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही शत्रू क्रमांक एक घोषित करून त्याने १७८९ मध्ये त्रावणकोर इथे ब्रिटिश सैन्यावर मोठा हल्ला केला. त्यात ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली होती.

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्या काळी फ्रेंच-इंग्रजांचे वैमनस्य हेरून टिपूने फ्रेंच लष्कर, सेनापती नेपोलियन यांच्याशी संगनमत बांधले. नेपोलियनला पराक्रमी टिपूचे आकर्षण होतेच. फेब्रुवारी १७९८ मध्ये नेपोलियनने त्याला एक पत्र लिहिले. त्यात हिंदुस्थानी फ्रेंच लष्कराची आघाडी उभारून इंग्रजांना जेरबंज करून हुसकावून लावायचे. चारी मुंड्या चित करायचे असा प्लॅन मांडला होता. पण मस्कत इथे हे पत्र फुटले. इंग्रज हेराने ते गायब केले. संभाव्य टिपू-नेपोलियन युतीचा धोका ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीला कळला. त्याने टिपूचा बंदोबस्त करण्याचा मोठा प्लॅन आखला.

वेलस्लीने सुसज्ज लष्करानिशी १७९९ मध्ये श्रीरंगपट्टन इथे टिपूवर निकराचा हल्ला चढवला. फ्रेंच सल्लागाराने टिपूला किल्ल्यातून पळू जावे, असा सल्ला दिला, पण त्याने तो ऐकला नाही. तो म्हणाला, हजार वर्षे शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगणं मी पत्करीनं. त्याचे हे प्रेरणादायी वाक्य पुढे जगप्रसिद्ध झाले. ४ मे १७९९ ला टिपूला इंग्रजांनी पराभूत करून ठार केले. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या कबरीजवळ त्याचे दफन केले गेले, तेव्हा या मुस्लिम राजाची बहुसंख्य हिंदू प्रजा हळहळली.

आपल्या किल्ल्यात विष्णूची नित्यनेमाने पूजा करणारा हा मुस्लिम राजा आजही दक्षिणेत विष्णूपूजक म्हणून प्रसिद्ध आहे. म्हैसूरच्या किल्ल्यात त्याचे विष्णू मंदिर आहे. आजही तिथे भक्तिभावाने पूजा होत असते. भाजपवाल्यांनी हे मंदिर बघावे. विष्णू आणि टिपूचे नाते समजावून घ्यावे. सेक्युलर राजाचे ते मोठे उदाहरण आहे. टिपूचा धर्म मुस्लिम. त्याची बहुसंख्य प्रजा हिंदू. आपल्या प्रजेचे सुख ते आपले सुख, अशी शिकवण बापानेच त्याला दिली होती. अशा या लोककल्याण राजाची हिंदूविरोधी प्रतिमा इंग्रजांनी पुढे उभी केली. १८५७ च्या ब्रिटिशविरोधी स्वातंत्र्ययुद्धाअगोदर इंग्रजांना समूळ उखडण्यासाठी अँग्लो-म्हैसूर युद्ध लढताना बलिदान देणारा टिपू किती पुढचा विचार करणारा होता हे लक्षात येते. अमेरिकन-फ्रेंच यांच्याशी लष्करी संबंध प्रस्थापित करून हिंदुस्थानच्या सर्व हिंदू-मुस्लिम राजांना गोळा करण्याची भूमिका घेणे, इंग्रजांना हुसकावण्याची भाषा, कृती करणारा हा राजा किती दूरदर्शी म्हणायचा! श्रीलंका, ओमान, अफगाणिस्तान, फ्रान्स, तुर्की, इराण या देशांशी टिपून व्यापार सुरू केला होता. या देशात त्याचे राजदूत असत. त्याला कन्नड, उर्दू, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी, फ्रेंच अशा सहा भाषा येत. त्याला तरुणपणात सूफी व्हायचे वेड लागले होते. पण बापाने त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली. तो राजा बनला. आपल्या राज्यात त्याने हिंदुस्तानातल्या सर्व राजांच्या राजपुत्रांसाठी अत्याधुनिक लष्करी शाळा सुरू केली. भारतात लढावू योद्धे घडावेत यासाठी त्याचा खटाटोप होता.

अशा गुणवान, लढाऊ राजाचा भाजपवाल्यांनी द्वेष का करावा? दिल्लीत औरंगजेबाच्या नावाची एका रस्त्याची पाटी हटवून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांचे नाव भाजपवाल्यांनी दिले. ते कलाम टिपूविषयी काय म्हणताहेत ते भाजपवाल्यांनी वाचावे. बंगलोरमध्ये ३० नोव्हेंबर १९९१ ला टिपू सुलतान शहीद मेमोरिअल लेक्चर झाले होते. त्यात कलाम म्हणाले होते, टिपू हा जगातला पहिला असा राजा आहे की, त्याने युद्धात रॉकेट तयार करून वापरले. त्याचे दोन रॉकेट इंग्रजांनी श्रीरंगपटनच्या युद्धात ताब्यात घेतले. लंडनमध्ये नेऊन ठेवले. आजही लंडनच्या रॉयल आर्टिलरी म्युझियममध्ये ते प्रदर्शनात ठेवलेले दिसतात. भारतीय राजाचे वैभव, सामर्थ्य त्या रॉकेटच्या रूपाने जगात पर्यटक कौतुकाने न्याहाळत असतात.

इतिहासकार डॉ. दुलारी कुरेशी लिहितात, टिपू नेपोलियनलाही सरस ठरेल असा लढाऊ होता. चपळाईने शत्रूला गाठण्यात तरबेज होता. एकाच वेळी विविध आघाड्यांवर तो लढे. निझामाचा त्याने पराभव केला. इंग्रजांचा दोनदा पराभव करणारा तो पहिला हिंदुस्थान राजा होय. नेपोलियनच्या फ्रेंच डायरीत नोंद आहे- नेपोलियन म्हणाला होता, मी लवकरच इजिप्त जिंकेल. त्यानंतर भारतीय राजा टिपूशी संबंध, मैत्री प्रस्थापित करील. त्याच्या बरोबर इतरही राजे आहेत. त्यांच्या एकजुटीने इंग्रजांवर निकराचा हल्ला करेल आणि त्यांना पराभूत करूनच दाखवेन. १५ हजार सैनिक सुएझ कालव्यामधून भारतात जातील. हे सैन्य टिपूच्या लष्करात सामिल होईल. आणि मग बघा इंग्रजांना चारीमुंड्या चीत करून उखडले जाईल.

इंग्रजांना एवढा मोठा धोकादायक, त्रासदायक ठरलेल्या टिपूचा इंग्रज इतिहासकरांनी द्वेष करणे स्वाभाविक आहे. त्याची प्रतिमा खलनायक, हिंदूविरोधी रंगवणे हे इंग्रजांच्या कारस्थानी द्वेषी स्वभावाला धरून झाले. पण हिंदुस्थानच्या भूमीवरून इंग्रजांना उखडवून त्याच्या देशात पळवून लावल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही अशी विष्णूपुढे दररोज पूजा-प्रार्थना करणाऱ्या टिपूचा भाजपवाल्यांनी द्वेष का करावा? देशप्रेमी, इंग्रजविरोधी टिपू त्यांचा नावडता का आहे?

भाजपवाल्यांना मिसाईल मॅन कलाम यांच्याविषयी प्रेम आहे, पण कलाम ज्याला भारताचा पहिला मिसाईल मॅन म्हणाले होते, त्या टिपूविषयी प्रेम का नाही? इंग्रजांच्या फुटपाड्या, परद्वेषी मनोवृत्तीला बळी पडून भाजपवाल्यांनी टिपूच्या चित्रपटाला विरोध तर केला नाही ना? अशा वादांतून भाजपवाले कुणाचे भले करताहेत?

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : १५/०९/२०१५


Wednesday, September 9, 2015

औरंगजेबाचे हिंदू महिलांनी आभार का मानायचे?


















डॉ. भालचंद्र नेमाडे मोठे डेरिंगबाज लेखक आहेत. ते नागपूरमध्ये म्हणाले, मोगल बादशाह आलमगीर औरंगजेबाचे हिंदू महिलांनी आभार मानायला हवेत. कारण त्याने सती प्रथा इंग्रजांच्या अगोदर २०० वर्षे बंद केली होती. ही प्रथा बंद करून त्याने त्याच्या राज्यातल्या हजारो महिलांना जीवदान दिले, सन्मान दिला. नेमाडे हे बोलत होते त्याला तीन बातम्यांची पार्श्वभूमी होती. पहिली, दिल्लीत औरंगजेबाचे एका रस्त्याला असलेले नाव हटवून त्या ठिकाणी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलमांचे नाव देण्यात आले. दुसरी, औरंगाबादचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेने पुन्हा केली. तिसरी, मराठवाड्यात दुष्काळात आपल्या पोटच्या कच्याबच्यांना जेवण देता येत नाही म्हणून हबकलेल्या एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले.

तर अशा तीन बातम्यांच्या पार्श्वभूमीवर नेमाडे बोलले. त्यानिमित्ताने औरंगजेब चर्चेत आला.

१६१८ला शहाजहान-मुमताज या दांपत्याच्या घरात जन्माला आलेला औरंगजेब ९० वर्षाचे दीर्घायुष्य जगला. १७०७ ला अहमदनगरला त्याला मृत्यू आला. ९० वर्षांच्या आयुष्यात त्याने जवळपास ५० वर्षे हिंदुस्तानवर राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार अफगाणिस्तानच्या काबुलपासून दख्खनपर्यंत होता.

हा मोठा हिकमती, महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने कर्तबगारीने १६९० पर्यंत त्यावेळचे जगातले सर्वात मोठे राज्य स्थापन केले. त्याचा आलमगीर बनला. हा त्याच्या काळातला महाशक्तिशाली बादशाह होता. क्रूर, धर्मांध म्हणून त्याची प्रतिमा रंगवलेली असली तरी त्याच्या चरित्राला दुसरी बाजूही आहे. तो टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशावर उपजीविका करी. तो धार्मिक होता. इस्लामप्रेमी होता. पाच टाइम नमाजी होता. संगीत, नृत्य, चित्रकला यांची त्याला घृणा होती. ही चैनबाजी त्याला आवडत नसे. तो निर्व्यसनी होता. महिलांना तो खूप मान देत असे. महिलांकडे वाकड्या नजरेने कुणी बघितलेले त्याला खपत नसे. तो कडक शिस्तीचा होता. राजद्रोह करणारा मुसलमान असो की, हिंदू तो त्याला कठोर शिक्षा करत असे. राजद्रोह केला म्हणून त्याने तीन भावंडांना मृत्यूदंडाच्या शिक्षा दिल्या. त्यामुळे त्याला क्रूर म्हटले गेले.

औरंगजेबाची हिंदूविरोधी प्रतिमा आहे, पण त्याच्या दरबारात १८२ मनसबदार हिंदू होते. त्या तुलनेत त्याचा बाप शहाजहानच्या दरबारात फक्त १०६ हिंदू मनसबदार होते. म्हणजे हिंदू मनसबदारांना जवळ करण्यात तो बापाच्याही एक पाऊल पुढे होता. सम्राट अकबरालाही त्याने याबाबतीत मागे टाकले होते. औरंगजेबच्या संपूर्ण लष्कराचा सरसेनापती मिर्झाराजे जयसिंग होता. मोगल सैन्याने बहुतेक मोठ्या लढाया हिंदू सेनापती जयसिंगच्या नेतृत्वाखाली लढल्या. औरंगजेबाच्या लष्करात इतर महत्त्वाच्या पदांवर राजपूत हिंदू बहुसंख्येने होते. १६६५ला त्याने राजा अजय सिंग याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमला. छत्रपती शिवरायांबरोबरच्या लढायांत हेच राजपूत औरंगजेबाच्यावतीने पुढे होते. छत्रपतींनी औरंगजेबाशी शांतता करार करावा म्हणून हे राजपूत आग्रही होते.

हिंदूची देवळे फोडणारा, देव-देवतांच्या मूर्ती तोडणारा म्हणून काही इतिहासकारांनी औरंगजेबाची जुलमी राजवट चित्तारली आहे. असे असले तरी त्याने अनेक मंदिरांना देणग्या, जमिनी दिल्या. जिर्णोद्धाराला पैसा दिल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. उत्तरप्रदेशातील अलाहाबादच्या प्रसिद्ध सोमेश्वरनाथ महादेव मंदिराला औरंगजेबाने जमीन दिली. काशी-बनारसच्या जंगमवादी शिवमंदिराला मदत केली. गुहाटी येथील हिंदू मंदिराला ग्रँट दिली. काश्मिरातही काही मंदिरांना सहकार्य केले. उत्तर प्रदेशातल्याच बालाघाटातील चित्रकुट येथील विष्णू मंदिराला औरंगजेबाने ८ खेड्यात ३३० बिघे जमीन इनाम दिली. देखभालीसाठी, दिवबत्तीसाठी प्रत्येक दिवशी १ रुपया सरकारी मदतीची २ तहहयात तरतूद केली. ३२३ वर्षानंतरही ही इनामी जमीन व पैशाची तरतूद अबाधित आहे. ब्रासच्या प्लेटवर या इनामाचे औरंगजेबाचे फर्मान (हुकूम) आहे. ते आजही वाचता येते. १९व्या इस्लामिक वर्षात रमजानच्या पवित्र महिन्यात औरंगजेबाने हे फर्मान काढल्याची नोंद आहे. आज त्या विष्णू मंदिराच्या जमिनी त्या भागातल्या गुंडांनी बळकावल्या आहेत. मंदिराला अवकळा आलीय. मंदिरांच्या प्रॉपर्टीवरून महंत, पुजारी, विश्वस्त यांच्यात लबाड्या, झगडे, भांडणे बोकाळलीत. एका ऐतिहासिक मंदिर-वारशाची अशी हेळसांड सुरू आहे. अशी मदत करणाऱ्या औरंगजेबाने विरोधी सत्तेची केंद्र असणारी मंदिरे पाडली हाही इतिहास आहे. तो एसेज ऑन इस्लाम अॅण्ड इंडियन हिस्ट्री या इतिहासकार रिचर्ड एम. इटन यांच्या पुस्तकात आला आहे. नवी दिल्लीच्या ऑक्सफर्ड युनिव्हसिटी प्रेसने ते छापले आहे.

हिंदू प्रजेचा छळ करण्यासाठी औरंगजेबाने जिझिया कर लादला, अशी मांडणी काही इतिहासकारांनी केली आहे. जिझिया हा मूळ अरबी शब्द. त्याचा अर्थ टॅक्स, कर, शुल्क असा आहे. औरंगजेबाच्या राज्यात मुस्लिमांवर मालमत्तेच्या दोन-पाच टक्के जकात वसुल केली जाई, तर मुस्लिमेतर प्रजेकडून जिझिया कर घेण्यात येई. तो नागरिकांकडून त्यांच्या जीविताचे, मालमत्तेचे शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी घेतला जाई. शिवाय हिंदू, गरीब, म्हातारे, महिला, अपंग, अनाथ, लहान मुले यांना या करातून सवलत देण्यात आली होती. जे संपन्न होते त्यांच्याकडूनच हा कर घेतला जाई हे विशेष.

औरंगजेबाने १६६४ त्या सतीबंदीचे फर्मान काढले. हजारो वर्षे सुरू असलेल्या त्याच्या या जुलमी प्रथेला कायद्याने विरोध करणारा हा पहिला राजा म्हणता येईल. त्याचे असे झाले की, त्याच्या दरबारात त्यावेळच्या एका फ्रेंच वैद्याने स्वत:ला अहमदाबाद ते आग्रा या प्रवासात आलेला अनुभव सांगितला. प्रवासात या वैद्याने सती जाणाऱ्या महिलेचे अमानवी संकट अनुभवले. एका महिलेला नटवून-सजवून नवऱ्याच्या चितेवर बाबूंने गचके देत ढोसले जाते. तिचा आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून ढोल-ताशे वाजवले जातात. असहाय बाई नातेवाईकांच्या, गावकऱ्यांच्या साक्षीने दिवसाढवळ्या जळते. ते पाहून हा परदेशी वैद्य हादरला. त्यापूर्वी त्याने एवढे अमानवी वास्तव पाहिले नव्हते. त्याला राहवले नाही. त्याने औरंगाजेबला हा आँखो देखा हाल सांगितला. त्या काळात वर्षभरात अदमासे ६०० हिंदू महिलांना असे बळी जावे लागे. बंगाल प्रांतात हे प्रमाण तर जास्तच होते. उत्तर हिंदुस्थानात दररोज अशा घटना घडत. त्याला धर्माचा भक्कम आधार होता. फ्रेंच वैद्याचे कथन ऐकून औरंगजेबही हलला. खरे तर त्यावेळचा कोणताही शहाणा राजा धार्मिक बाबींत हस्तक्षेप करत नसे. धर्म वेगळा, राज्यकारभार वेगळा, पण औरंगजेबाने सतीबंदी केली. हा निर्णय घेतला म्हणून बांगला प्रांतातले हिंदू त्याच्याविरुद्ध गेले. अर्थात औरंगजेबाने त्याची पर्वा केली नाही.

औरंगजेबाचा हा सारा कडू-गोड इतिहास सर जदुनाथ सरकार यांनी लिहून ठेवला आहे. सरकार बंगाली. मोगल साम्राज्याचे ते जगातले तज्ज्ञ, अधिकारी इतिहासकार मानले जातात. आपल्यापैकी सर्वांना हा इतिहास त्यांच्या पुस्तकातून वाचता येतो. जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार अलेक्झांडर हॅमिल्टन हा औरंगजेबाचा समकालीन होता. तो त्याच्या साम्राज्यात फिरला. त्याने निरीक्षणे नोंदवली आणि म्हटले, या राज्यात धर्मस्वातंत्र्य सर्वत्र आहे. देवपूजेला सर्वांना मोकळीक आहे. जबरदस्तीने धर्मांतर झाल्याची घटना मला दिसली नाही. सत्ता, प्रॉपर्टी, मानसन्मान यांच्यासाठी धर्मांतरे होत. तो मामला राजीखुशीचा होता.

इरफान हबीब हे भारतातले सध्याचे जानेमाने इतिहासकार आहेत. त्यांचे म्हणणे असे की, इतिहास हा काळ्या-पांढऱ्या रंगात पाहू नये. सत्य नेहमी दोन टोकांच्यामध्ये कुठेतरी असते. ते काळे नसते तसे पांढरही नसते. ग्रे शेडमध्ये कुठेतरी असते. १८५७च्या उठावाने इंग्रजांचे डोके फिरले. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकीचे संकट ओळखले. हिंदू-मुस्लिम एक होऊन इंग्रजांविरोधात एकवटतील तर राज्य करणे मुश्किल होईल. हा धोका टाळण्यासाठी इंग्रजांनी हिंदू-मुस्लिमांत वैर वाढवा, द्वेष पेरा, फूट पाडा, हे तंत्र वापरले. त्यासाठी ऐतिहासिक वैभवशाली प्रतिकांचा गैरवापर केला. प्रतिकांच्या गैरवापराच्या लढाईत औरंगजेब, छत्रपती शिवराय यांच्या ऐतिहासिक प्रतिमांना सोयीने पेश करण्यात आले. हिंदुस्तानच्या साऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणाची मोठी कृत्रिम वावटळ विदेशी-देशी हुशार लोकांनी निर्माण केली. त्याची फळे आज आपण भोगतो आहोत. काय खरे, काय खोटे, यांचा थांगपत्ता लागू नये एवढा भ्रम फैलावला गेला आहे. भारत-पाक फाळणी, हिंदू-मुस्लिम वैमनस्य, बॉम्बस्फोट, दंगली, पक्षपाती भाषणे, पुस्तके या माध्यमातून आजही भ्रम फैलावणे सुरूच आहे. धर्म-धर्मांत, जाती-जातींत आज लोक गचांडी पकडताना दिसतात. ते त्यातूनच घडत आहे. आपली विचार करण्याची प्रक्रियाच गढूळ झाली आहे.


खरे तर इतिहास आहे तसा स्वीकारावा. त्यातल्या चांगल्या-वाईट घटनांसह तो आपला वारसा आहे. तो बदलण्याचा, अट्टहास करून कुणाचेही भले होणार नाही. आपल्या देशाचे मन मोठे आहे. आपल्या देशाने गुजरात दंगली, तिथला वंशसंहार ज्यांच्या एक छत्री शासनकाळात झाला त्या नरेंद्र मोदींनाही बहुमताने स्वीकारले. बाबरी मशिद पाडलेल्या पक्षाला स्वीकारले. त्याच देशात, याच मातीत जन्मलेला परदेशी नसलेला औरंगजेब त्याच्या बऱ्या-वाईट कामांसह स्वीकारायला काय हरकत आहे? खास करून सतीबंदीसाठी देशाने त्याचे आभार मानायला काय हरकत आहे?

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०८/०९/२०१५

Wednesday, September 2, 2015

बोलबातांच्या गलबल्यात खरे कुणाचे मानायचे?














पडघम हे लोकसंगीतातले एक वाद्य आहे. आनंदाची बातमी, नव्याची चाहूल लागते तेव्हा हे वाद्य वाजवले जाई. पण काळानुसार कुठल्याही गोष्टीचे संदर्भ बदलत जातात. तसे या वाद्याचेही बदलले आहेत. काळोखाचे पडघम , मध्यरात्रीचे पडघम , निवडणुकांचे पडघम अशा शब्दप्रयोगांतून आपल्याला त्याची जाणीव होतच असते. सध्याचा काळात तर हे वाद्य केवळ चांगल्याच घटनांसाठी वाजवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे राजकारण-समाजकारण या क्षेत्रातील विविध घटना-घडामोडींविषयी पडघम वाजवण्याचे काम या साप्ताहिक सदरातून दर मंगळवारी केले जाईल...

तथागत गौतम बुद्धांची भूमी म्हणून बिहारची ओळख आहे. या भूमीवर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. दिल्लीचा रस्ता बिहारमधूनच जातो. दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारी ही निवडणूक देशाला मार्ग दाखवणारी आहे. देशाच्या १२५ कोटी जनतेच्या वतीने आपण बिहारींनी ती लढवली पाहिजे असे आवाहन संयुक्त जनता दलाचे नेते खासदार शरद यादव यांनी केले आहे. लबाडांना थारा देऊ नका. बिहारची बोली लावणाऱ्या बिहारींचा अपमान करणाऱ्यांना इथं पाय ठेवू देऊ नका , असे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांनी तर दिल्ली बदलो, दिल्ली बदलो अशी घोषणा पाटण्याच्या गांधी मैदानातून दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची या नेत्यांना साथ आहे.

दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम बिहारी मतदारांना जंगलराज पार्ट- येऊ द्यायचे नसेल तर यांना घरी बसवा, अशी हाक देत आहेत. आम्ही मंगलराज आणतो अशी आशा दाखवत आहेत. त्यावर जंगलराज नही, मंडलराज पार्ट- आहे, असे लालू म्हणत आहेत. या बोलबातांच्या गलबल्यात कुणाचे ऐकायचे, कुणाचे खरे मानायचे, असा प्रश्न बिहारी जनतेसमोर आहे.

या संभ्रमातून वाट काढण्यासाठी बिहारींना अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग, त्यातल्या उपदेश आज मदतीला येईल. तथागत बुद्ध एकदा कोसल देशात चारिका (पदयात्रा) करत होते. मोठा भिक्खू संघ सोबत होता. कालामांच्या (कोसल देशातल्या लोकांना कालाम म्हणत.) केसमुत्त या गावाजवळून ते जात होते. बुद्धांची कीर्ती कालामांना माहीत होती. भारावलेले कालाम बुद्धांना भेटायला गेले. अभिवादन करून ते बुद्धांना म्हणाले, “भन्ते, काही श्रमण आणि ब्राह्मण केसमुत्तामध्ये येतात. स्वत:च्या सिद्धांताला उजळवून सांगतात. दुसऱ्याच्या सिद्धांताची निंदा करतात. नावे ठेवतात. त्याला कमी लेखतात, अनादर करतात. आमच्या मनात शंका निर्माण होते. श्रमण-बाह्मणांपैकी कोण खरे बोलतो? कोण खोटे बोलतो?”

त्यावेळी तथागत म्हणाले, “कालामांनो, एखादी गोष्ट अनुभवावरून (ऐकीव माहितीवरून) स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे असे सांगितले आहे, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्यरूपाचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाराचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका. किंवा संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका. हा श्रमण आपला गुरू आहे, अशा विचार करून स्वीकारू नका. कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वत: होऊनच हा अनुभव घ्याल की, त्या गोष्टी अहिताच्या आहेत, सदोष आहे, त्या गोष्टींची निंदा जाणकारांनी केलेली आहे. त्या गोष्टी स्वीकारल्या असता अहिताला; दु:खाला कारणीभूत होतात. तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा?”

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करताना बिहारी जनता या उपदेशाचा नक्की उपयोग करून घेईल. बिहार चाणक्याचीही भूमी आहे. चाणक्याचे अर्थशास्त्र इथेच तयार झाले. त्याचा अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ आहे. त्यात राजा, जनता, राज्य कारभार याविषयीच्या व्यवहारांचे ज्ञान आहे. त्या राजकारण-व्यवहाराच्या आधारे सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांनी राज्य केले. एवढा समृद्ध राजकीय वारसा असणाऱ्या बिहारी नेते, जनता यांच्या रोमारोमांत राजकारण भरलेले दिसते. या राजकीय ज्ञानाची शिदोरी जवळ असल्यानेच बिहार-उत्तरप्रदेश या भागातले नेते, लोक अधिक आत्मविश्वासाने वावरताना दिसतात, हे आपण पाहतो.

या प्रदेशात सगळेच तयारीचे गडी असतात. त्यामुळे बिहारची निवडणूक साधीसोपी नसते. त्यात जातीची गणिते असतात. प्रगतीचे मुद्दे असतात. बिहारी मतदार फॉरवर्ड-बॅकवर्ड, यादव, कुरमी, कोयरी, कुशवाहा, लवकुश, धातू, तलवार, पंडिती, राजपूत, भूमिहार, ब्राह्मण, मुसलमान, अतिपिछडा, दलित, महादलित, मुसहार, पासवान अशा शेकडे जातीगटांत विखुरला गेला आहे. निवडणुकीत या जातींची मोट जो बांधतो, तो भारी भरतो, जिंकतो, हा आजवरचा अनुभव आहे

बिहारच्या या निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय दल, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस अशा चार पक्षांचे महागठबंधन बनले आहे. त्या विरोधात भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती आणि इतर छोटे-मोठे पक्ष यांची आघाडी आहे. महागठबंधनची जमेची बाजू नितीशकुमार यांचा विकासवादी चेहरा ही आहे. गुन्हेगार संपवणारा, प्रशासन पारदर्शक-गतिमान करणारा, भ्रष्ट नसलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही. केंद्रीयमंत्री राम विलास पासवान हे मीच मुख्यमंत्री पदाला योग्य अशी पाचर अगोदरच मारून बसले आहेत. बिहार भाजपची इच्छा आहे की, नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई व्हावी. या लढाईतून भाजपच्या जागा वाढवतील अशी अटकळ बांधली जात आहे.

आजतरी ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध नितीशकुमार अशी होणार असे चित्र आहे. माझ्या डीएनएमध्ये गडबड आहे ही मोदींनी बिहारला दिलेली शिवी आहे, अशी भूमिका घेत नितीशकुमार यांनी मोदींवर वरताण मारली आहे. माझा अपमान म्हणजे बिहारचा अपमान या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजतरी त्याला यश मिळतेय असे दिसतेय. मोदींनी कात्रीत पकडण्यात नितीशकुमार यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत नितीशकुमार जिंकले तर मोदींनी देशपातळीवर शेरास सव्वाशेर ठरू शकेल असा चेहरा साऱ्या विरोधी पक्षांना मिळू शकेल. असे होणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहे. त्यामुळे संघ परिवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

संघ परिवाराला खरे आव्हान बिहार-उत्तर प्रदेश या बुद्धभूमीतूनच मिळत असते. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवली होती. राम मंदिराचे आंदोलन उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांनी निष्प्रभ केले होते. आता मोदींचा सर्वसत्तावादाचा घोडा नितीशकुमारच रोखू शकतील. मोदी ज्या संघ परिवाराच्या विचारसूत्रावर स्वार आहेत, ते पंक्चर करण्याची युक्ती जनता परिवाराच्या जनतावाद या विचारात आहे. जनतावाद म्हणजे मध्यम, मागास, दलित, महादलित जाती-जमाती, अल्पसंख्यांक यांना प्रतिष्ठा आणि विकासाची संधी. डॉ. राम मनोहर लोहियांनी त्याची मांडणी केली आहे. जनतावाद म्हणजे संघाच्या धर्माच्या आधारावरच्या कट्टरवादी संघटनाला आडकाठी. म्हणून . गांधी जनतेचे संघटन करत होते. तोपर्यंत संघाला स्वत:चे संघटन वाढवता येईना. या देशातल्या माणसांची जात अस्मिता धर्म, राष्ट्र, भाषा, वंश, प्रांत या ओळखीवर सतत मात करत आली आहे. नुकतेच गुजरातमध्ये पटेलांचे झालेले आंदोलन पाहा. ३० वर्षापूर्वी याच पटेलांना घेऊन संघाने राखीव जागांना विरोध केला होता. तेच पटेल आज स्वत:च्या जातीला ओबीसीअंतर्गत आरक्षण मागत आहेत. एका अर्थाने संघाचा विचार बाजूला सारत आहेत.

सांगायचा मुद्दा असा की, बिहारात नितीशकुमार जिंकले तर संघ विचाराला देशव्यापी आव्हान उभे राहिल. देशात नवी राजकीय समीकरणे जन्माला येतील. संघ विचाराच्या विरोधात सरळ सरळ ध्रुवीकरण होईल. बुद्धभूमी बिहारमध्ये मोदींचे हरणे म्हणजे वैर, द्वेष, हिंसेविरोधात प्रेमाचा संदेश जिंकणे असा अर्थ लावला जाईल. सहिष्णुता जिंकली, असे म्हटले जाईल. मोदी, संघ द्वेषाच्या विचाराने देश हाकू पाहत आहेत. त्या विचारांचा पराभव झाला असे विश्लेषण केले जाईल. म्हणून ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. बिहारी मतदारांच्या मतांचा कस लावणारी आहे. कोण खरे, कोण खोटे याची तड लावणारी आहे.


राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०१/०९/२०१५