Tuesday, August 18, 2015

मंडल आयोगाने घडवलेली क्रांती













मंडलचे गेल्या २५ वर्षांचे मूल्यमापन करताना असे दिसते की, यापुढेही देशात मंडलच प्रभावी राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणाला जे अडवू इच्छितात, त्या संघटनांना तगण्यासाठी-जिंकण्यासाठी मंडलवादाशिवाय पर्याय नाही. मंडलची पंचविशी साजरी होताना बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यात मंडलच केंद्रस्थानी आहे. तिथे भाजपला राम विलास पासवान, जीतनराम मांझी यांच्या कुबड्यांशिवाय निवडणुकीला सामोरे जाता येत नाही. नितीश कुमार, लालू प्रसाद हे मंडलवादी भूमिका घेऊन देशात चौखूर उधळलेल्या संघाच्या घोड्याला अडवू पाहत आहेत.

भारताचा पहिला ओबीसी पंतप्रधान कोण? कोणत्या पक्षाने बनवला? या प्रश्नावर टीव्ही चॅनलच्या कॅमेऱ्यांसमोर छातीवर हात ठेवून, “एच. डी. देवेगौडा यांना मी बनवला,” असे लालू प्रसाद सांगत होते. लालूंच्या काही चुकांमुळे, प्रसारमाध्यमांची त्यांच्यावर खप्पामर्जी असल्याने त्यांची जी हास्यास्पद प्रतिमा निर्माण झालीय, त्यामुळे त्यांचे हे म्हणणे कुणी गांभीर्याने घेतले नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र, “नरेंद्र मोदी हेच भारताचे पहिले ओबीसी पंतप्रधान आहेत,” हे सांगण्याची एकही संधी सोडली नाही.

लालू प्रसाद, अमित शहा हे दोघेही मुरब्बी, स्वत:चा अजेंडा असलेले नेते. ते बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. त्याबरोबर दुसरेही एक निमित्त होते. ते म्हणजे मंडलच्या पंचविशीचे. बरोबर २५ वर्षांपूर्वी १९९० च्या ऑगस्टमध्ये मंडल अहवाल लागू करण्याच्या हालचालींनी दिल्लीतले वातावरण तापले. सात ऑगस्ट १९९० रोजी संसदेत तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये सर्व स्तरांवर २७ टक्के राखीव जागा मागासवर्गीयांसाठी ठेवण्यात आल्या. तोपर्यंत आरक्षणाचे लाभ न मिळालेल्या दगडफोडे, नावाडी, मच्छीमार अशा हजारो मागास जातींना न्याय मिळण्याची आशा या निर्णयाने जागवली. त्याचे रूपांतर सामाजिक न्यायाच्या लढाईत झाले. हा अहवाल गुणवत्तेचे मरण करणारा आहे, तथाकथित उच्च जातींवर सूड उगवणारा आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघपरिवारातील भाजप, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांनी घेतली. देशातल्या मोठ्या शहरांत विद्यार्थ्यांना चिथवून आंदोलन पेटवले. देशात एकच राजकीय गोंधळ माजला. मंडलवादी आणि मंडलविरोधी असे दोन तट पडले. काँग्रेस आणि भाजप मंडलविरोधात होते.

देशाच्या राजकारणात एवढी मोठी उलथापालथ करणाऱ्या मंडलचे कुळ-मूळ थोडे समजावून घेतले पाहिजे. मंडल हे नाव ज्यांच्या आडनावावरून आले, ते बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे बिहारचे कर्तबगार माजी मुख्यमंत्री, थोर समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचे सहकारी, अभ्यासू नेते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक जानेवारी १९७९ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बॅकवर्ड क्लास कमिशन नेमले. मागास जातीसाठीचे हे काही पहिले कमिशन नव्हते. मंडल हे दुसरे कमिशन. त्याआधी पहिले बॅकवर्ड क्लास कमिशन १९५३ ला काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते. १९५५ ला कालेलकर कमिशनने अहवाल सादर केला. त्यात २,३९९ मागास जातींची यादी बनवली. त्यात ८३७ जाती मोस्ट बॅकवर्ड होत्या. काँग्रेसने या अहवालावर काहीही निर्णय घेतला नाही. तो सडवला. मंडल यांनी ३१ डिसेंबर १९८० रोजी दोन वर्षे दौरे, अभ्यास करून मंडल अहवाल राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना सादर केला. तो सादर होईपर्यंत मोरारजी देसाईंचे जनता सरकार पडले होते. इंदिरा गांधी सत्तेवर आल्या होत्या. आधी इंदिरा व नंतर राजीव गांधींनी मंडलच्या भूताला घाबरून तो जाणीवपूर्वक सरकारी कपाटात धूळखात पडू दिला.

मंडल अहवालाची विश्वासार्हता मोठी होती. स्वत: मंडल हे यादव शेतकरी जातीत जन्मलेले. जातीव्यवस्थेचे चटके सोसलेले. त्यांच्या शाळेत वसतिगृहात प्राचार्य त्यांना तथाकथित उच्चभ्रू जातींच्या विद्यार्थ्यांबरोबर जेवू देत नसत. ती बोच, अनुभव त्यांना राजकीय शहाणपण देता झाला. त्या अनुभवावर ते नेते बनले. त्यांच्या हातून सामाजिक न्यायाच्या लढाईचा जाहीरनामा म्हणता येईल, असा ४२६ पानांचा मंडल अहवाल तयार झाला. हे मंडल एप्रिल १९८२ ला वारले. त्यानंतर आठ वर्षांनी मंडल आयोग लागू झाला. वृक्ष लावणारे निघोनिया जाती तसे झाले.
आता देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. बरोबर त्याच वेळी मंडल आयोगाला २५ वर्षे होताहेत. संविधानाने सामाजिक, आर्थिक, राजकीय लोकशाही समतेसह प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट मांडले. ते कसे साध्य करायचे याचा जाहीरनामा, अजेंडा मंडल अहवालामध्ये मांडला गेला होता. म्हणून हा समायोग महत्त्वाचा आहे.

मंडल अजेंडा किती यशस्वी झाला? मंडलने गुणवत्तेला किती मारले? तथाकथित उच्च जातींवर त्याने अन्याय केला का? हे प्रश्न २५ वर्षांनंतर तपासून पाहिले पाहिजेत. देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. ते गुणवत्तेवर पंतप्रधान झालेत. विकासाच्या अजेंड्यावर १९८४ नंतरचे सर्वात जास्त खासदारांचे बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. उच्चभ्रू जाती त्यांच्या सोबत आहेत. भाजपचा आजचा देशातला जनाधार मोठ्या प्रमाणात ओबीसी आहे. अर्धा भारत ज्या सहा राज्यांत वसतो - (उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्र) त्यांपैकी पाच राज्यांचे मुख्यमंत्री मागास जातीचे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत; पण महाराष्ट्रात धनगर, वंजारी, माळी (माधव) या मोठ्या जाती मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत. महाराष्ट्रात ओबीसी जाती हाच भाजपचा मोठा जनाधार आहे. संघपरिवाराचे प्रवीण तोगडिया, विनय कटियार, साध्वी प्राची, साध्वी निरंजन ज्योती, साक्षी महाराज हे आगलावे नेते मागास आहेत. ओबीसी, दलित यांच्या कुबड्यांशिवाय या राज्यात कुणालाही सत्तेत येता येत नाही. मंडलला विरोध करणाऱ्या संघपरिवाराने स्वत:चे मंडलीकरण केले, तो वाढला. काँग्रेसने मात्र मंडलपुढे शहामृगासारखे डोळे मिटून स्वत:चा आत्मघात करून घेतला. काँग्रेसकडे आज कर्नाटक हे एकच मोठे राज्य आहे. तेही त्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्ध रामय्या हे ओबीसी (धनगर) आहेत, म्हणून ते टिकवू शकले. सिद्ध रामय्या हे काही काँग्रेसी नाहीत. ते मूळचे जनता दलवाले आहेत.

१९८९-९१ या काळातल्या राजकीय उलथापालथीने देशाला बदलवून टाकले. १९८९ पर्यंत काँग्रेस पक्षाला देशात पर्याय नव्हता. काँग्रेसी सत्तेत राजकीय स्थिरता होती; पण लोकशाही नव्हती. संधीची समानता नव्हती. १९८९ साली काँग्रेसी सत्तेच्या विरोधात दोन आवाज घुमले. एक मंडलचा, दुसरा मंदिराचा. मंदिर आंदोलनात अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधणे, हा अजेंडा होता. मंडलच्या आवाजाने संघपरिवाराची झोप उडाली. तो धर्माच्या छत्रीखाली लोकांना एकवटू बघत होता. मंडलची मुले जाती समन्वयाचे, विकासाचे, त्यातून नव्या समाजाचे स्वप्न पेरून त्या छत्रीलाच उदध्वस्त करू पाहत होते. त्या भीतीने संघाने राममंदिराचा अजेंडा पुढे रेटला. त्यातून लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली. त्यांचा रथ बिहारात अडवून मुख्यमंत्री लालू प्रसाद मंडलच्या मुलांचे हिरो बनले. पुढे लालूंनी बिहार ही मंडलराज ची प्रयोगशाळा बनवली. त्यामध्ये हिंदू समाजातल्या मध्यम, मागास, दलित जाती, मुस्लिम समाजातील मागास जाती गुण्यागोविंदाने बागडतात, हे बघून संघपरिवार आणखी हिंसक झाला. त्यातून बाबरी मशीद पडली. नंतर देशाच्या राजकारणाने अवघड वळण घेतले. हे राजकारण थोपवण्याची शक्ती फक्त मंडलच्या मुलांमध्ये होती. मात्र, ते घडले नाही. स्वत: लालू प्रसाद आत्मकेंद्रित बनत गेले. संघटनेवर विश्वास नाही, टीमवर्क नाही, सतत उलटी कर्तबगारी या अवगुणांनी त्यांच्या नेतृत्वावर कुणाचा विश्वास उरला नाही. देश गांधी वाटेवरून पुढे नेऊ शकणारा मंडलचा एक मुलगा वाया गेला. कृष्णवंशीय लालू प्रसादांना दुसरा महात्मा गांधी बनण्याची संधी होती. कारण मंडल अजेंडा हा गांधींच्या महासमन्वयवादी विचारांचे पुढचे पाऊल होता. गांधींनी सर्व जाती-धर्मांचा भाईचारा निर्माण करून सर्वांना बरोबर घेत, सर्वोदयाचे स्वप्न भारतात पेरले. ते मंडल अजेंड्यातून पुढे जाणार होते. म्हणूनच गांधींना संघ घाबरत होता. गांधी आणि गांधीविचार संपवण्याचा संघाने आटोकाट प्रयत्न केला. सर्वोदयाचा विचार पुढे जाणे म्हणजे धर्माच्या नावाखाली संघटना बांधण्याच्या स्वप्नालाच तडा जाणे, हे संघ जाणतो. भारतात मध्यम जाती, मागास जातींना महासमन्वयाचा मोठा वारसा आहे, द्वेषाचा नाही. या जातींतून बळीराजा, राम, कृष्ण, गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, म. गांधी, म. फुले हे महामानव पुढे आले. त्यांनी समन्वयातून मानवमुक्तीचा, समतेचा विचार-वारसा पेरला. मंडलमुळे हा वारसा पुढे नेता येणार होता. हा वारसा किती कालातीत आहे, याची मांडणी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी केली आहे. गांधी-लोहिया हे ओबीसी नेते गुरुशिष्य होते, हा काही योगायोग नव्हता.

२५ वर्षांनंतर मंडल आयोगावर घेतलेले सगळे आक्षेप खोटे ठरल्याचे दिसते. मंडल लागू केला, तर अर्थव्यवस्था उदध्वस्त होईल, समाजात अनागोंदी माजेल, तथाकथित उच्च जातींवर अन्यायाचा वरवंटा फिरेल, त्यांच्या संधी नाकारल्या जातील, मागास-दलित लोक निर्णयप्रक्रियेत आले तर समाज रसातळाला जाईल, अशी टीका गुणवत्तेची मिरासदारी मिरवणाऱ्यांकडून करण्यात येत होती. २५ वर्षांनंतर असे दिसते आहे की, मंडलच्या अंमलबजावणीतून देशात राजकारण गतिमान झाले. नवे लोक राजकारण, अर्थकारण, समाजकारण, प्रशासनात आले. त्यामुळे भारत अधिक प्रगतीकडे झेप घेतोय. संघपरिवाराला आक्रमक, हिंसक धर्मवादी अजेंड्याऐवजी विकासाच्या अजेंड्यावर लोकसभेची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखाली लढवावी लागली. हिंसक राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या राजकारणाची भाषा वापरावी लागली. हा मंडलचाच प्रभाव आहे.

मंडलची पंचविशी साजरी होताना बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मंडलच केंद्रस्थानी आहे. तिथे भाजपला राम विलास पासवान, जीतनराम मांझी यांच्या कुबड्यांशिवाय निवडणुकीला सामोरे जाता येत नाही. नितीश कुमार, लालू प्रसाद हे मंडलवादी भूमिका घेऊन देशात चौखूर उधळलेल्या संघाच्या घोड्याला अडवू पाहत आहेत.

मंडलचे गेल्या २५ वर्षांचे मूल्यमापन करताना असे दिसते की, यापुढेही देशात मंडलच राजकारणात प्रभावी राहील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणाला जे अडवू इच्छितात, त्या संघटनांना तगण्यासाठी-जिंकण्यासाठी मंडलवादाशिवाय पर्याय नाही.

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे सामाजिक महत्त्व काय आहे? बाबू जगजीवनराम हे दलित नेते सांगत असत, “मागास-दलित मनुष्य करोडपती झाला, तरी त्याला ब्राह्मण मान देत नाही; पण सरकारी नोकरीत मागास मनुष्य पोलिस अधिकारी जरी झाला, तरी त्याच्या हाताखालचा ब्राह्मण पोलिस कॉन्स्टेबल जी, भाऊसाहेब म्हणून सॅल्यूट ठोकतो.” ही क्रांती मंडलने घडवली आहे. आता मंडलच्या मुलांची जबाबदारी पुढे अधिक महत्त्वाची आहे. संविधानाच्या स्वप्नातला समतावादी भारत घडवण्यासाठी त्यांनी हे २५ वर्षांचे निमित्त साधून पुन्हा लढाईला तयार झाले पाहिजे.

rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ११/०८/२०१५


Tuesday, August 11, 2015

बाबासाहेब, आव्हाडांना ओवेसी होऊ देऊ नका








महाराष्ट्राच्या पोटात सध्या एक गाणे आणि एक वाद खळबळ माजवत आहे. खळबळ माजवणाऱ्या गाण्याचे बोल असे -

कल्लूळाचं पाणी, कशाला डवळिले,
नागाच्या पिलाला, का गं डिवचिले!

सोशल मीडियात, युट्यूबवर या गाण्याला मिळणारी पसंती बघून त्याची लोकप्रियता जाणता येते. ठेक्यावरची चाल, डोलायला लावणारा लोकसंगीताचा बाज या गाण्यात आहे. हे गाणे ऐकता ऐकता दुखावलेली हरएक व्यक्ती आपला अहंकार कुरवाळून घेऊ शकते. आपल्यातले हिंसकपण गाणे ऐकताना खूश होऊ शकते. आपण जसे आहोत तसे मस्त आहोत असे काल्पनिक सुख हे गाणे देते. डिवचाल तर दंश करील अशी अभिव्यक्ती हरएकाला देणारे हे गाणे बसल्या ठिकाणी मनोरंजन करून घेता घेता आपल्याला नागासारखे हिंसक बनवू शकते.

या गाण्यातून समाजमन पुढे येतेय. त्याचा वास्तवात आविष्कार एका वादात प्रतिबिंबित झालेला दिसतो. बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना घोषित झालेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या निमित्ताने हा वाद उफाळून आला आहे. दुखावलेले समाजमन या वादाच्या निमित्ताने ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. प्रसरामाध्यमांनी या गंभीर वादाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्याचे कव्हरेज नीट झालेले नाही. या वादाने राज्यात जातीजातींत घुसळण सुरू आहे. दोन्ही बाजूने जन-मन संतप्त आहे.

बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार शासनाने रद्द करावा या मागणीसाठी काही सामाजिक संघटनांनी राज्यात अकरा शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या आहेत. हजारो लोक या परिषदांना हजर होते. सांगलीच्या परिषदेत लठ्ठालठ्ठी झाली म्हणून त्याची बातमी झाली. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, पारनेर, नांदेड, यवतमाळ या ठिकाणीही मोठ्या परिषदा झाल्या. दोन्ही बाजूंनी तक्रारी, हरकती, आरोप-प्रत्यारोप होताहेत. पोलिस बंदोबस्तात या परिषदा सुरू आहेत. या परिषदांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे हे वक्ते घणाघाती भाषणे ठोकतात. टाळ्या, घोषणा, जल्लोष, त्वेष त्या भाषणांत असतो. जितेंद्र आव्हाड हे या परिषदांमध्ये स्टार वक्ते असतात. शिवरायांच्या स्वराज्याचा खोटा इतिहास सांगणाऱ्याला महाराष्ट्रभूषण आणि खरा इतिहास सांगणाऱ्या गोविंद पानसरे यांची हत्या कशी व का केली जाते यांचे विवेचन परिषदांत केले जाते. राजा शिवछत्रपती या पुस्तकात पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करणाऱ्या चलाख्या कशा केल्या हे आव्हाड भाषणात सांगतात. या विपरित लेखनाला अधिकृत करण्यासाठी राज्य शासन पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देतेय. विदेशातून जेम्स लेन आला आणि शिवराय-जिजाऊंची बदनामी करून गेला, असे झालेले नाही. पुरंदरेंचे साहित्य म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे. स्वत:ला शिवशाहीर म्हणणाऱ्या पुरंदरेंनी इतिहासाचा खून केलाय. जिजाऊंचे चारित्र्यहनन करणारे पुरंदरे हेच खरे जेम्स लेन आहेत. जीव गेला तरी बेहत्तर पण इतिहासाचा खून सहन करणार नाही, असे जळजळीत भाषण आव्हाड करतात, तेव्हा अहं दुखावलेल्या लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येते.

राज्यभर झालेल्या अकरा जिल्ह्यांतील परिषदांमध्ये आव्हाडांची भाषणशैली एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याशी मिळतीजुळती दिसली. दुखावलेल्या मुस्लिम समूहाला ओवेसी चेतवतात. त्या समूहाचे नकारात्मक राजकियीकरण करतात. आक्रमक भाषणे, आव्हाने देण्याची धमक-भाषा, अहं सुखावणारा अजेंडा, मुद्द्यांचे अभ्यासून आणि साभिनय सादरीकरण, विनोद-उपहास-इशारे, भाषेचे खेळ यांनी भरलेल्या उत्कृष्ट एकपात्री प्रयोगासारख्या ओवेसी सभा रंगवतात. आपले राजकारण पुढे रेटतात. आव्हाड आणि ओवेसी यांच्यात हे समान धागे दिसतात. दोघांच्या भाषणांना, सभांना म्हणूनच प्रतिसाद मिळतो. दोघेही लोकांना चेतवण्यात माहीर ठरताहेत.

आव्हाडांची ओवेसी यांच्याशी तुलना करण्याचा इथे हेतू नाही. ओवेसी किंवा आव्हाडांना हिणवण्याचा तर नाहीच नाही. उलट राजकारणात आक्रमकपणा आणि अभ्यासूपणा यांचा मेळ दुर्मीळ आढळतो. उजव्या पक्षांकडे आक्रमक नेते खूप, अभ्यासू कमी. डाव्या, मध्यममार्गी पक्षांकडे अभ्यासू बरेच, पण जनमाणसाला गदगदा हलवणारे आक्रमक नेते कमी. दत्ता सामंत, दि. बा. पाटील असे अपवादात्मक नेते होऊन गेले. (जॉर्ज फर्नांडिस यापैकीच एक.) ते अभ्यासू होते आणि आक्रमकही. आव्हाडांना दत्ता, दि.बा., जॉर्ज यांचे वारस होता येऊ शकेल. तेवढे गुण त्यांच्याकडे नक्कीच आहेत.

इथे मुद्दा आहे राज्यात पुरंदरेंच्या निमित्ताने गंभीर बनलेल्या वादाचा आणि त्यातून वाढणाऱ्या विखाराचा. या वादात संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या मित्र संघटना विरुद्ध पुरंदरेप्रेमी संघटना यांच्या टकरावातून सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. तो ब्राह्मण-ब्राह्मणेतर या फॉर्ममध्ये भडकत आहे. गोविंद पानसरे यांच्या खुनाची या वादाला पार्श्वभूमी आहे. पानसरे हे जातीपलीकडे गेलेले कॉम्रेड-कम्युनिस्ट नेते. त्यांनी कधी त्यांची जात सांगितली नाही. मिरवली तर अजिबात नाही. जातीची घमेंड म्हणजे पराभवाचे मूळ असे ते मानत. प्रत्येकाने आपली जात टाकून दिली पाहिजे. कात टाकलेल्या सापासारखे जातीमुक्त झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पण पानसरेंच्या खुनाने त्यांची जात पुढे आली. पानसरे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हारचे. मराठा जातीत जन्मलेले. पानसरेंचा खून म्हणजे आपल्यावर झाडलेली गोळी असे सर्वमान्य मराठा समाजातल्या तरुणाला वाटले, असेल काय? हे तरुण आव्हाडांच्या भाषणाला गर्दी करतात. संभाजी ब्रिगेड त्या तरुणांचा मंच बनतेय. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष या मंचाला सहकार्य करताना दिसतोय. आंबेडकरी, कम्युनिस्ट हे गटही सोबत आहेत.

या गंभीर सामाजिक दुखण्यावर इलाज करू शकते अशी एकमेव व्यक्ती राज्यात आहे, ती म्हणजे खुद्द बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेबांना आवाहन करावेसे वाटते की, बाबासाहेब तुम्ही पुढे व्हा. संभाजी ब्रिगेडला एमआयएम बनू देऊ नका आणि आव्हाडांचा ओवेसी होऊ देऊ नका. तुम्हाला हे नक्की करता येईल. त्यासाठी तुम्हाला थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी आणि ख्यातनाम चित्रपट अभिनेते निळू फुले यांनी घालून दिलेल्या उदाहरणांपासून काही सूत्र सापडेल.

एस.एम. जोशींनी काय केले?
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या मागणीसाठी नामांतर आंदोलन पेटले. या आंदोलनाला सवर्ण विरुद्ध दलित असे रूप आले. जातीय तणाव वाढला. सवर्ण नेते, विचारवंत नामांतराला खोडा घालताहेत अशी दलित तरुणांची भावना वाढीस लागली. दुखावलेले दलित समाजातले तरुण हिंसक प्रतिक्रिया देत. त्याविरोधात त्याहून हिंसक प्रतिक्रिया उमटत. हा नकारात्मक समाजविघातक खेळ थांबवण्यासाठी, नामांतराचे आंदोलन अहिंसक आणि योग्य पद्धतीने, सर्वसमावेशक विचाराने पुढे जावे म्हणून एस.एम. जोशी यांनी पुढाकार घेतला. पहिल्यांदा दलित तरुणांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला. एस.एम. मराठवाड्यात दौऱ्यावर गेले. ठिकठिकाणी सर्व जातींतल्या कार्यकर्त्यांशी बोलू लागले. लातूर जिल्ह्यात एका ठिकाणी तर त्यांनी दलित तरुणांनी आणलेली चपलांची माळ स्वखुशीने गळ्यात घालून घेतली. ही माळ घालणाऱ्या तरुणांशी त्यांनी संवाद केला. त्यांचा राग रास्त आहे. मला चपलेची माळ घातल्याने जर त्यांना समाधान मिळणार असेल तर तेही मी स्वीकारतो. हा अपमान मी आनंदाने गिळतो, असे त्यांनी सांगितले. त्या चपलेच्या हाराने चमत्कार केला. अपमान गिळलेल्या एसेमांच्या नेतृत्वाचा सन्मान वाढला. त्यांचे नेतृत्व उजळून निघाले. बहुजनांनी त्यांना नेता मानले. महाराष्ट्राच्या शिल्पकारांच्या माळेत ते जाऊन बसले.

बाबासाहेब, हजारो सन्मान स्वीकारणे सोपे असते, पण एखादा अपमान गिळणे सोपे नसते. अपमान गिळण्याने सन्मान वाढतो, ही एसेम यांनी आपल्यापुढे तयार केलेली पायवाट आहे. आता निळू फुले यांचे पाहा. त्यांना राज्य सरकार म्हणाले, महाराष्ट्रभूषण तुम्हाला देतो. आपल्याला खलनायक म्हणून परिचित असलेले निळू फुले सरकारला म्हणाले, माझ्यापेक्षा मोठे नायक राज्यात आहेत. डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग या जोडप्याला माझ्याऐवजी महाराष्ट्रभूषण द्या. या पुरस्काराचा गौरव वाढेल. २००३ची ही गोष्ट. निळू फुलेंच्या सूचनेवरून त्यावेळी सरकारने बंग दाम्पत्याला महाराष्ट्रभूषण दिला. हा कलाकार-कार्यकर्ता म्हणून मोठा असलेला मनुष्य मनानेही किती महान होता! चालून आलेला सन्मान त्यांनी दुसऱ्याकडे वळवून दिला. मोठी झालेली माणसे मनानेही तितकीच उंच होतात असे सहसा दिसत नाही.

आज निळू फुले असते तर त्यांनी महाराष्ट्रभूषणसाठी हिंदू कार डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांचीही नावे सुचवली असती किंवा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनाही महाराष्ट्रभूषण द्या, असेही म्हणाले असते. ते काही असो. असो. मूळ मुद्द्याकडे येतो.

बाबासाहेब, राज्यातले हिंसक सामाजिक वातावरण निवळण्यासाठी तुम्ही भूमिका बजावू शकलात, तर महाराष्ट्रभूषण पुरस्कारापेक्षा मोठे व्हाल. एस. एम. जोशी आणि निळू फुले यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाले नाहीत, पण म्हणून त्यांना राज्यातले लोक लहान मानत नाहीत. व्यक्तीच्या जीवनात मानसन्मानापेक्षा लोक जीवनाला दिशा देणारी कृतीच सर्वात जास्त सन्मानजनक ठरते. अशी कृती करणाऱ्यांना लोक संत, फकीर मानतात. त्यांच्या तसबिरी घरात लावतात.

बाबासाहेब, ७० वर्षे तुम्ही राज्याच्या सार्वजनिक जीवनात एक भूमिका घेऊन वावरत आहात. आजच्या दुखावलेल्या विषारी सामाजिक वातावरणात सर्वांचे तुमच्या भूमिकेकडे डोळे लागलेले आहेत. आजच्या गढूळलेल्या सामाजिक ओंगळाला हटवलेत तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. तेव्हा एस.एम. यांचा वारसा तुम्ही पुढे न्याल काय बाबासाहेब?

rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ११/०८/२०१५

Tuesday, July 28, 2015

कॅलिडोस्कोप











राचेलबाई तुहा रंग कंचा?
अमेरिकेतल्या ‘न्युयॉर्क टाईम्स’ या दैनिकात जून महिन्यात आलेली एक स्टोरी खूप गाजली. सोशल मीडियातही तिचा गाजावाजा झाला. ही स्टोरी आहे राचेल डोलेझल या प्रतिष्ठित बाईची. राचेलबाई वॉशिंग्टनमधील स्पोकेन इथं राहतात. त्या प्राध्यापिका असून प्रतिष्ठित मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. या बाई आहेत गोऱया. पण त्यांनी स्वतची ओळख मी ब्लॅक वंशाची आहे, अशी सांगितल्याने खळबळ माजली. राचेलबाइं&च्या आईवडिलांनी तात्काळ जाहीर केलं की, ‘आमची मुलगी खोटारडी आहे. आम्ही गोरेच आहोत. मुलगीही गोरी आहे. आमचा वंश युरोपियन आहे. आम्ही ब्लॅक वंशाचे असण्याचा प्रश्नच नाही.’ अमेरिकेत सोशल मीडियासह विविध माध्यमांत राचेल बाईंना विचारलं गेलं की, ‘तुम्ही खोटं का बोलता? तुमचा रंग, वंश नेमका कोणता?’ राचेलबाई आपल्या मतावर ठाम होत्या. त्यामुळे त्या ज्या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत, त्या संस्थांचीही गोची झाली.

माध्यमांनी राचेल बाईंबद्दल माहिती काढली तर कळलं की, त्यांना बाल वयापासून ब्लॅक लोकांबद्दल आकर्षण वाटत होतं. त्यांच्या वडिलांनी चार काळी मुलं दत्तक घेतली. या मुलांबद्दलही त्यांना माया वाटत असे. पुढे त्यांनी कॉलेजातही काळ्या लोकांसाठी लढे दिले. लग्नही एका काळ्या माणसाबरोबरच केलं. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. राचेल बाई दिसतात सुंदर. त्या विद्वानही आहेत. कर्तबगार, धाडसी आहेत. त्यांच्यावर टीका करणारे जसे अनेक आहेत, तसे त्यांचे समर्थकही पुष्कळ आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत म्हटलं की, रंग, वंश हे मुद्दे आता अमेरिकेसारख्या पुढारलेल्या समाजात महत्त्वाचे आहेतच कुठे?अमेरिकन समाजात अंशत काळे पण गोऱयांसारखे दिसणारे असे खूप लोक आहेत. विसाव्या शतकात एकपंचमांश एवढी लोकसंख्या अशा लोकांची आहे. काही गोरे लोक काळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात. त्यांच्यासारखंच जीवन जगतात. पण कुणी आपली ओळख लपवत नाही. राचेल बाईंच्या बाबतीत मात्र ओळख लपवल्याचा आरोप होतो आहे.  अमेरिकेत रंग, वंश याबद्दल माहिती लपवणं हा मोठा सामाजिक अपराध मानला जातो. राचेल बाईंच्या विरोधात सोशल मीडियावर धमक्या देण्यापासून तर उपहासात्मक टीका करण्यापर्यंत अनेक प्रकार सुरू आहेत. या प्रकरणाचा शेवट काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी काळेपण मिरवणारी ही गोरी बाई लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे.


फ्रेंच हटके  विचार कसा  करतात?
मासा मेल्यानंतर त्याचं शरीर सडायला डोक्यापासून सुरूवात होते. मानवी समाजाचंही असंच काहीसं आहे. डोकं म्हणजे विचार. डोकं जिवंत असणं म्हणजे विचार सुरू असणं. डोकं मेलं की विचारही मेलाच. विचारशैली जिवंत, सळसळती असलेला समाज अधिक ताजातवाना, प्रगतीशील असतो. युरोपमधील प्रेंच समाज असा प्रगतिशील मानला जातो. या समाजाबद्दल असं म्हणतात की, तो विद्वानांचा समाज आहे. फ्रान्स हा विचारवंतांचा देश आहे. विचार तर सर्व मानवसमूह करत आलेला आहे. पण प्रेंचांचं वैशिष्ट्य असं की, ते हटके विचार करतात. म्हणून जगात त्यांचं नाव आहे. जॅक्स् डेरीदा, जॉ पॉल, सार्त्र, अल्बर्ट कामू आणि आताचा नवं भांडवल लिहिणारा थॉमस पीकेटी या प्रेंच विचारवंतांचा जगभर दबदबा आहे. प्रेंच माणसांच्या या वैभवशाली विचारशैलीच्या इतिहासाचा मागोवा घेत आज प्रेंच समाज बुद्धीच्या क्षेत्रात मागे का पडत आहे, याचा धांडोळा घेणारं एक पुस्तक सध्या चर्चेत आहे.
‘द इकॉनॉमिस्ट’ या जगप्रसिद्ध मॅगझीनमध्ये जून महिन्याच्या अंकात या पुस्तकावर लेखन प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाचं नाव आहे ‘हाऊ द फ्रेंच थिंक अॅन अॅफेक्शनेट पोट्रेट ऑफ अॅन इंटलेक्चुअल पिपल’. पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर हजारी सिंग. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी या पुस्तकात फ्रान्समध्ये विचारशैलीला महत्त्व कसं आहे, याचा ऐतिहासिक मागोवा घेत घेत आताच्या फ्रान्सचं विश्लेषण केलं आहे.

लेखक पुस्तकात सांगतो, प्रेंच माणूस हटके विचार कसा करतो? त्याच्या विचार करण्यावर पाच घटकांचा प्रभाव असतो.
1. प्रेंच समाजाचा इतिहास हा सामाजिक बंड, अराजक, त्यानंतर क्रांती आणि ती स्थिर झाल्यानंतर प्रगती असा अवघड वाटा-वळणांचा आहे. या इतिहासाचा फ्रेंच माणसावर मोठा प्रभाव आहे.
2. फ्रेंच समूहाला सामूहिक ओळख आहे. त्यामुळे तो समाज आत्मविश्वासाने विचार करतो.
3. प्रेंच समाजाला सामूहिक वाद संवादाची आवड आहे. घरी, सार्वजनिक ठिकाणी आणि विविध संस्थांमध्ये हे वाद संवाद घडत असतात. विचार कुटाळक्या, भांडणं, घनघोर चर्चाखोरी, छोट्या छोट्या गोष्टींवर कीसपाडीवृत्ती, चिकित्साखोरी अशा गुणांचा या समाजात भरपूर विकास झालेला आहे.
4. लोक विचारवंतांना खूप मान-सन्मान देतात, जपतात.
5. क्रांतिकारी विचार परंपरा आणि सर्जनशीलता यांच्यात फ्रेंच समाजाने पिढ्यान्पिढ्या संवादाचं वातावरण विकसित केलं आहे.

या पाच घटकांमुळे या समाजात विचार करणाऱयाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे, असा निष्कर्ष लेखकाने काढलाय. पण पुस्तकाच्या शेवटी हा लेखक आजच्या फ्रेंच समाजाचं विश्लेषण करताना थबकतो. बिचकतो. अल्बर्ट कामूचा देश आज सकस विचार करायला नकार का देतोय? विचाराच्या क्षेत्रात थॉमस पीकेटीचा अपवाद सोडला तर मोठे विचारवंत फ्रान्समध्ये जवळपास नाहीत. लेखकाला या मागचं कारण असं दिसतं की, समाजात विचार करायला प्रतिकूल वातावरण तयार झालं की, जे काही वासरात लंगडी गाय म्हणता येतील असे विचारवंत उरतात. त्यांचाही मेंदू आक्रसतो. मग त्यातून सुरू होतो छोट्या विचाराचा प्रदेश. आजच्या फ्रान्सचं असं काही तरी होतंय का? लेखकाने हा प्रश्न पुस्तकात मांडलाय.

जगभरातले नव्या जमान्याचे प्रेरणादायी सोशल लिडर
टाईम या मॅगझीनमध्ये दरवेळेला काहीना काही नवं हमखास वाचायला मिळतं. जून महिन्यात या अंकात नेक्स्ट जनरेशन लिडर्स् अशी एक स्टोरी प्रसिद्ध झाली आहे. या स्टोरीमध्ये चीन, पाकिस्तान, फ्रान्स, तुर्कस्तान, अमेरिका, केनिया या निवडक देशातील नव्या कल्पना निवडून त्यावर झपाटल्यासारखं काम करणाऱया तरुण, तरुणींच्या प्रेरक कथा दिलेल्या आहेत.


चिनी डिझाईनर माशा
यातली पहिली कथा आहे चीनमधील शांघाय येथील माशा मा हिची. जगभर चिनी वस्तूंचं मार्केटिंग जोरदारपणे चालु असतं. मेड इन चायना असं लिहिलेल्या विविध चिनी ब्रँडच्या वस्तू जगभर पाठवल्या जातात. मात्र या ब्रँडची डिझाईन नजरेस भरणारी नसते. विदेशातली ही चिनी वस्तूंविषयीची तक्रार लक्षात घेऊन डिझायनर माशा हिने स्वतचा स्टुडिओ उभा केला. आणि चीनमध्ये आकर्षक वस्तू बनवण्याचा सपाटा लावला. लंडनमध्ये फॅशन डिझाईन या विषयात पदवी मिळवलेल्या माशा हिने विशेषत स्त्रियांच्या वापराच्या फॅशनेबल वस्तू विदेशात पाठवायला सुरूवात केली. दोन वर्षांपासून माशा हा व्यवसाय करतेय. सुरूवातीला डझनभर ब्युटिकमधून तिने हा व्यवसाय सुरू केला. आता युरोप, अमेरिकेत तिच्या वस्तूंना मागणी आहे. मेड इन चायना या स्लोगनचं तिने ‘डिझाईन इन चायना’ असं रूपांतर केलं. लेडी गागासारख्या प्रतिष्ठित महिला तिच्या वस्तू विकत घेऊन वापरतात. आणि अभिमानानं मिरवतातही. अल्पावधित जगभर फॅशन डिझाईनर म्हणून या 29 वर्षांच्या चिनी मुलीचं नाव झालं. म्हणूनच काहींनी तिची दखल घेतली.

डिजिटल राईट अॅडव्होकेट
पाकिस्तानातल्या 34 वर्षीय निघत दाद या लाहोर येथे राहणाऱया तरुणीचीही कहाणी कमालीची प्रेरणादायक आहे. तिने पाकिस्तानातल्या पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱया ऑनलाईन हॅरॅशमेंटच्या विरोधात जागृती करणारी संस्था उभी केली. तिचं नाव डिजिटल राईट फाऊंडेशन असं आहे. निघत वकील आहे. क्रिमिनल लॉ आणि फॅमिली लॉ हे तिचे आस्थेचे विषय आहेत. तिचे वडील तिच्या पाठिशी सावलीसारखे उभे राहिले. पाकिस्तानातल्या कायदा विभागाने आणि पोलीस खात्याने तिच्या या प्रयत्नांना सहकार्य केलं. तरुण मुलींना ऑनलाईन हॅरॅशमेंट पासून स्वतचा बचाव कसा करायचा, यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम निघत आणि तिची टीम करते. ज्या मुली, महिला यांना ऑनलाईन छळाचा अनुभव येतो, त्यांनी पुढे येऊन तक्रार केल्यानंतर अशा पीडितांना निघत न्याय मिळवून देते. तिचं काम अल्पावधित एवढं लोकप्रिय झालं की, नोबेल प्राईझ विनर मलाला युसुफजाई हिनेही त्याची स्तुती केली. निघतचं काम आता पाकिस्तानात एवढं फोफावलं आहे की, ऑनलाईन हॅरॅशमेंट करणारे पुरुष वचकून असतात. तिच्या कामाला मिळालेली ही पावतीच म्हणता येईल, म्हणूनच जगभर तिची दखल घेतली गेली.

आचारी तुमच्या घरी
असंच वेगळं काम फ्रान्समध्ये पॅरिस येथे राहणारा स्टिफन लेगुईलॉन करतोय. त्याचं काम म्हटलं तर साधं आहे. म्हटलं तर घरातल्या किचनची दुनिया बदलून टाकणारं. स्टिफन आणि त्याचे साथीदार ग्राहकांना (गरजू कुटुंबांना) सेफ (आचारी) पुरवण्याचं काम करतात. ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करायचं. सेफने काय मेन्यू तयार करुन द्यायचा हे सांगायचं. एकदा बुकिंग झालं की, ठरलं त्या वेळेला सेफ घरी येईल. दार उघडून ग्राहकाने फक्त त्याचं स्वागत करायचं. त्याला  किचन दाखवून द्यायचं. हा सेफ सोबत मेन्यूचं सगळं साहित्य (किराणा बाजार, भाजीपाला वगैरे) बरोबरच घेऊन येतो. आणि कुटुंबाला मस्त सुग्रास भोजन आवडीनं तयार करून देतो. या कामामुळे 26 वर्षांचा स्टिफन फ्रान्समध्ये अल्पावधीतच प्रत्येक कुटुंबातल्या गळ्यातला ताईत बनला.

इंगिनचा अल्टरनेट जरनॅलिझम
स्टिफन सारखं काम करायला कल्पकता लागते आणि धाडसही. असं धाडस तुर्कीमधल्या इस्तंबुलमध्ये राहणाऱया इंगिन ओंडर या 23वर्षांच्या तरुणाने दाखवलं आहे. त्याने तुर्की प्रस्थापित मीडियाला आव्हान उभं करत स्वतचा अल्टरनेटीव्ह मीडिया तयार केला आहे. हे त्याने कसं घडवून आणलं? त्याला कारण ठरली एक घटना. 28 डिसेंबर 2011 रोजी तुर्की लष्कराच्या लढाऊ विमानांनी तुर्क आणि इराकच्या सीमेवर बॉम्बवर्षाव केला. कुर्दीश फुटीरतावादी अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी हा हल्ला केला गेला, असं सांगितलं गेलं. त्यात 34 लोक मारले गेले. मात्र सत्य वेगळंच होतं. या हल्ल्यात मारले गेलेले सर्वजण स्थानिक रहिवासी खेडूत होते. त्यात बहुतेकजण तरुण मुलं होती. ती मुलं सीमेवर इंधन आणि सिगरेटचं स्मगलिंग करून तुर्कीमध्ये नेत असत. तुर्कीमधील मुख्यप्रवाहातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने ही बातमी लपवली. इंगिन आणि त्याच्या विद्यार्थी सहकाऱयांनी ट्विटरवर ही बातमी दिली. त्याच्या मागचं सत्य उलगडून सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रस्थापित मीडिया इंगिनवर नाराज झाला. मात्र तुर्की जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यानंतर 140 नवशिक्या पत्रकारांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचं हत्यार वापरून इंगिनने सिटीझन जरनॅलिझम जोरात सुरू केला. आता तुर्कीमध्ये इंगिन आणि त्याच्या सहकाऱयांचा पर्यायी मिडिया उभा राहिला आहे. आणि बातमी लपवण्याची कुणाचीही बिशाद नाही.

फोटोग्राफर्स्ची चळवळ
अमेरिकेतल्या मे बोइव्ह आणि केनियाचा बोनिफेस मवांगी यांची कहाणीही डेअरिंगबाज आहे. 31 वर्षांची मे न्यूयॉर्कमध्ये राहते. 350स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं करून तिने पर्यावरणवादी गट बनवला आहे. पर्यावरणाचं नुकसान करणाऱया व्यवस्थेविरोधात जागृती करणं, मोर्चे काढणं, सरकारवर दबाब आणणं असं तिचं काम चालू आहे. 31 वर्षांचा बोनिफेस अप्रतिम फोटोग्राफर आहे. तो जिथे अन्याय, अत्याचार होईल तिथे धडकतो. त्याचे फोटो काढतो आणि दडपलेल्यांचा आवाज बनतो. त्याच्या फोटो काढण्याच्या पद्धतीमुळे त्याला जगभर ‘गनिमी काव्याचा फोटोग्राफर’ म्हणून ओळख मिळत आहे.अशा समदृष्टी फोटोग्राफर्सची टीम बनवून बोनिफेस आणि त्याचे सहकारी केनियातल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना फोटो चळवळीच्या माध्यमातून उघडं पाडतात. अशा नव्या कल्पना घेऊन काम करणारे हे सोशल लिडर आहेत. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, ही तरुणाई या तरुण नेत्यांपासून प्रेरणा घेईल काय? एकेका प्रश्नावर काम करणारे तरुण भारतातही वाढोत.










गाववाली अॅण्टी हिरोईन
भारतात कंगना राणावत या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नटीबद्दल जून महिन्यात न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियात खूप छापून आलं. तन्नू वेड्स मन्नू रिटर्नस् या तिच्या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा बिझनेस केला. क्वीन या चित्रपटासाठी तिला नॅशनल अवॉर्डस् मिळालं. या दोन गोष्टींमुळे तिची चर्चा झाली असली तरी ही नटी पहिल्यापासून काहीना काही स्वतचं वेगळेपण दाखवत आली आहे. हे वेगळेपण काय आहे? ‘डर्टी पिक्चर’ हा सिनेमा तिने नाकारला होता. या चित्रपटाची गोष्ट न आवडल्याने तिने हा निर्णय घेतला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर ही पोरगी बावळी आहे, तिला अक्कल नाही, अशी तिच्यावर टीका झाली होती. मात्र मी तत्त्व म्हणून असे चित्रपट यापुढेही नाकारेन, या मतावर कंगना ठाम दिसली. तोंडाला लावायच्या एका क्रीमची करोडो रुपयांची जाहिरातही तिने अशीच लाथाडली. तिचं असं म्हणणं आहे की, एक कोटी बुडाले म्हणून काय झाल? क्रीम तोंडाला लावल्याने कुणी गोरी कशी बनेल? जे घडणार नाही. ते मी जाहिरातीतून कसं सांगू? माझी बहीण सावळी आहे. तिला मी सामोरं कसं जाऊ? खोटं नको, करोडो रुपयेही नकोत.

अशी ही बॉलिवुडमधली हटके नटी आहे. सोळा-सतरा वर्षांची होती; तेव्हा ही पोरगी मुंबईत आली. हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिह्यात भांबला हे तिचं छोटं गाव. आधी दिल्लीत मग मुंबईत करिअरच्या शोधात असलेल्या या मुलीला नीट इंग्रजीही बोलता येत नव्हतं. मुंबईत नवखी होती. फिल्म इंस्डस्ट्रीत कुणी ओळखीचं नाही. तरी या मुलीने धीराने तडजोड न करता काम शोधायला सुरुवात केली. चांगली काम मिळाली, ती केली. तत्त्वाशी तडजोड केली नाही. छोट्याशा गावातून आलेली ती आज देशातल्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून बसली आहे. हम थोडे बेवफा क्या निकले, आप तो बदचलन हो गये, हे आपल्या नवऱयाला सांगणारी डेरिंगबाज तन्नू तिने साकारली. मै अपने हनिमून पे अकेले आई हूँ, असं समोरच्याला बेधडकपणे सांगणारी ही नायिका म्हणूनच तरुणाईची लाडकी झाली आहे. तिच्या भूमिका सोज्वल, रडक्या, अन्याय सहन करणाऱया बुळ्या हिरोईनसारख्या नाहीत. म्हणून बॉलिवुडचे चित्रपट समीक्षक तिला अॅण्टी हिरोईन म्हणतात. कंगनाचा त्याला आक्षेप नाही. तिचं म्हणणं असं की, मी आजची बेधडक तरुणी पडद्यावर साकारते. त्याचा मला अभिमान आहे.

 इंदिराजी आणि मोदीजी
नवभारत टाईम्स या दैनिकात संपादकीय पानावर देशातले जानेमाने पत्रकार, विचारवंत, लेखक विविध विषयांवर लिहित असतात. अत्यंत मूलभूत मांडणी काही लेखांमधून होत असते. ज्येष्ठ पत्रकार चंद्रभूषण यांनी जूनमध्ये इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन आजी माजी पंतप्रधानांची तुलना करत देशासमोरील आव्हानांची चर्चा करणारा लेख लिहिला आहे.

त्यांचं म्हणणं असं की, देशात, केंद्रात एकाधिकारशाहीने चालणारं सरकार आलं की, त्या सरकारचा दबदबा वाढतो जरूर. लोकांना त्याचं आकर्षणही वाटतं. त्या नेत्याची ‘वाह! काय ताकदवान नेता आहे, काय धडाकेबाज निर्णय घेतो, कसा सर्वांना नमवतो’ अशी स्तुती जरूर होते. पण या हुकूम सोडणाऱया नेत्यांच्या काळातच देशात, विविध राज्यांत पहिल्यांदा अस्वस्थता पसरते. मग गोंधळ माजतो. दंगली भडकतात. दहशतवादी कारवाया वाढतात. आणि याचा शेवट फुटीरवादी शक्ती फोफावतात. देश फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहतो.

इंदिरा गांधी यांची जूनमध्ये आठवण जरूर होते. कारण 26 जून 1975 रोजी त्यांनी देशात आणीबाणी लागू करून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला होता. हा अतिरेक लोकांना आवडला नाही. त्यानंतर मतपेटीतून लोकांनी इंदिराजींना घरचा रस्ता दाखवला होता. याच इंदिरा गांधी 1980 साली दुर्गा बनून परत सत्तेवर आल्या. त्यांचा 1980 ते 1984 हा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ दबदबा निर्माण करणारा होता. मात्र त्याच काळात पंजाबात खलिस्तानी आंदोलन वाढलं. आसाममध्ये सांप्रदायिक दंगे भडकले. जम्मू-काश्मिरमध्ये इंदिराजींचा शेख अब्दुला परिवाराशी इगोचा झगडा झाला. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये फुटीरवादी कारवाया माजल्या. या फुटीरतावादी शक्तींनीच पुढे इंदिराजींचा बळी घेतला.

मोदीजींचं सरकारही इंदिराजींच्या सरकार सारखंच ताकदवान आहे. बहुसंख्याकांचा त्याला जोरदार पाठिंबा आहे. या सरकारच्या पहिल्या वर्षातच काही वेगळ्या घटना बघायला मिळाल्या. 6 जून 2015 ला ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेचा 31वा स्मृतिदिन पंजाबात आणि जम्मूमध्ये साजरा करण्यात आला. यादिवशी एकेकाळी पंजाबात फुटीरवादी शक्तींची ज्योत पेटवणाऱया जर्नल भिंद्रनवाले यांना शीख फुटीरवाद्यांनी मानवंदना दिली. त्यांच्या समर्थनार्थ सुवर्णमंदिरात तलवारी उगारून घोषणाबाजी केली. पंजाबात अकाली दल आणि भाजपचं सरकार आहे. मात्र या सरकारचा या फुटीरतावाद्यांना धाक राहिलेला दिसत नाही. जम्मू-काश्मिरमध्ये जून महिन्यातच पाकिस्तानचे झेंडे फडवण्यात आले. या राज्यातही भाजप आणि पिडीपीचे सरकार आहे. पाकिस्तानधार्जिणे फुटीरतावादी नेते या राज्यात मोकाट आहेत. केंद्रात मोदीजी बलवान आहेत. पण त्यांचा या फुटीरतावाद्यांना धाक दिसत नाही. तमिळनाडूतल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर केंद्र सरकारने बंदी घालून तिथल्या विद्यार्थ्यांना डिवचलं. त्यातून तमिळ तरुण मोदीजींच्या विरोधात घोषणा देत हा देश आमचा आहे की नाही? या देशात आम्हांला चर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? असा सवाल करू लागलेत. नॉर्थ ईस्ट राज्यात अशांतता सुरू आहेच. देशात उत्तर प्रदेश सारख्या राज्यात राम मंदिराचा प्रश्न डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात नथुरामी कारवाया वाढताहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील लालकृष्ण अडवाणी यांची मुलाखतही लक्षवेधक ठरली. अडवाणींनी म्हटले आहे, लोकशाही चिरडणाऱया शक्ती आजही दखलप्राप्त आहेत. अडवाणींच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत चंद्रभूषण यांनी आपल्या देशात सीमेवरच्या राज्यांतून खतरनाक इशारे येऊ लागले आहेत, याचं भान आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रात हिंदूंचा दबदबा असणारं सरकार अंतिमत राज्या- राज्यात विभाजनवादी, देशतोडक ताकदीला बळ देतं, हा चंद्रभूषण यांचा निष्कर्ष आपल्याला नक्कीच काळजी करायला लावणारा आहे.

(सौजन्य : लोकमुद्रा जुलै 2015)

-        राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा