Thursday, December 3, 2015

धर्मनिरपेक्षला भाजप-संघाचा आक्षेप जुनाच













संघ परिवाराचा फक्त धर्मनिरपेक्षतेला विरोध नाही तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, समाजवाद या मूल्यांसह संविधानालाच आक्षेप आहे. वाजपेयी सरकारने संविधान पुनरावलोकन समिती नेमली होती. संघाला अशोकचक्र, सत्यमेव जयते, जनगणमन राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज याबद्दल प्रेम नाही.

२६ नोव्हेंबरला संसदेत संविधान दिनी संविधानावर चर्चा झाली. लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली. केंद्र सरकारची आणि भाजपची भूमिका मांडताना त्यांनी धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) हा शब्द आम्हाला खटकतो, या शब्दाचा भारताच्या राजकारणात सर्वात जास्त दुरुपयोग झाल्याचे सांगितले. या शब्दाला आमची हरकत असल्याचे त्यांनी जाहीरपणे नोंदवले. राजनाथ सिंह ही भूमिका भाजपचे प्रवक्ते म्हणून मांडत असले तरी भाजप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय हत्यार आहे. भाजप नेहमी संघाची भूमिका राजकीय क्षेत्रात पुढे नेत असतो. संघ बोले, भाजप चाले अशी पद्धत आहे.

भाजप-संघाची धर्मनिरपेक्ष या शब्दाला हरकत का आहे, हे समजून घ्यायचे असेल तर मुळात संघाची संविधानाविषयीची भूमिका बघावी लागते. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९४७-४९ या काळात संविधान तयार होत होते, तेव्हा संघाचे नेते सतत संविधानविरोधी वक्तव्ये करत असत. त्यातून त्यांना संविधानाबद्दल किती तिटकारा वाटतो हे स्पष्ट होत असे. संविधानाचा मूळ पाया, चौकट, मूलभूत मूल्ये त्यांना मान्य नाहीत. आधी स्वातंत्र्यलढ्यात, नंतर संविधान बनवण्यात संघाचा काडीचाही सहभाग नव्हता. या संविधानाबद्दल म्हणूनच संघवाल्यांना प्रेम, आस्था, आदर वाटण्याचे काही कारण नाही. संघ कधीही आपल्या शाखा, कार्यालयावर २६ जानेवारीला वा १५ ऑगस्टला तिरंगा फडकवत नाही. स्वातंत्र्यदिन मानत नाही. संविधानात समता, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समता ही मूल्ये नमूद करण्यात आली, त्याची प्रेरणा म. फुले, छ. शाहू महाराज, म. गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांतून आलेली आहेत. या महान नेत्यांबद्दल संघवाल्यांना तिटकारा आहे.

भारतात प्राचीन काळी बौद्ध प्रभावात काही प्रजासत्ताक राज्ये होती. त्यात लोकशाही होती. अध्ययन, अध्यापन करण्यासाठी विहार होते. समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा प्रभाव होता. मधल्या काळात वैदिकांनी हे सर्व नष्ट केले. वैदिकांनी प्रजासत्ताके नष्ट केली. मग फक्त राजेशाही राहिली. राजा हा धर्मानुसार वागणारा ठरला. विहार तोडण्यात आले. ज्ञानाच्या, समतेच्या परंपरांना सुरुंग लावण्यात आले. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांनाच मूठमाती देण्यात आली. हे सर्व ज्या वैदिकांनी केले, त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत हे संघ परिवार गर्वाने सतत मिरवत असतो. ज्यांनी १९९२ साली बाबरी मशीद तोडली, त्यांच्याच क्रूर पूर्वजांनी भारताला अंधार युगात ढकलले. या अंधारयुगाचे गोडवे संघवाले आजही गातात.

मुद्दा असा की, संघवाल्यांची फक्त धर्मनिपरेक्ष शब्दाला हरकत नाहीए, तर संविधानालाच हरकत आहे. त्यातल्या सर्व तत्त्वांना विरोध आहे. तो का आहे याची अत्यंत विद्वत्तापूर्ण मांडणी संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांनी केली. त्यांनी बंच ऑफ थॉट्स 
( विचारधन) हे पुस्तक संविधानाला विरोध करण्यासाठी लिहिले. मूळ इंग्रजी ग्रंथ १९६६ साली प्रकाशित झाला. त्याची मराठी आवृत्ती १३ ऑगस्ट १९७१ रोजी हिंदुस्थान साहित्य या पुण्यातल्या संघाच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली. गुरुजी पंचवीस वर्षे संघाचे नेतृत्व करत होते. या ग्रंथातील विचार चुकीचे आहेत किंवा आम्हाला ते मान्य नाहीत असे आजपर्यंत झालेले संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंहजी, के. एस. सुदर्शन आणि आताचे मोहन भागवत यापैकी कुणीही सांगितलेले नाही. भाजपचे नेते, प्रवक्ते कधी या ग्रंथाला नाकारत नाहीत.

विचारधन मध्ये गोळवलकर गुरुजींनी भारतीय समाज, हिंदु-मुस्लीम संबंध, भारताचे संविधान या मुद्द्यांचा सविस्तर उहापोह केला आहे. गुरुजींना संविधानातील केवळ धर्मनिपेक्षताच नव्हे तर राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेची तत्त्वे मान्य नाहीत. व्यक्तीची प्रतिष्ठा राखणारी एकता मान्य नाही. गुरुजी म्हणतात, समानता नव्हे तर सुसंवादित्व हवे. हा सुसंवाद धर्माच्या नियंत्रणामुळे निर्माण होणार. तो धर्म वैदिक धर्म हे ओघाने आले. संघाचा धर्म हिंदू धर्म नसून वैदिक धर्म आहे ही चलाखीही आपण समजावून घेतली पाहिजे. व्यक्ती व समाज यांच्या परस्परसंबंधाबद्दल संघवाले म्हणतात, समाजपुरुषात व्यक्ती गौण. तिला स्वतंत्र स्थान, भूमिका नाही. व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. स्वातंत्र नाही, व्यक्तीने स्वत्व अर्पण करून समाजात समरस व्हावे. विलिन व्हावे ही ती भूमिका आहे. वर्ग, जात, प्रांत, धर्म, भाषा यांचे अस्तित्व संघाला मान्य नाही. ते मान्य न करता समरसता स्थापन करण्याचा संघाचा विचित्र खटाटोप आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चातुर्वर्ण्याची गोळवलकर गुरुजींनी केविलवाणी भलावण केली. पुरोहित वगळता बाकी व्यक्ती कस्पटासमान आणि वैदिक धर्म श्रेष्ठ असा हा सिद्धान्त आहे. संघ जातीप्रथेचे समर्थन करतो. वैदिकांच्या मूल्यश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवतो. लोकशाहीबद्दल गुरुजींची काय भावना आहे पहा! ते म्हणतात, गणसत्तेपासून राजसत्तेपर्यंत अनेक शासनपद्धती आपण येथे राबवून बघितल्या. आपल्याला असे दिसते की पश्चिमेत ज्या राजेशाही शासन पद्धतीत पराकोटीचा जुलूम व रक्तरंजित राज्यक्रांत्या झाल्या, ती राजेशाही आपल्या इथे मात्र अत्यंत हितकारक ठरली. हजारो वर्षे चालत राहिलेल्या त्या शासन व्यवस्थेमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्र्य होते आणि सर्वत्र शांततेचे समृद्धीचे साम्राज्य नांदत होते. (पान २१). लोकशाही राज्यव्यवस्था नको हे सांगण्यासाठी गुरुजी ही राजेशाहीची तळी उचलताहेत, हे उघड आहे.

भारत हे हिंदुराष्ट्र असल्याने ख्रिश्चन, मुसलमान यांना परके (एलियन्स) मानावे, त्यांना दुय्यम नागरिकत्व काही अटींवर द्यावे ही गुरुजींची भूमिका होती. आता संघवाल्यांचा ख्रिश्चन, मुसलमानांवरच फक्त राग आहे असे नाही. ख्रिश्चन, मुसलमान मुळात परके नाहीत. ते इथले भूमिपूत्र आहेत. सर्वांसारखा त्यांचाही या भूमीवर हक्क आहे. पण संघवाले त्यांच्याबरोबरच शीख, जैन, बौद्ध, लिंगायत, दलित, आदिवासी, ओबीसी यांच्याशीही दुजाभाव करतात. आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचा अपमान करणे, पददलितांना पावन करून घेण्याची भाषा करणे, शीख, जैन, लिंगायत, बौद्ध या स्वतंत्र धर्मांना वैदिक धर्माचा भाग आहेत हे जाहीर करून त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे हे प्रकार संघ करत आला आहे. स्त्रियांचे समान हक्क, त्यांनी पुरुष वर्चस्वातून मुक्त होणे यालाही गुरुजींची हरकत आहे. गुरुजींची ही मते म्हणजे पुरोहित वर्गाशिवाय इतर साऱ्यांची मानहानीच होय.

धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझम. याचा अर्थ निधर्मी राज्य. आपल्या सरकारला कोणताही धर्म नाही. राजनाथ सिंह म्हणतात, धर्मनिरपेक्षतेऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द हवा. त्यांच्या मते सेक्युलॅरिझमचे भाषांतर चुकीचे झाले. ही खूप मोठी चलाखी आहे. राजनाथ पंथनिरपेक्ष शब्दमध्ये का आणतात हे राजकारण समजून घेतले पाहिजे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माप्रती राज्यसंस्था समान अंतर ठेवील... आदर ठेवील. भारत हिंदूराष्ट्र असल्याने ख्रिश्चन, मुसलमानांविषयी समान आदर का ठेवायचा ही खरी राजनाथसिंह यांची भूमिका आहे. इतर धर्म शीख, जैन, बौद्ध, लिंगायत हे हिंदू धर्माचे खरे म्हणजे त्यांच्या मते वैदिक धर्माचे उपपंथ आहेत. त्यांच्याविषयी पंथनिरपेक्षता चालेल, हेच ते संघ-भाजपचे राजकारण!

संघाचा समाजवादाला विरोध आहे. गुरुजी म्हणतात- हे विकृत तत्त्व पश्चिमेकडून आले. आता संघ परिवाराचे गंभीर राजकारण बघा. संविधानातील लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या संकल्पना म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण आहे असे गुरुजींना वाटते. पण भांडवलशाही आणि राजेशाही, पुरोहितशाही या कल्पना गुरुजींना आकर्षक वाटतात. साम्राज्यशाही भांडवलशाही ही कल्पना संघाला पाश्चात्य वाटत नाही. तिने लोकांना लुबाडले तरी संघ परिवाराची हरकत नाही. पण गरिबांची बाजू घेणाऱ्या समाजवादाला हरकत आहे. म्हणूनच जगातल्या गरिबांना ओरबाडणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेबद्दल संघ परिवाराला प्रेम वाटते. पाकिस्तानला शस्त्रे विकून उदध्वस्त करणाऱ्या, दहशतवाद वाढवणाऱ्या अमेरिकेबद्दल संघ ममता दाखवतो, अशी ही विचित्र भूमिका आहे.

थोडक्यात, संघ परिवाराचा फक्त धर्मनिरपेक्षतेला विरोध नाही तर समता, बंधुता, स्वातंत्र्य, समाजवाद या मूल्यांसह संविधानालाच आक्षेप आहे. संघ परिवाराचे लाडके विचारवंत अरुण शौरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खोटा देव म्हणून घोषित केले होते. वाजपेयी सरकारने संविधान पुनरावलोकन समिती नेमली होती. एक सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी कॉन्िस्टट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड अशी मागणी २००० साली केली होती. गुरुजींनी घटनाकारांचे वर्णन पाश्चिमात्य कल्पनांच्या मागे वेडेपणाने धावणारे नेते असे केले होते. संघाला अशोक चक्र, सत्यमेव जयते, राष्ट्रगीत, तिरंगा ध्वज याबद्दल प्रेम नाही. संघाला खरोखरच बाबासाहेब, संविधान यांबद्दल प्रेम असेल तर येत्या २६ जानेवारीला संघ शाखांवर, कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवावा... तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. अन्यथा या राजकीय चलाखीने लोकांमध्ये संभ्रम वाढत जाईल.


राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०१/१२/२०१५

Wednesday, December 2, 2015

स्मारके उदंड, नवविचार थंड!




























कुणाकुणाचे स्मारक करावे? कुठे करावे? सरकारी खर्चाने ते करावे का? स्मारकांतून खरेच प्रेरणा मिळते? कशा प्रकारचे स्मारक प्रेरणादायी ठरेल, समाजाला, राज्याला पुढे नेणारे ठरेल? अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेत नवे नवे मुद्दे पुढे येत आहेत. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की, नेत्यांची स्मारके झाल्याने खरेच समाज पुढे जातो का? की स्मारके उदंड होत आहेत आणि नवविचार थंड आहे? नवविचाराला चालना कशाने मिळते? स्मारके ही कुणाची गरज आहे, समाजाची की वारसांची?

महाराष्ट्राने देशाला सतत नवविचार देण्यात पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात नेत्यांची एक मोठी प्रभावळ इथे तयार झाली होती. समाजचिंतक, विचारवंत, कार्यकर्ते यांची फळी या काळात राज्यात उभी राहिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, या भूमीत कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. विचारी लोकांचे मोठे दळ या राज्यात नेहमीच पाहायला मिळे. लेखक, पत्रकारांची प्रभावशाली मांदियाळी याच काळात इथे तयार झाली. नवविचार मांडणाऱ्या मंडळींनी मराठी समाजाची मान उंचावली होती.

आज स्मारकांची चर्चा सुरू असताना समाजातले चित्रे फारसे आशादायक नाही. एकेकाळी खुलेपणा हे आपल्या समाजाचे गौरवशाली वैशिष्ट्य होते. हा खुलेपणा आपल्या समाजजीवनातून हरवत चालला आहे. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारा आपला शत्रू, अशी शिकवण काही संघटना समाजात रुजवत आहेत. सर्वांनी शेळ्या-मेंढ्यांसारखे एका सूरात ब्या ब्या करावे अशी सक्ती केली जात आहे. खुनाचे समर्थन करणे हा खरे तर मानसिक रोग होय. जर्मनीत हिटलरच्या विचारांचे, कृत्यांचे समर्थन करणाऱ्यांना मनोरुग्ण (सायको) ठरवले जाते. कायद्याने त्यावर बंदी आहे. आपल्या समाजात खूनाचे समर्थन, खुन्यांचे समर्थन करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली जाते आहे. त्यांच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होतात. खूनी माणसांचे गौरवपर सोहळे, जयंत्या साजऱ्या करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. त्यांना आता समाजात प्रतिष्ठा मिळत आहे. मनोरुग्णतेचे गौरवीकरण होत आहे.

भीती बाळगणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, हिंसेचे समर्थन करणे ही मानसिक आजाराची लक्षणे आहेत, असे आता जगभरच्या मानसशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. पण आपल्या समाजात द्वेषपूर्ण, हिंसक भाषणे करणाऱ्यांना अमूकतमूक म्हणतात. त्याच्या अशा विखारी विचार, भाषणांना खास शैली आहे, असे म्हणून खुद्द पत्रकार गौरवताना दिसतात. तेव्हा आपल्या समाजात काही बिघडत चालले आहे, हे लक्षात येते. हिंसेचे समर्थन करणाऱ्यांना दवाखान्यात भरती करायचे सोडून त्यांचे जयजयकार होत आहेत.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खूनानंतर त्याचे समर्थन करणारे महाभाग खुलेआम दिसले. वर्तमानपत्रांनी त्यांच्या वृत्तांना खमंग प्रसिद्धी दिली. या महाभागांच्या पत्रकार परिषदा म्हणजे खुलेआम धमक्या, इशारे, द्वेष पेरणे असा कार्यक्रम होता. पण त्याविषयी कुणी फार झोड उठवली नाही. संपादकांच्या लेखण्या त्या विरोधात चालल्या नाहीत. हे आता आम आहे, हे चालायचे, असेच सर्वांनी मान्य करून गप्प राहणे पसंत करायचे? की आपण आतून हिंस्त्र बनत चाललो आहोत? बोथट झालो आहोत? सामंजस्य, उदारता या गोष्टी आता जणू लयाला जात आहेत. त्या बदल्यात हिंसक प्रतिक्रिया, संकुचित अस्मिता आणि उन्माद या गोष्टी प्रभावी ठरू लागल्या आहेत. कर्ते सुधारक संपादक गोपाळ गणेश आगरकरांचा या राज्याला वारसा आहे, त्या राज्यात संपादकच हिंसक अग्रलेख, दुही पेरणारे अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानू लागलेत. याला काय म्हणावे?

दुष्काळात माणसे मरत असताना स्मारकांवर सरकारी खर्च कशाला करता हे म्हणणारे आपल्या समाजात बहुसंख्येने निघू नयेत याचा अर्थ काय? आपला समाज नवविचार करायला नकार देतो आहे काय? हे कसल्या समाजरोगाचे लक्षण? विवेकशीलतेचे मूल्य आपल्या समाजातून लोप पावत चालले आहे की काय? का विवेकशीलता आपल्याला नकोच आहे?

आपल्या राज्यात लेखकांनी असहिष्णुतेच्या विरोधात पुरस्कार परत केले. त्यावर खूप कडव्या प्रतिक्रिया उमटल्या. खूप लोक कडवट बोलले. राजकीय पक्षांच्या राजकीय प्रवक्त्यांना या लेखक-कवींबद्दल, त्यांच्या मतांबद्दल जराही सहानुभूती दिसली नाही. या प्रवक्त्यांनी मुजोरीने बजावले की, तुम्ही कुणाचे तरी हस्तक आहात. तुम्ही कट कारस्थानाच सहभागी आहात. हे प्रवक्ते लेखकांना तुम्ही लिहायचे बंद केले तरी काही फरक पडणार नाही एवढेच सुनवायचे बाकी राहिले होते. दुसरी बाजू ही हिणकस ठरवायची. तिचा तिरस्कार करणारी, नि:पात करायची भाषा काहींनी बोलायची, काहींनी त्यांना ठार मारायचे अशी ही कलाबाज व्यूहरचना दिसते. पण या विरोधात समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत कशा नाहीत? लेखक, कवी, चित्रकार, कलाकार, अभिनेते, शास्त्रज्ञ, पत्रकार, हे समाजाचे डोळे असतात. म्हणून त्यांच्याकडे जास्त संवेदनशील माणसे म्हणून पाहिले जाते. या डोळ्यांना फोडणाऱ्या शक्तीविरोधात आपला समाज एकवटत कसा नाही? की आपल्याला डोळ्यांचे महत्त्वच नाही? आजची तरुणाई सोशल मीडियाचा वापर करण्यात पुढे आहे याचे कौतुक आहे. ही तरुणाई नवा विचार, वेगळा विचार मांडणाऱ्या, समाज पुढे नेणाऱ्या या संवेदनशील माणसांची नालस्ती चालू असताना काय करत होती? तर ती पुरस्कार परत करणाऱ्यांना शिवीगाळ करत होती. संपादक अग्रलेखांतून या वेगळा विचार करणाऱ्यांना दूषणे देत होते. पण मुळात हे का घडत आहे? ही वेळ कुणी आणली याचा विचार ना तरुणाईने केला ना थोर पत्रपंडित संपादकांनी. शब्दबंबाळ सामने रंगवण्यातच सर्वांनी मनापासून रस घेतला. पुरस्कार वापसी जशी सरकार विरोधात होती तशी ती अपप्रवृत्तींना पोसणाऱ्या, नवा विचार करण्याचे नाकारणाऱ्या समाजविरोधातही होती हे झाकून ठेवण्यात आले. त्यात माध्यमे पुढे होती. ज्यांनी नवविचारांचा आरसा व्हायचे त्यांनीच तो होण्याचे नाकारणे हे कशाचे लक्षण आहे?

महाराष्ट्र आज कोणत्या दिशेने निघाला आहे? असमंजसपणा, अस्मितांची संकुचितता, सनातनी आत्मगौरव, कालबाह्य परंपरांचे उदात्तीकरण, हिंसेचे समर्थन, खूनांचे समर्थन, या गोष्टी आज महाराष्ट्रात प्रतिष्ठित होऊ लागल्या आहेत. आज जे वातावरण आपल्या इथे आहे त्याची तुलना फेब्रुवारी १९१९ या वर्षी मुसोलिनीने इटलीत सुरू केलेल्या कारनाम्यांशी करता येईल. त्याने फॅसिस्ट संघटना बळकट केली. विरोधकांच्या सभा उधळणे, त्यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न केले. अनेक विरोधकांचे खून केले. समाजात यथेच्छ अनाचार माजवून त्याने स्वत:ची दहशत माजवली. विरोधी विचारवंत, नेत्यांचे खूनसत्र घडवून विधिमंडळात स्वत:चे बहुमत स्थापन केले. नंतर स्वत: पंतप्रधान झाला. त्याने इटालियन जनता कलाबाज मार्केटिंगच्या तंत्राने, दहशतीने कब्जात घेतली.

या फॅसिस्ट संघटनेला त्यावेळच्या अनेक इटालियन लेखक, विचारवंत, तत्त्वज्ञांनी पाठिंबा दिला होता. मुसोलिनीने इटलीत दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने त्या समाजाची दशकभर नवविचारांशी फारकत झाली होती. फॅसिस्टांचे मार्केटिंग एवढे डोळे दिपवणारे, बुद्धी गुंग करणारे होते की, भले भले त्याला बळी पडले.

सांगायचा मुद्दा असा की, स्मारकांची केवढी रेलचल झाली आहे! त्यातून हितसंबंधीयांची दुकानदारी चालेल, बाकी काही होणार नाही. समाजात नवविचार वाढीला लागतील, अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. उलट ज्यांनी नवविचार मारले, त्यांची स्मारके सरकारी खर्चाने उभी करणे म्हणजे समाजाला आणखी गाळात घालण्याचे कृत्य होय. समाजाने याबाबत सजग राहिले पाहिजे. सतत जागरूक राहणे हीच स्वातंत्र्याची किंमत असते!

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २४/११/२०१५


Thursday, November 19, 2015

३० किलो तांदळासाठी, का मारिला गुरुजी माझा?

भाऊबीजेच्या दिवशी शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि शिक्षक भारतीचे शेकडो कार्यकर्ते यांची नकाशे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना धीर दिला. 













ऐन दिवाळीत शिक्षकांची वेदना मांडणारी एक पोस्ट व्हॉटसअॅपवर फिरत होती. ती अशी –

का मारिला गुरुजी माझा?
अरे, एवढा सिंचन घोटाळा झाला
त्याचा तपास गुलदस्त्यातच राहिला
आणि, ३० किलो तांदळासाठी
का मारिला गुरुजी माझा?

कित्येक कोटीचा चिक्की घोटाळा
त्याला काय न्याय तुम्ही दिला?
५१ कोटीच्या डाळीचा स्टॉक करणाऱ्यांना
शिक्षेऐवजी चोरी चुपके भेट दिली गोदामाला
वर्षांपूर्वी देशात नमोचा गजर झाला
अच्छे दिन चा डांगोरा पिटला
आणि ३० किलो तांदळासाठी
का मारिला गुरुजी माझा?

व्हॉटसअॅपवरच्या पोस्ट या उत्स्फूर्त असतात, पण त्या लोकभावना दर्शवतात. अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेचे संवेदनशील मुख्याध्यापक विजय नकाशे यांना शाळेत ३० किलो तांदूळ कमी भरले म्हणून निलंबित केले गेले. त्यानंतर त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेनंतर त्यासंबंधी संताप व्यक्त करणारे मेसेज, पोस्ट राज्यभर अनेकांच्या मोबाइलवर फिरत होत्या. व्यवस्था कशी निबर झालीय, ती किरकोळ कारणांसाठी सामान्यांचा बळी घेते, बड्यांना मात्र गुन्हे माफ करते. नकाशेंचा खून शिक्षणव्यवस्थेने, सरकारने केलाय अशी लोकांची भावना झाली आहे.

नकाशेंनी आत्महत्या का केली?
त्यांच्या शाळेत पंचायत राज कमिटी आली होती. पोषण आहारातील ३० किलो तांदूळ कमी भरले म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. नकाशेंना तो धक्का सहन झाला नाही. कमिटी येणार म्हणून त्यांनी स्वत: पत्नीच्या बचतीचे पैसे मोडून ४० हजार रुपये शाळेच्या रंग रंगोटीवर खर्च केले होते. शाळा चकाचक केली होती. आयुष्यात कधीही चुकीच्या गोष्टीला थारा त्यांनी दिला नव्हता, असे त्यांचे सहकारी सांगतात. ३० किलो तांदूळ कमी भरल्याने मात्र ते गुन्हेगार ठरले. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी आणि मुलांना लिहिले- मला प्रामाणिकपणाचे फळ मिळाले आहे. आता जीवनात अर्थ नाही. मला माफ करा. नकाशे कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली. राज्यातल्या शिक्षक बिरादारीवर या घटनेचा मोठा आघात झाला.

नकाशेंच्या आत्महत्येची बातमी व्हॉटसअॅपवरून अख्या राज्यात फिरली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिक्षक आणि शिक्षक संघटना अमरावती जिल्हा अधिकारी ऑफिसवर पोचले. त्यांनी निषेधाची निवेदने दिली. अशैक्षणिक कामांच्या ओझ्याने शिक्षक आधीच वाकला होता. आता खिचडीने त्याचा बळी घेतला. या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

विजय नकाशेंना न्याय द्या आणि अशैक्षणिक कामाच्या ओझ्यांतून शिक्षकांना मुक्त करा या मागणीसाठी २६ नोव्हेंबर पासून राज्यभर शिक्षक आंदोलन करणार आहेत. नकाशेंवर जी वेळ आली ती आपल्या प्रत्येकावर येऊ शकते या भीतीच्या भावनेतून राज्यातील सारी शिक्षक बिरादारी संतप्त झाली आहे. नकाशेंच्या आत्महत्येचा धसका प्रत्येक शिक्षकाने घेतला आहे. यावर्षीच्या दिवाळीत प्रत्येक शिक्षक चिंतेत दिसला. अच्छे दिन येणार अशी आरोळी ठोकून सत्तेवर आलेले राज्य आणि केंद्र सरकार आपल्याला न्याय देत नाही अशी राज्यभरातल्या शिक्षकांची भावना होत आहे.

या आत्महत्येपूर्वी अनेक शिक्षकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. वस्ती शाळा शिक्षक गांजलेले होते. तो प्रश्न आता सुटला असला तरी पूर्वी त्यांना अल्प वेतनावर काम करावे लागत होते. त्यातल्या काहींवर काही वर्षांपूर्वी आत्महत्या करण्याची वेळ आली होती. अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आ वासून आहे. त्यातले लाखो शिक्षक आज नोकरी जाईल किंवा उद्या अशा भीतीच्या सावटाखाली दररोज शाळेत येतात. चितेंतच घरी जातात. यातल्या अनेक शिक्षकांचे मानसिक ताणामुळे आरोग्य बिघडले. त्यातून आजार जडले. हृदयविकारासारख्या आजारांना काहींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षकांची एक प्रकारे भयानक कोंडी शिक्षणखात्याकडून होत असल्याचे चित्र आहे. अलीकडच्या काळात शिक्षकांना सतत बदनाम केले जात आहे. काही चुका झाल्या तर मुख्याध्यापकांना, शिक्षकांना जेलमध्ये टाकू अशी भाषा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी विधानपरिषदेत केली होती. त्यामुळे राज्यातला प्रामाणिक शिक्षक उद्विग्न आहे, ताणाखाली आहे. अशैक्षणिक कामाचे ओझे, समाजाच्या वाढत्या अपेक्षा, कामाचा वाढता व्याप आणि वरून सतत गुन्हेगार ठरण्याची भीती या कोंडीत शिक्षक सापडल्याचे चित्र आहे. याच कोंडीने नकाशेंचा बळी घेतला आहे. आता तरी सरकारने शिक्षक आणि शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अन्यथा राज्यातली शिक्षणव्यवस्था मोडून पडलेली बघायची वेळ आपल्यावर येईल.

नकाशेंना ज्या ३० किलो तांदळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली हे अशैक्षणिक काम आहे. या पोषण आहाराच्या कामासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा उभी करायला हवी. सर्व प्रकारच्या शिक्षणबाह्य कामांतून शिक्षकांची मुक्तता करायला हवी अशी शिक्षकांची मागणी आहे.

नकाशेंच्या निमित्ताने साऱ्या शिक्षक बिरादारीला सन्मान द्यावा ही मागणी ऐरणीवर आली आहे. सरकारने त्यावर कार्यवाही करायला हवी. पण शिक्षणमंत्री आणि सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. नकाशेंच्या निमित्ताने शिक्षकांच्या दु:खाची जखम भळभळत असताना सरकारने नवे शैक्षणिक धोरण ऐन दिवाळीत नेटवरून जाहीर केले आहे. या धोरणानुसार शाळा आठ तासांची सक्तीची करायचा सरकारचा प्रयत्न आहे. आठ तास शाळा म्हणजे आठ तास विद्यार्थ्यांना शाळेत कोंबायचे असा हा निर्णय आहे. म्हणजे शाळांचे कोंडवाडे करायचे, शिक्षण आनंददायी करण्याऐवजी शिकण्याच्या वयात मुलांना शाळेची भीती वाटेल असे हे धोरण आहे. शिक्षण फक्त शाळेतच होत नसते. शाळेच्या बाहेरचाही अवकाश (स्पेस) मुलांच्या जडणघडणीसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. या बाबींचा विचार सरकारने नवे धोरण आखताना केलेला नाही, अशी टीका केली जाते आहे, ती रास्त आहे. दिवाळीच्या सुट्टीत घाईगडबडीत विचार करायला वेळ न देता धोरण जाहीर करायचे आणि सूचना मागवायच्या ही पद्धत आक्षेपार्ह आहे.

या नव्या धोरणामुळे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचाही छळ होईल, अशी भूमिका अनेक शिक्षणतज्ज्ञांनी घेतली आहे. सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. महाराष्ट्राने शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवनवे प्रयोग यापूर्वी केलेत. त्या प्रयोगांची दखल देशातील इतर राज्यांनी घेतली आहे. आपल्याकडे साने गुरुजी, ताराबाई मोडक यांनी शिक्षणात प्रयोग केले. बालवाडीचा प्रयोग महाराष्ट्रातून पुढे आला. मुलांना आनंददायी शिक्षण कसे द्यावे याचा प्रयोग साने गुरुजींनी अमळनेर परिसरात केला होता. पण सरकार या वारशाकडे बघायला तयार नाही. उलट आनंददायी शिक्षणाच्या दोऱ्या कापण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो.

अलीकडे राज्य सरकारने शिक्षकांपाठोपाठ भाषा विषयांनाच कात्री लावण्याचा प्रयत्न केलाय. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नावाखाली मराठी, हिंदी, इंग्रजीला पर्याय दिलाय. स्किल इंडिया च्या नावाखाली मराठी माध्यमिक शाळांतून हिंदी, तर अन्य माध्यमांच्या शाळांतून मराठी आणि इंग्रजी या भाषांनाच हद्दपार करण्याचा फतवा शिक्षण मंडळाने जारी केलाय. त्या अगोदर कला, क्रीडा, शिक्षकांना हद्दपार करायला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता मराठी आणि हिंदी शिक्षकांना हद्दपार करून भाषा शिक्षणाचे वाटोळे सरकार करणार आहे. मराठीचे अभिमानी सरकार मराठीला या ठेचायला निघाले आहे.

राज्यातील ३५० शाळांत सरकार व्यावसायिक शिक्षण सुरू करणार आहे. राज्यात त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी, मराठी, हिंदी या तीन भाषा शाळेत शिकवतात. आता या निर्णयामुळे प्रथम भाषेशिवाय द्वितीय व तृतीय भाषेला पर्याय म्हणून व्यवसाय शिक्षण देण्यात येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळेल त्यांना भाषेचे शिक्षण मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांची भाषिक ओळख मिटवून त्यांना केवळ मजूर बनवणारा आहे. भाषा शिक्षणाला पर्याय देणे म्हणजे भाषा शिक्षणाला तिलांजली देणे आणि भाषाच मारून टाकणे होय. यात पहिला बळी मराठी भाषेचा जाणार आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ रोजीरोटी मिळवणे हा नसून विद्यार्थ्यांला जबाबदार नागरिक बनवणे हा आहे. स्किल इंडिया च्या नावाखाली ग्रामीण, गरीब, बहुजन मुलांना स्किल्ड लेबर बनवायचा सरकारचा घातकी विचार दिसतो. जबाबदार नागरिक बनण्याचा आणि जीवनात पुढे जाण्याची संधी हिरावून घेण्याची अधिकार सरकारला कुणी दिला? कला, क्रीडा शिक्षणाचा मुलांचा अधिकारही हे सरकार हिरावून घेणार, जबाबदार नागरिक बनण्यातही अडथळा आणणार हा सरकारचा उद्योग राज्यातल्या मुलांच्या भविष्याशी खेळणार आहे. शाळांच्या अंगणात या सगळ्या सरकारच्या उद्योगांमुळे मोठा असंतोष आहे. त्याचा भडका कधीही होऊ शकतो.

नकाशेंसारख्या आत्महत्या इतर शिक्षकांनीही करायची सरकार वाट पाहत आहे का?

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : १७/११/२०१५


Tuesday, November 10, 2015

बुद्धाच्या भूमीने मार्ग दाखवला आहे...














बिहारात भाजप, संघ परिवाराचा पराभव होणे याला ऐतिहासिक महत्त्व आहे. बिहार ही गौतम बुद्धांची भूमी आहे. देशातला हा सगळ्यात जागरूक असा प्रदेश आहे. इथली माणसे खूप शहाणी आहेत. ते निवडणूक निकालात दिसले आहे. या भूमीने देशाला चंद्रगुप्त, चाणक्य दिले. वैदिक विरुद्ध अवैदिक अशी वैचारिक घनघोर लढाई या भूमीने पाहिली. बुद्धाचा धम्म वाढताना या भूमीने पाहिला. त्या धम्माचा वैदिकांनी केलेला पराभव पाहिला. त्या पराभवात झालेला रक्तपात अनुभवला. राम-कृष्णाच्या चरित्राशी, वारशाशी इथली माणसे दररोज नाते सांगतात. बाबरी मशीद पाडायला निघालेल्या लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा या बिहारनेच अडवली होती. त्या अडवाणींच्या वाढदिवशीच संघ परिवाराला, भाजपला स्वत:चा पराभव पाहावा लागला. बिहारींची ही भेट अडवाणींना पचली असेल काय?

पिछडा पावे सौ में साठ ही घोषणा समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी दिली आणि १९६० च्या दशकात उत्तर भारतात पिछडा म्हणजे ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समूहाला जाग आली. या घोषणेने केवळ पीडित जाती जागृत झाल्या नाहीत, तर नवी सामाजिक न्यायाची लढाई उभी राहिली. बिहारच्या निवडणूक प्रचारात नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे नेते मोदींना विरोध म्हणजे आगडे आणि पिछडे यांची लढाई आहे असे जे म्हणत होते, त्याचा अर्थ त्या घोषणेशी जोडलेला होता.

बिहारमध्ये नीतीशकुमार-लालूप्रसाद यांच्या ऐतिहासिक विजयाने पिछड्यांच्या लढाईने एक पाऊल पुढे टाकले आहे. हे दोघेही लोहिया यांच्या सामाजिक न्यायाच्या लढाईतून पुढे आलेले ओबीसी नेते. नीतीश कुर्मी, तर लालूप्रसाद यादव आहेत. या जाती पारंपरिक सत्तेच्या परिघात नव्हत्या. साऱ्या उत्तर भारतात उच्चवर्णीयांच्या हातात सत्ता होती. त्यात पिछड्यांनाही वाटा मिळावा ही लोहिया यांची मागणी होती. पुढे मंडल यांच्या क्रांतीने सत्तेच्या वर्तुळात माझा माणूस हे सूत्र मांडले. त्यातूनच कर्पूरी ठाकूर, बी. पी. मंडल, मुलायमसिंग यादव, शरद यादव, रामविलास पासवान, नीतीशकुमार, लालूप्रसाद, उपेंद्रसिंग कुशवाहा हे नेते पुढे आले. आज देशभरात ओबीसी जातीतून पुढे आलेले अनेक नेते राजकारणात काम करत आहेत.

सत्तेच्या वर्तुळात माझा माणूस या जादुई सूत्राची किमया आताच्या बिहार निवडणुकीच्या निकालानंतर दिसली आहे. या निवडणुकीत नीतीश-लालू यांनी उघडपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा अजेंडा लोकांना समजावून सांगितला. त्याला निमित्त घडले सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणाबद्दलच्या वक्तव्याचे. भागवत म्हणाले, आरक्षणाचा आम्ही फेरविचार करू. त्याच्या फेरविचारासाठी अशासकीय समिती नेमू. संघ परिवार हे भाजपाचे सुप्रीम कोर्ट आहे. संघ बोले भाजपा चाले अशी स्थिती आहे. संघ कितीही आम्ही राजकारणात नाही असे म्हणत असला तरी ते ढोंग आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे. संघ परिवाराने संविधानाच्या समीक्षेसाठी वाजपेयी पंतप्रधान असताना शासकीय समिती नेमली होती. या संविधान पुनरावलोकन राष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष न्या. एम.एन. वेंकटचलय्या होते. संघाचे तेव्हाचे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी तर हे संविधान मोडीत काढले पाहिजे असा आदेशच सरकारला दिला होता. संघाचे एक सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात १९६६ सालीच संविधान, आरक्षण या गोष्टींना संघाचा विरोध का आहे हे जाहीररित्या मांडले आहे.

भागवत यांच्या आरक्षणाबद्दलच्या वक्तव्यानंतर बिहारमध्ये त्याची सर्वात तीव्र प्रतिक्रिया उमटली. पुढे दादरीचे हत्याकांड, फरिदाबादचे कोवळ्या दलित मुलांचे जळितकांड, गाईच्या शेपटाला धरून अल्पसंख्याकांवरचे हल्ले, बिहारींना पाकिस्तानी ठरवणे, नीतीशकुमारांच्या डीएनएला खराब ठरवणे, लालूप्रसादांची जंगली म्हणून हेटाळणी करणे, या साऱ्या प्रकरणातून आमचा अपमान होतोय हे बिहारींना जाणवले. त्यामुळे दिल्लीनंतर बिहारमध्ये संघ परिवाराचा लाजीरवाणा पराभव झाला. त्याची जबाबदारी संघ घेणार नाही. लबाडीने ते खापर भाजपवर फोडेल. संघ परिवाराने स्वत:च्या छत्रीखालील साऱ्या संघटना बिहार निवडणुकीत कामाला लावल्या होत्या. भाजपने रामविलास पासवान, जीतनराम मांझी, उपेंद्र कुशवाहा, पप्पु यादव हे मागासवर्गीय चेहरे सोबत घेत पिछड्यांमध्ये फूट पाडण्याचा मोठा डाव टाकला होता, पण त्याला यश आले नाही. सारे पिछडे नीतीश यांच्या मागे उभे राहिले. बिहारची निवडणूक म्हणजे साधी सोपी गोष्ट नव्हती. मोदी-शहा यांच्याकडे १०-१० हेलिकॉप्टर, प्रचंड पैसा, डझनभर केंद्रीयमंत्री प्रचारात टाळ उडवायला होते. शिवाय आगलावू भाषणे करणारे साधू, साध्वी हेही होते. या सर्व लवाजम्याला नीतीश यांनी जनता परिवार, काँग्रेस यांची मोट बांधून थोपवले. बिहारातून अक्षरश: पळवून लावले. सामान्य माणसांच्या बळावरच हे घडले.

नीतीश यांचा चेहरा विकासवादी आहे. गुन्हेगारी संपवणारा मुख्यमंत्री, प्रशासन पारदर्शक आणि गतिमान करणारा नेता, सर्व जातिगटांना एकत्र घेऊन पुढे जाणारा लोकनेता अशी त्यांची प्रतिमा आहे. ती लोकांना जास्त भावली. बिहारात नीतीश विरुद्ध मोदी असा सामना झाला. त्यात नीतीश सरस ठरले. मोदींना या निवडणुकीने उघडे पाडले आहे. मोदी केवळ प्रचारपुरुष आहेत. ते भाषणे ठोकतात. काम काही होत नाही. दीड वर्षात ते महागाई कमी करू शकले नाहीत, तरुणांना रोजगार देऊ शकले नाहीत, हे या निवडणुकीत नीतीश यांनी स्पष्टपणे मांडले. लोकांना ते पटले. विकास, अच्छे दिन तर बाजूलाच राहिले, पण देशात हिंसक वातावरण वाढले. लेखक-कलाकारांना पुरस्कार परत करण्याची वेळ आली. संवेदनशील लेखकांना तुम्ही लिहिणे थांबवा असे देशाचा सांस्कृतिकमंत्री म्हणतो आणि मोदी ते चालवून घेतात. याचा अर्थ लोकांना कळला आहे. अरुण जेटली यांनी लेखकांच्या पुरस्कार वापसीला कागदी क्रांती म्हणून हेटाळले. ती बिहारमध्ये भोवली.

बिहारात भाजप, संघ परिवाराचा पराभव होणे याला ऐतिहासिक महत्त्व आहे. बिहार ही गौतम बुद्धांची भूमी आहे. देशातला हा सगळ्यात जागरूक असा प्रदेश आहे. इथली माणसे खूप शहाणी आहेत. ते निवडणूक निकालात दिसले आहे. या भूमीने देशाला चंद्रगुप्त, चाणक्य दिले. वैदिक विरुद्ध अवैदिक अशी वैचारिक घनघोर लढाई या भूमीने पाहिली. बुद्धाचा धम्म वाढताना या भूमीने पाहिला. त्या धम्माचा वैदिकांनी केलेला पराभव पाहिला. त्या पराभवात झालेला रक्तपात अनुभवला. राम-कृष्णाच्या चरित्राशी, वारशाशी इथली माणसे दररोज नाते सांगतात. बाबरी मशीद पाडायला निघालेल्या लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा या बिहारनेच अडवली होती. त्या अडवाणींच्या वाढदिवशीच संघ परिवाराला, भाजपला स्वत:चा पराभव पाहावा लागला. बिहारींची ही भेट अडवाणींना पचली असेल काय?

या निवडणुकीत विकासाचे खरे मॉडेल कोणते? गुजरातचे की बिहारचे? की इतर आणखी वेगळे? कायदा सुव्यवस्था, अर्थनीती, संघाची शिरजोरी, बिहारींचा गौरव, राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व, सुशासन, असहिष्णुता, सेक्युलॅरिझम या मुद्द्यांचा कस लागला. बिहारींनी मोदी आणि असदुद्दीन ओवेसी या दोघांनाही नाकारले. हिंदू मध्यम जाती एक झाल्या तर उच्चवर्णीयांचे हिंदुत्व पराभूत होते हे सूत्र बिहारने दाखवून दिले.

नीतीश यांच्या विजयाने मोदींच्या भाजपांतर्गत दादागिरीलाही शह बसला आहे. देशातले राजकारण नीतीश यांच्या विजयाने कूस बदलते आहे. भाजप हा पक्ष संघाचा अजेंडा घेऊन काँग्रेसेतर मध्यम मार्गी राजकीय पक्षांना हरवू शकत नाही हे बिहारात दिसलेच, पण त्याआधी दिल्लीतही केजरीवाल यांच्या विजयात पाहायला मिळाले होते. ममता बॅनर्जी, मुलायसिंह यादव, जयललिता, करुणानिधी, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव, नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना भाजप हटवू शकत नाही. त्या पक्षांच्या विभागात भाजपला आघाडी करावी लागते. स्वत:ची ताकद वाढवता येत नाही.

संघ परिवाराला माहीत आहे की, बिहारमधून एकता, सहिष्णुतेचा संदेश देशात जातो. बिहारात एकता, सहिष्णुतेचा नीतीश यांच्या रूपाने विजय झाला. एकतेचा विजय म्हणजे संघाच्या द्वेषवादी विचाराचा पराभव. मोदी-संघ द्वेषाच्या विचाराने देश हाकू पाहत होते. बुद्धाच्या बिहारने द्वेषाच्या विचारकांना धुडकावले. संघाला हा मोठा तडका आहे. देशाला या विजयाने मार्ग दाखवला आहे. दिल्लीचा रस्ता बिहारमधून जातो. बिहारने सहिष्णुतेच्या राजकारणाला विजयी केले. हे राजकारण देशपातळीवर आकाराला येत आहे. संघ, मोदी यांनी यातून योग्य तो धडा घ्यावा, असा बुद्ध भूमीचा संदेश आहे. अन्यथा पुढील काळात दिल्लीचे तख्त बदलल्याशिवाय राहणार नाही.­


राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : १०/११/२०१५

Sunday, November 8, 2015

साईबाबांवर हल्ले हा नियोजित कटाचा भाग



















शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या विरोधात गेले काही महिने जोरदार मोहीम चालू केली आहे. त्यांच्या आवाहनानंतर साईबाबांच्या देशभरातील विविध मंदिरातील मूर्ती उखडून टाकण्यात आल्या होत्या. आता बजरंगबली हनुमान साईबाबांवर हल्ला करत आहेत, अशी पोस्टर्स वितरीत करण्यात आली आहेत. त्या निमित्ताने हनुमानभक्त आणि साईभक्त यांच्यात तेढ वाढवायची अशी व्यूहरचना सुरू आहे. देशभर साईबाबांच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. साईबाबा मुस्लीम आहेत, मग हिंदूंना त्यांच्याबद्दल पुळका का, अशी द्वेषाची भाषा वापरली जात आहे.

शंकराचार्य आणि त्यांचे सहकारी साईबाबांविरोधात संताप का व्यक्त करत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी इतिहासात जावे लागेल. साईबाबा १८६०च्या दशकात एक दिवस एका वरातीत शिर्डीत आले. १९१७ साली दसऱ्याच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. म्हणजे जवळपास ६० वर्षे ते शिर्डी परिसरात एक फकीर म्हणून वावरले. “एकोप्याने रहा. त्या एका देवावर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी बाळगा. अल्ला मालिक है. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस बना. माणूस म्हणून जगा,” असा संदेश साईबाबा लोकांना देत असत. शिर्डी आणि परिसरातल्या शेतकरी समाजात ते एकरूप झाले होते. हिंदू-मुस्लीम दोन्ही समाजांना ते एकत्र करून भक्ती मार्गाला घेऊन जाऊ पाहत होते. एक हकीम (वैद्य) म्हणून त्यांचा बोलबाला झाला होता. जडीबुटीची औषधे देऊन लोकांना ते बरे करत. रोगातून वाचलेल्या, रंजल्या- गांजल्या माणसांना तो चमत्कार वाटे. साठेक वर्षांत बाबांनी समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले. ज्याची जात-धर्म माहीत नाही, कोण, कुठला माहीत नाही, अशा गूढ साईबाबांनी दसऱ्याला समाधी घेणे, लोकांमधून निघून जाणे हे सारेच साईभक्तांना अकल्पित वाटत आले आहे. १९१७ नंतर शिर्डीत साईभक्तांचा ओघ सुरू झाला. अल्पावधीत बाबांची कीर्ती देशभर पसरली. आज देशात एकही गाव असे नाही की, तिथे साईभक्त सापडणार नाही. हिंदू, शीख, मुस्लीम, जैन, ख्रिश्चन, लिंगायत, पारशी, आदिवासी अशा सर्व धर्म-समुदायात साईभक्त दिसतात. म्हणूनच शिर्डीत दररोज भक्तांचा लोंढा असतो. गेल्या ५० वर्षांत एवढे लोकप्रिय, श्रीमंत झालेले भक्तिस्थान देशात दुसरे नाही. अयोध्या, वाराणशी, हरिद्वार या धर्मस्थळांपेक्षा शिर्डीचा बोलबाला मोठा आहे.

सर्व जाती-धर्मातले लोक एकत्र येतात. ते साईबाबांना मानतात. त्यांची भक्ती करतात. नेमके हेच शंकराचाऱ्यांना खटकते आहे. आपल्याकडे लोक येत नाहीत, ते साईबाबांकडे कसे जातात, हा त्यांचा राग आहे. शंकराचार्य हे नेहमी धर्मातल्या मक्तेदारीचे नेतृत्व करत आले आहेत. आपल्या नियंत्रणाबाहेर कुणी संत, फकीर, भक्त, बाबा लोकप्रिय झालेला त्यांना खपत नाही. हे फार पूर्वीपासून दिसून आले आहे. लोकांनी स्वतंत्रबुद्धीने देवाची भक्ती करणे, धर्माचे आचरण करणे, देवाशी संवाद साधणे याला शंकराचाऱ्यांचा नेहमी विरोध राहिला आहे. आपल्यापेक्षा वेगळे धर्ममत, विचार त्यांना मानवत नाही.

सामान्य माणूस एक होऊन स्वतंत्र बुद्धीने धर्माचरण, देवाशी संवाद करत असेल तर शंकराचाऱ्यांच्या पोटात का दुखते? कारण शंकराचार्य हे नेहमी विषमता आणि नियंत्रित धर्माचे तत्त्वज्ञान पुढे रेटत आले आहेत. त्यांनी जातिव्यवस्थेचे गुणगान गायले आहे. स्त्रिया, दलित यांना तुच्छ लेखले आहे. गरीब हा त्याच्या पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे गरिबीत सडत पडलाय हे त्यांचे धर्ममत आहे. आपल्या मतांपेक्षा वेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, विचार शंकराचाऱ्यांनी कधीही खपवून घेतलेले नाहीत.

हा संघर्ष फार जुना आहे. आद्य शंकराचाऱ्यांनी भागवत संप्रदाय हा वेदविरोधी आहे असे म्हणून त्याविरोधात लढे दिले. या लढ्यात रक्तपात घडवण्यात आले. वास्तविक भागवत संप्रदाय हा वेदांना नाकारत नव्हता. सामान्य लोकांना भक्तीचा मार्ग उपलब्ध करून देण्याची धडपड तो करत होता. वेद, यज्ञ ज्यांना करायचे त्यांनी करावेत, पण सामान्य लोकांनी देवांच्या दलालाला धुडकावून लावावे आणि देवाशी प्रत्यक्ष संवाद करावा असे भागवत संप्रदाय सांगत होता. अशा देवाच्या दारात समता निर्माण व्हावी अशी भूमिका घेणाऱ्या संप्रदायाला नष्ट करण्यात आदि शंकराचाऱ्यांनी हयात खर्च करावी, याला काय म्हणावे?

सामान्य लोकांना धार्मिक न्याय, समता यांचा आग्रह धरणाऱ्या चार्वाक, जैन आणि बौद्ध या दर्शनांशीही धर्माच्या दलाल-मक्तेदारांनी भांडणे केली. ही तीनही दर्शने सामान्य लोकांना वैदिकांच्या शोषणातून मुक्त करत होती. पण ते धर्माच्या मक्तेदारांना पटले नाही. त्यांनी गौतम बुद्धांना विरोध केला. मृत्यूनंतर मात्र त्यांना विष्णूचा अवतार ठरवून निष्प्रभ करण्याचा डाव टाकला.

भागवत संप्रदायाप्रमाणेच नाथ संप्रदायालाही शंकराचाऱ्यांनी विरोध केला. नाथपंथी तत्त्ववेत्ते गोरक्षनाथ यांनी भारतभर हिंडून वैचारिक क्रांती केली. नेपाळपासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत त्यांचा प्रभाव वाढला होता. त्यांनी धार्मिक समता निर्माण केली होती. बंदिस्त धर्म चाकोरीबाहेर आणून सामान्य लोकांसाठी खुला केला. या नाथपंथीयांशी साईबाबांनी आपली फकिरी नाळ जोडली होती. चक्रधर स्वामींच्या महानुभाव संप्रदायानेही धर्मसत्तेला आव्हान दिले होते. या सर्वांची त्या त्या काळी शंकराचाऱ्यांनी कोंडी केली होती. बसवेश्वरांनी जातिप्रथेवर हल्ला केला. लिंगायत हा नवीन धर्म स्थापन केला. संत कबीरांनी उत्तरेत समाजाला स्वतंत्र ताजातवाना विचार दिला. महाराष्ट्रात संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामांपर्यंत विविध संतांनी देवाच्या दलालांना धक्के दिले. वाळवंटात आध्यात्मिक समता आणली. या सर्व प्रयत्नांचा शंकराचाऱ्यांना राग आहे. पंजाब परिसरात गुरुनानक यांनी समतावादी शीख धर्माची स्थापना केली. शीख बनलेल्या समाजाने उद्योग, व्यापार, शेती, शिक्षणात जगात नाव कमावले. केंद्रित धर्माच्या बुरसटलेल्या, विचारांतून सुटून समतावादी स्वतंत्र विचारांनी सामान्य माणूस काय प्रगती करू शकतो हे शीख समाजाकडे बघितले की लक्षात येते.

शीख धर्माचाही वेगळा विचार शंकराचाऱ्यांना मानवला नाही. ख्रिश्चन आणि मुस्लीम हे धर्मही आपल्या समाजात रुजले. परदेशातून आलेल्या या धर्मांचा काही भारतीयांनी स्वीकार केला. मुस्लीम परंपरेतील सुफी संतांसारखी फकिरी जीवनशैली हे साईबाबांचे वैशिष्ट्ये होते.

मुद्दा असा की, साई बाबा हे नाथपंथ, सुफी फकिरी या परंपरांशी उघड नाते दर्शवत राम, कृष्ण या सर्वजनवादी भक्ती परंपरांशीही जोडून घेताना दिसले. हे एक प्रकारे भारतात विकासित झालेल्या समतावादी, लोकवादी भक्ती संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याचा क्रांतिकारी प्रयत्न आहे. तो नियंत्रित धर्मसत्तेला आव्हान देणारा आहे. म्हणूनच त्याला शंकराचाऱ्यांचा विरोध आहे. या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी मारलीय. संघाने म्हटलेय, साईबाबा स्वत:ला देव मानत नव्हते. मग भक्त त्यांना देव म्हणून का पुजतात? हे एका बाजूला बोलत असताना संघाने साईबाबांच्या मूर्ती तोडा या शंकराचाऱ्यांच्या आवाहनाचा मात्र निषेध केलेला नाही. या भांडणात संघ, शंकराचाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असे चित्र दिसत आहे.

थोडक्यात, धर्माच्या प्रांगणात स्वतंत्र, समतावादी, सर्वजनवादी तत्त्वाचा एखादा विचार रुजत असेल तर तो धर्माच्या मक्तेदारांना खपत नाही. म्हणून साईबाबांच्या भक्तिपंथावर हल्ले सुरू आहेत. तो एका नियोजित कटाचा भाग आहे. म्हणून सर्वजनवादी, समतावादी धर्मविचार मानणाऱ्यांनी संघटित होऊन शंकराचाऱ्यांच्या नेतृत्वाखालील नियंत्रित धर्मसत्तेच्या हल्ल्यांचा वैचारिक प्रतिवाद केला पाहिजे. साईबाबांना, साईभक्तांना बरोबर घेऊन त्याची सुरुवात होऊ शकते. ­

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०३/११/२०१५


Tuesday, November 3, 2015

धनगर समाजाचा ख्वाडा कधी संपणार?









मा. राम शिंदे साहेब,
गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य 

ख्वाडा हा धनगर समाजातील मेंढपाळांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकणारा अप्रतिम चित्रपट सध्या चर्चेत आहे. त्यानिमित्ताने धनगरांच्या प्रश्नांविषयी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच. तुम्ही उच्चशिक्षित आहात. धनगर समाजाच्या प्रश्नांचा तुमचा अभ्यास आहे. अहमदनगरसारख्या सहकार चळवळ रुजलेल्या जिल्ह्यातले तुम्ही आहात. तुमच्याकडे गृहखात्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. सामाजिक प्रश्नांचे भान असणारे मंत्री म्हणून धनगरांच्या व्यथा तुमच्यापुढे मांडणे योग्य ठरेल. 

ख्वाडा मध्ये रघु कऱ्हे या धनगर मेंढपाळांच्या कुटुंबाची गोष्ट चित्रारलेली आहे. मेंढरांचा कळप गावोगाव चारण्यासाठी घेऊन हिंडणे हे या कुटुंबाचे जगणे. रघुला बायको, दोन मुले. थोरला पांडा, धाकटा बाळू. पांडाचे लग्न झालेय. तो मेंढ्या चारण्याचे काम करतो. बाळूला पैलवानकीचा नाद असतो. व्यायाम, कुस्ती हे त्याचे छंद. पांडाला वडिलांचे जिणे मान्य. बाळूला गावोगाव भटकणे अमान्य. चाऱ्यासाठी फिरता फिरता रघुचे कुटुंब एका गावातल्या रानात येते. त्या गावचे सरपंच अशोकराव. ते या कुटुंबाला दमदाटी करतात. या रांगड्या सरपंचाशी कऱ्हे कुटुंबाचा संघर्ष होतो. तो म्हणजेच ख्वाडा. त्याला खोडा, अडथळा असेही म्हणतात. असे विविध खोडे हटवत कऱ्हे कुटुंबाची वाटचाल चालू असते. 

रघु कऱ्हे हा सर्व मेंढपाळांचा प्रतिनिधी म्हणता येईल. सर्वच मेंढपालांना गावोगाव अशोकरावासारख्या धनदांडग्यांशी संघर्ष करत करत मेंढ्यांची चारणी करावी लागते. ख्वाडा सिनेमा शहरी लोकांसाठी फक्कड गावरान मेजवाणी आहे. शानदार मनोरंजन आहे. दोन घटकेचे उत्तम मनोरंजन आहे हे खरेच. पण या चित्रपटाच्या पलीकडचे वास्तव भयानक आहे. वादळ, ऊन, वारा, दुष्काळ, पाऊस, चोर-दरोडेखोर यांच्या तावडीतून सुटका करून घेता घेता मेंढपाळांना काय मरणप्राय जिण्याला सामोरे जावे लागते हे मुंबईत बसून नाही कळणार.

शिंदेसाहेब, आपल्याकडे पोलीस दल आहे. मेंढपाळांचा संरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मेंढ्या चारायला जाताना गावोगाव मेंढपाळांना अनेकदा जबर मारहाणीला सामोरे जावे लागते. गावगुंड मरेस्तोवर मारतात. मेंढ्या, शेळ्या ओढून नेतात. मेंढपाळ भोळा, भाबडा असतो. तो पोलीस खात्याला घाबरतो. कोर्टाची पायरी आणि पोलिसांची डायरी नको रे बाबा असे म्हणतो. रानात राहणारा हा माणूस बुजरा असतो. तो अन्यायाविरोधात ना पोलिसांकडे जात, ना कोर्टात. मारहाण झाली, सहन करतो. माझ्या नशिबी हे जीणे आलेय म्हणून नशिबाला दोष देत रडत, कुढत बसतो. आला दिवस साजरा करतो. पोलीस खाते या मेंढपाळांना गावोगाव त्यांच्याशी संवाद साधून, धीर देऊन अन्याय झाला तर सहन करू नका, आमच्याकडे या, असे काही सांगेल काय? त्यासाठी पोलिसांना मेंढपाळांकडे रानात त्यांच्या मेंढ्यामागे जावे लागेल. पण त्यातून मेंढपाळांना धीर येईल आणि गावातल्या दांडग्यांना, अन्याय करणाऱ्यांना चाप बसेल. मेंढपाळांच्या पाठीमागे पोलीस आहेत, हा संदेश गेला तरी मारहाण, चोऱ्या आटोक्यात यायला मदत होईल. 

दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांपेक्षाही जास्त हाल मेंढपाळांचे होतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करते. पीक विमा भरपाई, अनुदान देते. गाई-बैलांसाठी चारा छावण्या सुरू करते. पण मेंढ्यांसाठी चारा छावणी किंवा चाऱ्याची मदत आजवर सरकारने कधी केल्याची बातमी ऐकली नाही. पाण्यावाचून मेंढ्या, शेळ्या मरतात. रोगराईने मरतात. त्याची भरपाई मेंढपाळांना कधी मिळत नाही. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यात किती मेंढपाळ आहेत, त्यांच्याकडे किती मेंढ्या, शेळ्या, घोडे, गाई आहेत याची सरकारने मोजदाद केली पाहिजे. या जनावरांचे विमे काढले पाहिजेत. एखादवेळी पावसाळ्यात वीज पडते. पाच-दहा मेंढ्या मरतात. दहा मेंढ्या मेल्यातर दोन लाख रुपयांचे नुकसान झाले म्हणून समजा. त्याची भरपाई मेंढपाळांना मिळत नाही. त्यासाठी सरकारने विमा योजना मेंढपाळांपर्यंत नेली पाहिजे. लांडगे, बिबटे मेंढ्या खातात, रोगराईने मरतात. त्यावेळी मेंढपाळांना या विम्याचा आधार मिळेल. हे झाले नाही तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आम झाल्यात. उद्या मेंढपाळही वैतागून त्या मार्गाने जातील. 

वनजमिनी मेंढ्यांना चरण्यासाठी द्या, अशी मेंढपाळांची जुनी मागणी आहे. या जमिनी त्यांना दिल्या तर मेंढ्यांना चाऱ्याची व्यवस्था होईल. वनातील झाडे राखण्याची जबाबदारी मेंढपाळ घेऊ शकतील. त्यातून वनही वाढतील. मेंढ्याही जगतील. व्यवसाय वाढेल. 

सरकारने मेक इन महाराष्ट्र , मेक इन इंडिया सारख्या घोषणा केल्या आहेत. मेंढपाळ व्यवसायाच्या साखळीतून करोडो लोकांना राज्यात रोजगार मिळतो. आज शेतीत रोजगार घटतोय. ग्रामीण भागात मेंढीपालन, शेळीपालन या व्यवसायाची वाढ झाली तर अनेक रोजगार वाढतील. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर शेळ्या-मेढ्यांच्या मटणाला मागणी वाटतेय. हे लक्षात घेता या व्यवसायाकडे सरकारने रोजगारवाढीची संधी देणारा व्यवसाय म्हणून पाहायला हवे. या व्यवसायातले कष्ट कमी केले, चारा मुबलक उपलब्ध करून दिला, बंदिस्त शेळी, मेंढी पालनात नवे तंत्रज्ञान आणून या व्यवसायाला गती दिली, त्यात गुंतवणूक वाढली तर राज्यात ग्रामीण भागात एक मोठी भक्कम अर्थसाखळी वाढायला मदत होईल. मुबलक पैसा येईल. महाराष्ट्र समृद्ध व्हायला मदत होईल. राज्यात सहकारी चळवळीतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने उभे राहिले. दूध उत्पादकांचे दूध संघ उभे राहिले. मग शेळ्या, मेंढ्या उत्पादकांचे मटण उत्पादन, मार्केटिंगचे सहकारी कारखाने का उभे राहू शकले नाहीत? त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. काळाची ती गरज आहे.

भावी काळात रोजगारवाढीचा किफायतशीर उद्योग म्हणून शेळी, मेंढी उद्योगाकडे पाहावे यासाठी सरकारने आग्रह धरला पाहिजे. धनगर समाजात आमदार गणपतराव देशमुख, आमदार महादेव जानकर यांच्यासारखे नेते आहेत. त्यांनीही या प्रश्नाकडे सरकारला तात्काळ लक्ष द्यायला भाग पाडले पाहिजे.

राज्यात शेळीमेंढी पालन महामंडळ आहे. ते अधिक सक्रिय करावे लागेल. जगभर शेळ्या-मेंढ्याच्या उत्पादनात, मटण उत्पादन विक्रीत नवे तंत्रज्ञान येत आहे ते गावातल्या, रानातल्या मेंढपाळांकडे नेले पाहिजे. या व्यवसायात नवी दृष्टी, नवे तंत्रज्ञान आणले तर क्रांती घडून येईल. 

मेंढपाळांच्या कुटुंबाचे इतरही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण झाले पाहिजे. त्यांच्या मुलांमध्ये चांगले कुस्तीगीर होण्याचे गुण असतात. ही मुले पळायला कुणाला आवरत नाहीत. उंच उडी मारायला त्यांचा हात कुणी धरणार नाही. त्यांना संधी मिळाली तर ती ऑलिम्पिक सामन्यांपर्यंत आपल्या देशाचे नाव रोशन करतील. मेंढपाळ रानावनात हिंडत देशाच्या उभारणीत योगदान देतो. शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मिळतात. मेंढपाळांना असे पुरस्कार सरकारने का देऊ नयेत? धनगरी नृत्याला प्रोत्साहन द्यायला हवे. या समाजात भूत, भगत, भानामती, अघोरी प्रथांना बुवाबाजीला बळी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याबद्दल प्रबोधन होण्याची गरज आहे.

शिंदेसाहेब, आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून या प्रश्नांचा विचार करावा. आपल्यालाही हे प्रश्न माहीत आहेत. मेंढपाळ लोक मुंबईत आझाद मैदानात किंवा मंत्रालयात आपल्याकडे त्यांची गाऱ्हाणी घेऊन येणार नाहीत. त्यांचा भांडण्यापेक्षा काही नवे घडवण्याकर जास्त विश्वास आहे. स्वत:च्या लेकरापेक्षा मेंढीचे नवजात कोकरू ते जास्त जीव ओवाळून सांभाळतात. नवे घडवणे, वाढवणे हेच जिणे अशी जीवनशैली जगणाऱ्या या लोकांसाठी काही करता आले तर बघा. ­

राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २७/१०/२०१५