Wednesday, September 2, 2015

बोलबातांच्या गलबल्यात खरे कुणाचे मानायचे?














पडघम हे लोकसंगीतातले एक वाद्य आहे. आनंदाची बातमी, नव्याची चाहूल लागते तेव्हा हे वाद्य वाजवले जाई. पण काळानुसार कुठल्याही गोष्टीचे संदर्भ बदलत जातात. तसे या वाद्याचेही बदलले आहेत. काळोखाचे पडघम , मध्यरात्रीचे पडघम , निवडणुकांचे पडघम अशा शब्दप्रयोगांतून आपल्याला त्याची जाणीव होतच असते. सध्याचा काळात तर हे वाद्य केवळ चांगल्याच घटनांसाठी वाजवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे राजकारण-समाजकारण या क्षेत्रातील विविध घटना-घडामोडींविषयी पडघम वाजवण्याचे काम या साप्ताहिक सदरातून दर मंगळवारी केले जाईल...

तथागत गौतम बुद्धांची भूमी म्हणून बिहारची ओळख आहे. या भूमीवर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. दिल्लीचा रस्ता बिहारमधूनच जातो. दिल्लीच्या तख्ताला आव्हान देणारी ही निवडणूक देशाला मार्ग दाखवणारी आहे. देशाच्या १२५ कोटी जनतेच्या वतीने आपण बिहारींनी ती लढवली पाहिजे असे आवाहन संयुक्त जनता दलाचे नेते खासदार शरद यादव यांनी केले आहे. लबाडांना थारा देऊ नका. बिहारची बोली लावणाऱ्या बिहारींचा अपमान करणाऱ्यांना इथं पाय ठेवू देऊ नका , असे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे. लालू प्रसाद यादव यांनी तर दिल्ली बदलो, दिल्ली बदलो अशी घोषणा पाटण्याच्या गांधी मैदानातून दिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची या नेत्यांना साथ आहे.

दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम बिहारी मतदारांना जंगलराज पार्ट- येऊ द्यायचे नसेल तर यांना घरी बसवा, अशी हाक देत आहेत. आम्ही मंगलराज आणतो अशी आशा दाखवत आहेत. त्यावर जंगलराज नही, मंडलराज पार्ट- आहे, असे लालू म्हणत आहेत. या बोलबातांच्या गलबल्यात कुणाचे ऐकायचे, कुणाचे खरे मानायचे, असा प्रश्न बिहारी जनतेसमोर आहे.

या संभ्रमातून वाट काढण्यासाठी बिहारींना अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग, त्यातल्या उपदेश आज मदतीला येईल. तथागत बुद्ध एकदा कोसल देशात चारिका (पदयात्रा) करत होते. मोठा भिक्खू संघ सोबत होता. कालामांच्या (कोसल देशातल्या लोकांना कालाम म्हणत.) केसमुत्त या गावाजवळून ते जात होते. बुद्धांची कीर्ती कालामांना माहीत होती. भारावलेले कालाम बुद्धांना भेटायला गेले. अभिवादन करून ते बुद्धांना म्हणाले, “भन्ते, काही श्रमण आणि ब्राह्मण केसमुत्तामध्ये येतात. स्वत:च्या सिद्धांताला उजळवून सांगतात. दुसऱ्याच्या सिद्धांताची निंदा करतात. नावे ठेवतात. त्याला कमी लेखतात, अनादर करतात. आमच्या मनात शंका निर्माण होते. श्रमण-बाह्मणांपैकी कोण खरे बोलतो? कोण खोटे बोलतो?”

त्यावेळी तथागत म्हणाले, “कालामांनो, एखादी गोष्ट अनुभवावरून (ऐकीव माहितीवरून) स्वीकारू नका. परंपरा आहे म्हणून स्वीकारू नका. कोणीतरी असे असे सांगितले आहे, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट पिटकातून आली आहे, एवढ्यावरून स्वीकारू नका. अनुभवाचा पाठिंबा नसलेल्या तर्काच्या वा न्यायशास्त्राच्या आधारे स्वीकारू नका. बाह्यरूपाचा विचार करून स्वीकारू नका. अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो, म्हणून स्वीकारू नका. एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. सांगणाराचे सुंदर रूप पाहून स्वीकारू नका. किंवा संभाव्यता आहे एवढ्यावरून स्वीकारू नका. हा श्रमण आपला गुरू आहे, अशा विचार करून स्वीकारू नका. कालामांनो, तुम्ही जेव्हा स्वत: होऊनच हा अनुभव घ्याल की, त्या गोष्टी अहिताच्या आहेत, सदोष आहे, त्या गोष्टींची निंदा जाणकारांनी केलेली आहे. त्या गोष्टी स्वीकारल्या असता अहिताला; दु:खाला कारणीभूत होतात. तेव्हा कालामांनो, तुम्ही त्या गोष्टींचा त्याग करा?”

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करताना बिहारी जनता या उपदेशाचा नक्की उपयोग करून घेईल. बिहार चाणक्याचीही भूमी आहे. चाणक्याचे अर्थशास्त्र इथेच तयार झाले. त्याचा अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ आहे. त्यात राजा, जनता, राज्य कारभार याविषयीच्या व्यवहारांचे ज्ञान आहे. त्या राजकारण-व्यवहाराच्या आधारे सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांनी राज्य केले. एवढा समृद्ध राजकीय वारसा असणाऱ्या बिहारी नेते, जनता यांच्या रोमारोमांत राजकारण भरलेले दिसते. या राजकीय ज्ञानाची शिदोरी जवळ असल्यानेच बिहार-उत्तरप्रदेश या भागातले नेते, लोक अधिक आत्मविश्वासाने वावरताना दिसतात, हे आपण पाहतो.

या प्रदेशात सगळेच तयारीचे गडी असतात. त्यामुळे बिहारची निवडणूक साधीसोपी नसते. त्यात जातीची गणिते असतात. प्रगतीचे मुद्दे असतात. बिहारी मतदार फॉरवर्ड-बॅकवर्ड, यादव, कुरमी, कोयरी, कुशवाहा, लवकुश, धातू, तलवार, पंडिती, राजपूत, भूमिहार, ब्राह्मण, मुसलमान, अतिपिछडा, दलित, महादलित, मुसहार, पासवान अशा शेकडे जातीगटांत विखुरला गेला आहे. निवडणुकीत या जातींची मोट जो बांधतो, तो भारी भरतो, जिंकतो, हा आजवरचा अनुभव आहे

बिहारच्या या निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय दल, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस अशा चार पक्षांचे महागठबंधन बनले आहे. त्या विरोधात भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती आणि इतर छोटे-मोठे पक्ष यांची आघाडी आहे. महागठबंधनची जमेची बाजू नितीशकुमार यांचा विकासवादी चेहरा ही आहे. गुन्हेगार संपवणारा, प्रशासन पारदर्शक-गतिमान करणारा, भ्रष्ट नसलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही. केंद्रीयमंत्री राम विलास पासवान हे मीच मुख्यमंत्री पदाला योग्य अशी पाचर अगोदरच मारून बसले आहेत. बिहार भाजपची इच्छा आहे की, नितीशकुमार विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई व्हावी. या लढाईतून भाजपच्या जागा वाढवतील अशी अटकळ बांधली जात आहे.

आजतरी ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध नितीशकुमार अशी होणार असे चित्र आहे. माझ्या डीएनएमध्ये गडबड आहे ही मोदींनी बिहारला दिलेली शिवी आहे, अशी भूमिका घेत नितीशकुमार यांनी मोदींवर वरताण मारली आहे. माझा अपमान म्हणजे बिहारचा अपमान या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजतरी त्याला यश मिळतेय असे दिसतेय. मोदींनी कात्रीत पकडण्यात नितीशकुमार यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत नितीशकुमार जिंकले तर मोदींनी देशपातळीवर शेरास सव्वाशेर ठरू शकेल असा चेहरा साऱ्या विरोधी पक्षांना मिळू शकेल. असे होणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहे. त्यामुळे संघ परिवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

संघ परिवाराला खरे आव्हान बिहार-उत्तर प्रदेश या बुद्धभूमीतूनच मिळत असते. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अडवली होती. राम मंदिराचे आंदोलन उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांनी निष्प्रभ केले होते. आता मोदींचा सर्वसत्तावादाचा घोडा नितीशकुमारच रोखू शकतील. मोदी ज्या संघ परिवाराच्या विचारसूत्रावर स्वार आहेत, ते पंक्चर करण्याची युक्ती जनता परिवाराच्या जनतावाद या विचारात आहे. जनतावाद म्हणजे मध्यम, मागास, दलित, महादलित जाती-जमाती, अल्पसंख्यांक यांना प्रतिष्ठा आणि विकासाची संधी. डॉ. राम मनोहर लोहियांनी त्याची मांडणी केली आहे. जनतावाद म्हणजे संघाच्या धर्माच्या आधारावरच्या कट्टरवादी संघटनाला आडकाठी. म्हणून . गांधी जनतेचे संघटन करत होते. तोपर्यंत संघाला स्वत:चे संघटन वाढवता येईना. या देशातल्या माणसांची जात अस्मिता धर्म, राष्ट्र, भाषा, वंश, प्रांत या ओळखीवर सतत मात करत आली आहे. नुकतेच गुजरातमध्ये पटेलांचे झालेले आंदोलन पाहा. ३० वर्षापूर्वी याच पटेलांना घेऊन संघाने राखीव जागांना विरोध केला होता. तेच पटेल आज स्वत:च्या जातीला ओबीसीअंतर्गत आरक्षण मागत आहेत. एका अर्थाने संघाचा विचार बाजूला सारत आहेत.

सांगायचा मुद्दा असा की, बिहारात नितीशकुमार जिंकले तर संघ विचाराला देशव्यापी आव्हान उभे राहिल. देशात नवी राजकीय समीकरणे जन्माला येतील. संघ विचाराच्या विरोधात सरळ सरळ ध्रुवीकरण होईल. बुद्धभूमी बिहारमध्ये मोदींचे हरणे म्हणजे वैर, द्वेष, हिंसेविरोधात प्रेमाचा संदेश जिंकणे असा अर्थ लावला जाईल. सहिष्णुता जिंकली, असे म्हटले जाईल. मोदी, संघ द्वेषाच्या विचाराने देश हाकू पाहत आहेत. त्या विचारांचा पराभव झाला असे विश्लेषण केले जाईल. म्हणून ही निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. बिहारी मतदारांच्या मतांचा कस लावणारी आहे. कोण खरे, कोण खोटे याची तड लावणारी आहे.


राजा कांदळकर 
संपादक, लोकमुद्रा
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : ०१/०९/२०१५

Wednesday, August 26, 2015

ब्राह्मण समाजातील तरुणांना खुले पत्र








मित्र हो, आजच्या दुहीच्या वातावरणातून पुढे जाण्यासाठी साने गुरुजींचा वारसा आपल्याला उपयोगी ठरू शकेल काय? तुम्हाला काय वाटते? तुम्ही सारे महाराष्ट्रातील अठरापगड जातींच्या मोठ्या कुटुंबातील मोठ्या, शहाण्या भावाची जबाबदारी अंगावर पडलेल्या ब्राह्मण या जातीतले आहात. ही सामाजिक जबाबदारी पेलण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्हा प्रत्येकात ती शक्ती आहे. महाराष्ट्राला द्वेषाच्या जाळातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आपला महत्त्वाचा वाटा उचलाल? ती तुम्ही उचलायला हवी.

प्रिय मित्रहो, सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करताना एक मित्र म्हणाला, “ही ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भानगड दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललीय. कधी संपणार हे? काय केलं पाहिजे? गुंतागुंत आहे सारी!” या मित्राची अस्वस्थता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. त्यातून पुढे जाण्याचा एक मार्ग आहे संवादाचा. हे का घडतेय, हे संवादातून समजून घेण्याचा. राज्यात सध्या जे सुरू आहे, त्याचे मूळ कशात आहे हे समजून घेण्यासाठी हा पत्रसंवाद आहे.

आरक्षणाच्या मागण्यांनी जाती-जातींत भांडणे भडकू पाहताहेत. पुरस्काराच्या राजकारणाने सामाजिक दुही रुंदावतेय. डॉ. नरेंद्र दाभोलकर-कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनांनी जखमा भळभळताहेत. दहशतवाद-कट्टरवादामुळे नवी आव्हाने देशाला व समाजाला हादरवून टाकताहेत. याकूब मेमनच्या फाशीप्रकरणाच्या गुंतागुंतीने आव्हाने अधिक जटिल होताहेत. या सगळ्यामुळे एक भांबावलेपण आलेय. त्यातून उद्रेक होताहेत. हे सारे समजून घ्यायचे, तर महाराष्ट्राच्या पोटात धगधगणारे छोटे-मोठे ज्वालामुखी उमजून घ्यावे लागतील. त्यासाठी काही तरुणांना भेटावे लागेल.

पहिली भेट आपण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घेऊ. बिचकू नका, हा तरुण कार्यकर्ता आक्रमक आहे; पण बदल घडवू पाहतोय. तो म्हणेल की, या महाराष्ट्राचे वाटोळे भट-ब्राह्मणांनी केलेय. त्याच्या बोलण्याने निराश होऊ नका. त्याची ही भाषा संतापाच्या कडेलोटातून येतेय. त्याची आर्थिक परिस्थिती समजावून घ्या. त्याचे कुटुंब शेतकऱ्याचे आहे. तीन-चार एकर शेतीवर आज गावात कुणाचीही उपजीविका होऊ शकत नाही. सतत दुष्काळ पडतो. पाऊस पडून पीक आले, तरी शेतमालाला भाव नाही. वर्षानुवर्षे अस्मानी-सुलतानी संकटाने अशी लाखो शेतकरी कुटुंबे गांजलेली आहेत. त्यातला हा मुलगा. हातात पदवी आहे; पण नोकरी नाही. मतदारयादीत नाव आहे; पण गावच्या मतदारयादीत स्थान नाही. आर्थिक प्रश्नाने मोडलेला हा कार्यकर्ता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमात स्वत:ला शोधतोय. दररोजच्या मेटाकुटीला आलेल्या भयाण जगण्याला, वास्तवाला सामोरे जाण्यासाठी चाचपडणाऱ्या या कार्यकर्त्याची भाषा टोकदार बनलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष त्याच्या जगण्याचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. ते सोडवण्याचा अजेंडाच त्यांनी कधी घेतला नाही. हा कार्यकर्ता मराठा समाज आरक्षण मागतोय; पण त्यातही खाचखळगे आहेत. बरे आरक्षणानेही सारे प्रश्न सुटणार नाहीतच. व्यवस्था मला नाकारतेय, चिरडू पाहतेय ही भावना बळावल्याने हा कार्यकर्ता सैरभैर आहे. त्यातून त्याची भाषा संतापी बनतेय; पण त्याचे खरे दु:ख स्वत:चा विकास होत नाही हे आहे. अशा सैरभैर कार्यकर्त्याला बहकवणे सोपे असते. हा कार्यकर्ता आग असतो. त्या आगीने चूलही पेटवता येते आणि घरेही पेटवता येतात. तिचा सामना यापुढे महाराष्ट्राला करावाच लागणार आहे. असे कार्यकर्ते, अशी आग इतरही छोट्या-मोठ्या जातींत आहे.

यानंतर तुम्ही मुस्लिम तरुणाला भेटायला हवे. त्याने ओसामा बिन लादेनसारखी दाढी वाढवलेली असली, तर गैर मानू नका. तसे राहणे हे त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. जसे शीख दाढी-पगडीत वावरतात, तसेच याचे आहे. मुस्लिम धर्माचा म्हणून नोकरी नाकारली जाण्याचा अनुभव या तरुणाला आला असणे शक्य आहे. मुस्लिम तरुणाला शिक्षण कमी असेल, तर नोकरीचे प्रश्न जास्त बिकट होतात. जास्त शिकलेला असला, तरी शहरात नोकरी मिळेलच याची गॅरंटी नाही. बॉम्बस्फोट, दंगेधोपे, दहशतवादी घटना, धर्मा-धर्मांत तणाव, या प्रश्नांचा या तरुणावर खूप खोल परिणाम होतो. आपण भारतीय समाजाचा भाग आहोत; पण आपल्याला वेगळे समजले जाते. मांस खातो म्हणून घरही मिळू दिले जात नाही, यातून या तरुणांना असुरक्षित वाटू लागते. संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता व्यवस्थेला शिवीगाळ करू शकतो. तसे करताना कुणी त्याला अडवू शकत नाही. मुस्लिम तरुणांची गोची अशी की, ते शिवीगाळ करायला गेले की अतिरेकी म्हणून शिक्का मारला जाताे. दररोज भयाण जीणे जगणाऱ्या माणसांना जात-धर्माचे मोर्चे, जमाव, रॅली यात काल्पनिक सुरक्षितता मेहसूस होते. काल्पनिक सुखाचे चार क्षण तिथे अनुभवता येतात. हा तरुण समाजातल्या सर्व असुरक्षित असलेल्यांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.

या दोन तरुणांना भेटल्यानंतर तुम्ही कोणत्याही सामान्य तरुणाला भेटा. त्याची पाटी कोरी असते. तोही शिक्षण, रोजगार, घर, कुटुंबाची जबाबदारी या प्रश्नांनी भांबावलेलाच असतो. अशा तरुणांच्या हातात आपला झेंडा, आपल्या घोषणेचा बॅनर देण्यासाठी सगळे राजकीय पक्ष सरसावलेलेच असतात. जो पहिला भेटेल त्याच्या गोटात तो सामील होतो. सगळ्या पक्षांना असेच कार्यकर्ते मिळतात. त्यांच्या जिवावर राज्याचे राजकारण, समाजकारण हाकले जाते आहे.

या तिघांना भेटून तुम्हाला आजचा महाराष्ट्र समजून घ्यायला मदत होईल. आज जे घडतेय, ते अचानक उद्भवलेले नाही. हुबेहूब अशीच परिस्थिती राज्यात १९४०मध्येही होती. त्या वेळी पुण्यात हिंदुत्व व हिंदुराष्ट्र या विषयावर परखड बोलल्याबद्दल सेनापती बापट यांना उजव्या विचारांच्या तरुणांनी बेशुद्ध पडेस्तोवर मारले होते. सेनापती महाराष्ट्राच्या चांगुलपणाचा मूर्तिमंत चेहरा होते. त्यांच्यावर हल्ला झाला हे ऐकून साने गुरुजी पुढे आले. त्यांनी आंधळे रे आंधळे या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करणारे पत्र लिहिले. सेनापतींवरच्या हल्ल्याचा निषेध करून साने गुरुजींनी लिहिले होते, “महाराष्ट्रातील तरुणांनो, तुम्ही अत:पर स्वच्छ विचार केला पाहिजे. स्वच्छ विचारांची आज जितकी जरूर आहे, तितकी पूर्वी कधीच नव्हती. केवळ हिंदू-हिंदू करून आता भागणार नाही. सर्व राष्ट्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाही... तुम्ही नवतरुण आंधळेपणा सोडून भारतीय संस्कृतीच्या दिव्य प्रकाशाने दृष्टी भरून घ्या. आंधळे होऊ नका. आपापल्या डबक्यात बसू नका. जुनी मढी उकरून काढू नका. श्रद्धेचा दिवा हातात घेऊन भव्य-दिव्य ध्येयासाठी उभे राहा. सेनापतींसारख्यांवर हल्ले करणाऱ्या या संघांतून शिरू नका. मने विषारी प्रचारापासून दूर ठेवा. तुम्ही पुण्याला मवालीपणा करणाऱ्या आत्मघातकी आंधळ्या तरुणांप्रमाणे होणार का; राष्ट्राचे तुकडे जोडू पाहणाऱ्या, राष्ट्राची एक नाडी, एक हृदय, एक बुद्धी करू पाहणाऱ्या खऱ्या भारतीय संस्कृतीचे उपासक होणार?”

मित्रहो, साने गुरुजी मातृहृदयी होते. म्हणून त्यांना अनेक जण महाराष्ट्र माऊली म्हणत. त्यांची भाषा मवाळ होती; पण सेनापतीसारख्या देवमाणसावर हात टाकणाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. त्या मारेकरी लोकांपासून तरुणांना सावध राहायला सांगितले. ७५ वर्षांपूर्वी गुरुजींनी हे आवाहन महाराष्ट्रातील तरुणांना केले होते. त्याचे मोल आजही तेवढेच आहे. आजच्या ओंगळातून आपल्या देशाला, समाजाला भारतीय संस्कृतीमधला एकोप्याचा, समतेचा विचारच वाचवेल अशी गुरुजींना खात्री होती. त्या काळी गुरुजींवरही शाब्दिक हल्ले झाले. गुरुजी वैर पेरणाऱ्यांवर लिहीत, बोलत. तेव्हा त्यांना मुल्ला साने , खुळचट साने म्हणून हिणवले जाई. त्यावर गुरुजी म्हणत, “मला रेव्हरंड साने , भिक्खू साने असंही म्हणा. त्यामुळे माझा सन्मान वाढेल?”

साने गुरुजींनी आजच्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीची वाटच आपल्याला दाखवून ठेवलीय. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर मित्राशी चर्चा करताना अमेरिकेतील रंगभेदविरोधी चळवळीचे नेते डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांचे भाषण आठवले. त्यात मार्टिन म्हणतात, “अंधार अंधाराला हटवू शकत नाही, ते काम उजेड करतो. द्वेष द्वेषाचा नायनाट करू शकत नाही, ती ताकद फक्त प्रेमात आहे?” काळे आणि गोरे यांच्यात प्रेमसंवाद व्हावा म्हणजे तो प्रश्न सुटेल, यावर मार्टिन यांचा भरोसा होता. साने गुरुजी तेच मांडत होते. या दोघांचीही गांधींशी नाळ होती, हे विशेष. द्वेष करणाऱ्यांना प्रेमानेच उत्तर द्यायचे, हे सेनापती बापटांनी पुढे आपल्या जीवनातून दाखवून दिले. १९४० मध्ये सेनापतींनी रक्तबंबाळ होईस्तोवर मार खाल्ला, तेच सेनापती १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ब्राह्मण समाजाची घरे पेटवायला आलेल्यांच्या विरुद्ध उभे राहिले.

गांधींचा मारेकरी मराठी आपल्याच जातीतला होता, याबद्दल त्यांना दु:ख झाले. साने गुरुजींनी तर मनाला लावून घेतले. गांधीहत्या शुक्रवारी झाली. म्हणून दर शुक्रवारी गुरुजी कडक उपवास करत. गुरुजी म्हणत, “आपण सारेच एका अर्थाने गांधीजींचे मारेकरी. नथुराम गोडसे हा आमच्या मनातील जातीयतेची पुंजीभूत मूर्ती आहे. तुमच्या-आमच्या हृदयातील जातीयतारूपी हिंस्र गोडसेचे निर्मूलन केल्याखेरीज तरणोपाय नाही.” गौतम बुद्धांनी व्यक्ती, समाजाच्या पराभवाची १२ कारणे सांगितली. त्यात द्वेष हे नंबर एकच कारण सांगितलेय. द्वेष म्हणजे विनाश.

मित्र हो, आजच्या दुहीच्या वातावरणातून पुढे जाण्यासाठी साने गुरुजींचा हा वारसा आपल्याला उपयोगी ठरू शकेल काय? तुम्ही सारे महाराष्ट्रातील या अठरापगड जातींच्या मोठ्या कुटुंबातील मोठ्या, शहाण्या भावाची जबाबदारी अंगावर पडलेल्या ब्राह्मण या जातीतले आहात. ही सामाजिक जबाबदारी पेलण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुम्हा प्रत्येकात ती शक्ती आहे. महाराष्ट्राला द्वेषाच्या जाळातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही आपला महत्त्वाचा वाटा उचलाल, या अपेक्षेसह हे पत्र संपवतो.

राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - मी मराठी live : २६/०८/२०१५