Tuesday, July 28, 2015

कॅलिडोस्कोप











राचेलबाई तुहा रंग कंचा?
अमेरिकेतल्या न्युयॉर्क टाईम्सया दैनिकात जून महिन्यात आलेली एक स्टोरी खूप गाजली. सोशल मीडियातही तिचा गाजावाजा झाला. ही स्टोरी आहे राचेल डोलेझल या प्रतिष्ठित बाईची. राचेलबाई वॉशिंग्टनमधील स्पोकेन इथं राहतात. त्या प्राध्यापिका असून प्रतिष्ठित मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. या बाई आहेत गोऱया. पण त्यांनी स्वतची ओळख मी ब्लॅक वंशाची आहे, अशी सांगितल्याने खळबळ माजली. राचेलबाइं&च्या आईवडिलांनी तात्काळ जाहीर केलं की, ‘आमची मुलगी खोटारडी आहे. आम्ही गोरेच आहोत. मुलगीही गोरी आहे. आमचा वंश युरोपियन आहे. आम्ही ब्लॅक वंशाचे असण्याचा प्रश्नच नाही.’ अमेरिकेत सोशल मीडियासह विविध माध्यमांत राचेल बाईंना विचारलं गेलं की, ‘तुम्ही खोटं का बोलता? तुमचा रंग, वंश नेमका कोणता?’ राचेलबाई आपल्या मतावर ठाम होत्या. त्यामुळे त्या ज्या संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत, त्या संस्थांचीही गोची झाली.

माध्यमांनी राचेल बाईंबद्दल माहिती काढली तर कळलं की, त्यांना बाल वयापासून ब्लॅक लोकांबद्दल आकर्षण वाटत होतं. त्यांच्या वडिलांनी चार काळी मुलं दत्तक घेतली. या मुलांबद्दलही त्यांना माया वाटत असे. पुढे त्यांनी कॉलेजातही काळ्या लोकांसाठी लढे दिले. लग्नही एका काळ्या माणसाबरोबरच केलं. आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. राचेल बाई दिसतात सुंदर. त्या विद्वानही आहेत. कर्तबगार, धाडसी आहेत. त्यांच्यावर टीका करणारे जसे अनेक आहेत, तसे त्यांचे समर्थकही पुष्कळ आहेत. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत म्हटलं की, रंग, वंश हे मुद्दे आता अमेरिकेसारख्या पुढारलेल्या समाजात महत्त्वाचे आहेतच कुठे?अमेरिकन समाजात अंशत काळे पण गोऱयांसारखे दिसणारे असे खूप लोक आहेत. विसाव्या शतकात एकपंचमांश एवढी लोकसंख्या अशा लोकांची आहे. काही गोरे लोक काळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात. त्यांच्यासारखंच जीवन जगतात. पण कुणी आपली ओळख लपवत नाही. राचेल बाईंच्या बाबतीत मात्र ओळख लपवल्याचा आरोप होतो आहेअमेरिकेत रंग, वंश याबद्दल माहिती लपवणं हा मोठा सामाजिक अपराध मानला जातो. राचेल बाईंच्या विरोधात सोशल मीडियावर धमक्या देण्यापासून तर उपहासात्मक टीका करण्यापर्यंत अनेक प्रकार सुरू आहेत. या प्रकरणाचा शेवट काय होईल हे सांगणं अवघड असलं तरी काळेपण मिरवणारी ही गोरी बाई लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे.


फ्रेंच हटके  विचार कसा  करतात?
मासा मेल्यानंतर त्याचं शरीर सडायला डोक्यापासून सुरूवात होते. मानवी समाजाचंही असंच काहीसं आहे. डोकं म्हणजे विचार. डोकं जिवंत असणं म्हणजे विचार सुरू असणं. डोकं मेलं की विचारही मेलाच. विचारशैली जिवंत, सळसळती असलेला समाज अधिक ताजातवाना, प्रगतीशील असतो. युरोपमधील प्रेंच समाज असा प्रगतिशील मानला जातो. या समाजाबद्दल असं म्हणतात की, तो विद्वानांचा समाज आहे. फ्रान्स हा विचारवंतांचा देश आहे. विचार तर सर्व मानवसमूह करत आलेला आहे. पण प्रेंचांचं वैशिष्ट्य असं की, ते हटके विचार करतात. म्हणून जगात त्यांचं नाव आहे. जॅक्स् डेरीदा, जॉ पॉल, सार्त्र, अल्बर्ट कामू आणि आताचा नवं भांडवल लिहिणारा थॉमस पीकेटी या प्रेंच विचारवंतांचा जगभर दबदबा आहे. प्रेंच माणसांच्या या वैभवशाली विचारशैलीच्या इतिहासाचा मागोवा घेत आज प्रेंच समाज बुद्धीच्या क्षेत्रात मागे का पडत आहे, याचा धांडोळा घेणारं एक पुस्तक सध्या चर्चेत आहे.
इकॉनॉमिस्टया जगप्रसिद्ध मॅगझीनमध्ये जून महिन्याच्या अंकात या पुस्तकावर लेखन प्रसिद्ध झालं आहे. या पुस्तकाचं नाव आहे हाऊ फ्रेंच थिंक अॅन अॅफेक्शनेट पोट्रेट ऑफ अॅन इंटलेक्चुअल पिपल’. पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर हजारी सिंग. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी या पुस्तकात फ्रान्समध्ये विचारशैलीला महत्त्व कसं आहे, याचा ऐतिहासिक मागोवा घेत घेत आताच्या फ्रान्सचं विश्लेषण केलं आहे.

लेखक पुस्तकात सांगतो, प्रेंच माणूस हटके विचार कसा करतो? त्याच्या विचार करण्यावर पाच घटकांचा प्रभाव असतो.
1. प्रेंच समाजाचा इतिहास हा सामाजिक बंड, अराजक, त्यानंतर क्रांती आणि ती स्थिर झाल्यानंतर प्रगती असा अवघड वाटा-वळणांचा आहे. या इतिहासाचा फ्रेंच माणसावर मोठा प्रभाव आहे.
2. फ्रेंच समूहाला सामूहिक ओळख आहे. त्यामुळे तो समाज आत्मविश्वासाने विचार करतो.
3. प्रेंच समाजाला सामूहिक वाद संवादाची आवड आहे. घरी, सार्वजनिक ठिकाणी आणि विविध संस्थांमध्ये हे वाद संवाद घडत असतात. विचार कुटाळक्या, भांडणं, घनघोर चर्चाखोरी, छोट्या छोट्या गोष्टींवर कीसपाडीवृत्ती, चिकित्साखोरी अशा गुणांचा या समाजात भरपूर विकास झालेला आहे.
4. लोक विचारवंतांना खूप मान-सन्मान देतात, जपतात.
5. क्रांतिकारी विचार परंपरा आणि सर्जनशीलता यांच्यात फ्रेंच समाजाने पिढ्यान्पिढ्या संवादाचं वातावरण विकसित केलं आहे.

या पाच घटकांमुळे या समाजात विचार करणाऱयाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे, असा निष्कर्ष लेखकाने काढलाय. पण पुस्तकाच्या शेवटी हा लेखक आजच्या फ्रेंच समाजाचं विश्लेषण करताना थबकतो. बिचकतो. अल्बर्ट कामूचा देश आज सकस विचार करायला नकार का देतोय? विचाराच्या क्षेत्रात थॉमस पीकेटीचा अपवाद सोडला तर मोठे विचारवंत फ्रान्समध्ये जवळपास नाहीत. लेखकाला या मागचं कारण असं दिसतं की, समाजात विचार करायला प्रतिकूल वातावरण तयार झालं की, जे काही वासरात लंगडी गाय म्हणता येतील असे विचारवंत उरतात. त्यांचाही मेंदू आक्रसतो. मग त्यातून सुरू होतो छोट्या विचाराचा प्रदेश. आजच्या फ्रान्सचं असं काही तरी होतंय का? लेखकाने हा प्रश्न पुस्तकात मांडलाय.

जगभरातले नव्या जमान्याचे प्रेरणादायी सोशल लिडर
टाईम या मॅगझीनमध्ये दरवेळेला काहीना काही नवं हमखास वाचायला मिळतं. जून महिन्यात या अंकात नेक्स्ट जनरेशन लिडर्स् अशी एक स्टोरी प्रसिद्ध झाली आहे. या स्टोरीमध्ये चीन, पाकिस्तान, फ्रान्स, तुर्कस्तान, अमेरिका, केनिया या निवडक देशातील नव्या कल्पना निवडून त्यावर झपाटल्यासारखं काम करणाऱया तरुण, तरुणींच्या प्रेरक कथा दिलेल्या आहेत.


चिनी डिझाईनर माशा
यातली पहिली कथा आहे चीनमधील शांघाय येथील माशा मा हिची. जगभर चिनी वस्तूंचं मार्केटिंग जोरदारपणे चालु असतं. मेड इन चायना असं लिहिलेल्या विविध चिनी ब्रँडच्या वस्तू जगभर पाठवल्या जातात. मात्र या ब्रँडची डिझाईन नजरेस भरणारी नसते. विदेशातली ही चिनी वस्तूंविषयीची तक्रार लक्षात घेऊन डिझायनर माशा हिने स्वतचा स्टुडिओ उभा केला. आणि चीनमध्ये आकर्षक वस्तू बनवण्याचा सपाटा लावला. लंडनमध्ये फॅशन डिझाईन या विषयात पदवी मिळवलेल्या माशा हिने विशेषत स्त्रियांच्या वापराच्या फॅशनेबल वस्तू विदेशात पाठवायला सुरूवात केली. दोन वर्षांपासून माशा हा व्यवसाय करतेय. सुरूवातीला डझनभर ब्युटिकमधून तिने हा व्यवसाय सुरू केला. आता युरोप, अमेरिकेत तिच्या वस्तूंना मागणी आहे. मेड इन चायना या स्लोगनचं तिने डिझाईन इन चायनाअसं रूपांतर केलं. लेडी गागासारख्या प्रतिष्ठित महिला तिच्या वस्तू विकत घेऊन वापरतात. आणि अभिमानानं मिरवतातही. अल्पावधित जगभर फॅशन डिझाईनर म्हणून या 29 वर्षांच्या चिनी मुलीचं नाव झालं. म्हणूनच काहींनी तिची दखल घेतली.

डिजिटल राईट अॅडव्होकेट
पाकिस्तानातल्या 34 वर्षीय निघत दाद या लाहोर येथे राहणाऱया तरुणीचीही कहाणी कमालीची प्रेरणादायक आहे. तिने पाकिस्तानातल्या पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांना सोसाव्या लागणाऱया ऑनलाईन हॅरॅशमेंटच्या विरोधात जागृती करणारी संस्था उभी केली. तिचं नाव डिजिटल राईट फाऊंडेशन असं आहे. निघत वकील आहे. क्रिमिनल लॉ आणि फॅमिली लॉ हे तिचे आस्थेचे विषय आहेत. तिचे वडील तिच्या पाठिशी सावलीसारखे उभे राहिले. पाकिस्तानातल्या कायदा विभागाने आणि पोलीस खात्याने तिच्या या प्रयत्नांना सहकार्य केलं. तरुण मुलींना ऑनलाईन हॅरॅशमेंट पासून स्वतचा बचाव कसा करायचा, यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम निघत आणि तिची टीम करते. ज्या मुली, महिला यांना ऑनलाईन छळाचा अनुभव येतो, त्यांनी पुढे येऊन तक्रार केल्यानंतर अशा पीडितांना निघत न्याय मिळवून देते. तिचं काम अल्पावधित एवढं लोकप्रिय झालं की, नोबेल प्राईझ विनर मलाला युसुफजाई हिनेही त्याची स्तुती केली. निघतचं काम आता पाकिस्तानात एवढं फोफावलं आहे की, ऑनलाईन हॅरॅशमेंट करणारे पुरुष वचकून असतात. तिच्या कामाला मिळालेली ही पावतीच म्हणता येईल, म्हणूनच जगभर तिची दखल घेतली गेली.

आचारी तुमच्या घरी
असंच वेगळं काम फ्रान्समध्ये पॅरिस येथे राहणारा स्टिफन लेगुईलॉन करतोय. त्याचं काम म्हटलं तर साधं आहे. म्हटलं तर घरातल्या किचनची दुनिया बदलून टाकणारं. स्टिफन आणि त्याचे साथीदार ग्राहकांना (गरजू कुटुंबांना) सेफ (आचारी) पुरवण्याचं काम करतात. ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग करायचं. सेफने काय मेन्यू तयार करुन द्यायचा हे सांगायचं. एकदा बुकिंग झालं की, ठरलं त्या वेळेला सेफ घरी येईल. दार उघडून ग्राहकाने फक्त त्याचं स्वागत करायचं. त्याला  किचन दाखवून द्यायचं. हा सेफ सोबत मेन्यूचं सगळं साहित्य (किराणा बाजार, भाजीपाला वगैरे) बरोबरच घेऊन येतो. आणि कुटुंबाला मस्त सुग्रास भोजन आवडीनं तयार करून देतो. या कामामुळे 26 वर्षांचा स्टिफन फ्रान्समध्ये अल्पावधीतच प्रत्येक कुटुंबातल्या गळ्यातला ताईत बनला.

इंगिनचा अल्टरनेट जरनॅलिझम
स्टिफन सारखं काम करायला कल्पकता लागते आणि धाडसही. असं धाडस तुर्कीमधल्या इस्तंबुलमध्ये राहणाऱया इंगिन ओंडर या 23वर्षांच्या तरुणाने दाखवलं आहे. त्याने तुर्की प्रस्थापित मीडियाला आव्हान उभं करत स्वतचा अल्टरनेटीव्ह मीडिया तयार केला आहे. हे त्याने कसं घडवून आणलं? त्याला कारण ठरली एक घटना. 28 डिसेंबर 2011 रोजी तुर्की लष्कराच्या लढाऊ विमानांनी तुर्क आणि इराकच्या सीमेवर बॉम्बवर्षाव केला. कुर्दीश फुटीरतावादी अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी हा हल्ला केला गेला, असं सांगितलं गेलं. त्यात 34 लोक मारले गेले. मात्र सत्य वेगळंच होतं. या हल्ल्यात मारले गेलेले सर्वजण स्थानिक रहिवासी खेडूत होते. त्यात बहुतेकजण तरुण मुलं होती. ती मुलं सीमेवर इंधन आणि सिगरेटचं स्मगलिंग करून तुर्कीमध्ये नेत असत. तुर्कीमधील मुख्यप्रवाहातल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने ही बातमी लपवली. इंगिन आणि त्याच्या विद्यार्थी सहकाऱयांनी ट्विटरवर ही बातमी दिली. त्याच्या मागचं सत्य उलगडून सांगितलं. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रस्थापित मीडिया इंगिनवर नाराज झाला. मात्र तुर्की जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. त्यानंतर 140 नवशिक्या पत्रकारांना बरोबर घेऊन सोशल मीडियाचं हत्यार वापरून इंगिनने सिटीझन जरनॅलिझम जोरात सुरू केला. आता तुर्कीमध्ये इंगिन आणि त्याच्या सहकाऱयांचा पर्यायी मिडिया उभा राहिला आहे. आणि बातमी लपवण्याची कुणाचीही बिशाद नाही.

फोटोग्राफर्स्ची चळवळ
अमेरिकेतल्या मे बोइव्ह आणि केनियाचा बोनिफेस मवांगी यांची कहाणीही डेअरिंगबाज आहे. 31 वर्षांची मे न्यूयॉर्कमध्ये राहते. 350स्वयंसेवी संस्थांचं जाळं उभं करून तिने पर्यावरणवादी गट बनवला आहे. पर्यावरणाचं नुकसान करणाऱया व्यवस्थेविरोधात जागृती करणं, मोर्चे काढणं, सरकारवर दबाब आणणं असं तिचं काम चालू आहे. 31 वर्षांचा बोनिफेस अप्रतिम फोटोग्राफर आहे. तो जिथे अन्याय, अत्याचार होईल तिथे धडकतो. त्याचे फोटो काढतो आणि दडपलेल्यांचा आवाज बनतो. त्याच्या फोटो काढण्याच्या पद्धतीमुळे त्याला जगभर गनिमी काव्याचा फोटोग्राफरम्हणून ओळख मिळत आहे.अशा समदृष्टी फोटोग्राफर्सची टीम बनवून बोनिफेस आणि त्याचे सहकारी केनियातल्या भ्रष्ट राज्यकर्त्यांना फोटो चळवळीच्या माध्यमातून उघडं पाडतात. अशा नव्या कल्पना घेऊन काम करणारे हे सोशल लिडर आहेत. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, ही तरुणाई या तरुण नेत्यांपासून प्रेरणा घेईल काय? एकेका प्रश्नावर काम करणारे तरुण भारतातही वाढोत.










गाववाली अॅण्टी हिरोईन
भारतात कंगना राणावत या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नटीबद्दल जून महिन्यात न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियात खूप छापून आलं. तन्नू वेड्स मन्नू रिटर्नस् या तिच्या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा बिझनेस केला. क्वीन या चित्रपटासाठी तिला नॅशनल अवॉर्डस् मिळालं. या दोन गोष्टींमुळे तिची चर्चा झाली असली तरी ही नटी पहिल्यापासून काहीना काही स्वतचं वेगळेपण दाखवत आली आहे. हे वेगळेपण काय आहे? ‘डर्टी पिक्चरहा सिनेमा तिने नाकारला होता. या चित्रपटाची गोष्ट आवडल्याने तिने हा निर्णय घेतला होता. हा चित्रपट हिट झाल्यानंतर ही पोरगी बावळी आहे, तिला अक्कल नाही, अशी तिच्यावर टीका झाली होती. मात्र मी तत्त्व म्हणून असे चित्रपट यापुढेही नाकारेन, या मतावर कंगना ठाम दिसली. तोंडाला लावायच्या एका क्रीमची करोडो रुपयांची जाहिरातही तिने अशीच लाथाडली. तिचं असं म्हणणं आहे की, एक कोटी बुडाले म्हणून काय झाल? क्रीम तोंडाला लावल्याने कुणी गोरी कशी बनेल? जे घडणार नाही. ते मी जाहिरातीतून कसं सांगू? माझी बहीण सावळी आहे. तिला मी सामोरं कसं जाऊ? खोटं नको, करोडो रुपयेही नकोत.

अशी ही बॉलिवुडमधली हटके नटी आहे. सोळा-सतरा वर्षांची होती; तेव्हा ही पोरगी मुंबईत आली. हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिह्यात भांबला हे तिचं छोटं गाव. आधी दिल्लीत मग मुंबईत करिअरच्या शोधात असलेल्या या मुलीला नीट इंग्रजीही बोलता येत नव्हतं. मुंबईत नवखी होती. फिल्म इंस्डस्ट्रीत कुणी ओळखीचं नाही. तरी या मुलीने धीराने तडजोड करता काम शोधायला सुरुवात केली. चांगली काम मिळाली, ती केली. तत्त्वाशी तडजोड केली नाही. छोट्याशा गावातून आलेली ती आज देशातल्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड करून बसली आहे. हम थोडे बेवफा क्या निकले, आप तो बदचलन हो गये, हे आपल्या नवऱयाला सांगणारी डेरिंगबाज तन्नू तिने साकारली. मै अपने हनिमून पे अकेले आई हूँ, असं समोरच्याला बेधडकपणे सांगणारी ही नायिका म्हणूनच तरुणाईची लाडकी झाली आहे. तिच्या भूमिका सोज्वल, रडक्या, अन्याय सहन करणाऱया बुळ्या हिरोईनसारख्या नाहीत. म्हणून बॉलिवुडचे चित्रपट समीक्षक तिला अॅण्टी हिरोईन म्हणतात. कंगनाचा त्याला आक्षेप नाही. तिचं म्हणणं असं की, मी आजची बेधडक तरुणी पडद्यावर साकारते. त्याचा मला अभिमान आहे.

 इंदिराजी आणि मोदीजी
नवभारत टाईम्स या दैनिकात संपादकीय पानावर देशातले जानेमाने पत्रकार, विचारवंत, लेखक विविध विषयांवर लिहित असतात. अत्यंत मूलभूत मांडणी काही लेखांमधून होत असते. ज्येष्ठ पत्रकार चंद्रभूषण यांनी जूनमध्ये इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन आजी माजी पंतप्रधानांची तुलना करत देशासमोरील आव्हानांची चर्चा करणारा लेख लिहिला आहे.

त्यांचं म्हणणं असं की, देशात, केंद्रात एकाधिकारशाहीने चालणारं सरकार आलं की, त्या सरकारचा दबदबा वाढतो जरूर. लोकांना त्याचं आकर्षणही वाटतं. त्या नेत्याची वाह! काय ताकदवान नेता आहे, काय धडाकेबाज निर्णय घेतो, कसा सर्वांना नमवतोअशी स्तुती जरूर होते. पण या हुकूम सोडणाऱया नेत्यांच्या काळातच देशात, विविध राज्यांत पहिल्यांदा अस्वस्थता पसरते. मग गोंधळ माजतो. दंगली भडकतात. दहशतवादी कारवाया वाढतात. आणि याचा शेवट फुटीरवादी शक्ती फोफावतात. देश फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहतो.

इंदिरा गांधी यांची जूनमध्ये आठवण जरूर होते. कारण 26 जून 1975 रोजी त्यांनी देशात आणीबाणी लागू करून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला होता. हा अतिरेक लोकांना आवडला नाही. त्यानंतर मतपेटीतून लोकांनी इंदिराजींना घरचा रस्ता दाखवला होता. याच इंदिरा गांधी 1980 साली दुर्गा बनून परत सत्तेवर आल्या. त्यांचा 1980 ते 1984 हा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ दबदबा निर्माण करणारा होता. मात्र त्याच काळात पंजाबात खलिस्तानी आंदोलन वाढलं. आसाममध्ये सांप्रदायिक दंगे भडकले. जम्मू-काश्मिरमध्ये इंदिराजींचा शेख अब्दुला परिवाराशी इगोचा झगडा झाला. त्यानंतर जम्मू काश्मिरमध्ये फुटीरवादी कारवाया माजल्या. या फुटीरतावादी शक्तींनीच पुढे इंदिराजींचा बळी घेतला.

मोदीजींचं सरकारही इंदिराजींच्या सरकार सारखंच ताकदवान आहे. बहुसंख्याकांचा त्याला जोरदार पाठिंबा आहे. या सरकारच्या पहिल्या वर्षातच काही वेगळ्या घटना बघायला मिळाल्या. 6 जून 2015 ला ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेचा 31वा स्मृतिदिन पंजाबात आणि जम्मूमध्ये साजरा करण्यात आला. यादिवशी एकेकाळी पंजाबात फुटीरवादी शक्तींची ज्योत पेटवणाऱया जर्नल भिंद्रनवाले यांना शीख फुटीरवाद्यांनी मानवंदना दिली. त्यांच्या समर्थनार्थ सुवर्णमंदिरात तलवारी उगारून घोषणाबाजी केली. पंजाबात अकाली दल आणि भाजपचं सरकार आहे. मात्र या सरकारचा या फुटीरतावाद्यांना धाक राहिलेला दिसत नाही. जम्मू-काश्मिरमध्ये जून महिन्यातच पाकिस्तानचे झेंडे फडवण्यात आले. या राज्यातही भाजप आणि पिडीपीचे सरकार आहे. पाकिस्तानधार्जिणे फुटीरतावादी नेते या राज्यात मोकाट आहेत. केंद्रात मोदीजी बलवान आहेत. पण त्यांचा या फुटीरतावाद्यांना धाक दिसत नाही. तमिळनाडूतल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी चालवलेल्या आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर केंद्र सरकारने बंदी घालून तिथल्या विद्यार्थ्यांना डिवचलं. त्यातून तमिळ तरुण मोदीजींच्या विरोधात घोषणा देत हा देश आमचा आहे की नाही? या देशात आम्हांला चर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? असा सवाल करू लागलेत. नॉर्थ ईस्ट राज्यात अशांतता सुरू आहेच. देशात उत्तर प्रदेश सारख्या राज्यात राम मंदिराचा प्रश्न डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात नथुरामी कारवाया वाढताहेत. इंडियन एक्स्प्रेसमधील लालकृष्ण अडवाणी यांची मुलाखतही लक्षवेधक ठरली. अडवाणींनी म्हटले आहे, लोकशाही चिरडणाऱया शक्ती आजही दखलप्राप्त आहेत. अडवाणींच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा करत चंद्रभूषण यांनी आपल्या देशात सीमेवरच्या राज्यांतून खतरनाक इशारे येऊ लागले आहेत, याचं भान आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रात हिंदूंचा दबदबा असणारं सरकार अंतिमत राज्या- राज्यात विभाजनवादी, देशतोडक ताकदीला बळ देतं, हा चंद्रभूषण यांचा निष्कर्ष आपल्याला नक्कीच काळजी करायला लावणारा आहे.

(सौजन्य लोकमुद्रा जुलै 2015)

-        राजा कांदळकर, संपादक, लोकमुद्रा


Thursday, June 11, 2015

धनगरांची सर्वपक्षीय फसवणूक















मोदी सरकारमधील आदिवासी खात्याचे केंद्रीय मंत्री ज्युएल ओराम यांनी खासदार शरद पवार यांना धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देता येणार नाही, असे पत्र लिहिले आहे. हे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर समाजाचा मानबिंदू असणा-या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनी मीडियाला दिले. त्यानंतर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा उलटसुलट चर्चा रंगली. दावे, प्रतिदावे ठोकले गेले. या पत्रात केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र राज्य सरकारने धनगरांना अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण द्यावे, असा कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्ज (एनसीएसटी) यांचे यापूर्वीचे प्रस्ताव आम्ही विचारात घेतले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे केंद्राच्याही हा प्रस्ताव विचाराधीन नाही. या पत्रामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर धनगर समाजाची घोर फसवणूक होत आहे, हे जाहीर झाले आहे. सुप्रिया सुळेंनी या प्रश्नावर पत्र मीडियाला देऊन गौप्यस्फोट केला. कारण त्यांना भाजप या प्रश्नावर काही करत नाही हे धनगरांना पटवून द्यायचेय. भाजप व राज्य सरकारला या प्रश्नावर उघडे पाडण्याची खेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सहा महिने उलटून गेले तरी त्यांनी या प्रश्नावर काही पावले उचललेली नाहीत. राष्ट्रवादीचे बडे नेते आता हे सगळीकडे सांगण्याची संधी सोडणार नाहीत.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या पुढाकाराने धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन झाले. धनगरांची संख्या दीड कोटी आहे, असे सांगितले जाते. राज्यात विधानसभेच्या ६० मतदारसंघांत धनगर समाजाचे मतदान दखल घ्यावे, असे आहे. ही राजकीय परिस्थिती पाहता भाजपने धनगरांना संघटितपणे आरक्षणाच्या आंदोलनात उतरवले. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना सोबतीला घेतले. या आंदोलनाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा शह दिला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ही सगळी व्यूहरचना केली होती. या आंदोलनात राज्यातला अवघा धनगर समाज तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरोधात एकवटला होता. आघाडी सरकारने तुमची फसवणूक केली, आम्ही तुम्हाला न्याय देतो, असे मुंडे, फडणवीस, पंकजा मुंडे हे नेते धनगरांना सांगत होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात धनगर समाजाच्या मताचे मोल मोठे होते. शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने नेहमीच साथ दिली होती. भाजपच्या ‘आरक्षण’ डावामुळे आपल्या पाठीमागचा धनगरांचा ओघ दुसरीकडे वळला, हा पवारांना राग असणे स्वाभाविक आहे. आताच्या पत्र गौप्यस्फोट ‘डिप्लोमसी’मागे हे राजकारण आहे. या पत्रामुळे धनगर समाजाचे पुरते डोळे उघडायला हवेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर सतत टोलवाटोलवी करत तो प्रश्न भिजत ठेवला. भाजपने त्याचे राजकारण केले. गेले सहा महिने भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारने त्या प्रश्नावर काहीही केले नाही. राज्यातले सर्वपक्षीय आदिवासी खासदार, आमदार या प्रश्नावर विरोध करत आहेत. यापूर्वी हा प्रश्न कायदेशीर, घटनात्मक आहे, असे मांडले जात होते. आता तो राजकीय प्रश्न झाला आहे. त्यामुळे अधिक गुंतागुंतीचा बनतोय. हे पाहता धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळणे हे यापुढे अधिक गुंतागुंतीचे होणार आहे. धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यातली आरक्षण ही एक पायरी आहे. पण या समाजाच्या ख-या प्रश्नांना आता भिडायला हवे.
धनगर समाज शेळी, मेंढी, गायी पालनाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहे. धनगरांची पोटजातीनिहाय व्यवसायांची विभागणी होते. हटकर धनगर, मेंढ्या-बक-या पालन करतात. अहिर धनगर गायी पाळतात. खुटेकर धनगर घोंगडी, लोकर व्यवसायात आहेत. सजगर धनगर लोकरीच्या घोंगड्या, ब्लँकेट विणण्याचे काम करतात. खाटीक धनगर शेळ्या-बक-यांच्या मांसाच्या धंद्यात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला धनगर समाज शेती व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आहे. ही व्यवसाय विभागणी पाहता धनगर समाजाचे प्रश्न विविध आहेत. शेळ्या-मेंढ्या पाळणारा धनगर समाज डोंगराळ भागात पायपीट करून व्यवसाय करतो. दुष्काळात आणि इतर वेळीही या शेळ्या-मेंढ्यांना चा-याची मोठी अडचण असते. सरकारने वनजमिनीत, कुरणांच्या जमिनीत गुरे, पशुचराईला बंदी घातली आहे. त्यामुळे या समाजाला चा-याच्या प्रश्नाला दररोज तोंड द्यावे लागते. मेंढ्यांच्या लोकरीला भाव, घोंगड्यांच्या उत्पादन विक्रीचा प्रश्न, शेळ्या-मेंढ्या विक्री, मांस उत्पादन, त्याची वाहतूक-विक्री अशा निरनिराळ्या स्तरावरचे प्रश्न आहेत. शिवाय शेतकरी वर्गाचे जे प्रश्न आहेत ते धनगरांचेही प्रश्न आहेत. त्या प्रश्नालाही धनगर समाज दररोज तोंड देत असतो.

हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी किंवा बकरी खाटकाला धार्जिण या म्हणी धनगर समाजात दररोज वापरल्या जातात. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे आणि आपले सर्वस्व गमावणे हा या म्हणींचा गर्भितार्थ आहे. मेंढीवर ताव मारायला टपलेले लांडगे कोण-कोण याची चर्चा यापुढे रंगेल; पण धनगर समाजाच्या शहाण्या नेतृत्वाने महत्त्वाच्या प्रश्नांवर यापुढे काम केल्यास समाजाचे भले होईल. ते प्रश्न असे- १) शेळ्या-मेंढ्यांना सरकारने वनजमिनी खुल्या करून द्याव्यात. स्वस्तात चारा उपलब्ध करून द्यावा. २) शेळी-मेंढी मांस उत्पादन, मार्केटिंग निर्यात सहकारी कारखान्यांची उभारणी सरकारी मदतीने व्हावी. ३) लोकरीला भाव द्यावा, घोंगडी विणकर, उत्पादकांना सुविधा, भांडवल पुरवावे, बाजारात त्यांना संरक्षण द्यावे. ४) मांस उत्पादन, विक्रीत असणा-या खाटीक समाजाचे प्रश्न सोडवावेत. ५) धनगर शेतक-यांचे प्रश्न इतर शेतक-यांबरोबर तातडीने मार्गी लावावेत. ६) शिक्षण, नोक-यांत धनगर समाजाला अधिक झुकते माप द्यावे. ७) राज्य सरकारच्या शेळी, मेंढी-पालक संस्था अधिक कार्यक्षम, लोकाभिमुख करावी. त्याला आर्थिक निधी अधिक पुरवावा. धनगर समाजात आज फसवले गेल्याची भावना वाढू द्यायची नसेल तर या सात प्रश्नांवर काम झाले पाहिजे. अन्यथा ग्रामपंचायतीपासून तर मंत्रालयापर्यंत आपल्याला नाकारले जातेय ही भावना धनगरांमध्ये आहेच. तिचा यापुढच्या काळात स्फोट होऊ शकतो. या स्फोटाची झळ सर्वच प्रस्थापित राजकीय वर्गाला व धनगर नेत्यांनाही बसणार आहे हे नक्की.

राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

पूर्व प्रसिद्धी - दिव्य मराठी 

Monday, February 9, 2015

गोळवलकर गुरुजींचे राज्य आले तर...















फडणवीस सरकारचं सत्तांतर एका अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत झालंय. सन 1978 मध्ये जनता पक्षाच्या आमदारांची मोठी संख्या असताना जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एस.एम.जोशी यांनी 'पुढची 25 वर्षे ब्राम्हण मुख्यमंत्री होऊ शकत नाही' म्हणून स्वतः मुख्यमंत्रीपदाकडे पाठ फिरवली. शरद पवारांना मुख्यमंत्री केलं. त्या समाजपरिवर्तनाच्या विचाराला 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी छेद देत मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. आता 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवरांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केला. एस.एम.जोशींचे विचार बाळासाहेब ठाकरेंना मान्य नव्हते, हे उघड आहे, पण शरद पवारांनाही एस.एम.जोशी यांचे विचार पेलवले नाही की काय ? अशा विसंगतीपूर्ण अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. फडणवीस सरकारकडे त्यांचं कारभारीपण आलंय. तो कारभार गोळवलकरांच्या विचारांनी होणार की छत्रपती शिवरायांच्या, हे आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे.

कोल्हापूरचे स्वतंत्रसेनानी माधवराव बागल यांनी 'गोळवलकरगुरुजींचे राज्य आले तर...' अशी पुस्तिका 1976 मध्ये लिहिली होती. देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव तेव्हा वाढत होता. संघाचे सरसंघचालक माधवराव सदाशिव गोळवलकर यांच्या विचारांचा तेव्हा बोलबाला होता. त्यांचे विचारधन विविध पुस्तकांतून गाजत होते. वादग्रस्त ठरत होते. बागल यांनी त्यांच्या पुस्तिकेत शेटजी-भटजींचे राज्य कसे असेल, याचं चित्र रंगवलं होतं. त्यात शेतकऱयांची लुबाडणूक कशी होईल, दलाल-व्यापारी शिरजोर बनतील, धर्मांधांची चलती होईल आणि गरिबांवर अवकळा येईल, अशा मांडणी बागलांनी केली होती. याउलट, आमचे राज्य आले तर हिंदूंचे कल्याण होईल, व्यापार-उदीम फळफळेल. न्याय, नीतीचा सुकाळ येईल. अल्पसंख्यांक वठणीवर येतील, गाई आणि जनावरांचं रक्षण होईल, धर्मराज्य अवतरेल अशी भविष्यवाणी गोळवलकर यांनी केली होती.

सन 1976 चा हा संदर्भ आठवण्याचं कारण आहे. फडणवीस यांच्या सरकारकडून लोक, माध्यमे, विचारी माणसं वेगवेगळ्या अपेक्षा बाळगून आङेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारात शिवसेना सहभागी झाली. त्यांचं खातेवाटप जाहीर झालं. नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी-विरोधक यांचे आरोप-प्रत्योरप, पेच-डावपेच रंगत आहेत. फडणवीस सरकार स्थिर होऊन वाटचाल करत आहे. 'मी गोळवलकरगुरुजींच्या विचारांचा पाईक आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, गोळवलकर आणि संघविचाराने आम्हाला राज्य चालवायचं आहे,' हे फडणवीस यांनी लपवून ठेवलेलं नाही.

फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि माध्यमांत त राज्याचे तिसरे 'ब्राम्हण' मुख्यमंत्री झाले आहेत, असा उल्लेख झाला. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आता फडणवीसांच्या हाती, अशी टीका खुद्द 'सामना' या दैनिकातून छापून आली होती. त्यावर माध्यमांनी उलट-सुलट चर्चाही केली होती. फडणवीस या नावाला पेशवाईच्या इतिहासाचा संदर्भ आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात नाना फडणवीस हे बडे प्रस्थ होते. पेशवाईत बारभाईंचे कारस्थान गाजले. या कारस्थानात साडेतीन शहाण्यांपैकी एक म्हणून नाना फडणवीस इतिहासप्रसिद्ध झाले.

देवेंद्र फडणवीस कसा कारभार करणार यानिमित्ताने ही सगळी चर्चा झाली. ते पेशवाईसारखा महाराष्ट्र चालवणार की, छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य हाकणार, हे यापुढे दिसेल. गोळवलकरगुरुजींच्या विचारांचं त्यांच्या निर्णयात काय प्रतिबिंब दिसणार, हेही आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र हे कायदा, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांची जाण असलेले नव्या पिढीतले कर्तबगार नेते आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वर्तनावर अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव दिसतो. त्यांचे वडिल संघ-स्वयंसेवक गंगाधरराव फडणवीस हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. गंगाधररावही वाजपेयींच्या उदारमतवादी मतांचे पुरस्कर्ते होते. समन्वयी वृत्तीचे होते. देवेंद्र यांना तो वारसा आहे. कारभार हाकताना त्यांचा कस लागेल.

सुरुवातीला अस्थिर वाटणारं फडणवीस यांचं सरकार आता सेनेच्या सहभागाने मजबूत झालंय. या सरकारला भाजप 122 अधिक सेन 63 असं 185 आमदारांचं भक्कम पाठबळ आहे. छोटे पक्ष त्यांच्या सोबतीला आहेत. या सरकारने दुसरा मंत्रिमंडळ विस्तार केला, त्यात सेनेसोबत खात्यांची वाटणी स्पष्ट झाली. स्वतः फडणवीस यांनी स्वतःकडे गृह खातं ठेवून घेतलंय. नगरविकास हे खातंही त्यांच्याकडे आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल, अल्पसंख्याक विकास, कृषी, दुग्धविकास ही महत्त्वाची खाती आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त, विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण, प्रकाश मेहता यांच्याकडे गृहनिर्माण, चंद्रकांत पाटील सहकार व पणन, पंकडा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास व जलसंधारण, विष्णू सावरा यांच्याकडे आदिवासी विकास ही लोकांवर प्रभाव असणारी खाती आहेत. जलसंपदा हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे, अन्न खातं गिरीश बापट यांच्याकडे आहे. शिवसेनेकडे उद्योग, परिवहन, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य ही खाती देण्यात आली आहेत.

सुभाष देसाई यांना उद्योगमंत्री करण्यात आले, दिवाकर रावते यांना परिवहन मंत्रालय दिलंय, रामदास कदम यांच्याकडे पर्यावरण, एकनाथ शिंदेंना सार्वजनिक बांधकाम, दीपक सावंतांकडे आरोग्यखातं आहे. या सगळ्या मंत्र्यांना नागपूर अधिवेशनात काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधाला तोंड द्यावं लागणार आहे. गोंधळ, घोषणा, निषेध, सभागृह दणाणणं असं सगळं होणार. भाजप-सेनेचं खातेवाटप बघितलं, तर लोकांच्या दृष्टीने कळीची आणि परिणामकारक, प्रभावी खाती भाजपने स्वतःकडे ठेवून घेतली आहे. उद्योग, परिवहन, आरोग्य ही खाती वगळता सेनेकडे महत्त्वाचं खातं नाही. सेनेला हे कमीपण सतत टोचत राहणार आहे. या कमीपणाचं असंतोषात कधीही रुपांतर होईल. फडणवीस यांच्यापुढे पुढची वाटचाल करताना दुष्काळ हा प्रश्न डोकेदुखीचा असणार आहे. राज्यात पुढच्या सहा महिन्यांत 19 हजार गावांत दुष्काळ भीषण रूप धारण करणार आहे. दुष्काळी गावांची संख्या वाढणार आहे. अतुल देऊळगावकर यांच्यासारखे अभ्यासक या दुष्काळाची तीव्रता मांडत आहेत. पूर्व विदर्भात वर्धा जिल्हा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तर 1972 पेक्षाही भयावह दुष्काळ आताच जाणवू लागलाय. वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 341 गावांपैकी 1 हजार 49 गावांत पाणीटंचाईने भीषण रुप धारण केलंय. नागपूर विभागात 8 हजार पैकी 2 हजार गावं दुष्काळाशी झुंजत आहेत. अमरावती विभागात 7 हजार 350 गावं दुष्काळाच्या छायेत आहेत. ही शासनाची आकडेवारी आहे. वास्तव त्यापेक्षा जास्त विदारक असणार आहे. रोजगार, पिण्याचं पाणी, जनावरांचा चारा, शेतमालाचे भाव हे प्रश्न सरकारला सोडवावे लागतील.

मराठवाड्याचा पाणीप्रश्न या दुष्काळात पूर्वीपेक्षा जास्त पेटणार आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी धरणात 8 टीएमसी पाणी भंडारदरा धरणातून मुळा व प्रवरा या नद्यांच्या प्रवाहातून सोडण्यात आलंय. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात नेते-शेतकऱयांनी त्याविरोधात आताच निषेध मोर्चे काढायला सुरुवात केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याची पातळी सर्वात कमी झाल्याची नोंद करण्यात आली. सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. तेथील जमिनीतील पाण्याच्या तुटीचं पुनर्भरण झालं नाही, तर हा भाग वाळवंट बनू शकेल. विशेषतः भूम-परांडा, कळंब, बार्शी हा परिसर वाळवंट बनण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे सरकारच सांगू लागलंय. असे वाळवंट बनू शकणारे पट्टे बीड (आष्टी), अहमदनगर (कर्जत-जामखेड), सोलापूर (सांगोला), सातारा (माण-खटाव) या जिल्ह्यांतही तयार होत आहेत. वाळवंट बणण्याच्या तोंडावर असणाऱया या भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

या दुष्काळाशी फडणवीस सरकारला झुंजावं लागेल. त्या दृष्टीने त्यांचं मंत्रिमंडळ नागपूर अधिवेशनात शेतकऱयांच्या पदरात काय टाकतंय, हे दिसेल. ती मदत लोकापर्यंत कशी पोचते, ते बघावे लागेल. विदर्भात शेतकरी आत्महत्यांची, कर्जबाजारीपणाची समस्या मोठी आहे. या प्रदेशातून भाजपा 64 पैकी 44 आमदार निवडून आणता आले. याचा अर्थ भाजपकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी विदर्भ, मराठवाड्याला शेतकऱयांची स्मशानभूमी असं दुःखाने म्हटलं होतं. मरणाच्या दारात उभ्या येथील शेतकऱयांना भाजप-सेना सरकार कसा धीर देतं, हे दिसेल.

फडणवीस सरकारला मोदी-शहा यांच्याशी संवाद साधून, सेनेशी समन्वय करत पुढे जावं लागणार आहे. ही कसरत वाटते तेवढी सोपी नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री यांना चोंबाळून कारभार करणं कटकटीचं ठरणार आहे. सेनेच्या मंत्र्यांमध्ये दिवाकर रावते हे फडणवीस यांच्या जवळचे आणि ज्येष्ठ आहेत. त्यांची फडणवीस यांच्या जवळचे आणि ज्येष्ठ आहेत. त्यांची फडणवीसांना या कसरतीत मदत होऊ शकेल. रावते भाजपमध्ये मित्र जमवून आहेत. सेनेत उद्धव यांचे विश्वासू आहेत. शिवसैनिकांत प्रभाव ठेवून आहेत. फडणवीस मंत्रिमंडळात सेनेचा उपमुख्यमंत्री नसला तरी ती भूमिका रावते निभावत आहेत. भाजप-सेनेची बोलणी, सेनेचा सत्तासहभाग होत असताना हे दिसून आलंय.


फडणवीस सरकारचं सत्तांतर एका अभूतपूर्व राजकीय सामाजिक, आर्थिक परिस्थितीत झालंय. सन 1978 मध्ये जनता पक्षाच्या आमदारांची मोठी संख्या असताना जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एस.एम.जोशी यांनी 'पुढची 25 वर्षे ब्राम्हण मुख्यमंत्री होऊ शकत नाही' म्हणून स्वतः मुख्यमत्रिपदकडे पाठ फिरवली. शरद पवारांना मुख्यमंत्री केलं. त्या समाजपरिवर्तनाच्या विचाराला 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी छेद देत मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं. आता 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवरांनी बिनशर्त पाठिंबा देऊ केला. एस.एम.जोशींचे विचार बाळासाहेब ठाकरेंना मान्य नव्हते, हे उघड आहे, पण शरद पवारांनाही एस.एम.जोशी यांचे विचार पेलवले नाही की काय ? अशा विसंगतीपूर्ण अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. फडणवीस सरकारकडे त्यांचं कारभारीपण आलंय. तो कारभार गोळवलकरांच्या विचारांनी होणार की छत्रपती शिवरायांच्या, हे आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे.

राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

Friday, January 23, 2015

नथुरामजादे मनोरुग्ण आहेत काय ?















या लेखाचा मथळा महात्मा गांधी यांना अजिबात आवडला नसता. मलासुद्धा नथुराम गोडसेविषयी हा लेख लिहितान जाम कंटाळा आलाय. चावून चोथा झालेल्या एखाद्या विषयावर काय लिहायचे ? राष्ट्र हिंदू सभेचे नथुरामजादे लोक या माथेफिरुचे पुन्हा पुन्हा गोडवे का गातात ? त्याला देशभक्त म्हणून जाहीर करतात. उत्तर प्रदेशात मेरटला तर काहींनी नथुराम मंदिराचं भूमिपूजन केलंय. एक बरं, राज्य सरकारनं त्याला हरकत घेतली. अन्यथा मंदिर उभंही राहिलं असतं. कुणी सांगावं आत्तापर्यंत मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या असत्या. हिंदू महासभावाले नथुरामवर चित्रपट काढणार आहेत. त्याच्यावर बंदीची चर्चाही सुरु आहे. अजून चित्रपटाचा पत्ता नाही. बंदीची चर्चा मात्र जोरात सुरु आहे. नथुरामचे पुतळे उभे करण्याची मोहीम, मागणी सुरु आहे.

या साऱया प्रकारची जाम चीड येते. दुर्लक्ष करावं असं वाटतं, पण हे जे घडतंय ते साधं सरळ सोप्प नाहीये. म्हणून त्याकडे कंटाळा, दुर्लक्ष, चीड, निष्क्रियता या भावनांनी बघून चालणार नाही. नथुरामचं उदात्तीकरण हे एका मोठ्या राजकारणाचा कट आहे. जर्मनीचा क्रूर हुकूमशहा हिटलर याचा गोबेल्स नावाचा हिकमती प्रचारप्रमुख होता. आपल्या विचारांचा प्रसार कसा करावा याची त्याची काही सूत्र होती. 'बाजारात बोलणाऱयाच्या करड्या विकतात, मुखदुर्बलांच्या गव्हाकडेही कोणी पाहत नाही' अशी म्हण आपल्या गावात प्रसिद्ध आहे. गोबेल्सनं असंच तत्त्व मांडलं, त्याचे प्रयोगही करुन बघितले, खोटी मते, विचार, तथ्य पुन्हा पुन्हा सांगितले. कानीकपाळी आदळवून मांडली की ती काही काळाने खरी वाटू लागतात. समाज हीच मतं, विचार खरे मानतो. प्रसिद्धी माध्यमं, पुस्तकं, चित्रपट यातही ती खरी म्हणून स्थिरावतात. मग हाच विचार लोकांच्या मनाची पकड घेतो. इतिहास बनतो. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा परिवार हिटलर, गोबेल्स यांना देवासमान मानतो. त्यामुळे त्यांची गोबेल्सनीतीवर श्रद्धा आहे. गोबेल्सनीती वापरुन या परिवाराने समाजात असंख्य खोट्या गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिलेला, गुन्हेगार, भारतीय समाज त्याला माथेफिरु, वेडगळ समजतो त्या नथुरामाला देशभक्त ठरविण्याचा घाट, त्याची मंदिर उभारण्याचा उपद्व्याप हा गोबेल्सनीतीचाच एक भाग आहे. खरं तर 'नथुराम भारतातला आद्य राजकीय दहशतवादी आहे' असं कोर्टानं म्हटलंय. तरी त्याचं उदात्तीकरण, दैवीकरण का होतंय ?

हिंदूमहासभा, संघ परिवाराचा नथुरामचे भूत नाचवण्याचा खरा उद्देश महात्मा गांधींची बदनामी करायची हा आहे. गांधींचा दररोज खून करायचा. ते त्याला वध म्हणतात. अशी ही किडक्या मेंदूतली विकृती काम करीत आहे. या विकृतीतून हे सुरु आहे. हे लोक दररोज महात्मा गांधीजींची बदनामी, हरदिन खून करण्याचा प्रयत्न का करतात ?
'गांधी हत्या आणि मी' या पुस्तकाची थोर समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सखोल चिकित्सा केली आहे. हे नथुरामी लोक विकृत आणि कांगावखोर आहेत हे त्यांनी सप्रमाण मांडलंय. 'महात्म्याची अखेर' हे महाराष्ट्रातील थोर पत्रकार जगन फडणीस यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात नथुरामजादे आणि त्यांचे विचार चुकीचे आणि भंपक आहेत. त्यांचा गांधीद्वेष विकृत मनोवृत्तीचा भाग आहे हे उदाहरणासह मांडले आहे. वाचकांना हे पुस्तक उपलब्ध आहे.

'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचं उदाहरण घेऊ. शरद पोंक्षे या नटाच्या नाटकातला खोटेपणा ख्यातनाम संशोधक डाॅ. य. दि. फडके यांनी 'नथुरामायण' या पुस्तकात मांडलाय.

आज हे नाटक संघविचाराच्या संस्थांच्या पैशावर पुण्या-मुंबईत चालतंय. शरद पोंक्षे हा नट नथुरामाच्या आवेशात समाजात विविध मंचावर कार्यक्रमात मिरवत असतो. चॅनलवरच्या चर्चांमध्ये विचारवंताच्या आवेशात तो नथुरामची भलामण करीत असतो. महात्मा गांधींच्या बदनामीचा हा असा व्यवसाय करुन या नाटकामार्फत पोंक्षे पोट भरतात. याबद्दल खरं तर त्यांची कीव करावी अशी परिस्थिती आहे. पण यांना आपल्या या उपद्व्यापाची कधीही शरम वाटत नाही हे विशेष. ते स्वतःला सावरकरवादी म्हणवतात. त्यांनी फडके यांचे पुस्तक वाचलंय की नाही माहिती नाही.

कुरुंदकर, फडके, फडणीस यांच्यासह देशातल्या, परदेशातल्या अनेक पत्रकार, लेखक, विचारवंतांनी लिहून ठेवलंय की महात्मा गांधींसारख्या महामानवाला मारणाऱया नथुराम आणि त्यांच्या समर्थकांनी एका विकृत, फॅसिस्ट राजकीय विचाराने प्रेरित होऊन हे कृत्य केलंय. हे कृत्य मानव समाजाला काळिमा फासणारं आहे. जगाने ज्याला महामानव मानलं त्या महामानवाला कुणी मारलं हे चांगलं झालं असं कुणी म्हणत असेल, तो मारणारा थोर, देशभक्त, देव आहे अशी कांगावाखोरी करीत असेल तर त्याच्या माणूसपणाबद्दल शंका घेतली पाहिजे. त्यांचे मेंदू मनोरुग्ण तर नाहीत ना असा संशय घेतला पाहिजे. शुद्ध बुद्धी असलेला, संवेदना असलेला, माणूस म्हणून लाज असणारा माणूस नथुराम समर्थक बनू शकणार नाही.

कुरुंदकर, फडके, फडणीस यांनी सप्रमाण दाखवून दिलंय की, महात्मा गांधींची हत्या ते दलितांना चोंबाळत, कुरवाळत होते, मुसलमानांचे लाड करत होते, पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले म्हणून त्यांची हत्या झाली हे खरं नाही. हे प्रश्न यायच्या आधी गांधीजींवर संघ परिवारातील लोकांनी जीवघेणे हल्ले केले होते. खून करायचे प्रयत्न केले होते. एकदा तर प्रबोधनकार ठाकरे यांनीच गांधीजींच्या मारेकऱयांना दूर केलं होतं.

गांधीजींशी नथुराम समर्थकांचं खरं भांडण काय होतं ?

गांधीजी स्वतःला हिंदू म्हणवत. राम, कृष्ण, शिव यांना ते मानत असत. 'वैष्णवजन तो तेणे कहिए जो पीड पराई जान रे' असा वैष्णवपंथी मी आहे, असं गांधी म्हणत. गांधी गुजराथी बनिया होते. आताच्या भाषेत अोबीसी होते. उच्चवर्णीय नसलेला हा माणूस हिंदू समुदयाशी एकजीव झालेला होता. भारतातले सारे हिंदू गांधीजींना 'बापू' म्हणत. आपला प्रतिनिधी मानत. घरातला मोठा माणूस मानत. अखिल हिंदूंचा पुढारी, महात्मा, राष्ट्रपिता, महामानव असलेल्या मोहनदास करमचंद गांधींशी संघ परिवार, हिंदू महासभेचं भांडण सुरु झालं. कारण या संघटनांना हिंदूंचा एकगठ्ठा समुदाय एका मंचावर आणून 'आर्यावर्त' हे राष्ट्र उभं करायचं  होतं. मनुस्मृतीवर ते आधारित असणार होतं. बुडालेली पेशवाईच त्यांना अशा मार्गाने पुनर्जिवीत करायची होती. त्या राज्यात पुरोहितांच्या हातात सत्ता आणि बाकी समाज चातुर्वर्ण्यात सांगितल्याप्रमाणे ज्याच्यात्याच्या पायरीने वागणार होता. या आर्यावर्तात अल्पसंख्याक वठणीवर आणायची सोय होती. दलितांना त्यांची जागा दाखविलेली होती. स्त्रियांना दाबलं जाणार होतं. पण गांधीच्या मागचे हिंदू हटून संघ परिवाराच्या मागे आल्याशिवाय हे आर्यावर्त राष्ट्र कसं आकाराला येणार ? उलट 1920 ते 1948 या काळात चढत्या क्रमाने गांधीना हिंदूंचा पाठिंबा मिळत होता. ते म्हणवत होते, हा समाज अहिंसक बनवायचा. महिलांना सार्वजनिक जीवनात पुढे आणा. त्यांना बरोबरीने वागवा. सारे धर्म समान आहेत. एकोप्यानं नांदा. दलित-आदिवासींना हक्क मिळाले पाहिजेत. जाती निर्मूलन झाले पाहिजे. आंतरजातीय लग्न असेल तरच मी लग्नाला येईल. मी भंगीमुक्ती करेन. भारत स्वच्छ झाला पाहिजे. सर्व मुलं-मुली शिकली पाहिजेत. शेतकरी-कामगार-कष्टकऱयांचं राज्य येऊ द्या. मागासांना पुढे येऊ दे. जनसेवा हीच ईश्वरसेवा. गरिबात नारायण बघा. हा गांधीजींचा अजेंडा आर्यावर्तवादी संघ परिवाराच्या थोबाडीत मारणारा होता.

हा अजेंडा आर्यावर्ताचं स्वप्न धुळीस मिळवील हे संघ परिवारानं अोळखलं. आता भारतरत्न मिळालेले पं. मदन मोहन मालवीय, विनायक दामोदर सावरकर या हिंदू महासभेच्या नेत्यांना, संघ परिवाराच्या केशव बळीराम हेडगेवार, माधवराव सदाशिव गोवळकर यांना हा अजेंडा पटणे शक्य नव्हते. तिकडे मुस्लीम लीगच्या महंमद अली जिना यांच्या मनातही मुस्लीम राष्ट्राची कल्पना, स्वप्न होतं. त्यांना ईस्लामी राष्ट्र उभं करण्याच्या भावनेने घेरलं होतं.

गांधीपासून हिंदू समाज तुटेना, आर्यावर्ताचं स्वप्नं धुळीस मिळतंय हे पाहून गांधी विरोधकांना निराशेचा झटका आला. या झटक्यातून देशात गांधीद्वेष निर्माण झाला. तो एवढा की गांधींवर शस्त्र, शब्द हल्ले वाढले. वैयक्तिक अमाप बदनामी सुरु झाली. त्याचं टोक गाठलं गेलं, गांधी खउनाचा कट गोडस, करकरे, आपटे यांनीच तडीस नेला आणि गांधींचा दिल्लीत खून झाला. गांधींचे मारेकरी मराठी निघाले. मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी आपल्यातून शरीराने गेले.

या 30 जानेवारीला गांधीजींचा स्मरणदिन, हुतात्मा दिन आहे. देशात मोदिंच्या नेतृत्वाखाली उजव्यांची सत्ता आली. ही सत्ता येण्याचं एक वैशिष्ट्य आहे. मोदी टिमने सार्वत्रिक निवडणुकांआधी मिडीया, सोशल मिडीया पैशाच्या बळावर अंबानी-अदानीसारख्या पैसेवाल्यांच्या साथीने ताब्यात घेतला. मिडीयात गोबेल्सनीती वापरुन सामान्य मतदारांच्या मेंदूवर विविध प्रयोग केले. मतदारांच्या मेंदूला अच्छदिनाचं स्वप्न दाखवून, भुलवून त्यांचे हात मतदानाच्या दिवशी कमळाच्या बटणापर्यंत नेले. नवं तंत्रज्ञान, जाहिरातबाजी, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, इलेक्शन मॅनेजमेंट अशी साधनं हुशारीनं वापरली हे आता लपून राहिलेलं नाही.

तेव्हाच आता याच तंत्राचा वापर करुन गांधींच्या भारताला उखडून त्याचं रुपांतर आर्यावर्तात करायचे पुढचे प्रयोग सुरु झाले आहेत.

रामजादे, हरामजादे, नथुरामजादे, घरवापसी, बहु लाअो बेटी बचाअो, नथुराम मंदिर, 2021 पर्यंत ख्रिश्चन-मुस्लीम संपवायचे, स्कील इंडिया अभियान आणून गरीबांच्या पोरांना पुढे शिकू न देता फुटकळ रोजंदारी कामात गुंतवायचं, रेल्वेचं खाजगीकरण करायचं, स्वच्छतेवाला गांधी पुढे आणून क्रांतिकारक गांधीची वाट लावायची - म्हणजे पुन्हा एकदा खूनच.

हा सारा अजेंडा संघपरिवाराचा आहे. हा अजेंडा यशस्वी झाला म्हणजे आर्यावर्त राष्ट्र व्हायला मदत होईल. नथुरामने गांधीजींना मारुन पहिलं पाऊल टाकलं म्हणून नथुराम देशभक्त आहे. पण तो भारत देशाचा भक्त नाही. आर्यावर्त राष्ट्राचा भक्त आहे.

संघ परिवाराचं हे राजकारण तरुण पिढीच्या आता लक्षात येत आहे. नथुरामचे पुतळे बसवायची मागणी हिंदू महासभेने केल्यावर फेसबुकवर एक पोस्ट एका कार्यकर्त्याने टाकली ती अशी, 'कसा देशभक्त नथुराम? त्याला पिस्तूल चालवता येत होतं. पण त्याने ते इंग्रजांवर एकदाही चालवलं नाही. फकीरीवृत्तीने देशासाठी झिजणाऱया महान म्हाताऱयावर त्यानं ते चालवलं. छातीत तीन गोळ्या मारल्या. वा ! केवढा शूरपणा की भेकडपणा?'

फेसबुक, ट्वीटर हे सोशल मिडियाचे माध्यम वापरणारा तरुण वर्ग उत्साही असतो. त्यातल्या अनेकांनी नथुरामच्या ढोंगी देशभक्तीवर हलक्या भाषेत शेरेबाजी केली. उद्या यातले काही तरुण येत्या 30 जानेवारीला नथुरामजादे असलेल्या सर्वांचे मेंदू तपासा, त्यांची मानसोपचार चाचणी करा, नथुराम समर्थक मनोरुग्ण तर नाहीत ना ? याची सरकारने चाचणी करा अशी सवंग मागणीही करु शकतील. अशा शेरेबाज्या, मागण्या, प्रतिक्रिया यातून विषयाचे गांभीर्य़ जाऊ नये. कारण गांधीद्वेष करणारे एक गंभीर खेळ खेळत आहेत. जर्मनीत हिटलरने नाझी समर्थकांच्या मदतीने साऱया जर्मन राष्ट्राला वेड लावले होते. सारा जर्मन देश हिंसक, रक्तपिपासू, पुरुषी अहंकाराने पछाडलेला, विजयासाठी वखवखलेला, अपयशाच्या भितीने झोप पळालेला अशा जर्मन राष्ट्राची लक्षणं आपल्या देशात दिसताहेत की काय ?

राष्ट्रपिता महात्मा गांधींना हे बघून क्लेश झाले असते. त्यांनी सहिष्णू, अहिंसक, समतावादी, जात, धर्म, वर्ण, लिंग, भाषा भेद संपलेल्या भारत देशाचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न जर भंगलं तर या जमिनीवरील महात्मा गांधींच्या शेवटच्या अवशेषाचाही मुडदा पडेल.

राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

Wednesday, July 30, 2014

धनगर समाजातील धुमसता असंतोष





गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू   करा ही मागणी मूळ धरत होती. या मागणीला सत्ताधार्‍यांनी कायमच्या वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे धनगर समाजात असंतोष धुमसत आहे.

         बारामतीत गेल्या सोमवारी (21 जुलै) धनगर समाजाचे लाखो कार्यकर्ते, आंदोलक येऊन धडकले आणि त्यांच्या मागण्यांकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (र.ळ.) आरक्षण लागू करा ही मागणी मूळ धरत होती. आता पंढरपूर ते बारामती असा मोर्चा निघाला. त्या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद आणि त्यातून फुटलेला असंतोष यामुळे धनगर समाजाचे प्रश्न चर्चेला आले आहेत. या समाजाच्या डोक्यात राग का आहे?
        आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला असला तरी हा असंतोष खूप वर्षांपासून ठसठसत आहे. आपल्या राज्यातल्या गावगाड्यात मराठा, धनगर, माळी या मोठ्या जातींचा पगडा आहे. या तिन्ही जाती पूर्वी एकच होत्या हे महात्मा फुले यांच्यापासून तर परदेशी संशोधक गुंथर सोंथायमर यांच्यापर्यंत अनेकांनी नोंदवलं आहे. या तीन जाती व्यवसायामुळे विभागल्या. मराठा (शेती), माळी (भाजीपाला पिकवणं), धनगर (मेंढ्या, बकर्‍या पाळणं) अशा व्यावसायिक विभागणीमुळे या जातीतला बेटी व्यवहार बंद झाला. आजही गावगाड्यात त्यांची सामाजिक प्रतिष्ठा सारखी आहे.
           गेल्या साठ-सत्तर वर्षात गावगाड्यात मोठा बदल होतोय. मराठा समाज राजकीय सत्तेत स्थिरावलाय. माळी समाज व्यापार, राजकारण आणि इतर क्षेत्रांत शहरात प्रगती करतोय. या तुलनेत धनगर समाजाची फरपट पाहण्यासारखी आहे. राजकीय सत्तेत ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत वाटा नाही. शिक्षण, नोकर्‍यांत हिस्सा नाही. शेती, मेंढ्या, बकर्‍यांच्या व्यवसायात घाटा आहे. उद्योगासह प्रगतीच्या सार्‍या क्षेत्रात ‘नाही रे’ अवस्थेत हा समाज वावरतोय. आपल्याबरोबरचे सारे समाज पुढे जाताहेत आणि आपल्या वाट्याला भोपळा, घाटा येतोय ही भावना या समाजात बळावलीय. विशेषत: तरुणांमध्ये ही नकाराची आग भडकताना दिसतेय. 1990-95 नंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली माळी, धनगर, वंजारी (माधव) हे समीकरण मांडत धनगर समाजाला सत्तेत वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी लोकसभा निवडणुकीत धनगर समाज महायुतीच्या बरोबर दिसला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या नाकी नऊ त्यामुळे आले होते. जवळपास 1 कोटीच्या घरात लोकसंख्या असणारा हा समाज शंभर विधानसभांच्या मतदारसंघात उमेदवार पाडू किंवा निवडून आणू शकतो. हे महत्त्व ओळखून काँग्रेस-राष्ट्रवादीने नेहमी या समाजाला चुचकारले. बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ या मागणीचा समावेश केला होता. प्रचाराच्या रणधुमाळीत गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजाच्या हक्काचं आरक्षण देऊ अशी घोषणा अनेक प्रचारसभांत केली होती.
         अनुसूचित जमातीचं आरक्षण द्या या धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा मोठा असला तरी हे आरक्षण देण्यात कायदेशीर अडचणी आहेत. राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद केलीय. परंतु ‘धनगर’ आणि ‘धनगड’ अशा शब्दोच्चाराचा गैरफायदा घेत समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यात येतंय, हे धनगर समाजाचे नेते सांगत आहेत. मंडल आयोगाने धनगड आणि धनगर एकच आहेत असं म्हटलंय. 1955 मध्ये काका कालेलकर आयोगाने अहवालात धनगर समाजाचा राज्यनिहाय अनुसूचित जमातींच्या यादीत उल्लेख केलाय. मात्र राज्य सरकारने या समाजाला भटकी जमात (क) हे आरक्षण दिलं. ते 3.5 टक्के आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्याचा केंद्र पातळीवरच्या नोकर्‍यांत फायदा नाही. आता संविधानात तरतूद असल्याने आम्हाला थेट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, अशी अटीतटीची भूमिका बारामतीतल्या आंदोलनात घेण्यात आलीय. इतर राज्यात धनगड अनुसूचित जमातीत आहे. मग धनगरांना महाराष्ट्रात हे आरक्षण का नाही, हा त्यांचा सवाल आहे.
        राज्य सरकारने मंत्रिमंडळात धनगर समाजाला अनुसूचित जमातीत टाकण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करावी का, अशी चर्चा काढली. त्याला शिवाजीराव मोघे, मधुकर पिचड, पद्माकर वळवी या आदिवासी नेत्यांनी कठोर विरोध केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यास राज्यातल्या सर्व आदिवासी नेते, आमदार, खासदार, मंत्री यांचा विरोध आहे. ही आमच्या हक्कावर गदा आहे अशी या नेत्यांची भावना आहे. यापुढे या राज्यात धनगर विरुद्ध आदिवासी हे भांडण भडकेल याची ही चिन्हे आहेत. शिवाय राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केली तरी या विषयाला केंद्राची मंजुरी लागेल. मोदी सरकारच्या स्तरावर येणार्‍या अडचणी दूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन असं बारामतीत लाखो आंदोलकांना पंकजा मुंडे यांनी आश्वासन देऊन टाळ्या मिळवल्या. पण केंद्राकडून ही मागणी मंजूर करवून घेणं वाटतं तेवढं सोपं नाही. कारण मोदी सरकार आणि भाजपमध्ये आदिवासी खासदारांची लॉबी खूप मोठी आणि बळकट आहे. त्या तुलनेत धनगर समाजाचा एकही खासदार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे.
          मराठा समाजात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार हे नेते तयार झाले. माळी समाजात म. फुले ते छगन भुजबळ या नेतृत्वाने समाजाला पुढे नेण्यात   भूमिका बजावलीय. वंजारी समाजात भगवानबाबा हे आध्यात्मिक, सामाजिक संत झाले. गोपीनाथ मुंडे यांनी त्या समाजाला सत्तेत हिस्सेदारी मिळवून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला दिशा दिली. धनगर समाजात अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर यांच्यानंतर संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन दिशा देऊ शकेल अशा नेतृत्वाचा दुष्काळ राहिलेला आहे. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख हे सन्माननीय अपवाद आहेत. पण त्यांनी गरिबांच्या बाजूचं राजकारण केलं. त्यांना धनगर समाजाचा नेता कुणी मानत नाही. शिवाजीराव शेंडगे, अण्णा डांगे यांनी काही काळ सत्तेत पदं भूषवली. पण त्यांची कारकीर्द अल्पकाळ ठरली. आता अनिल गोटे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे हे समाजात काम करताहेत. पण त्यांची राजकीय ताकद, संघटन अल्प आहे. त्यामुळे प्रभाव कमी आहे. समाजाला खेचून दिशा देणारं, राजकीय भक्कम ताकद उभी करू शकणारं नेतृत्व आज या समाजात नाही हे वास्तव आहे.
          धनगर समाजाच्या पंढरपूरहून निघालेल्या यात्रेचा राग बारामतीत व्यक्त होणं याचा सांस्कृतिक, राजकीय पदरही समजावून घेतला पाहिजे. पंढरीचा लोकदेव विठ्ठल हे धनगर समाजाचं दैवत आहे. पंढरपूर हा केंद्रबिंदू पकडला तर त्याच्या अवतीभवती धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. पंढरपूरच्या शेजारच्या सर्व जिल्ह्यांत (सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद) धनगर समाजाची ताकद आहे. धनगरांचा राग बारामतीत व्यक्त झाला; कारण बारामती हे प्रस्थापित सत्तेच्या केंद्राचं प्रतीक आहे. बारामती परिसरात धनगर व मराठा समाज एकमेकांना भाऊबंद मानतो. बारामती तालुक्यात पंदेरे या गावात ही प्रथा लग्नसमारंभात आजही पाळतात. धनगर समाजानं शरद पवारांवर मोठ्या भावासारखं प्रेम केलं. त्यांना सतत साथ दिली. घरातला मानलं. तोच मोठा भाऊ मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देतो. मग आपल्याला का देत नाही हा राग आहे. आरक्षण मिळेल वा तो प्रश्न भिजत पडेल. पण आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा, विकासाचा मार्ग नव्हे. आदिवासी, दलितांना आरक्षण आहे म्हणून काही त्यांचा सर्वांगीण विकास झाला नाही. तो कसा होईल, याविषयी नवा विचार देणारे नेतृत्व धनगर समाजात कधी तयार होणार, नवा प्रगतीचा विचार समाजात कधी घुमणार, हा खरा प्रश्न आहे.     (पूर्व प्रसिद्धी - दिव्य मराठी ३० जुलै २०१४)



राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com

Monday, December 23, 2013

प्रिय नेल्सन मंडेला


















तुम्ही दवाखान्यात मृत्यूशी झुंजत असताना हे पत्र लिहिलं होतं. भारत सरकारने तुम्हाला १९९० मध्ये भारतरत्न किताब दिला तेव्हा तुम्ही भारतात आला होतात. त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. दूरदर्शनवर, वर्तमानपत्रात फोटोत पाहिलेलं तुमचं व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहतंय. वेगवेगळ्या रंगांच्या फुल्या, नक्शी असलेला फूल बाह्यांचा शर्ट, खिशाला दोन पेन अडकवलेले, बोलके डोळे, पांढरे कुरळे केस, मागे वळण दिलेले. चेहरा काळा, रापलेला, हसरा. हुबेहूब महात्मा गांधी जसं हसायचे तसं तुम्ही हसता आहात असं जाणवून गेलं होत. पुढे अनेकदा दूरदर्शनवर तुमचा दर्शन झालं की जाणवायचं कला माणूस किति सुंदर असतो. 

गांधीचा आणि तुमचा संबंध काही हास्यातले साम्यापुरता नव्हता. दक्षिण अफ्रिकेत तुम्ही गांधीजींची सामाजिक न्यायाची वंशभेदविरोधी लढाई पुडे नेली. तिचे वारस झालात. ती लढाई जिंकून दाखवलीत. द. आफ्रिकेला खंर स्वातंत्र्य मिळवून दिलंत. तिथला वंशभेद गाडला. गरिबी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. काळे व गोरे यांत समन्वयाची भूमिका रुजवली.

तुमचं सारं जगणं पाहिलं की कुणीही अचंबीत व्हावं असं आहे. १८ जुलै १९१८ रोजी द. आफ्रिकेतल्या मावेधा या गावी थिंबू कुटुंबात तुम्ही जन्मलात. थिंबूहे एक प्राचीन कृष्णवर्णिय जमातीचं नाव. तूमचं लहानपणीचं नाव झोसा. त्याचा अर्थ होतो, अडचण निर्माण करणारा. पण तुम्ही आयुष्यभर अडचणी असणाऱ्यांना मदत केली. नंतर तुमच्या गोत्रावरून तूमचं नाव मदिबा पडलं. प्रेमाने आजही तुम्हाला द. आफ्रिकेत नागरिक याच नावानं संबोधतात. तुमचे खापर पंजोबा थिंबू टोळीचे प्रमुख होते. केप प्रांतात या टोळीतले लोक राहतात. या खापर पंजोबाच्या एका मुलाचं नाव मंडेला होतं. त्या मंडेलांशी तुमचं नातं; तुमच्याही आडनावात मंडेला नाव आलं. 

तुमच्या कुटुंबात कुणी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आधी तुम्ही शिकलात. पुढे वकील झालात. जोहान्सबर्गमध्ये राहत असताना तुम्ही वसाहतवाद विरोधी आंदोलनात सहभागी झालात. त्यावेळी भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. अफ्रिकन नॉशनल काँग्रेसच्या झेण्ड्याखाली तुमचा स्वातंत्र्य लढा सुरु होता. या पक्षाच्या यावक आघाडीचे सदस्य म्हणून काम सुरु केलं आणि हळूहळू तुम्ही नेते बनलात. 

चळवळीत तुमच्यावर कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा पगडा बसला. महात्मा गांधी यांचे विचारही तुम्हाला पटले. मार्क्स आणि गांधी या दोघांच्या विचारांचा समन्वय करत तुम्ही लढत राहिलात.

वसाहतवादी ब्रिटीश गोरयान्च तुमच्या देशावर वर्चस्व होतं. हे गोरे लोक व द. अफ्रिकन नागरिकांना लोकशाही हक्क नाकारत होते. रंगावरून भेद करत होते. कृष्णवर्णीयांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना सन्मानानं जगता यावं हा तुमचा आणि सहकाऱयांचा अट्टाहास होता.

1962 साली तुम्हाला वसाहतवाद विरोधी आंदोलनात अटक झाली. जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर 27 वर्षे तुम्ही तुरुंगात होतात. हालअपेष्टा भोगून तुम्ही तुरुंगातून स्वातंत्र्याची लढाई लढलात. तुमच्या सुटकेसाठी जगभरातून दबाव आला. मग कुठे वसाहतवादी गोरे नमले. 1990 साली तुमची सुटका झाली. तुरुंगानं तुम्हाला नवा जन्म दिला. उजळून टाकलं. तुम्ही बाहेर येताच दक्षिण अफ्रिकेचे नेते बनलात. सवर् पक्ष तुमच्या भोवती उभे राहिले. तुम्ही आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झालात. त्याच काळात तुमचं आत्मचरित्र प्रकाशित झालं. तुमचे तुरुंगातले दिवस आणि चिंतन जगभराच्या लोकांनी अधाश्यासारखं वाचून काढलं.

त्यावेळी द. आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डब्ल्यू क्लकर् हे गोरे होते. त्यांच्याशी तुमच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या. 1994 साली नव्याने निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पहिल्यांदा कृष्णवणीर्य नागरिकांना मतदान करता आले. तुम्ही प्रचंड मतांनी जिंकलात. त्यानंतरच्या राष्ट्रीय संकटात तुम्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष झालात. 10 मे 1994 ते 14 जून 1999 अशी पाच वर्षे तुम्ही कारभार केलात. 

पाच वर्षाच्या काळात तुम्ही द. आफ्रिकेचा स्वप्नवत कायापालट केला. नवी राज्यघटना लागू केली. सत्य आणि समन्वय हे तुमच्या कारभाराचं सूत्र होतं. जमीन सुधारणेचा महत्त्वाचा क्रांतिकारक कार्यक्रम तुम्ही राबवला. गरिबीविरुद्ध युद्ध पुकारलंत. प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा ही तुमची घोषणा गाजली. त्याचा खेडोपाडी नागरिकांना लाभ मिळाला. जगभरात तुमच्या कार्यामुळे तुम्ही मान्यता पावलात. पाच वर्षांची कारकीर्द संपल्यानंतर दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यास तुम्ही नकार दिला. नव्या लोकांना संधी दिली. सत्तेच्या मायाजालाला नकार देणं हे मोजक्या मोठ्यांना जमतं. सारे मोठे नेते या मार्गाने जात नाहीत. या बाबतीतही तुम्ही गांधीजींचे वारस ठरलात.

तुम्ही 1999 नंतर राजकारणातून निवृत्ती घेतलीत. सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वयंसेवी संस्था काढून काम सुरु केलं. गिरीब निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु ठेवलेत. आरोग्य सेवा लोकांपर्यंत नेण्याचा खटाटोप केला. 1983 साली तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळाला. रशियाने तुम्हाला आॅर्डर आॅफ लेनीन हा किताब दिला. द. आफ्रिकेने तुम्हाला राष्ट्रपिता हा किताब देऊन तुमचं ऋण मान्य केलं. तुम्हाला जगभरातले एकूण अडीचशे पुरस्कार मिळाले. महात्मा गांधी गेल्यानंतर त्यांचा अंश आपल्या आहे हे समाधान तुमच्याकडे बघून मिळायचे. द. आफ्रिकेचा पहिला काळा अध्यक्ष झाल्यावर तुम्ही म्हणालात मी लोकशाही समाजवादी आहे. तेव्हा भांडवली जगाने चमकून बघितलं कुणी कुत्सितपणे हसलं, कारण तो काळ जागतिकीकरणाच्या आरंभाचा होता. साम्यवादी रशिया कोसळला होता, समाजवादी देशांची पीछेहाट झालेली होती, क्युबा आणि फिडेल कॅस्ट्रो दोघेही थकले होते. चीनने वेगळी वाट निवडली होती.

गांधीजींच्या भारतात शायनिंग इंडियाचे वारे जोरात होते. अमेरिकेकडे आणि तिथल्या भांडवलाकडे, त्या भांडवलाच्या नियंत्रणकर्त्यांच्या इशाऱयाकडे भारतीय राजकर्त्यांचे डोळे लागले होते. त्या इशाऱ्यावर इथली  अर्थव्यवस्था विकासाकडे हलत होती. अशा वेळी तुम्ही समाजवादाचा नारा देणं, समाजवादी जग शक्य आहे असं म्हणणं मोठे धाडसाचं होते.

तुम्ही धाडस दाखवलंत. कारण हरणं तुम्चाय सारख्यांना मान्य होणारच नाही. जगभरचे गरीब जिंकले पाहिजेत हाच तुमच्या लढाईचा गाभा होता. तुम्ही मार्क्स स्वीकारलात पण पोथी नाकारलीत. मार्क्सचा विचार दररोज नवा होत असतो. पोथी शिळी होत जाते हे तुम्ही दाखवून दिलंत. सक्रिय असेपर्यंत तुम्ही गांधींसारखेच एकटे पडला नाहीत. कंपू, डबके करुन राहिला नाही, वावरला नाहीत. जनप्रवाहाच्या मध्यभागी तुम्ही आणि लोक तुमच्या भोवती राहिले. लॉंग वॉक टू फ्रिडम आणि प्रेसिडेन्शीयल इयर्स ही तुमची दोन पुस्तकं गाजली. या दोन्ही पुस्तकांत तुम्ही जे जगलात आणि जसा विचार केला तसं चिंतन, जीवनानुभव तुम्ही मांडला. तुमचं नव्या जगाचं स्वप्न या पुस्तकामध्ये आलंय. नवा माणूस घडविण्यासाठी तुमचे प्रयत्न त्यात मांडलेत.

निर्भय जगावं कसं हे तुमच्यासारख्या माणसांकडून शिकावं. 27 वर्षे तुरुंगवास म्हणजे साधासुधा काळ नव्हे. या काळात तुम्ही द. अफ्रिकन माणसाच्या मुक्तीचा विचार जिवंत ठेवलात. तुरुंगातून अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा दिलीत.

तुमचं प्रत्यक्ष जीवन म्हणजे समाजवादी विचाराची एक कृतीच. तुमचा साधेपणा, काम करणं, कार्यकर्त्याशी असणारा सद्भाव याला तोड नाही. तुम्ही कौटुंबिक जीवनही समृद्ध जगलात. तीन पत्नी व तीन अपत्य. त्या प्रत्येकाला तुम्ही न्याय दिला. तुम्ही तीन लग्न केलीत, निभावलीत. आमच्या देशात हे ऐकून  लोक नाकं मुरडतील, पण तुमच्या समाजात ती प्रथा आहे. शिवाय तिन्ही पत्नींना तुम्ही बरोबरीनं वागवलंत. त्यांच्या व्यक्तिविकासाला पूरक ठरलात. दुसाऱ्या पत्नी विनी मंडेला यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरवर्तणुकीचे आरोप झाले, तुम्ही नीतिमान वागणं, भ्रष्ट न होण्याच्या बाजूचे कट्टर समर्थक. तरीही विनी मंडेला जोपर्यंत भ्रष्टाचारी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत मी तिच्या बाजूला अशी भूमिका तु्म्ही घेतलीत. त्या भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध झाले आणि तुम्ही विनींचा पाठिंबा काढून घेतला. 

आता जगभर तुमच्यासारखी माणसं कमी राहिली आहेत. मार्क्स, गांधी, लेनीन यांच्या परंपरेतले तुम्ही आमच्यासाठी कायम प्रेरक शक्ती म्हणून वावरलात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लढणाऱया माणसाला तुम्ही आधार वाटत आलात.

तुम्ही दिलेला लढाईचा वारसा सर्व काळी, सावळी, गोरी मुलं अभिमानानं मिरवतील असा आहे.

jepee keÀeboUkeÀj
rajak2008@gmail.com

Tuesday, October 15, 2013

डॉक्टर, तुम्ही म्हणालात, नुसतं लिहू नको!













डॉक्टर, तुमच्या संबंधीची भयंकर बातमी कळाली. एसएमस येत गेले. आमदार कपिल पाटील यांचा फोन आला. खात्री झाली. भोवती भूकंप होत आहे असं जाणवलं. कपिल पाटील, संभाजी भगत, येशू पाटील, जयवंत पाटील यांच्या सोबत साताऱ्याला तुमच्याकडे निघालो. मनात तुच्यासंबंधीच्या आठवणी, विचार घोंघावत होते. तुमची साधनाच्या कार्यालयातली भेट टक्क समोर उभी राहिली. तुम्ही साधना मिडिया सेंटरच्या वरच्या मजल्यावरच्या साधनाच्या ऑफिसमध्ये बसला होता. समोर प्रा. ग. प्र. प्रधान सर होते. बाजूला प्रा. रा. ग. जाधव सर होते. तुम्ही म्हणालात, ये.... ये.... बस... अगोदर जुजबी भेटलो होतो. त्या भेटीत तुम्हाला कळलं होतं, हा जर्न्यालिझमचा अभ्यासक्रम रानडे इन्स्टिटयूटमध्ये शिकतोय, काही बाही इकडे तिकडे लिहितोय. तुम्ही प्रधान सर, जाधव सरांना म्हणालात, हा राजा कांदळकर. संगमनेरचा आहे. चांगलं लिहितो बर का? शिवाय वाचतो चांगलं. चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये फिरतो.अरे व्वा! चांगलं आहे, प्रधान सर म्हणाले होते तेव्हा.
तुमची ही खास पध्दत असावी. तरूण मुलाला आत्मविश्वास देण्याची. खरं म्हणजे मी काही तेव्हा फार लिहिलं नव्हतं. चळवळीतल्या लोकांमध्ये चाचपडत होतो. तरी तुम्ही मला चांगलं लिहितो असं म्हणालात. आज त्याच महत्व कळतयं. डॉक्टर या तुमच्या त्या शाबासकीच्या थापेनं खूप आत्मविश्वास दिला होता. त्या भेटीनंतर तुम्ही मला साधना परिवारात घेतलं. येत जा, म्हणालात. भेटलात की विचारायचा, काय विषय डोक्यात  आहे!

एकदा म्हणालात, गोसी खूर्द परिसरात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे. जातोस का तिकडे? विदर्भात आहे. नागपूरला जा. सुभाष लोमटे, विलास भोंगाडे यांचा त्यात पुढाकार आहे. त्यांच्याशी संपर्क कर. ग्राऊंड रिपोर्ट साधनासाठी लिही. तुम्ही माझ्या मागेच लागलात. संंबंधितांचे फोन दिले. मला पाठवलं गोसी खुर्दला. आंदोलनाचा रिपोर्ट साधनात छापला. पुढे भेटल्यावर सगळयांना सांगत सुटलात याने गोसी खुर्दचा रिपोर्ट फार चांगला लिहिला.

तुम्ही हे करत होतात त्यातून मला किती उर्जा मिळत होती. म्हणून सांगू डॉक्टर! तुम्हाला माझ्याबददल सगळं माहित होतं.... हा मुलगा खेडयातला आहे. शेतकरी घरातला आहे. पुण्यात शिककतोय पण गांगारलेला आहे. शेतकरी घरातला आहे. याच्या मनात गोंधळ आहे. पुढे कसं जावं, काय करावं हे याला स्पष्ट नाही... घरात वाचनाची लिहिण्याची परंपरा नाही. विचार करण्याची परंपरा नाही... अनेक दोष आहेत... मलाही ते जाणवत होतं. पण तुम्ही कधी त्या दोषांबददल बोलला नाहीत. सतत पुढे ढकलायचा प्रयत्न करत होतात.

त्यावेळी साधना साप्ताहिकात तुम्ही अनेक प्रयोग करत होतात. युवा संपादक निवडून त्यांच्यामार्फत काही विषयांवर अंक काढावेत ही तुमची कल्पना होती. माझ्यासारखेच तुमच्याकडे मंजिरी घाटपांडे, प्रसाद मणेरीकर हे यत असत. तुम्ही एकदा तिघांना एकत्र बसवून म्हणालात तुम्ही तिघं युवा संपादक व्हा. काही अंक संपादीत करा. वेगवेगळे नवे विषय त्यात आणा. काही जणांना लिहायला सांगा. आम्ही तिघांनी काही अंकांचं संपादन केलंही. त्याचं तुम्ही भरपूर कौतुक केलं. दोष मात्र उगाळत बसला नाहीत.

असंच एकदा तुम्ही म्हणालात आजचे युवक काय विचार करतात. त्यांची जीवनशैली कशी आहे. याबददल तुम्ही एक विशेषांक काढा. तेव्हा विनोद शिरसाठ आणि मी तुमच्याकडे येत होतो. सारीका शिंदे कधी कधी यायची.  तिघांवर  तुम्ही जबाबदारी सोपवली. विशेषांक निघाला. त्याचं प्रकाशन निखिल वागळेंच्या हस्ते केले. साधना सभागृहात कार्यक्रम घडवून आणला. अंक संपादन, प्रकाशन कार्यक्रम सगळं सुरू असताना तुम्ही मोकळेपणाने आम्हाला वावरू देत होता. शाबासकीची थाप देत होता. करा रे. होईल चांगलं... असं बिनधास्त प्रोत्साहन देत होता.

पुढे विनोदला तुम्ही तरुणांच्या विचार विश्वावर लाटा-लहरी हे सदर लिहायला लावलं. त्याच्या मागे लागून अक्षरशः लिहून घेतलं. पहिल्यांदा विनोदच्या मनात कसं लिहावं याविषयी दवीधा होती. मला तुम्ही सारखं बजावायचं, विनोद चांगला लिहिलं. त्याच सांग. लिही म्हण. मग मीही विनोदला गळ घालायचो. ते सदर चांगलं झालं. सर्वांना आवडलं.

हे सर्व करण्यामागे तुमचा हेतू स्पष्ट होता. साधनेत तुम्ही एका बाजूला मान्यवरांना लिहितं करत होता. तर दुसऱ्या बाजूला नवे लोक हेरून  त्यांना साधनेशी जोडत होता. धडपडणाऱ्या, लिहिणाऱ्या मुलांचं तुम्हाला खूप कौतुक आहे असं दिसायचं. अनुभवाला यायचं इथे तुमची नाळ मला साने गुरूजी आणि यदुनाथ थत्ते यांच्याशी जोडलेली दिसत होती. धडपडणारी लिहिती मुलं, माणसं  तुम्ही साधनेकडे अक्षरशः खेचून आणत होतात. तुम्ही कबडडीपटू संघात अव्वल दर्जाचे कॅचर होतात, असं ऐकून होतो. मला साधनेत नव्या लोकांना पकडून तुम्ही लिहीतं करत होता तेव्हा तुमचं कॅचर असणं अनुभवाला येत होतं.

पुढे मी मुंबईत आलो. माध्यमांत कार्य करत राहिलो. मुंबईत आलात की, तुम्ही फोन करायचाच. अंधश्रध्दा निर्मूलन कायदयासाठी मंत्रालयात फेरी मारायचा. अनेकदा तुमच्या बरोबर मंत्रालयात वावरायचो. मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडे तुम्ही या कायदयाचा विषय, त्याचा पाठपुरावा करताना पहायचो. या लोकांच्या अपॉइन्टमेंट मिळण्यात अडचणी येत. मुख्यमंत्र्यांना भेटताना नाकी नउ येत तुमच्या. एकदा अविनाश पाटील आणि तुम्ही होतात. मुख्यमंत्री  भेट होत नव्हती. विधीमंडळाचं अधिवेशन चालू होतं. अर्धा दिवस तुम्ही विधीमंडळ परिसरात हिंडत होता. तरी तुम्ही न चिडता पाठपुरावा करत होतात. म्हणायचा, त्यांचीही महत्वाची कामं असतात. आपण धीर धरला पाहिजे. लोकप्रतिनिधी, नोकरशहा यांना कळत होतं का?

मुंबईत तुम्ही भेटायचा तेव्हा नवं काय लिहितोय, काय वाचतोय असं विचारायचा. पुढे माझी काही पुस्तकं प्रकाशित झाली. एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रावसाहेब कसबे यांच्या उपस्थित पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात होता. तुम्ही विनोदला घेवून कार्यक्रमात आलात. तिथही शाबासकीची थापं दयायला विसरला नाहीत. चष्मयाच्या आडून तुमचे डोळे कौतुकानं बघत होते. नंतर तुम्ही म्हणालात, लिहित राहा. पण नुस्तं लिहू नको. लोकांत फिर. खूप वाच. आणि लढं.... तुम्ही काय म्हणत होता हे आज कानात सारखं घुमतंय. त्याचं महत्व कळू लागलंय याची भीषणता अनुभवत होतो. मंडपात अनेक कार्यकर्ते सैरभैर झालेले पाहत होता. काही रडत होते, काही फुंदत होते. काहींच्या डोळयात नुसते पाणी. काही सुन्न... तेव्हा आठववलं तुम्ही आणि सुभाष वारेंनी मला एकदा सांगितलं महाराष्ट्रभरातल्या काही कार्यकर्त्यांवर तू लिही. त्यांना भेटायचं त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. त्याच्याशी जोडलेल्या लोकांशी चर्चा करायची आणि लिहायचं. तुम्ही उत्साहाने यादी काढली. दत्ता इस्वलकर, प्रतिभा शिंदे, सुबोध मोरे, किशोर ढमाले यांच्यावर मी लिहिलं. तुम्ही म्हणायचा, आत्ताचा काळ चळवळींसाठी विपरित. कार्यकर्ते एकाकी आपल्या कार्यक्षेत्रात लढत आहेत. त्यांना उभारी देणं हे साधनेचं काम. तुम्ही अनेकांना ही उभारी देत होतात.  म्हणूनच तुम्ही गेलात आणि कार्यकर्त्यांना पायाखालची जमीन खचल्यागत वाटलं.

मी काही मोठा लेखक नाही पण तुम्ही साधनेच्या एका कार्यक्रमात मला बोलण्यासाठी बोलावलं. अभिमानानं उपस्थितांना सांगितलं., राजा हा साधनेचा लेखक.

साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देवून निघालो तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक!

साताऱ्यात तुमच्या पार्थिवाला अखरचा निरोप देवून निघालो. तेव्हा कानात शब्द घुमले, हा साधनेचा लेखक! केवढा मोठा विश्वास तुम्ही दाखवला होता. मी अगदी नवखा लिहिता होतो तेव्हा तुम्ही मला उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं रिपोर्टींग करायला पाठवलं. हातात मुबलक पैसे दिलेत. कसं जा, कुठं रहा. कुणाशी बोल. काय विषय कव्हर कर, हे लहान मुलाला बोट धरून शिकवावं तसं सांगितलं. पुन्हा पाठीवर थाप. खांदयावर मायेनं हात ठेवून छान कर सगळं असे प्रोत्साहन!

गुजरातची विधानसभा निवडणूक तर तेव्हा ऐतिहासिक होती. दंगे नुकतेच झाले होते. माणसं मारली, कापली, जाळली गेली होती. सगळा गुजराती समाज खदखदत होता. दुःखाने आणि द्वेषानेही. तेव्हा तुम्ही म्हणालात, अशा काळात पत्रकाराने समाजात जावं. समाज क्रायसिसमध्ये, विसंगतीत जास्त कळतो. तू जा गुजरातमध्ये, समजून घे, रिपोर्टींग पाठव. लोकांना वाचायला आवडेल. गुजरातमध्ये नथुराम प्रवृत्तीनं केलेला हैदोस जवळून पाहत आला तो तुमच्यामुळेच. द्वेषाची विचारसरणी समाजावर हावी झाली की काय होवू शकतं हे अनुभवलं तेव्हा आणि आता द्वेषाच्या प्रवृत्तीनचं तुमचा घात केला. आता कळू येतंय, तुम्ही मला लिहितं करता करता काय काय पेरत होतात माझ्यात. माझ्या सारख्या अनेकांत. म्हणजे या समाजात.... तुमही या जमिनीत पेरत होतात नव्या नागरिकांचं बी. नवे नागरिक ज्यांचा हिंसेवर विश्वास नाही. भारताच्या राज्यघटनेवर ज्यांची श्रध्दा आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य, सामाजिक न्याय यांच्यावर ज्यांचा भरोसा आहे असे नागरिक. डॉक्टर, तुम्ही गेला आणि ते बीज तरारलेलं दिसलं. महाराष्ट्रात. तुमच्या हत्येची बातमी ऐकूण हा समाज निषेध करत रस्त्यावर आला तुमच्यासाठी.... तुम्ही पेरलेल्या मुल्यांसाठी... लोक म्हणाले, तुम्ही अमर आहात. तुम्हाला कोण मारू शकेल!

- राजा कांदळकर 
rajak2008@gmail.com